सुजित निकाळजे (Sujit Nikalje)
१ जानेवारी हा दिवस सर्वांच्या जीवनामध्ये नवीन वर्ष घेऊन येणारा दिवस, नवीन अशा, अपेक्षा, प्रेरणा, संकल्प यांच्या समवेत येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत आणि गेलेल्या वर्षाला निरोप देत सर्वजण आनंद साजरा करतात. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मजात लाखो अनुयायी आणि त्यांच्या विचारांना व आचारांना आत्मसात करून अंगीकरणारे लाखो अनुयायी १ जानेवारी या दिवसाला “विजय दिवस” किंवा “शौर्य दिन” काही वर्षांपूर्वीपासून तो दिवस ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. दिनांक १ जानेवारी १९२७ रोजी या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन मृत असलेल्या विजय स्तंभाच्या इतिहासाला जागृत करून दबलेल्या ,पिछाडलेल्या विचाराने मोडकळीस आलेल्या अस्पृश्य वर्गामध्ये स्पुर्ती यावी यासाठी लोकांना जागृत केले व तुम्ही दीनदुबळे नसून तुमचाही इतिहास गौरवशाली आहे हे दाखवून दिले व नव्याने इतिहासाची जागृती केली. इतिहासात १ जानेवारी १८१८ रोजी ५०० अस्पृश्य सैनिकांनी ब्रिटिशाना बराच काळ अशक्य असणारा पेशवाई वरील विजय मिळवून दिला. पेशवाई मध्ये अस्पृशांवर झालेल्या अत्याचाराला बाली पडलेले लोक होणारे अत्याचार असह्य झाल्यानंतर मृत्यूची तम न बाळगता, मरणाची भीती न बाळगळता स्वतःच्या गुलामी विरुद्ध लढले आणि त्यांनी पेशव्यांच्या सैन्यावर विजय मिळवला. याच्या सन्मानार्थ भीमा नदीच्या काठावर कोरेगाव (वाढू) या ठिकाणी विजयस्तंभाची उभारणी करून त्या सैनिकांचा गौरव केला.
१ जानेवारी २०१८ या घटनेला २०० वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी या इतिहासाची अजरामरता जगभर पसरवून त्याचा प्रचार प्रसार केला म्हणूनच जगभरातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोक आले होते. मागील काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी हा दिवस विजय दिवस, शौर्य दिवस आणि प्रेरणा दिवस म्हणून विजय स्तंभाला अभिवादन करून साजरा करत होता, गेल्या पंचवीस वर्षांपासून याची व्याप्ती मोठी होत गेली असून गेल्या १० वर्षांपासून लोक मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यात सहभागी होत होते, त्यावेळी पुणेकरांनां व भीमा कोरेगाव (वढू) मधील लोकांना त्याचा अभिमान वाटत व या ऐतिहासिक दिवसाबाबत कोणाच्याही मनामध्ये द्वेष भावना नव्हती. गावामधील लोक स्वतःचा व्यवसायाचे दुकाने व गाडे याचं दिवशी मांडून लोकांची सेवा करत होते. या गावाची ग्रामपंचायत या कार्यक्रमात सहभागी होत होती कारण हि बाबा ऐतिहासिक असून त्याचा जगाने स्वीकार केल्यामुळे गावकरीही आनंदाने हा दिवस साजरा करत असे. या पार्श्वभूमीवर ” भीमा कोरेगाव विजय स्तंभ समिती” या स्तंभासाठी व त्याची ऐतिहासिक जपवणूक करण्यासाठी सतत महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा व संघर्ष करत होती, त्यामुळे बौद्धांच्या व आंबेडकरांच्या इतिहासाचा विसर पडलेल्या महाराष्ट्र शासनाकडून सतत पाठपुरावा करून या स्तंभा भोवती असणारे अतिक्रमण हटवून या ठिकाणी इतिहास जिवंत रहावा याचा अतोनात प्रयत्न केला आणि त्या गोष्टीला २०१७ या वर्षांमध्ये यश प्राप्त झाले.
या पार्श्वभूमीवर नदीच्या दुसऱ्या बाजूला कोरेगाव (वढू) या गावामध्ये घडलेल्या दुसऱ्या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख गेल्या काही वर्षांपासून होत असून, त्या ठिकाणी असणारी छत्रपती संभाजी राजे यांच्या समाधीची आणि त्यासाठी आहुती देणारे गोविन्द गायकवाड यांची समाधी. या पूर्वीच्या इतिहासात नामशेष झालेल्या दोन्ही गोष्टींची इतिहासकारांनी उजेडामध्ये आणून त्याचा प्रसार-प्रचार केला. छत्रपती संभाजी महाराजांची दूषित झालेली प्रतिमा काढून ते शूर-वीर, आज्ञाधारी होते अशी खरी प्रतिमा लोकांच्या समोर मांडली. भारत देशामध्ये इतिहासाचे विकृती करून सांगण्याचा व त्याचा प्रसार करण्याचा इतिहास फार जुना असून या देशातील कित्येक बौद्धकालीन लेण्यांवर देव-देवतांचे मंदिर स्थापण्यात अली असून, कित्येक गुफा व ऐतिहासिक ठिकाणांकडे मोठया प्रमाणात शासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या सर्वांच्यापाठीमागे ब्राह्मणी विचारधारा कार्यरत असून इतिहासाचे विकृतीकरण करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, इतर जातींवर स्वतःचा पगडा टिकवण्यासाठी, सत्ता- संपत्ती राखून ठेवण्यासाठी सतत वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून कार्यरत असते. आजही इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या दुष्ट हेतूने ब्राह्मणवादी संगठनांनी व अनुयायांनी कट-कारस्थान रचून १ जानेवारी २०१८ रोजी इतिहासात अजरामर असणाऱ्या महार या जातीच्या शौर्याच्या व धैर्याच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा अतोनात प्रयत्न केला. यासाठी प्रथम त्यांनी १ जानेवारी च्या अगोदर गोविंद गायकवाड यांच्या योगदानाचा व शौर्याचा इतिहास खरा नसून (त्याची मोडतोड करून) आम्ही त्याबाबत याचदिवशी याच गावामध्ये सभा आयोजित करून सांगणार आहे असे जाहीर केले, त्यानंतर लगेचच गोविंद यांच्या समाधीची अवहेलना करून त्याची मोडतोड करण्यात आली. हे कळल्यानंतर काही गावातील भीमसैनिकांनी मोडतोडीत सामील असणाऱ्या गाव गुंडांची व बाहेरून आलेल्या त्यांच्या साथीदारांची तक्रार नोंदवून त्यांच्यावर अट्रॉसिटी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याचा द्वेष मनामध्ये बाळगून बहुसंख्येने मराठा समाज राहत असणाऱ्या या गावामध्ये एका विकृत व जातीयवादी माणसाने गावकऱ्यांची डोकी भडकावून १ जानेवारी हा कार्यक्रम होऊ न देण्याचे ठरविले त्यासाठी ग्रामसेवक आणि गावाचा प्रथम नागरिक ‘सरपंच’ यांना हाताशी धरून तसा आदेश पारित करून शासन दरबारी पाठवला आणि गावामध्ये फेरी काढून १ जानेवारीला बाहेरून येणार्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध होऊ नये यासाठी गावामधील दुकाने बंद करण्यास लावली आणि या दोन्ही समाजामध्ये पद्धतशीर तेढ पसरवली. वास्तविक या दोन्ही इतिहासाला प्रकाशमय करण्याचा उद्देश असा होता कि, यापूर्वी छत्रपती संभाजी राज्यांचा खोटा इतिहास सांगून ब्राह्माणवाद्यांनी त्यांच्या कार्यावर टाकलेला पडदा उठवून मराठयांच्या राजदरबारी सर्व जातीच्या लोकांनी केलेले योगदान प्रकाशमय करून या दोन्हीजातीमध्ये निर्माण झालेली तेढ संपवण्यासाठी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांनां प्रेरणा मिळावी या माणूसपणाच्या बंधुभावाच्या भावनेतून केलेला होता. मात्र कार्य इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी व याच १ जानेवारी या दिवसाला गालबोट लावण्याच्या दुष्ट हेतूने गावामधील गावगुंडांच्या मदतीने दंगलीचा कट रचून तो यशस्वी करण्यात आला.
दिनांक २ व ३ या तारखेला महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले आणि भावनिक असणारे लोकांनी रास्तारोको आणि महाराष्ट्र बंद च्या माध्यमातून १ जानेवारी २०१८ रोजी केलेल्या मोडतोड, दगडफेक, हल्ला या गोष्टी बेकायदेशीर असून शासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी यासाठी सनदशीर मार्गाने निवेदने देण्यात आली, या घटनेमध्ये जखमी झालेले, बळी पडलेले आणि घाबरून गेलेल्या लोकांच्या जवळच्या लोकांनी काही प्रमाणामध्ये उद्रेक करून या देशातील शासनाला, प्रशासनाला, राजकीय प्रतिनिधींना, मुख्य प्रवाहातील वृत्त वाहिन्या व वृत्तपत्रे यांचे लक्ष वेधून घेऊन न्यायाची धाड घेतली. यानंतर लगेचच ४ जानेवारी २०१८ पासून महाराष्ट्रातील बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिक्षित, मध्यमवर्गीय लोकांना माणूसपणाचे डोहाळे लागले आणि त्यांच्या जवळच्या सोशल मीडियाचा वापर करून जातिप्रथा वाईट आहे, जातीय दंगली वाईट आहेत, रंगाचे राजकारण वाईट आहे, “मी जात, धर्म, पंथ सोडून आज माणूस झालो”, “काल बस, एस. टी., रेल्वे थांबविणारे आज त्याची वाट बघतायत” या व अश्या आशयाचे अनेक लेख, चारोळी, कविता या माध्यमातून माणूसपणाच्या डोहाळ्यांना ऊतू आला होता. खरंतर हि एकात्मतेची भावना कायम स्वरूपी आचरणात असावी याचा कोणी विचार करीत नाही. हे डोहाळे ज्यांना लागले आहेत ते काही महत्वाच्या गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. कोणत्याही जात, धर्म, पंथाचे व त्यातील ऐतिहासिक घटनांचे विकृतीकरण कोणत्याही जात, धर्म, पंथाला पटणारे नसून त्याविरुद्ध साहजिकच त्याचा निषेध नोंदविणार असे असताना मात्र प्रशासन व्यवस्थेने स्वतःच्या कर्तव्याला विसरून राजकीय लोकांच्या इशाऱ्याला साथ दिली आणि हि घटना होऊ नये यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या उलट महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी असणाऱ्या तरुण युवक, विद्यार्थी, कार्यकर्ता यांना अटक करून “जेलभरो” नीतीचा स्वीकार केला यावर मात्र माणूसपणाचे डोहाळे लागल्यानी जाणून बुजून दुर्लक्ष केलेले दिसते. एवढेच काय परंतु महाराष्ट्रातील खैरलांजी व खर्डा या ठिकाणी झालेल्या अमानुष कृत्याचे प्रथमदर्शी साक्षीदार असूनही देशाच्या सर्वोच्य न्यायव्यवस्थेपुढे याचा समूहातील काही लोक खऱ्या गोष्टींवर आणि घटनांवर पडदा टाकून ‘फितूर’ होतात आणि समाजातील विकृत मानसिकता बाळगणाऱ्या गावगुंडांना व समाज कंठकांना स्वतःच्या स्वार्थासाठी पाठीशी घालतात. त्यावेळी मात्र माणूसपण जातीच्या आणि जातीच्या खोटया गर्वाच्या वळचणीला बांधून चुकीच्या कृतीला पाठबळ देण्याचे काम करतात आणि या घटनेमधील अत्याचाराने पिढीत असलेल्या व कोर्टामध्ये साक्षीदार असणाऱ्यांना पुन्हा: मरणाच्या खाणीमध्ये एकटे सोडून देतात.
माझ्या मते जातीचा अभिमान जातीमधील अज्ञान, अंधश्रदा, विषमता, गरिबी, इत्यादी दूर करून स्वतःच्या जातीतील व जात बांधवाना समाजामध्ये उच्चदर्जा मिळवून देण्यासाठी करावा पण हे करत असताना जातीय तेढ, जातीय द्वेषाची भावना व अंधत्वाने आलेला जातीय गर्व बाजूला ठेऊनच ह्या गोष्टी शक्य आहेत. जागृत आणि शिक्षित समाजामध्ये हि विषमता व दारी मिटवण्याची ताकत असली तरी त्यांनी सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेऊनच समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे आकलन करणे गरजेचे आहे . त्यासाठी या व अश्या सर्व घटनांच्या मागे कोण आहे, कोणती विचारधारा हे पसरवीत आहे आणि या सर्वांचा फायदा कोणाला होत आहे याचे आकलन करून त्याचा प्रसार प्रचार करणे गरजेचे आहे.
आजमितीला महाराष्ट्रातील सर्व जातींमध्ये त्या त्या जातीतील क्षत्रिय पुरुषांचा इतिहास गर्वाने सांगितलं जातो याला कोणी विकृत करून सांगण्याचा प्रयत्न केल्यास तो टिकवण्यासाठी त्या समूहातील प्रत्येक जण स्वतःच्या मृत्यूपर्यंत प्रयत्न करील. यापूर्वीही इतिहासामध्ये या प्रकारचे दाखले अजूनही जिवंत आहेत. या पार्श्वभूमीवर माणूसपणाचे डोहाळे लागलेल्या या शिक्षित आणि मध्यमवर्गीय समूहातील लोकांना कळकळीची विनंती कि, जातीयवाद, जातीयद्वेष, ब्राह्मणवाद डोक्यामध्ये ठेऊन माणूसपणाचे धडे व संस्कार येणाऱ्या पिढीवर करू नका. काही लोकांच्या गुंड प्रवृत्ती , जातीच्या गर्वाची विकृती, यातून निर्माण होणाऱ्या भूलथापांना बळी पडू नका. राजकीय, धार्मिक आणि स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला (जातीला) शस्त्र बनवण्यारांपासून सावध रहा. यापुढे समाजामध्ये होणाऱ्या अमानवीय कृतीला बाजूला सारा आणि जात, धर्म, पंथ, यांच्या नावावर होणाऱ्या अट्रॉसिटी थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असे होणारे अत्याचार अमानवीय आहेत याची शिकवण स्वतःच्या जातीतील तरुण पिढीला द्या! हे अत्याचार कोठेही होऊ नये याची दक्षता म्हणून सोशल मीडियाचा वापर करून त्वरित त्याचा प्रसार प्रचार करा. देशाला लागलेला हा अस्पृश्यतेची कीड नष्ट करण्यासाठी व खऱ्या माणूसपणाचे जतन करण्यासाठी एकत्र या! वरील घटनांमध्ये अटक केलेल्या माणसांना माणूसपणाच्या नात्याने सोडविण्यासाठी व त्याच्यावरील केसेस मागे घेण्यासाठी शासनाला सनदशीर मार्गाने निवेदन द्या! पत्र पाठवा! अथवा व्हाट्स अँप आणि संदेश पाठवा! त्यांना कळू द्या कि त्याच्यामागे देशातील खरा देशभक्त, सच्या माणूस उभा आहे. नाहीतर लागलेले हे माणूसपणाचे डोहाळे फुसके ठरतील आणि “तोंडामध्ये माणूसपण आणि संस्कारामध्ये जातीयवाद” घेऊन दुफळ्या मानसिकतेमध्ये तुम्ही अजूनही स्वतःची केवळ फसवणूक कराल. लक्षात ठेवा जातीयवाद आणि जातीचा खोटा गर्व मनामध्ये बाळगून कोणालाही माणूसपण पसरवता येणार नाही. आजपर्यंत जात, धर्म, पंथ याच्या नावावर तुमच्या मन, मेंदू आणि मनगटावर स्वतःच्या स्वार्थापोटी प्राबल्य गाजवून तुम्हाला गुलाम ठेवलेला समाज आजही यशस्वी आहे आणि यापुढेही गुलामीची वेळ येऊ देण्याची नसेल तर तुमच्या धडावर तुमचे डोके आहे का याची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे.
~~~
सुजित शांताबाई आनंदराव निकाळजे, बी. ए., एल. एल. बी., एम. एस. डब्लू. (दलित आणि आदिवासी समाजशास्त्र), टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई.
“शिक्षणाचा फायदा आर्थिक स्थर उंचावण्याबरोबर मानवतावाद आचरण करून पसरवण्यासाठी व्हावा.” या उद्देशाने व्यावसायिक शिक्षण घेऊनही केवळ समाजाचे प्रश्न वैज्ञानिकदृष्ट्या समजावून घ्यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आयुष्य घालवलेले नवे आणि जुने सर्व पॅन्थर यांच्या संघर्षाला डोळ्यासमोर ठेऊन उच्च शिक्षणाची एक एक पायरी चढत प्रथम बी. ए. त्यानंतर एल. एल. बी. त्यानंतर एक वर्ष वकिली करून पुन्हा एम. एस. डब्लू. त्यामध्येही विशेषतः दलित आणि आदिवासी समाजशास्त्र -भारतामध्ये एकमेव ठिकाणी असणारा कोर्स टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई याठिकाणी पूर्ण केला आहे. सध्या एम. फिल. व पी. एच.डी. चे शिक्षण घेत आहे. एक विद्यार्थी.