दलित पँथरने आम्हाला काय दिले ?

विश्वदिप दिलीपराव करंजीकर

‘आपण’ म्हणजे नेमके कोण ?

आपण राहत असलेल्या भौगोलिक प्रदेशामध्ये 19 व्या शतकात एक मोठी क्रांती उदयास आली. जिचे नाव ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ असे ठेवण्यात आले. आपण राहत असलेल्या भौगोलिक प्रदेशात ‘ग्रेट ब्रिटन’ किंवा ‘इंग्लंड’ या देशातून आलेल्या व्यापा-यांनी ‘आपल्याला’ गुलाम बनविले असे म्हटले गेले. ‘आपण’ म्हणजे नेमके कोण ? तुम्ही, मी, आपण सर्व की फक्त या भौगोलिक प्रदेशातील तथाकथित उच्चवर्णीय हिंदू आणि उच्चवर्णीय मुस्लिम ? आपली नेमकी काय ओळख आपण या भौगोलिक प्रदेशामध्ये स्थापित केली आहे ? हा प्रश्न माझ्या मनात सातत्याने घर करुन आहे. एवढ्या वर्षांनंतरसुध्दा ‘माणूस’ म्हणून ‘आपल्याला’ इथे स्वीकारले जाते का ही शंका मला वारंवार सतावते.
आपण कोण आहोत ? या प्रश्नाचे उत्तर देणे फार जास्त कठीण आहे. कारण आपण दलित-आदिवासी-भटके-विलिंबाळ-बौद्ध-महार-मांग-ढोर-चांभार-उच्चवर्णीय स्त्रिया-दलित स्त्रिया-आदिवासी स्त्रिया -भटक्या स्त्रिया-विमुक्त स्त्रिया-मुस्लिम स्त्रियांपासून ते बहुजनवादी-आंबेडकरी-आंबेडकरवादी-रिपब्लिकन-संविधानवादी अशा या सर्व शोषितांच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीचा मूलगामी दूरगामी परिणाम होऊन आयुष्याचे सोने झाले अशा सर्वांना एका सूत्रात कसे बांधावे हे मला अजून उमजले नाही. म्हणून या सर्वांना एकत्रित संबोधित करण्यासाठी ‘आपण’, ‘आपले’ आणि ‘आपल्या’ या शब्दांचा आधार घेत आहे.

मी ज्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समूहातून येतो, त्या वर्गाला 19 व्या शतकात इथल्या तथाकथित उच्चवर्णीय हिंदू आणि तथाकथित उच्चवर्णीय मुस्लीम यांच्या इंग्रजांपासून मुक्ततेपेक्षा स्वतःच्या मुक्तीची क्रांतीकारी तीव्र भेदक जाणिव त्याच वेळी झाली होती. म्हणून माझ्या पूर्वजांना तेव्हाच्या ‘भारताच्या’ इंग्रजांच्या गुलामी पासून मुक्तीसाठी आणि स्वतःच्या ‘उच्चवर्णीय हिंदू’ आणि ‘उच्चवर्णीय मुस्लिम’ यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अशा दोन पातळीवर स्वातंत्र्यलढा लढावा लागला.

ही प्रेरणा त्यांच्यामध्ये कुठून आली याचा शोध घेतला असता लक्षात येते की, 1920 च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने आम्हाला आमचा ‘मुक्तिदाता’ मिळाला. बाबासाहेबांनी इथल्या हिंदू धर्मातील सामाजिक वर्गभेद करणाऱ्या जातीव्यवस्थेपासून मुक्ती मिळवून देण्याचे काम केले. हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेने अस्पृश्य समाजाची विभागणी ही जातीविशिष्ट विवाहसंस्थेच्या माध्यमातून नागरी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय शक्ती अंकित करुन अंतिमःत नेस्तनाबूत केली होती. निरस्त्र, नि:शस्त्र आणि निष्प्रभ झालेल्या अस्पृश्य समूहात आपल्या ज्ञात सूर्यमालेतील सर्वात मोठ्या सूर्याच्या स्थायी असलेली प्रचंड उर्जा शक्ती प्रवाहित करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मानवमुक्तीच्या चळवळीच्या माध्यमातून केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 1920 सालापासून 1956 पर्यंतच्या प्रवासात शाक्षणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यायाने राजकीय क्रांतीच्या माध्यमातून ‘आपल्या’ जाणीवा-नेणीवांमध्ये समग्र बदल घडवून आणत ‘आपल्यासाठी’ अत्यंत सन्मानाचे, आत्मभान, आत्मविश्वासाचे जीवनमार्ग अस्तित्वात आणून ‘प्रबुद्ध’ होण्याकडे राजमार्ग तयार करून दिला. त्या राजमार्गावर मार्गक्रमण करत ‘आपण’ थक्क करणारी प्रगती करु शकलो.

मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर या मानवमुक्तीच्या चळवळीमध्ये दुष्ट प्रवृत्तींचा शिरकाव झाला. तसेच राजकीय शत्रूंबरोबर ‘आपले’ म्हणवणारे तत्कालीन नेते सर्व प्रकारच्या मानवी स्वभावाच्या विकारांपासून स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. याची परिणीती स्वातंत्र्याच्या तिस-या वाट्यावर हक्कदारी असलेल्या समूहावर अनन्वित अत्याचार होऊन शोषणामध्ये झाली.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून आश्वासित स्वातंत्र्य, समता, बंधुता, सार्वभौम, सामाजिक-आर्थिक-राजकीय न्याय, विचार, भाषण, मत, धार्मिक स्वातंत्र्य, संधीची समानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांची दररोज विटंबना होऊ लागली. ज्यांच्याकडे आशेने पाहावे असे सगळे पालखीचे भोई पालखी चिखलात सोडून बेईमान झाले. अशा परिस्थितीत शोषित-वंचित-पीडित- ऐतिहासिक दारिद्रयामध्ये पिचलेल्या अन्यायग्रस्त अन्यायग्रस्त दलित समूहाच्या प्रश्नांकडे सरकारपासून तमाम रिपब्लिकन नेत्यांचे दुर्लक्ष झाले. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी समाज व्यवस्थेत विषमता नसली पाहिजे, सामाजिक विषमतेवर आधारलेल्या अन्यायकारक समाज विभागणीमध्ये हिंसक क्रांतीची बीजे असतात, असा इशारा डॉ. आंबेडकरांनी दिलाच होता.

1972 सालच्या उन्हाळ्यात स्त्रियांवर बलात्कार, त्यांची नग्न धिंड काढणे, सामूहिक बहिष्कार, विहिरीमध्ये विष्ठा टाकणे, खून करणे, नरबळी देणे, झोपड्या जाळणे, मृतास समशानभूमी नाकारणे, जमीन बळकावणे, दगडांने ठेचून मारणे, जिवंत जाळणे, डोळे फोडणे, हात-पाय कु-हाडीने तोडणे या सर्व प्रकारच्या घटनांनी महाराष्ट्रात तसेच देशभरात जातीय अत्याचारांच्या घटनांनी कळस गाठला होता. उन्हाळाच्या गरमीत सुद्धा असंतोषाचा प्रक्षोभ पराकोटीला जाऊन पोचला होता.

अशा परिस्थितीत ज. वि. पवार आणि नामदेव ढसाळ यांनी 29 मे, 1972 रोजी ‘दलित पँथर’ ही दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यासाठी संघटना स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर अन्यायाच्या ठिक-या-ठिक-या उडवण्यासाठीचा जो झंझावात सुरु झाला, त्याचा वारसा आजही आपल्या चित्तामध्ये प्रवाहित आहेच.

साधना साप्ताहिकातील राजा ढालेंचा तो लेख, रामदास नारनबरेचा नरबळी, दुर्गा भागवत आणि साधना प्रकरण इगतपुरीची दंगल, वरळीची जातीवादी दंगल, नामांतर लढ्यानंतर असंख्य खेडयात सुरू झालेल्या छळछावण्या या सर्वांना तोंड देताना दलित पँथरला सुद्धा फुटीचा शाप लागला. दलित पँथरच्या म्होरक्यांमधील मतभेद, नेतृत्वाची हौस, विरोधकांनी केलेली षडयंत्रे यांच्या हल्ल्यापासून ‘दलित पँथर’ देखील वाचू शकली नाही. ‘दलित पँथर’च्या स्थापनेला आता 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या 5 दशकात जगात अचाट-अफाट-प्रचंड असे बदल घडून आलेले आहेत. मानव जातीने अचंबित करणारी प्रगती केली आहे. मात्र, भारत देशात कडव्या उजव्या विचारसरणीचे वैदिक संस्कृतीचे पुरस्कर्ते सत्तेत आल्यानंतर पुन्हा या लढ्याचे संदर्भ पुनर्जीवित होताना आपण पाहत आहोत.

पँथरविषयी व त्याच्या योगदानाविषयी सातत्याने उलट-सुलट चर्चा होत असते. कांशीराम समर्थक बहुजनवादी व्यक्ती-संघटना दलित पँथरला केवळ अस्मितेचे लढे लढणारी संघटना म्हणून उपहास करतात. मवाळ, अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणात गळचेपी भूमिका घेणारे आंबेडकरवादाच्या नावावर केवळ निवडणूक राजकारणाकडे बोट दाखवणारे ‘गुंडगिरी’ म्हणतात. ज्या सर्वांची बोलती ‘दलित पँथर’ च्या झंझावातामुळे कायमची बंद झाली अशा दळभद्री लोकांची कोल्हेकुई सातत्याने ऐकावयास मिळते. या पार्श्वभूमीवर ‘दलित पँथर’ने आपल्याला दिलेल्या अत्यंत महत्वाच्या अशा वारसाबद्दल नवीन पिढीला माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे .

‘दलित पँथर’ने आंबेडकर चळवळीचे राजकीय शत्रू अधोरेखित केले व त्यांचे जातीयवादी चेहरे समोर आणले !

सर्वप्रथम आंबेडकरवादी विचारांना प्रमाण मानणारे कृतिशील विचारवंत आणि वैचारिक कार्यकर्ते हे कुठल्याही भूलथापांना बळी पडणारे नसावेत हे आपण समजून घेतले पाहिजे. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात ‘विनम्रतेने अतिलीन राहून कुणाच्याही चरणी आपला स्वाभिमान गहाण टाकू नका.’ एरवी आंबेडकरवादाची पारायणे घडवणारी मंडळी निवडणुकीच्या काळात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या चरणी लोटांगण घालताना दिसतात. त्यांना आपल्या राजकीय शत्रूची ओळख नाही. तसेच अशा प्रस्थापित नेत्यांच्या भुलथापांना बळी पडणाऱ्या आपल्याच म्हणवणाऱ्या सामान्य लोकांना त्यांचे राजकीय शत्रू माहीत असावेत. हे राजकीय शत्रू सर्वप्रथम ओळखण्याचे काम ‘दलित पँथरने’च केले.

दलित पँथरच्या सर्व कारकिर्दीचा अभ्यास केल्यास एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय क्रांतीनंतर देशभरात आणि महाराष्ट्रात झंझावात निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राजकीय चळवळीला खीळ घालण्याचे काम काँग्रेसने आणि शिवसेनेने केले आहे. त्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गटात विभागलेल्या बेईमान झालेल्या काही नेत्यांनी साथ दिल्यामुळे भीमाचा रथ चिखलात रुतून बसला.

वरळीची दंगल ही प्रचंड भीषण होती असे अनेक प्रत्यक्षदर्शी आणि नियतकालिकांमधून स्पष्ट झाले आहे. एका वंचित शोषित अभावी समूहाबद्दल इथल्या प्रस्थापितांमध्ये किती पराकोटीचा आकस आहे हे यानिमित्ताने ‘आपण’ अनुभवले आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’ च्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य प्रकाशित होऊ न देण्यासाठी थेट संस्थात्मक पातळीवरून प्रचंड विरोध करण्यात आला. दलित पँथरचे संस्थापक आदरणीय ज. वि. पवार यांनी या अभूतपूर्व प्रसंगाचे वर्णन ‘श्रमण’ विरुद्ध ‘ब्राह्मण’ या ऐतिहासिक लढ्याएवढेच गांभीर्यपूर्वक आहे असे केले आहे.
काँग्रेस सत्तेत राहून पद्धतशीरपणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती, अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीय यांच्या विरोधात काम करत होती तर शिवसेना, जनसंघ आणि कम्युनिस्ट मंडळी पडद्याआड राहून सातत्याने मागासवर्गीय दलितांच्या हक्कांचे हनन करत होती.

‘दलित पँथर’चा वारसा कुठला ? हा प्रश्न जेव्हा आपल्या समोर असेल तेव्हा सर्वात महत्वाचा वारसा हाच समजला जावा की, दलित पँथरने आंबेडकरवादी चळवळीचे राजकीय शत्रू अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत त्यांच्या प्रबुद्ध चळवळीमुळे प्रस्थापितांपैकी कोणाची हिंसक विरोध करण्याची हिंमत नव्हती. मात्र, बाबासाहेबांच्या पश्चात भारत म्हणवणा-या देशातील जातीयवादी हिंसक मानसिकता सर्वांच्या समोर आणण्याचे काम दलित पॅंथरने केले आहे. आपले खरे राजकीय शत्रू विसरणे म्हणजे आपल्या अस्तित्वाशी आत्मघात करणे होय.

‘रिपब्लिकन ऐक्य’ हे फक्त काँग्रेसच्या फायद्याचे आहे हे ‘दलित पॅंथर’ने सिद्ध केले !

काँग्रेसने रिपब्लिकन पुढाऱ्यांना आमिषे दाखवून रिपब्लिकन पक्ष फोडला आणि कालांतराने काँग्रेसनेच राजकीय फायदे उपटण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य घडवण्यामध्ये सातत्याने मोठा पुढाकार घेतला. रिपब्लिकन ऐक्याचे अनेक प्रयोग आपण अनुभवले आहेत. ज्या ज्या वेळी ‘रिपब्लिकन ऐक्य’ झाले तेव्हा त्याचा राजकीय फायदा केवळ काँग्रेसलाच मिळाला आहे. म्हणूनच ‘रिपब्लिकन ऐक्य’ हे फक्त काँग्रेसच्या फायद्याचे अस्त्र आहे, याद्वारे सर्व मागासवर्गीय , शोषित, वंचितांची मते काँग्रेसकडे वळवण्यासाठी केलेला हा प्रयोग होता याची ठाम जाणीव ‘दलित पँथर’च्या पुढारी नेतृत्वामध्ये आली होती. या धोकेबाजीला आता इथून पुढे आपण बळी पडायचे नाही यासाठी ते कायम सजग होते.

‘रिपब्लिकन ऐक्य’ हे दलित पँथरचे कधीच ध्येय नव्हते. सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तन करून सर्वंकष अशी ‘सम्यक क्रांती’ दलित पॅंथरला अपेक्षित होती. ‘खरा रिपब्लिकन पक्ष अजून निर्माण निर्माण व्हायचा बाकी आहे, तो स्थापन करण्याची जबाबदारी दलित पॅंथरची आहे’ असे राजा ढाले यांनी दलित पँथरच्या मुखपत्रात म्हटले होते. दलित पॅंथर एकजातीय नव्हती; मात्र बौद्ध तरुणांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय क्रांतीमुळे राजकीय जाणीव-जागृती निर्माण झाली होती. त्यांनी सर्व शोषित समूहांना एकत्र घेऊन ही दलित पँथरची व्यापक चळवळ उभी केली.

दलित पॅंथर चळवळीमुळे मराठी साहित्याला समांतर ‘दलित साहित्य’ निर्माण झाले !

प्रत्येक क्रांतीला स्वतःचे असे क्रांतिकारी साहित्य असते असे म्हटले जाते. दलित पँथरने ‘दलित साहित्य’ निर्माण करून मराठी साहित्यच नव्हे तर जागतिक साहित्य विश्वासाला खाडकन थोबाडीत मारून भानावर आणले. कधी न लिहिले गेलेले, कधी न वाचले गेलेले असे ज्वालामुखीच्या स्फोटाप्रमाणे स्फोटक साहित्य कादंबरी, आत्मचरित्र, कवितासंग्रह, ग्रंथ, नाटके इ. पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या जाणिवा-नेणिवांना आतून-बाहेरून धक्के देणारे ते क्रांतिकारी साहित्य ठरले.
समाजव्यवस्थेच्या प्रत्येक पायरीवर उभे असलेल्या जातिव्यवस्थेच्या रखवालदाराची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगण्याचे काम दलित साहित्याने केले. जागतिक साहित्यामध्ये सापडणारी सौंदर्यवाद, अभिजातवाद, गुढवाद, रोमँटिझम, वास्तववाद, अतिवास्तववाद, अभिव्यक्तीवाद, रुपवाद, संरचनावाद मनोविश्लेषणात्मक, स्वच्छंदवाद आणि घनवाद या सर्व साहित्यनिर्मितीच्या प्रकाराची लक्षणे दलित साहित्यामध्ये आढळतात. हे दलित साहित्य मूलतः दलित पँथरच्या निर्मितीमुळे आणि अविरत झंझावातामुळे साकार होऊ शकले. दलित पॅंथर चळवळीने तरुणांमध्ये, लेखकांमध्ये आपल्यावर पिढी-दरपिढी झालेल्या अत्याचारांच्या मालिकांना लेखणीबध्द करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे मराठी साहित्याला एकापेक्षा एक श्रेष्ठ असे लेखक-कवी-साहित्यकार मिळाले.

दलित पँथरची स्थापना ज. वि. पवार आणि नामदेव ढसाळ यांनी केली असल्याने आणि दलित पँथरची मूलभूत भूमिका राजा ढाले यांनी अत्यंत आक्रमकपणे रुजवण्याचे काम केल्यामुळे दलित पॅंथरचे मूल्यांकन करण्याचा या तिघांनाच अधिकार आहे असे मला वाटते. त्याचबरोबर दलित पॅंथरचे मूल्यांकन करत असताना दलित पॅंथर मार्गक्रमण कशा प्रकारे झाले किंवा ते कसे व्हायला हवे होते याविषयी फक्त या तिघांची मत ग्राह्य धरले जावे असे मला व्यक्तिशः वाटते.

दलित पँथरच्या संघर्षाच्या भूमिकेमुळे राज्य सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य प्रकाशित करावे लागले !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाआधी त्यांनी दररोज शेकडो पुस्तके लिहण्याचे काम सातत्याने केले आहे, असे त्यांचे जवळचे सहकारी नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण भाषणे, पुस्तके, ग्रंथ साहित्य निर्माण केले आहे. मात्र आपली प्राणज्योत जास्त काळ टिकणार नाही, याची कदाचित त्यांना जाणीव झाली असावी म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ फक्त आणि फक्त लिखाणामध्ये व्यतीत केला. या माध्यमातून आपल्या पश्चात आपले लिखाण या बहिष्कृत अस्पृश्य समाजाला दीर्घकाळ योग्य दिशा देण्याचे काम करेल असे त्यांना वाटत होते. ते खरेच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या ताब्यामधून जवळपास पन्नास ते साठ पुस्तके प्रकाशित होतील इतके साहित्य प्राप्त झाले आहे. ते साहित्य राज्य सरकारकडे देण्यात आले. ते प्रकाशित करण्यासाठी सातत्याने दलित पॅंथर आणि सर्व आंबेडकरवादी विचाराचे नेते, कार्यकर्ते मंडळींनी हा विषय ऐरणीवर लावून धरला. मात्र, तत्कालीन सरकार साहित्य प्रकाशित करण्यासाठी उदासीन होते. हा खर्च कुठल्या खात्याच्या अंतर्गत करायचा या कारणास्तव अनेक दिवस हे काम रखडले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठीतील पत्रकारिता ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ याशिवाय ब्रिटिशांच्या काळात मंत्री म्हणून केलेले कामकाज त्यांनी राज्यसभेत, लोकसभेत केलेले कामकाज, संविधान सभेत केलेले कामकाज असे अनेक त्यांचे साहित्य प्रकाशित व्हायचे बाकी होते. दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य व भाषणे प्रकाशित करण्याची समिती स्थापन झाली. ती स्थापन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांची भेट घेऊन बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य व प्रकाशित असलेले मात्र उपलब्ध नसलेले साहित्य शासनामार्फत प्रसिद्ध करावे अशी विनंती यामार्फत करण्यात आली होती. हे साहित्य प्रकाशित करण्यासाठी भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर आणि माईसाहेब सविता आंबेडकर यांची संमती आवश्यक होती. ही सहमती मिळवण्यासाठी ‘दलित पॅंथर’ च्या वतीने ज.वि. पवार, दत्ता जाधव आणि रामदास आठवले यांनी प्रयत्न केले.

दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य व लेखन या खंडातील चौथा खंड प्रकाशित होण्याच्या मार्गावर असताना त्यामध्ये ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या ग्रंथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माची परखड चिकित्सा केली असल्याने त्यावर काही हिंदुत्ववादी मंडळींनी आक्षेप घेतला. त्यातील काही भाग वगळण्यासाठी त्यांनी आटापिटा सुरू केला. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर आणि त्यांच्या क्रांतिकारी चळवळीवर प्रेम करणारे लोक दहा ते पंधरा लाखाच्या संख्येने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मोर्च्यामध्ये सहभागी होऊन मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि अभूतपूर्व असा ‘रिडल्सचा मोर्चा’ असा लौकिक प्राप्त झालेला मोर्चा निघाला. त्यातून असे सिद्ध झाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातील एक ओळ किंवा एक स्वल्पविरामसुद्धा आम्ही कमी करु देणार नाही. शेवटी कुठल्याही संपादनाशिवाय तो ग्रंथ प्रकाशित झालाच.

वास्तविक, त्या दरम्यानच्या काळात दलित पॅंथर जरी विखुरली असली तरी दलित पँथरच्या झंझावातामुळे आंबेडकरी चळवळीला जी गतिशीलता निर्माण झाली होती, त्यामुळे हा मोर्चा अत्यंत मोठ्या संख्येने होऊ शकला. या मोर्चामुळे राज्य सरकारला, कडवट हिंदुत्ववादी संघटनांना आंबेडकरी विचारांची धडकी भरली. त्यानंतर बाबासाहेबांचे खंड प्रकाशित होण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व साहित्य हे निर्विवादपणे त्यानंतर प्रकाशित होऊ शकले. आतापर्यंत 26 खंड प्रकाशित झालेले आहेत. अजून साधारणपणे 25 खंड प्रकाशित व्हायचे अजून बाकी आहेत.
आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे प्रकाशित झालेले अनेक खंड वाचून वैचारिक, चिंतनशील, गंभीर, कृतीशील, निःस्वार्थी, प्रामाणिक आंबेडकरवादी पिढी तयार होण्यास प्रचंड मदत झाली आहे. या साहित्याशिवाय आंबेडकरवादी पिढीची अवस्था ही अंधारात मेणबत्ती घेऊन रस्ता शोधणा-या एखाद्या आंधळ्याप्रमाणे झाली असती.

दलित पँथरच्या क्रांतीकारी चळवळीत अपरिमीत त्याग केलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात योध्द्यांना दलित पँथरच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त विनम्र अभिवादन. क्रांतीकारी जयभीम !

विश्वदिप दिलीपराव करंजीकर

लेखक BE (Civil), MTech(CWM) असून Maharashtra Water Resources Regulatory Authority, Mumbai येथे सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत.ते फॅम् चे सदस्य आहेत तसेच रिझर्व्हेशन इन प्रमोशन ह्या संबधित सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते आहेत. ते राऊंड टेबल इंडिया मराठी(भीमाच्या लेखण्या) येथे विविध विषयांवर स्तंभलेखन करत असतात.

संदर्भ :-

  1. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ :- खंड 1 ते 5
  2. दलित पॅंथर :- नामदेव ढसाळ
  3. दलित पॅंथर :- शरणकुमार लिंबाळे
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड : १, ५, ९, १०, १७, १८

1 Comment

  1. छान मांडणी केलीत.आंबेडकरवादी रिपब्लिकन (अर्थात लोकांची) चळवळी ची मुलभूत संकल्पना व तीची निर्माण झालेली स्वतंत्र आेळख व तिची मोडतोड. केवळ दलित संकल्पनेतून झालेली दिशाहिन भंटकंती ही आंबेडकरवादी चळवळीतील घटना आम्ही दुर्लक्षित कशी काय करु शकतो. समग्र शत्रू एकत्र होऊन आंबेडकरवादी चळवळीला नष्ट करण्यासाठी आक्रमक झालेले होते.ग्रामिण भागातील जातीग्रस्त ब्राह्मणेतरांच्या मार्फत आंबेडकरवादी जनाधाराला अन्याय पिडित करुन त्यांच्यात दहशत निर्माण केली. रिपब्लिकन पक्ष काँग्रेसने ताब्यात घेतला व दलित संकल्पनेच्या माध्यमातून रिपब्लिकन अर्थात सर्वसमावेशी अोळख नष्ट करण्यासाठी दलित नामाधिनाचा वापर व त्याला साहित्याची जोड देऊन कायम वैचारिक संभ्रम निर्माण करण्यासाठी समाजवादी व मार्क्सवादीयांची घूसखोरी. हे आंबेडकरवादी चळवळीवरील वैचारिक चळवळ व संसाधनात आघात याकडे कसे दुर्लक्ष करता येईल. यावर संयमाने व गांभिर्याने चिंतन व्हायला हवे.
    धन्यवाद !

Leave a Reply to अॅड. शाम तांगडे Cancel reply

Your email address will not be published.


*