तनुजा हरड (Tanuja Harad)
मार्च २०१७ मध्ये बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील रमावतीदेवी या दलित महिलेला जिवंत जाळले गेले.१ तिच्या शेजाऱ्यांना असा संशय होता की ती भूतबाधा करते. ७ आॅगस्ट २०१७ या दिवशी भागापुर, बिहारमध्ये फूल कुमारी देवी या महिलेचा मृतदेह रेल्वे रूळांवर आढळून आला.२ ती भूताली आहे या संशयावरून तिच्या मारेकऱ्यांनी तिला तिच्या राहत्या घरातून किडनॅप केले होते. नंतर असे समजले की तिचा बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता.
आपल्याकडे भूताली म्हणजे “काळी जादू करणारी स्त्री” असं समजलं जातं. लोकांच्या मते ह्या स्त्रियांकडे अशी क्षमता असते की त्या त्यांच्याकडच्या दुष्ट शक्तीने हव्या त्या माणसाचा बळी घेऊ शकतात, त्यांना आजारी करू शकतात किंवा त्यांच्या घरामध्ये अडचणी निर्माण करू शकतात. बर्याच वेळा घरातील जनावर म्हणजे गाय, बैल आजारी पडले किंवा मेले तरी भूतालीने करणी केली असे समजतात. नैसर्गिक आपत्ती आली तरी भूतालीने जादूटोना केला असा संशय घेतला जातो. भूतालीला चेटकीण असे सुद्धा म्हटले जाते. काही पुरुषांना सुद्धा अश्याप्रकारे दोषी ठरवलं जातं पण त्याचं प्रमाण तुलनेने खूप कमी आहे.
भूताली हा प्रकार पहिल्यांदा १४ व्या शतकात युरोपमध्ये चालू झाला. ज्या स्त्रिया चर्चच्या विरोधात होत्या त्यांना भूताली म्हटले जायचे. त्या समाजात दुर्दैव पसरतात असे समजले जायचे आणि म्हणून समाजाला त्यांच्यापासून वाचवण्यासाठी त्यांना जाळले जायचे. तेव्हापासून अजूनपर्यंत भूताली हा प्रकार चालू आहे. हा प्रकार युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडात पाहायला मिळतो. भारतातसुद्धा हा प्रकार शेकडो वर्षांपासून चालू आहे.
माझी स्वतःची आजी भूताली आहे असे गावातील अनेक लोक मानतात. गेल्या वर्षी ती गावातील एका काकांना मूल झालं म्हणुन पाहायला गेली तर घरातील लोकांनी बाळाला लपवून ठेवले. माझ्या शेजारचे असे मानतात की आजी त्यांच्या घरी गेली तर ते आजारी पडतात, त्यांची मुले आजारी पडतात. पाच-सहा वर्षांपूर्वी माझ्या एका शेजार्याने माझ्या आजीला मारले होते. त्याचे असे म्हणणे होते की माझी आजी भूताली आहे आणि त्यांच्या घरी ज्या काही अडचणी येतात ते सगळं माझ्या आजीची करणी आहे.
माझे कुटुंब लहान आहे. आम्ही तीन भावंडे मुंबईत राहतो. गावी आई-वडील आणि आजी असतात. घरात शिक्षण घेतलेली आमची पहिली पिढी आहे. माझ्या गावातील वस्ती बहुजन आहे (कुणबी आणि आदिवासी). बहुतांश लोक शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय करतात. खूप कमी लोक नोकरी करतात. अगदी सगळेच देवावर, भूतावर विश्वास ठेवणारे आहेत. पावसाळ्यात शेतीला सुरुवात करण्याआधी देवांना (वेताळ, चेरोबा, कुलदैवत, काळबैरी, गणपती, इत्यादि) नारळ फोडले जातात आणि मगच शेतीला सुरुवात केली जाते. यापैकी काही देव बांधावर, शेतात असतात. गावात दवाखाना नाही. पाच किलोमीटर बाजाराच्या ठिकाणी गेल्यावर तिथे दवाखाना आहे. माझ्या आजूबाजूच्या गावांची सुद्धा अशीच परिस्थिती आहे. भूताली हा प्रकार फार पूर्वीपासून चालू आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानामुळे आता थोड्या कमी प्रमाणात दिसतो पण फार फरक पडलेला नाही. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात दोन तरी भूताली म्हणून हिणवल्या जाणार्या स्त्रिया भेटतील, तसेच भगतही भेटतील.
एनसीआरबीच्या (National Crime Records Bureau) अहवालानुसार २०००–२०१५ या कालावधीत भूताली या प्रकारात २,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. त्यामधे बहुतांशी स्त्रिया होत्या. एनसीआरबीच्या २००८ च्या अहवालानुसार झारखंडमध्ये ५२ लोक मारले गेले, हरियाणामध्ये २६ गुन्हे दाखल करण्यात आले, आंध्र प्रदेश, ओरीसामध्ये २३, मध्य प्रदेशात १७, छत्तीसगड मध्ये १५, महाराष्ट्रात ११, पश्चिम बंगालमध्ये ४ तर मेघालयमध्ये ३ गुन्हे दाखल केले गेले. कोर्टात खूप वेळा पुराव्याअभावी न्याय मिळत नाही. जे लोक स्त्रियांवर भूताली असल्याचा ठपका ठेवतात त्यांचं गावात वजन असतं आणि त्यामुळे बर्याचदा भितीपोटी तक्रार दाखल केली जात नाही.
महिलांवर भूताली म्हणून शिक्का मारून त्यांना त्रास देण्याचा प्रकार भारतातील सर्वच भागांत कमी-जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. परंतु, केवळ आठ राज्यांमध्ये या अमानुष प्रथेविरुद्ध कायदा लागु आहे. या कायद्यांनुसार भूताली म्हणून हिणवल्यास किंवा त्रास दिल्यास शिक्षा होते. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर २०१३ मध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा करण्यात आला. कर्नाटक विधानसभेने १७ नोव्हेंबरला ‘कर्नाटक अमानवी वाईट कृत्ये आणि काळी जादू प्रतिबंध आणि निर्मूलन कायदा, २०१७ लागू केला. पण केंद्र सरकारचा स्वतंत्र असा कायदा अजूनही नाही.
बिरुबाला राभा या आदिवासी महिलेने आसाम मध्ये भूतबाधा, भूताली याविरुद्ध चळवळ सुरू केली आहे. जेव्हा स्वतःच्याच मतिमंद मुलाने त्यांना भूताली म्हटले त्यावेळी त्यांनी याविरुद्ध आवाज उठवायचे ठरवले. १९८५ पासून त्या याविरुद्ध लढा देत आहेत. त्यांची संस्था ‘मिशन बिरुबाला’ या नावाने काम करते. त्यांनी खूप स्त्रियांना या प्रकारांतून वाचवले आहे. झारखंडमध्ये जोहर (JOHAR) सारख्या सामाजिक संस्था यामधे लक्ष घालतात. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संस्था अंधश्रध्दा विरोधी कार्य करते.
भूताली समजल्या जाणाऱ्या स्त्रिया ह्या समाजाला नकोशा असतात. त्यामुळे अशा स्त्रियांना शिव्या, मारहाण केली जाते, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात, त्यांचे मुंडण केले जाते, त्यांची मालमत्ता हडप केली जाते, त्यांचा जीवही घेतला जातो. कधीकधी एखाद्या महिलेवरील रागाचा बदला घेण्यासाठी तिला भूताली संबोधले जाते. भूताली समजल्या जाणाऱ्या स्त्रिया ह्या बरेचदा म्हातार्या असतात, विधवा असतात, त्या गरीब घरातील असतात व दलित–बहुजन समाजातील असतात. गावामध्ये जे चार-पाच मोठे जमीनदार (पाटील) असतात किंवा अशी कुटुंबे ज्यांची दुसरी-तिसरी पिढी नोकरी करत आहे, त्यांच्या घरातील बाईवर भुताली असल्याचा ठपका कधीच येत नाही. भूताली ह्या स्त्रिया उच्चजातीय घरातील कधीच नसतात. चित्रपटात किंवा दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये भूताली /चेटकीण दाखवल्या जातात, त्या नेहमीच गरीब आणि खालच्या जातीतील असतात. मात्र चित्रपट आणि मालिका बनवणारे बहुतांश लोक उच्चजातीय असतात. उच्चजातीय स्त्रियांना कधिच भूताली म्हणून हिणवले जात नाही; त्यांच्याकडे संशयानेसुद्धा पाहिले जात नाही.
जिथे शिक्षण अजून पोहोचलेले नाही, खूपच कमी लोक शिकलेले आहेत, जवळपास दवाखाना नाही, रस्ते नाहीत, वाहनांची सुविधा नाही अशा ठिकाणी लोकांना उपचारासाठी तांत्रिकाकडे जाणे जास्त सोयीचे वाटते. तांत्रिक त्याच्याकडच्या दैवी शक्तीने रुग्णास बरा करेल असा विश्वास लोकांना असतो. विज्ञानापेक्षा दैवी शक्तीवर लोकांचा जास्त विश्वास असतो.
आपल्या समाजात स्त्री ही देवी, सरस्वती मानली जाते आणि त्याच वेळी तिची अशी अवहेलना केली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम वागणूक मिळाली आहे. स्त्रीचा आवाज सुरुवातीपासूनच दाबला गेला आहे, तिला विचारांचे स्वातंत्र्य नाहिये, तिच्यावर लादलेल्या गोष्टी ती निमुटपणे सहन करत आलेली आहे. काही वेळा या गोष्टींना स्त्रियाच प्रोत्साहन देतात. एखादी स्त्रीच दुसर्या स्त्रीला हिणवते. आपली विचारसरणी मागासलेली आहे. शिक्षणानेसुद्धा आपल्या विचारांमध्ये फरक पडलेला नाही. पूर्वी लोक ज्या गोष्टींवर अंध विश्वास ठेवायचे त्याच गोष्टी ते आतासुद्धा मानतात. अजून किती वेळ जावा लागेल आपली विचारसरणी बदलायला?
~
टिपा
१. http://www.hindustantimes.com/india-news/suspected-to-be-witch-elderly-dalit-woman-burnt-alive-in-bihar/story-osbWIYc3HTg9Z4VeIVlrLM.html
२. http://indianexpress.com/article/opinion/when-women-are-branded-as-witches-and-brutalised-witchcraft-violence-against-women-4789745/
~~~
तनुजा हरड ही मुंबई विद्यापीठाची एमकॉम पदवीधर असून तिला अर्थशास्त्र, स्त्रीवाद आणि जातीअभ्यास ह्या गोष्टींमध्ये रस आहे.