सुजित निकाळजे (Sujit Nikalje)
गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचे बाजारीकरण होत असून ७५ वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये ‘सामाजिक न्यायासाठी’ उभ्या असणाऱ्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने इतर खाजगी शिक्षण संस्थांप्रमाणे शिक्षणाचे बाजारीकरण करून अनुसूचित जाती-जमाती, OBC व इतर कमकुवत तबक्यांतील विद्यार्थ्यांना शुल्क आकरण्यात आले व भरण्याची सक्ती केली आहे. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या मूलभूत अधिकारांचे पालन व्हावे आणि संस्था स्थापन करते वेळी ठरवलेली उद्देश लक्षात घेऊन शिक्षणाची दारे खुली व्हावीत म्हणून सदरचे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या इतिहासामध्ये या संस्थेने सुरु केलेला अभ्यास हा त्या त्या काळात असणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर अभ्यास होऊन त्याविषयी वैज्ञानिक तोडगा निघावा यासाठी सतत कार्यरत राहिले आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने संस्था नोंदणी करतेवेळी आणि शासनाकडून अनुदान स्वीकारताना स्पष्टपणे असे नमूद करण्यात येते कि, सदर संस्था गरीब, गरजू, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्राधान्य देईल आणि त्याच्या हिताचे योग्य निर्णय घेतील. याच मूलभूत तत्वावर टाटा सामाजिक संस्था यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन प्रथमच सर्व संस्थांच्या समोर आदर्श ठेऊन कमीतकमी फी भरून अनुसूचित जाती -जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते. गेल्या काही वर्षांपासून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा सुनिश्चित केलेला फंड शासनाने दिलेला नाही आणि शासनाकडून पैसे येत नाहीत या कारणाने कमीजास्त प्रमाणामध्ये त्याचा विद्यार्थ्यांवर बोजा टाकून या संस्थेने फी वाढ व फी आकारणी सुरु केली. तेव्हापासूनच या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या गोष्ठीला विरोध केला परंतु संस्थेच्या बजेट व आकडेवारी पुढे त्यांना काही बोलता आले नाही.
दिनांक २१ रोजी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडून आलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे अखेर ‘TISS बंद’ चे आव्हान केले व त्या दिवशी सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीरीत्या ‘TISS बंद’ पार पडला. या दरम्यान विद्यार्थ्यांची अशी मागणी होती कि, २०१६ -१७ व २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकारलेले अतिरिक्त भोजन व वसतिगृह शुल्क माफ करावी आणि २०१८-२० या नवीन वर्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे कमीत कमी शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा. यासाठी दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना प्रशासनाने आम्ही विद्यार्थ्यांच्या समिती बरोबर चर्चा करू असे सांगून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली परंतु त्यामध्ये प्रशासनाने केवळ विद्यार्थ्यांना मदत करू यापुढे काहीही सांगितले नाही आणि आंदोलन पुढे तसेच चालू ठेवण्यात आले.
गेट बंद आंदोलन हे केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आहे, यामध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांचे दोन कॅम्पस असून सादर आंदोलन मुख्य कॅम्पस च्या गेट वर सुरु आहे लोकांची गैरसोय करण्याचा कोणताही मानस विद्यार्थ्यांमध्ये नसून केवळ प्रशासनाला या प्रश्नांचे गांभीर्य कळण्यासाठी आहे. मागील गेट हे सर्वांच्यासाठी खुले असून विद्यार्थ्यांनी गेटवर येणाऱ्या ना विनंती केली जाते कि, तुम्ही मागील गेट वरून जा! सदर आंदोलन शांततेने चालू असून विद्यार्थी गेट वर बसून निदर्शने करीत आहेत या मध्ये TISS विद्यार्थी संघटनेचा सिहाचा वाटा असून इतर सर्व संघटना त्यामध्ये सहभागी आहेत.
सदर आंदोलनामध्ये प्रशासनाकडून असे सांगण्यात येते कि, १. अनुसूचित जाती-जमातीचे विद्यार्थी अँप्लिकेशन फॉर्म भरत नाहीत २. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हि त्यांच्या बँक खात्यावर जमा होते ( व दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी सोडून गेल्यावर ती जमा करत नाहीत) ३. इतर मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती बंद झाली आहे ४. शासनाने विद्यापीठाची ग्रँड कमी केली आहे आणि अशीच करणे सांगून कोणत्याही कायद्याने आम्ही असे करण्यास बांधील नाही अशी उलट उत्तरे प्रशासन देत आहे.
यामध्ये फार सत्य नाही मुलांनी फॉर्म भरले नाहीत त्याला प्रशासनाची वेबसाईट व तांत्रिक अडचणी आहेत, फॉर्म भरलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना २०१५ पासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही, वसतिगृह मिळालेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी त्याच्या खात्यावर जमा होत नाही, सर्वच इतर मागासवर्गीयांना सर्वच राज्यांनी शिष्यवृत्ती बंद केली नाही त्यामुळे सर्वच OBC ना फी ची सक्ती करू नये, शासनाने ग्रँड कमी केली असता त्याचा बोजा विद्यार्त्यांवर टाकू नये. त्यामुळे प्रशासनाने उपस्थित केलेले सर्व प्रश्न हे पळवाटा असून त्यापुढे आम्ही हे हि करणार नाही अशी धमकी येत आहे.
एक सामाजिक शास्त्राचा टाटा सामाजिक संस्थेचा विद्यार्थी म्हणून मी विनंती करतो कि, हि लढाई केवळ TISS ची नसून शिक्षणासाठी कायदा करणारे आणि अंमलबजावणीच्या नावाने शिमगा करणारे सरकार आणि त्याच्या धोरणांच्या विरोधात आहे. सर्व सामाजिक संघटनांनी त्यास पाठिंबा देणे हि जबाबदारी समजून या लढाईमध्ये सामील व्हावे.
जय भीम!
~~~