माझ नाव प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे असून मॉडर्न कॉलेज येथील गजानन एकबोटे चेअरमन असलेल्या ह्या कॉलेजच्या त्यांच्याच कन्या श्रीमती निवेदिता एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जातीय द्वेषातून दिलेल्या त्रासाबद्दल माझी बाजू मांडणार आहे ज्यामुळे मला लंडन मधील नोकरीपासून वंचित राहावे लागले.
माझे BBA चे शिक्षण याच मॉडर्न कॉलेज मधून 2020 ते 2023 दरम्यान पूर्ण झाले. तद्नंतर मी उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथील University of Sussex येथे प्रवेश घेतला. तेथील उच्च शिक्षणासाठी जात असताना त्यावेळच्या सर्व परिचित शिक्षक, विद्यार्थ्यांना माझी वागणूक ठाऊक असल्यामुळे याच कॉलेजने मला दोन आवश्यक Letter of Recommendation दिलेले होती ती पुढे येतीलच लेखामध्ये.
तर माझे लंडन येथील उच्च शिक्षण पूर्ण होताच मला Heathrow International Airport येथे एका नोकरीची संधी उपलब्ध होत होती. माझी निवड ह्या नोकरीसाठी झाली होती, परंतु त्यासाठी मला मागील पाच वर्षांचा माझा एकूण शैक्षणिक अथवा मी कुठे काम केले असल्यास त्या त्या शिक्षण संस्थांचा तसेच आस्थापनांचा मी त्या काळात तेथे असल्याचा कागदोपत्री पुरावा हवा होता.
त्यातील 2020-23 ह्या काळात मी पूर्णवेळ मॉडर्न कॉलेजला शिक्षण घेत असल्याने मला सेवेत घेऊ इच्छिणार्या कंपनीने मॉडर्न कॉलेज व्यवस्थापनाला दिनांक 30.09.2025 रोजी एक ईमेल पाठवले होते. त्या ईमेल मध्ये अगदी स्पष्ट नमूद होते की मला मिळणारी नोकरी ही कॉलेज व्यवस्थापनाने दिलेल्या शैक्षणिक अहवाल नुसार ठरवले जाणार आहे. थोडक्यात कॉलेजला केवळ हे प्रमाणित करून देणे भाग होते की 2020-2023 ह्या काळात मी त्यांचा विद्यार्थी होतो अथवा नाही, कारण कंपनी जरी पाच वर्षांचा शोध घेत असली तरी शैक्षणिक वर्षांपूर्वी किंवा नंतरचा कार्यकाळ हा कॉलेजचा हस्तक्षेपाचा असू शकत नाही. थोडक्यात कॉलेजने केवळ मी त्या अमूक वर्षात विद्यार्थी होतो अथवा नाही केवळ हे प्रमाणित करणे अपेक्षित होते.
यानंतर मी लगेचच कॉलेजला फोन केला की अमूक ईमेल कॉलेजच्या ईमेल वर आलेला असेल. त्या संदर्भात श्रीमती लाॅली दास ह्यांना 01 ऑक्टोबर 2025 रोजी फोन केला असता त्यांनी मला सर्वात प्रथम, “तुझी जात काय आहे?” असे विचारले. मी क्षणभर पूर्णतः गांगरून गेलो, परंतु स्वतःला सावरत कस बस विचारलं की मॅडम त्याचा काय संबंध, तर त्या म्हणाल्या की हे त्या रेकॉर्ड साठी विचारत आहेत. मला हे फार धक्कादायक वाटलं पण मी दुर्लक्ष केल. त्यानंतर दिनांक 02.10.2025 रोजी लाॅली दास यांनी मला माझ्या WhatsApp वर ईमेल मिळाल असल्याचे सांगितले तसेच त्या दिवशी दसर्याची तसेच गांधी जयंतीची सुट्टी असल्याने माझ्या कंपनीला हव असलेल verification दुसर्या दिवशी म्हणजे दिनांक 03.10.2025 रोजी पाठवले जाईल असे लेखी आश्वासन दिले. खाली त्यांनी दिलेल्या आश्वासन संबंधित स्क्रीनशॉट.

त्यानंतर मी verification ची वाट पाहू लागलो की कधी एकदाच हे सोपस्कार पार पडतील आणि मी त्या नोकरीवर रुजू होऊ शकेन. परंतु तसे काही झाले नाही. मला लाॅली दास यांनी आधी उप प्राचार्य सरदेसाई मॅडम यांच्या सोबत बोलण्यास सांगितले परंतु त्यांनी माझ्या फोन ला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मग मी पुन्हा लाॅली दास मॅडम ना विचारले असता त्यांनी अगदी स्पष्ट उत्तर दिले की त्यांना ह्या संदर्भात निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाहिये तसेच प्रिन्सिपल मॅडम निवेदिता एकबोटे यांनी verification देण्यास नकार दिला आहे. ह्या संभाषणाचा स्क्रिनशॉट हे खाली दिल्याप्रमाणे स्पष्ट करतो की प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे यांच्या सांगण्यावरून मला वरील verification पत्र नाकारले गेले.

त्यांनी सुचवल्याप्रमाणे मी दास मॅडम यांना फोन केला परंतु त्या म्हणाल्या की प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे यांचा नकार आहे सदरील verification देण्यास कारण त्यांनी सांगितले की विद्यार्थी म्हणून माझा नावलौकिक चांगला नव्हता, मी कॉलेजला नियमित येत नसे तसेच बेशिस्त होतो असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर मी दास मॅडम ना मला उच्च शिक्षणासाठी याच कॉलेजने गुणवंत विद्यार्थी असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे आठवण करून देखील त्यांनी एकबोटे मॅडम यांच्या निर्णयापुढे हतबल असल्याचे सांगितले.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रिन्सिपल एकबोटे मॅडम यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु मला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
मॉडर्न कॉलेजने केवळ हा आमचा अमूक काळातील विद्यार्थी होता, जे त्यांना कायद्याने माहिती देणे बंधनकारक आहे हे कळवले नाही आणि त्यानंतर मला त्या नोकरीपासून मुकावे लागले कारण त्यांना अत्यंत कंपनीला तातडीने ह्या बाबी उरकायच्या असतात, परंतु निवेदिता एकबोटे यांच्या जातीय भूमिकेमुळे मला ती नोकरीची संधी गमवावी लागली.
शेवटी निराशेतून मी सोशल मीडियात एक video टाकला ज्यात माझ्यावरील अन्यायाला वाचा फोडली. सुरुवातीला मी कॉलेजचे नाव घेणे सुद्धा टाळले होते, परंतु शेवटी माझ्यावरच आरोप होऊ लागल्याने मला नाव घेणे भाग पडले.
सोशल मीडियातून टीकेची झोड उठल्यानंतर प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे यांनी दिनांक 17.10.2025 रोजी एक पत्रक जाहीर केले ज्यात पुन्हा माझी बदनामी करण्यात आली की मी बेशिस्त विद्यार्थी होतो इत्यादी. प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे यांनी माझी बदनामी करताना प्रसिद्ध केलेल पत्रक खालील प्रमाणे.


ह्या पत्रकात त्यांनी माझ्या आधीच्या गैरवर्तनामुळे तसेच संस्थेच्या धोरणानुसार मला हे verification नाकारण्यात आल्याचे स्पष्ट म्हटले आहे, परंतु माझ्यावरील आरोपा संदर्भात कुठलाही पुरावा त्यांनी दिलेला नाही. हा जातीय अभिनिवेष बाळगून माझी केलेली बदनामी आहे तसेच माझे केवळ जातीय आकसातून नुकसान करण्यासाठीच मला हे verification पत्र नाकारले गेले हे अगदी स्पष्ट आहे.
हा जातीय आकस त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतला असावा अस म्हणायला वाव आहे कारण केवळ एक दिवस अगोदर महाराष्ट्र टाइम्स च्या फेसबुक पेज वरील माझ्यावरील बातमीवर त्यांनी देखील हेच आरोप केले होते आणि ते सुद्धा कुठलाही पुरावा न देता, आणि ते ह्या संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांनी केलेल्या कॉमेंट चा स्क्रिनशॉट आणि माझे उत्तर त्याखाली पुढीलप्रमाणे.

मी गजानन एकबोटे यांना प्रश्न विचारले असे असेल तर मग मला परीक्षेला बसू कसे दिले, गैर हजर असणार्या बेशिस्त मुलांना पास केले जाते का तुमच्या संस्थेत इत्यादी, त्यावर निरुत्तर होऊन त्यांनी पळ काढला होता. त्यांना हे सुद्धा विचारले की मला तुमच्याच कॉलेजच्या प्राध्यापकांनी ह्यापूर्वी recommendation letters दिलेली आहेत ती चुकीची अथवा खोटी आहेत काय? ह्यावर देखील त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही.
मला ह्याच कॉलेजने recommendation letter देताना माझा एक चांगला विद्यार्थी म्हणून नोंद आहे हे दाखवून देणारी ती प्रमाणपत्रे खालील प्रमाणे.


मग असे असताना आज माझ्यावर हा अन्याय केवळ जातीय मानसिकतेतून केला गेलाय हे स्पष्ट होत. ज्यामुळे मला मिळणारी नोकरी मला गमावली गेली केवळ एकबोटे कुटुंबाच्या जातीय मानसिकतेमुळे.
ह्या नंतरसुद्धा ह्या कॉलेज प्रशासनाने मला बदनाम करण्याचे ठरविले दिसते आहे आणि आता ते म्हणतात की त्यांनी त्या कंपनीला verification पाठवले आहे. परंतु सत्य विपरीत आहे आणि अजूनही त्यांनी कसा माझा छळ सुरू ठेवला आहे हे मांडणे गरजेचे आहे.
तर 30.09.2025 नंतर देखील 09.10.2025 ला देखील त्या कंपनीने एक reminder ईमेल मॉडर्न कॉलेजला पाठवला होता परंतु त्याला देखील त्यांनी reply केला नाही. 16.10.2025 ला रात्री गजानन एकबोटे यांनी विद्यार्थी म्हणून माझ्या चारित्र्यावर प्रश्न उभे केले, तर दुसर्या दिवशी सकाळी त्यांची मुलगी प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे यांनी पत्रकाद्वारे खुलेआम मला बदनाम केले. पण आता त्यांचा दावा आहे की त्यांनी त्याच दिवशी 17.10.2025 रोजी ते verification letter कंपनी ला सादर केले आहे. अस काय घडल काही तासांत हे समजून घेतलं पाहिजे.
माझ्यावर झालेल्या अन्यायाची समाजाने दखल घेतली, आणि ती सर्वदूर पोहचली, विद्यार्थी संघटना, सामाजिक, राजकीय संघटना जाब विचारू लागल्या तेव्हा त्यांनी त्याच दिवशी अगदी हृदय परिवर्तन झाल्यामुळे verification letter पाठवले असल्याचे सांगितले. पण त्यात सुद्धा ह्या प्रशासनाने काय खोडसाळपणा केला आहे हे लपवून ठेवले आहे आणि पुन्हा माझ्याविरुद्ध संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत.
वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी 17.10.2025 ला शेवटचा ईमेल कंपनीकडून आला त्यात असलेल्या attachment मध्ये केवळ ह्या संस्थेकडे मी शिक्षण घेत असताना संस्थेला ज्ञात असलेल्या बाबींचा उल्लेख करणे अपेक्षित असताना पुन्हा खोडसाळपणा केला आहे. तो खालील प्रमाणे.


वरील verification letter पाहिल्यास मॉडर्न कॉलेजचा खोडसाळपणा लक्षात येतो. ती कंपनी विचारते की ह्या कार्यकाळात कॉलेजला असताना त्यांच्या असलेल्या माहितीनुसार माझ्या प्रामाणिक असण्यावर काही शंका आहे का, त्याचे उत्तर हो अथवा नाही देणे अपेक्षित आहे.हो असल्यास स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. परंतु कॉलेजचा खोडसाळपणा बघा त्यांनी हो अथवा नाही काहीही उत्तर न देता एक स्टार * दिला आहे आणि त्याखाली स्पष्टीकरण दिले आहे की त्यांच्याकडे माहिती नाही, पोलिसांना विचारून माहिती दिली जाईल. कॉलेजला पोलीस कारवाई अथवा गुन्हे रेकॉर्ड संबधित विचारणा केली गेली नव्हती तर केवळ मी त्या कॉलेजला असताना माझ्या चारित्र्याबद्दल काही गैर आढळले असेल तर ते सांगणे अपेक्षित होते, पण ज्या पद्धतीचा शेरा ह्या कॉलेजने मारला आहे त्यानुसार कुठली कंपनी कुठल्याही उमेदवाराला संधी देईल काय हे अगदी स्पष्ट आहे.
त्यामुळे हा एकबोटे कुटुंबाकडून माझ्यावर जातीय अभिनिवेष बाळगून केला गेलेला अन्याय आहे हे स्पष्ट होत. ते केवळ इथवर थांबत नाहीत तर त्याही पलीकडे जाऊन माझी बदनामी करत आहेत शिवाय मला कायदेशीर कारवाई ची धमकी मीडियातून देत आहेत. आता पुरोगामी महाराष्ट्रातल्या, फुले शाहू आंबेडकरी वारसा असलेल्या जनतेनेच ठरवणे अपेक्षित आहे इथे दोषी कोण आहे.
जय भीम.
धन्यवाद.
प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे
हा लेख कुणीही कुठल्याही ठिकाणी कॉपी करून पब्लिश करू शकता, कुठल्याही परवानगीची गरज नाही. केवळ मूळ स्त्रोत/सोर्स म्हणून Round Table India Marathi/भीमाच्या लेखण्या हा उल्लेख करावा.

Caste-based harassment in educational institutions is a serious offence.
When a college authority harasses a student or former student on caste grounds — especially while denying legitimate documents like a verification letter — it is not just unethical, it is criminal. Such acts cause mental trauma, damage reputations, and can destroy careers.
Authorities indulging in such discrimination must be booked immediately under the SC/ST (Prevention of Atrocities) Act. Education spaces should be safe, fair, and dignified for every learner — not platforms for humiliation or bias.