
सागर अ. कांबळे

गेल्याच वर्षी केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि आता लगोलग हिंदीसक्तीचा प्रयत्न करून हे दाखवून दिले की ती एक वरवरची विधानसभा निवडणुकापुरती राजकीय चाल होती, त्यात भाषेवरचं प्रेम न्हवतं. हिंदी जेमतेम बाराशे वर्ष जुनी भाषा आहे आणि ती अभिजात भाषा नाही. मराठी दोन-अडीच हजार वर्ष जुनी भाषा आहे. इतकी शतके ती टिकून आहे. भारतात अशा तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली इ. अभिजात भाषा आहेत. म्हणजे या भाषा कोणत्याच बाजूंनीं हिंदी पेक्षा कमी नाहीत. उलट अनेक अर्थाने सरस आहेत.
जर्मनीत आणि एकंदरीत युरोपातल्या शिक्षणसंस्था आणि कामाच्या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत असते, ती म्हणजे जर्मन, पोर्तुगीज, स्पॅनिश, तुर्किश अशा भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये असणारा आत्मविश्वास. आणि इंग्लिश किंवा दुसरी भाषा वापरात असो न असो, त्यांनी स्वतः च्या भाषेत ज्ञाननिर्मिती आणि शिक्षणव्यवहार दोन्हीचा दर्जा उंचावत ठेवला आहे. एक साधी गोष्ट गुगल करून बघा. जगात जर्मन, पोर्तुगीज, कोरियन वगैरे भाषा बोलणारे नेटिव्ह लोकं किती आहेत. मराठीचा सुद्धा आकडा याच्या आसपासच आहे. पण मराठी किंवा इतर भारतीय भाषा समृद्ध असूनही, आपण केवळ शब्दप्रामाण्यवादी असल्याने आपल्या भाषेत ज्ञान निर्माण करण्यापासून लांब आहेत. भारताची ही समृद्धी आहे की आपल्याकडे अनेक भाषा, बोलभाषा आहेत. भाषा हा माणसाने लावलेला सगळ्यात मोठा शोध आहे. ही गोष्ट धर्म, तत्वज्ञान अभ्यासकांपासून आत्ताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लँग्वेज मॉडेल संशोधकांपर्यंत सगळेच मान्य करतात. एखादी भाषा जेव्हा मरते किंवा एखादी भाषा दुर्लक्षित केली जाते तेव्हा काय होते? भाषेसोबत जोडलेली संस्कृती आणि ओळख पुसली जाते. एवढंच नाही, तर त्या भाषेचे नागरिक आर्थिक आणि सामाजिक स्तरावर दुय्यम स्थानी सुद्धा ढकलले जाऊ शकतात. महाराष्ट्राच्या संदर्भात हीच चिंतेची बाब आहे.
एखाद्याचं मराठी किंवा कन्नड असणं त्याला भारतीय असण्यापासून वेगळं करणारं आहे का? तर नाही. उलट जितके जास्त आपण देशी आणि स्थानिक होतो तितके जास्त आपण देशप्रेमी होतो. कारण आपण ही संस्कृती, सभ्यता त्यातूनच टिकवत, घडवत असतो. भारतीय असण्यासाठी हिंदीचा आग्रह ही अट नाही, उलट हा दुराग्रह आहे. ज्यांना भारताच्या खऱ्या सभ्यतेची जाणीवच नाही त्यांचा दुराग्रह. हिंदी आधीपासून महाराष्ट्रात अभ्यासक्रमाचा भाग आहेच तरीही एवढे आक्रमकपणे हातपाय पसरायची गरज का? मराठी माणूस कोणत्याही भाषा स्वतः शिकायला स्वतंत्र आहेच. मराठी भाषेसोबत आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश, हिंदी, बंगाली, कन्नड, स्पॅनिश, लॅटिन, ग्रीक, प्राकृत, पाली, संस्कृत कोणत्याही भाषा शिकण्याची मुभा आहेच. आता तंत्रज्ञानाने त्या संधीही सोप्या केल्या आहेत. भारतात बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाषा हे आपलं वैभव आहे. हिंदीकरण हा त्या वैभवावरचा हल्ला आहे. मराठीने कधीही हिंदी द्वेष केला नाही, पण याच्या उलट, मराठीद्वेष आणि दुर्लक्षितता मात्र आता सर्रास बघायला मिळेल. काँग्रेसच्या काळातही मध्यमवर्गीय लोकांच्या अभिरुचीतून बनवलेले दूरदर्शन कार्यक्रम हिंदी विस्ताराचा आणि पक्ष प्रसाराचा भाग झाले होते.
मराठीला समृद्ध करणारे संत नामदेव पंजाबला जातात आणि त्यांचे अभंग शिखांच्या गुरुग्रंथसाहिब मध्ये समाविष्ट होतात. हीच खरी भारतीय सभ्यता आहे. यापेक्षा भारतीय सभ्यता-संस्कृती काय वेगळी! सगळं भारतीयत्व काय काशीच्या पंडितांनी पोथ्यात साचवून ठेवलं आहे का?
भारतीय भाषांमध्ये सामंजस्य आणि देवाणघेवाणीचे उपक्रम ठेवले तर त्यातून सध्या सरकार ज्यावर भर देत आहे ते ‘इंडियन इंडिजिनस ज्ञान’ तयार होईल. राज्यांच्या भाषा दुर्लक्षित केल्याने याच्या विपरीत परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातल्या निद्रिस्त मध्यमवर्गाला अजून ही गोष्ट लक्षात येत नाही की हा मुद्दा फक्त तुमच्या मुलांना मराठी कि इंग्लिश माध्यमात शिकवायचे असा नाही. आपण जर मराठीला वाऱ्यावर सोडून दिल तर तत्वज्ञ संत नामदेव, मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे, भाताच्या वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे आणि असे अनेक मराठी नायक नायिका संग्रहालयाचा भाग होत होत नष्ट होतील. ज्ञान निर्माण करणारे लोक म्हणून, मूल्यवान व्यक्ती म्हणून मराठीची ओळख नाहीशी होईल. हे इथे उल्लेख केलेले तीन त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज तरुण पिढीला नीट माहीत तरी असतील का? मग येणाऱ्या पिढ्यांचं काय? या तिघांकडे ज्ञान आणि भाषा दोन्ही होतं. भाषेबद्दल आणि स्वतः च्या प्रादेशिक अस्तित्वाबद्दल, की आपण कुठे जन्मलोत, कोणताही गंड न्हवता. कान्होजी जर स्पेन किंवा पोर्तुगालशी संबंधित असते तर तिथे समुद्री नॅव्हिगेशनचा इतिहास म्हणून त्यांच्या जीवनाचा आणि ज्ञानाचा अभ्यास झाला असता. आपण हंगामी फुकाचा अभिमान मिरवतो. जर्मनीत दादाजींचा वैज्ञानिक म्हणून, आणि नामदेवांचा कान्ट हेगेलसोबत अभ्यास झाला असता. केवळ भावनिकतेतून नाही तर युरोपातील अकॅडेमिक अनुभवावरून मी हे विधान करत आहे. नामदेवांना तत्वज्ञ, कान्होजीना नौदल तज्ञ, दादाजींना संशोधक म्हणून आपण आजवर का पाहू शकलो नाही? याच्या मागे शूद्रांचे ज्ञान कमी लेखणारी जातीय उतरंड हे मोठं कारण आहेच. पण मराठी भाषेचे होत असलेले सीमांतीकरण या प्रक्रियेचा शेवटचा घाव ठरेल. इथल्या मातीत आणि भाषेत ज्ञान तंत्रज्ञान पिकतच नाही ही सर्वत्र पसरलेली समज आहे. याच कारणामुळे मराठी भाषेचा प्रश्न हा सर्वच जातींचा आहे पण तो बहुजन समाजासाठी मोठा प्रश्न आहे. मातृभाषेशिवाय आपणास मूळ आणि पाया तर नाहीच पण, मराठीचे हिंदीत सामिलीकरण (assimilation) हे रोजच्या जगण्यावर आणि सामाजिक, राजकीय अस्तित्वावर होणारं वर्चस्व आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आपल्या उत्तर भारतीय हिंदू, हिंदी जाळ्यात घेण्याचे हे उघड डावपेच आहेत. मुघलांचा द्वेष करायचा आणि स्वतः दिल्लीचे मुघल वागतात तशी वृत्ती ठेवायची अशा राजकीय चाली सुरु आहेत. मराठी राज्यकारभार आणि दैनंदिन जीवनाची जागा हिंदी भाषा आणि हिंदी लोक चोरपावलांनी कधी घेतील हे कळणार पण नाही. आपल्याच राज्यात आपण उपरे! ही प्रक्रिया सुरु झालीच आहे पण आपण झोपेचं सोंग घेऊन बसलो आहोत. बहुसंख्य मराठी जनता शेतकरी आणि कमी उत्पन्न गटातली आहे, आर्थिकदृष्ट्या निम्न मध्यमवर्गात आहे. हे संकट टाळायचं तर महाराष्ट्राच्या जनतेची राज्यकारभारातली स्वायत्तता जपण्यासाठी आपल्याच नेत्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला लढावं लागणार.
माझ्या मित्राने, नंदुरबारवरून लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं : ” तुला सांगतो देशभक्ती जर मातीवरल्या प्रेमातून ठरवली असती ना तर हे सर्व पहाडी लोक त्यात सर्वात वरच्या नंबरवर आले असते.” एक गोष्ट या हिंदीसक्तीविरोधातल्या आंदोलनाच्या निमित्ताने उघड झाली आहे ती म्हणजे मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठी माणूस म्हणून आजवर जे काही सांस्कृतिक, राजकीय राजकारण झालं ते अपुरं ठरलं आहे. आपला भाषेचा अभिमान मिथ्या राहून काहीच साध्य होणार नाही. या आंदोलनाच्या मागण्या शैक्षणिक आणि सामाजिक दोन्ही स्तरावर पोचल्या पाहिजेत. देशावरचे प्रेम म्हंणजे कशावरचे प्रेम? प्रतीकं की माणसांवरचे प्रेम ? मराठीवरचे प्रेम असेच सहजभावाने मराठी माणसांवरील, प्रत्येक मराठी माणसावरील – महाराष्ट्रातले आदिवासी आणि त्यांच्या भाषा-संस्कृती, बोलभाषा, स्थानिक बोली – यांच्यावरील प्रेम होईल का ? तसं असेल तर ही जागृती भाषेचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार आयुष्य अशी वाढत राहिल.
जिल्हा पारेषद, मनपा अशा मराठी शाळांची दुरावस्था करून महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनी मराठी भाषेच्या अधोगतीचा रस्ता मळून ठेवला आहे. भाषेवरून होणारी दादागिरी हा आपल्यावर एका मोठ्या होऊ घातलेल्या वर्चस्वाचा भाग आहे. गेली चारपाच वर्ष मराठी प्रदेशात जो गोंधळ माजवला गेला आहे, नावापुरती ठेवलेली निवडणूक लोकशाही, नावापुरत्या सुद्धा निवडणूका न घेता प्रतिनिधीविरहित ठेवलेल्या म्युनिसिपालट्या, जातीजातीत वाढवलेले द्वेष, पक्षफोडी, खून… हे सगळं काय दर्शवत आहे. कशाचं मराठी राज्य आणि कसलं स्वराज्य! किती निष्क्रिय होऊन हे सगळं आपण सहन करतोय.
लंडन, पोर्तुगाल, बर्लिन मध्ये भेटलेले भारतीय आपली स्थानिक ओळख अभिमानाने सांगतात.
“पंजाब दुनिया में सबसे बढिया जगा है रहने के लिये,” “मदुराई अँड चेन्नई हॅव बेस्ट एज्युकेशन,”
कन्नड, मल्याळम सुद्धा आपल्या आपल्या ओळखीबाबत स्पष्ट आणि ठाम आहेत. बंगाली लोकांची जगभरात ख्याती आहे. मराठीचे काय? प्रेम तर दिसते पण मराठी-महाराष्ट्रीय माणूस संभ्रमितच जास्त आहे. कसल्या ओझ्याखाली आपण राहतोय? महाराष्ट्रातले सर्व जाती धर्मातील लोकं, भाषा अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनी सोबत येऊन मराठी भाषा आणि मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी लढण्याची ही वेळ आहे. एखाद्याचं मराठी असणं म्हणजेच भारतीय असणं आहे. भारतीय असणं म्हणजे संपूर्ण शरीर असेल, तर मराठी अस्तित्व हे आपलं हृदय आणि आपले हातपाय आहेत. तेच धड नसतील तर त्याच्याशिवाय आपण मुर्दा शरीर आहोत. आपण नाठाळपणा सहन करणारे मृतप्राय मराठी लोकं बनलो आहोत का?
सागर अ. कांबळे
लेखक फ्राई युनिव्हर्सिटी बर्लिन येथे व्हिजिटिंग रिसर्च फेलो आहेत.
- मराठी भाषेअभावी नामदेव, कान्होजी आंग्रे, दादाजी खोब्रागडे पुन्हा बनू शकत नाहीत. - July 1, 2025
- आपली क्रांती आपण क्लेम केली पाहिजे - September 5, 2022
- आशयाचा श्रम : अण्णाभाऊ साठे मराठी कथा स्पर्धा – भूमिका - April 25, 2022
हिन्दी सक्ती विरोधात म्हणा किंवा मराठी भाषिकांच्या उदासीनते वर म्हणा, हा जळजळीत आणि तेवढ्याच तळमळीने लिहिलेला लेख म्हणजे सागर च्या यापुर्वी आलेल्या लेखा इतकाच महत्त्वाचा आहे… सागर च्या या विचारांना जर योग्य प्लॅटफॉर्म मिळाला तर भाषे बद्दलची जागृती होण्यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडतील… खूप खूप शुभेच्छा सागर. जय भीम
Taking lead of South Indian languages, Modi script should’ve been adopted for Marathi for maintaining unique identity. Languages closer to hindi viz. Gujarati, Punjabi, Bengali etc have distinct scripts so why does Marathi use Devanagari?
मराठी भाषेचा ‘काल,आज आणि उद्या’असा त्रिकालवेध घेणार हा लेख म्हणजे महाराष्ट्रजनांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे.भाषेचे राजकारण आणि राजकारण्यांची भाषा आपण समजून घेणे आवश्यक आहे.ज्यांना मराठीचा”म”कळत नाही ते भाषासक्ती करत आहेत.सत्ताधाऱ्यांकडून नजीकच्या काळात महाराष्ट्रात ग्रामपंचायतीपासून ते खासदारकीपर्यंत हिंदी भाषिकांसाठी काही जागा आरक्षित करण्यात
आल्या तर आश्चर्य वाटायला नको.वेळीच सावध व्हा आणि मराठीसाठी,महाराष्ट्रासाठी सज्ज रहा..
…जय महाराष्ट्र..