माहुल : पुनर्वसन की मृत्यूचा सापळा?

सोनल शहाजी सावंत

स्त्रोत – इंटरनेट

मुंबई मधल्या माहुल गावातल्या म्हाडा वसाहतीं मध्ये मी राहते. जो खर तर ७२ buildings चा SRA प्रोजेक्ट आहे. आणि मुंबई च्या कानाकोपऱ्यातून (झोपडपट्टी) मधून लोकांना पुनर्वसनाच्या नावाखाली या buildings मध्ये लोकांना रहायला घर दिलेली आहेत. १० बाय १२ च्या खोलीत एका कुटुंबात जेवढी लोक आहेत तेवढी सगळी राहतात. माहुल च वातावरण आपण पाहिलं तर म्हाडा वसाहतींच्या समोर च भारत पेट्रोलियम केमिकल refinery, मागच्या बाजूला खाडी थोड पुढे गेल की RCF कंपनी आणि HPCL अस चहूबाजूंनी chemical gas कंपनी आणि अत्यंत दूषित वातावरण. इथे येण्यापूर्वी आम्ही घाटकोपर येथे चाळीमध्ये राहत असू, परंतु ती जागा महापालिकेच्या हद्दीत असल्याने आमच “पुनर्वसन” इथे करण्यात आल, १९८२ पासून राहत असलेले घाटकोपर चे घर सोडून आम्हाला इथे यावं लागलं. पहिल्यांदा माहुल मध्ये राहणे किती धोकादायक आहे हे २०१८ च्या सप्टेंबर मध्ये कळल. जेव्हा BPCL मध्ये स्फोट झाला. आणि पूर्ण मुंबई संकटात होती पण भक्ष्यस्थानी आम्ही पडणार होतो. (ह्या घटनेची बातमी इथे)

इथल्या लोकांचा विचार केला तर बहुसंख्य लोकसंख्या ही बहुजन, मुस्लिम आणि मग इतर (म्हाडा वसाहती मधली फक्त. गाव आगरी-कोळी समाजाच आहे. ) आणि यातल्या बर्‍याच लोकांचा रोजगार हा अगोदर ज्या ठिकाणी राहत होते तिथे अवलंबून होता. बर्‍याच स्त्रिया धुणीभांडी ची कामे करत असत तर काही लोकांनी फुटपाथ वर वेगवेगळ्या स्टॉल, धंदे मांडून बसले आहे.याबद्दल अजून खोलात जर का आपण पाहिल तर, RCF आणि ईस्टर्न फ्री वे कडून येताना लगेचच वातावरण थोडफार धुरकट धुरकट दिसू लागतं. कॉलनी च्या गेट मधून आत येताना फूटपाथ आणि बाहेरच्या रस्त्यावर बरीच लोक मोबाईल वर बोलताना दिसतील.कारण जसे तुम्ही आत येता तस तुमच मोबाईल नेटवर्क तुमची साथ सोडून जात. कॉलनी आता बर्‍यापैकी लोकांनी गजबजलेली आहे. सगळीकडेच गर्दी, कचरा, रस्त्याच्या कडेला उभ राहून धूर सोडणारी (सिगरेट पिणारी) अल्पवयीन मुल, कॉलनी च्या मध्यात गटाराची फुटलेली लाइन आणि रस्त्यावर पसरलेल पाणी, तिथेच बाजूला भाजी, मच्छी, फळे विकणारे विक्रेते आणि अस वातावरण असूनही खरेदी करणारे लोक अस चित्र दिसेल.  कोणत्याही बिल्डिंग च्या आत जाण्याचा प्रयत्न केला की अगोदर समोर येईल तो कचर्‍याचा डोंगर, त्यावर सर्रास दिसणारे मच्छर, कुत्री, गाय असे प्राणी. बंद पडलेल्या लिफ्ट आणि कचरा आणि गुटखा आणि पानाने रंगवलेला काळोखा जिना (लिफ्ट working condition मध्ये ही लालच असते.) बिल्डिंग च्या मागच्या बाजूला फुटलेली ड्रेनेज लाईन त्यामुळे सतत येणारी दुर्गंधी आणि मच्छर तसेच त्यात वरुन लोकांनी कचरा टाकून नव्याने तयार झालेली गटारे हे अस काहीस चित्र दिसेल. 

अशा वातावरणात इथल्या लोकांच्या तब्येती देखील तशाच आहेत. प्रत्येक तिसऱ्या कुटुंबात एक तरी व्यक्ती TB, हृदय रोगाने त्रस्थ आहे. त्यात इथे आल्यापासून सतत मलेरिया, टायफॉइड, त्वचेचे आजार हे तर कोरोना च्या अगोदर पासून आहेतच. महिलांचा विचार केला तर एकही महिला डॉ (खाजगी सुद्धा) नाहीच. त्यामुळे delivery, प्रेग्नंसी या काळात राजावाडी किंवा मग इतर private हॉस्पिटल गाठावे लागतात. महिलांनंतर जास्त समस्या आहे ती म्हणजे वृद्ध आणि लहान मुले यांची. सरकारी एक OPD इथल्या बिल्डिंग क्रमांक ४२ मध्ये सुरू केलेली आहे परंतु तिथे जाताना घोटाभर गटाराच्या पाण्यातून वाट काढत जावी लागते आणि एकूणच सरकारी व्यवस्थेवर असलेला अविश्वास यामुळे ज्यांची खूपच अडचण आहे केवळ तेच लोक जातात.

१७ ठिकाणाची १७ लोक जमा झाल्यामुळे पुन्हा महिलांची सुरक्षा हा ही महत्त्वाचा मुद्दा आहे. गर्दीचा फायदा घेत होणारे स्पर्श, चालताना लाळ गाळत बघणार्‍या नजरा, पास होणारे कॉमेंट्स हे तर रोजचच आहे आणि याची इतकी सवय आता पडलीय की त्याबद्दल कोणीच बोलायला ही तयार होणार नाही. बरं यात फक्त महिलाच असुरक्षित आहेत का? तर असे नाही! रोज छोट्या छोट्या कारणावरून होणारी भांडणे कधी मारामारी आणि half मर्डर- पर्यन्त पोचतील याचा नेम नाही. बस आणि गावात गावातल्या लोकांची अरेरावी ही सुद्धा कुठे तरी याला कारणीभूत आहे.       मार्च-एप्रिल मध्ये पहिल्यांदा जेव्हा लॉकडाऊन पडला तेव्हा इथल्या लोकांनी भीती पोटी त्याला चांगला प्रतिसाद दिला. काही लोक ज्यांना शक्य होते ते गावी निघून गेले. पण ज्यांना शक्य नाही ते सगळे इथेच या गॅस चेंबर(मुद्दाम हा शब्द वापरतेय कारण इथली परिस्थिती तशीच आहे.) बर्‍याच लोकांचे रोजगार गेले. बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे धंदे बंद पडले. खुराड्या सारख्या घरात एकाचवेळी सगळे जबरदस्ती अडकल्यामुळे त्यात खायला अन्न नाही हातात पैसे नाही यामुळे अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली. माझ्या समोरच्या बिल्डिंग मध्ये २-३ व्यक्तीनी आत्महत्या केल्याच ऐकण्यात आल्याने एकमेव घरातून बाहेर पडून गच्ची वर जायचा ऑप्शन ही बंद पडला. 

एका माळ्यावर ३० खोल्या असल्याने एका ७ मळ्याच्या बिल्डिंग मध्ये राहणारी लोकसंख्या ही भरपूर आहे. त्यामुळे covid पेशंट चा hotspot असूनही या भागात इतर ठिकाणांसारख सरकारच लक्ष कमीच होत. आणि यामुळेच इथे covid मुळे कमी पण हार्ट अ‍ॅटॅक आणि इतर आजार मुळे जास्त लोक दगावली. आमच्या बिल्डिंग मध्ये अगदी ७-१५ दिवसाला १ असे मृत्यूचे प्रमाण होते. हॉस्पिटल पाहिल तर घाटकोपर च राजावाडी रुग्णालय हे जवळ म्हणजे ७-८ किमी लांब आणि त्यात ते ही covid hospital असल्याने इतर आजार असलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल याची तुम्ही कल्पना केलेलीच बरी. प्रतेक घरात कोणी ना कोणी आजारी, अगोदर धुरामुळे कमी झालेली फुफ्फुसाची ताकद, त्यात दारू, सिगरेट, यांसारखी व्यसने, हातात काम नाही आणि असे अजून बर्‍याच समस्यांनी overall lockdown अत्यंत वाईट गेला. अगदी माझ्या घरी ही आम्ही एक झाले की एक आजारी पडून वर्षाच्या शेवटी हार्ट अ‍ॅटॅक नेच आजीचा मृत्यु (बिल्डिंग madhye जवळपास १०-१५ लोक heartattack ने वारले) याला जबाबदार ही कुठे तरी हा lockdown च आहे.       Lockdown नसताना atleast आम्हाला जवळचे हॉस्पिटल उपलब्ध तरी होते. आणि कामाच्या निमित्ताने का होईना या घाणेरड्या वातावरण मधून लोकांना बाहेर थोड्या वेळासाठी तरी पडता येत होत. परंतु Lockdown मुळे ते सर्व बंद झाल आणि लोकांनी आपले उत्पन्नाचा स्त्रोत, कुटुंबातील सदस्य, मानसिक स्वास्थ्य, आरोग्य अस बरच काही गमावले. लॉक डाऊन च्या काही दिवस अगोदर मेधाताई पाटकर यांच्या मदतीने इथल्या लोकांनी आदरणीय सुप्रीम कोर्टात जाऊन इथून आम्हाला हलवण्याबाबत लढा जिंकला होता. पण लॉकडाऊन पडल आणि सगळे निर्णय ठप्प झाले. त्याची अमलबजावणी कधी होणार आहे किती टप्प्यात होणार आहे माहीत नाही.

गळक्या छतापासून ते कचर्‍यापर्यन्त BMC ला तक्रार करून ही काही फायदा होत नाही,  त्यामुळे ‘बाहेर ते बाहेर घरातही थांबायचे कसे?’ हा प्रश्न इथल्या लोकांना आहे. तर सरकार दरबारी इथल्या लोकांना बिल्डिंग मध्ये राहायला घर दिल, २४ तास पाणी दिले म्हणजे एकप्रकारे उपकार केले आहेत अशा प्रकारचा approach आहे. या सर्व गोष्टींमुळे गरीब आणि बहुजनांनी कायम दुर्लक्षितच रहायच का? जर का प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरविणे हे राज्याचे कर्तव्य आहे तर मग माहुल इतकी वर्ष दुर्लक्षित का? फक्त निवडणुकी च्या वेळी इथल्या नेत्यांना इथल्या लोकांची आठवण येते. इतर वेळी आपला नेता कोण हे देखील आम्हाला माहीत नाही. हातावर पोट असणाऱ्या समाजाकडून हफ्ते गोळा करून अजून किती दिवस यंत्रणा स्वताची पोळी भाजणार आहे?

पुन्हा लॉकडाऊन आता सरकार लावत आहे.पण पुन्हा Lockdown लावताना नियम सगळीकडे सारखे लावुन त्या भागातील लोकांची मुख्य समस्या लक्षात घेऊन ते बसवावेत. एवढी एकच सरकार ला विनंती!

सोनल शहाजी सावंत

लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्याीठात MA in Women’s studies शिक्षण घेत आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*