प्रकाश रणसिंग
“…. बाहेरून आपल्याकडे ‘ शो पीस’ म्हणून पाहणारे लोक आपला वापर शो पीस म्हणूनच करीत आहेत हे लक्षात घ्या. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आमचे राज्यकर्ते दिल्लीच्या राजरस्त्यावरुन जी धिंड काढतात, तो शोच असतो. ती एका परीने आमची धिंडच असते. त्यातून वैभवशाली दारिद्र्य, नालायकपणाच आम्ही दाखवत असतो. ती नृत्य आणि गाणी बेंदराच्या बैलासारखी वाटतात. वर्षभर कुणाला परत आठवण येत नाही की हे कला प्रकार सादर करणारे कोणत्या अनन्य अवस्थेत नंगे – भुके जगत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या रकमा आमच्या नावे खर्च होतात आणि पाड्यावरल्या आदिवासीची लंगोटी आहे तशीच आहे.”
असं मत चौथ्या आदिवासी साहित्य संमेलना मध्ये अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण माने यांनी मांडलं होतं. लक्ष्मण माने भटक्या विमुक्तांच्या चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते. उपरा हे त्यांचं आत्मकथन. लक्ष्मण माने या एका भटक्या विमुक्तांमधुन येणाऱ्या साहित्यिक कार्यकत्याला आदिवासी साहित्य संमेलनाचे आध्यक्षपद मिळणे हा इथल्या प्रस्थापित ब्राह्मण सवर्ण साहित्यिक मंडळीच्या विरुद्ध आदिवासी, कष्टकरी, भटक्या विमुक्त एकीचा सिम्बल मानावा लागेल. आणि इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने जी जातीय गुलामी आमच्या कैक पिढ्यावर लादली आहे, तो केवळ दलितांचा प्रश्न नव्हे इथल्या तर आदिवासीचा, भटक्या विमुक्ताचा प्रश्न आहे आणि त्याविरोधात साहित्यिक आणि सामाजिक नवनिर्मिती सर्वांना मिळून करावी लागेल हा त्यामागचा उद्देश असावा.
लक्ष्मण माने जे ब्राम्हणी व्यवस्थेच्या शो-पीस सिस्टिम बद्दल बोलतात ते आजही तितकंचं सत्य आणि वास्तव आहे. राज्यव्यवस्था मोठ्या थाटात आदिवासीच्या नाट्य-नृत्य कलेला वर्षाच्या एका दिवशी घेऊन मिरवतात. पण त्याचवेळेस आदिवासीच्या पोटापाण्याच्या प्रश्नाकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. आदिवासींचं अस्तित्व राजमार्गावर एका फेरीत संपवतात. पण त्याचवेळी हजारो फेऱ्या हक्काच्या वनजमिनी मिळवण्यात घालाव्या लागतात. बरं यात कोणी हक्क मागायला उठलं की मग नक्षली म्हणून गणला जातो. इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांना केवळ शो-पीस म्हणूनच मिरवले, मिरवत आहेत. परंतु जेव्हा जेव्हा सत्तेतील आणि संपत्तीच्या समान वाटपाचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा सगळे शो-पीस जेलात कोंडले जातात. हजारो वर्षाच्या प्रश्नाना बगल देत त्यांना ब्राम्हणी व्यवस्थेच्या मनोरंजनासाठी वापरलं जात आहे. याच शो-पीस व्यवस्थे बद्दल बोलताना लक्ष्मण माने म्हणतात –
” या शो-पीस व्यवस्थेमध्ये आपण भुकेल्या पोटी प्रदर्शनीय वस्तु होत आहोत.” या शो-पीस व्यवस्थेने आजही आदिवासी भटक्याना माणूस म्हणून कधीही बघितलं नाही. तर वस्तु म्हणून, शो-पीस म्हणून बघितलं. आमच्या माणसांचा आजही बाजार भरतो. बोली लागते. ठेकेदारीच्या या बाजारात माणसं सालानं गुलाम होतात. ही गोष्ट नक्कीच नवीन नाही. सर्रास होत आहे. माणसं आजही इथल्या सरंजामी लोकांचा अन्याय अत्याचार सहन करत आहेत. माणूस म्हणून आदिवासी भटक्याचं, दलितांच जगणं नाकारलं गेलं.
या सगळ्या बेसिक प्रश्नाना खुंटीवर टांगत आदिवासी कसे हिंदु आहेत हे स्पष्ट करण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत. त्यांचं हिंदूकरण करण्यावर भर देत आहेत. लक्ष्मण माने म्हणतात एखाद्या वस्तुला वाटून घ्यावे तसे या मंडळींनी आदिवासींना वाटून घेतले आहे. जसे समाजशास्त्रद्य जी एस घुर्ये हे सुद्धा आदिवासी कसे मागासलेले हिंदु आहेत हे म्हणून प्रमाणित करतात. लक्ष्मण माने काही अशा साहित्यकांचे, पुस्तकांचे उदाहरण देतात की ज्यात आदिवासी फक्त विषयापुरता मर्यादित राहिला. उदा. दुर्गाबाई भागवत यांनी माडिया जमातीतील स्त्री पुरुषांवर ‘महानदीच्या तीरावर’(१९५७) ही कांदबरी लिहली. संपूर्ण कांदबरी महानदीच्या डोहातील चेटकिणीभवती फिरत राहते. ती कांदबरी काय आदिवासीची होणारी पिळवणूक विपन्नावस्था याला न्याय देऊ शकली नाही. ना आदिवासी स्त्री ला शोषणाविरुद्ध आवाज देऊ शकली नाही. पुढे ते गोदावरी परुळेकर यांच्या ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकाचे ते उदाहरण देतात. ते म्हणतात हे पुस्तक वारल्यांच्या वर्णनापेक्षा गोदावरी परुळेकरांचे आत्मचरित्र जास्तं वाटते. यातून उपकारक अहंम चा दर्प सतत जाणवत राहतो. त्याच प्रकारे गो.नी दांडेकर याच्या ‘जैत रे जैत’, ‘भिल्लवीर कलिंग’ या ही कांदबऱ्या याच प्रकारात येतात. म्हणजे सगळ्यां अंधश्रद्धा आणि आदिवासी आणि भटक्याच्या माथी मारायच्या. असं एकंदरीत काम चालेलं असतं.
म्हणून अश्या प्रकारचे साहित्य आदिवासींना कोणत्याही प्रकारचं न्याय देऊ शकत नाही. केवळ आदिवासीचा डाटासाठी वापर केला. स्वतःच्या पुस्तकांचा बाजार भरवला. पण आदिवासींच्या वाट्याला काय आलं? त्यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे. आदिवासी, भटक्या जमातीच्या भाषावर अभ्यास करुन पदव्या प्राप्त केल्या. पण परत आपण जो डेटा वापरला त्या लोकांचं काय? यांच्यावर रिसर्च करून धनवान झालेल्यांनी आदिवासींना काय दिलं? रिसर्च एथिक्स मध्ये हे ऍड करायला पाहिजे. नाहीतर आदिवासी भटक्या जमाती फक्त डाटा म्हणून शिल्लक राहतील. इथून पुढे अभय खाखा या कार्यकर्त्याच्या भाषेत ठासून सांगायला पाहिजे – “I am not your data.” हे होणं आज गरजेचं आहे.
समाजसेवेच्या क्षेत्रावर बोलताना लक्ष्मण माने म्हणतात, आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणारे मोठे होतात आणि आदिवासी मात्र जैसे थे. मग ते बाबा आमटेचं उदाहरण देऊन सांगतात, भामरागडात मीठ वाटण्यासाठी बाबा आमटे जातात ते मोठे होतात. सन्मान, धनधान्य विपुल मिळते. त्याचप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही तेच जे. पी सिंघल या चित्रकारने बस्तर मधील माडिया तरुणीची चित्र काढल्या बद्दल आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली पण बस्तर ची स्त्री मात्र जैसे थे! तिच्या डोईवरील मोळी आणि काखेतलं मूल काही खाली उतरले नाही. या सगळ्या पद्धतीला माने बौद्धिक भ्रष्टाचार म्हणतात. मग ते काही उदाहरणं देतात ‘भामरागडची भ्रमणगाथा’, ‘सत्यकथा 78’ नाटक, ‘आक्रोश’ हा तेंडुलकरांचा की आदिवासीचा? अशाप्रकारचे नाटक सिनेमे आदिवासींना नायक करतच नाहीत . त्यासाठी बाहेरून ईश्वरासारखा कुणीतरी गेला पाहिजे त्यांचा उद्धार करायला, अशीच चित्रणे रंगविण्यात आली आहेत.
आदिवासीमधून लीडरशिप सुद्धा पुढं आणली जात नाही. प्रश्न आदिवासीचा आणि लीडर ब्राह्मण-सवर्ण, बिगर आदिवासी. ते साहित्य, सामाजिक सेवा, कला, सामाजिक चळवळी आदि सर्व क्षेत्रात घडत आहे. म्हणून जेष्ठ आदिवासी कवी वाहरुभाऊ सोनवणे त्यांच्या स्टेज या कवितेत सांगतात
“ते स्टेज वर उभे राहून
आमचे दुःख आम्हाला सांगत राहिले
आमचे दुःख आमचेच राहीले
कधी त्यांचे झालेच नाही “
आजही फक्तं दुःखाचा बाजार मांडला जात आहे. आदिवासींच्या दुःखावर कोण मोठं होतंय? ही दुःखं कुणाच्या उत्पन्नची साधने होतायत? आदिवासीचं भलं व्हावं वाटत असेल तर आदिवासी मधून लीडरशिप तयार व्हावी लागेल. मग ती सर्वच क्षेत्रात कला, साहित्य, समाजसेवा.
म्हणून लक्ष्मण माने त्यांच्या भाषणात म्हणतात. “बाहेरून रोपे आणून लावली तर ती तग धरतील असे नाही. त्याच जमिनीतून जोरकस मोड उगवतील तर ते नक्की जगतील” आणि असं झालं तरच आदिवासी असतील, भटके असतील यांच्या दुःखाचा बाजार भरणार नाही. आणि दुःखाच्या मुळाशी जाऊन ही सारी दुःख केवळ आमच्यावर का? असे हजारो प्रश्न उभे राहतील. अर्थात ब्राम्हणी सवर्ण व्यवस्थेचा बाजार उठेल. त्यासाठी लक्ष्मण मानेंच्या भाषेत “आपल्याच हातानी आपली स्मशाने धुंडाळली पाहिजेत.”
प्रकाश रणसिंग
लेखक विद्रोही संघटनेचे राज्य निमंत्रक असून District Magistrate Fellowship अंतर्गत तोरणमाळ येथे कार्यरत आहेत.
संदर्भ :
‘आदिवासी साहित्य संमेलन : अध्यक्षीय भाषणे’
संकलन – डॉ. गोविंद गारे
सुगावा प्रकाशन, पुणे
दुसरी आवृत्ती -१४ नोव्हेंबर २०१७
- बुळे पठार: ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध ‘उलगुलान’ पुकारलेले गाव - June 16, 2023
- चॅरिटी नको तर आदिवासींच्या मूलभूत हक्कांची पूर्तता हवी ! - August 17, 2022
- आदिवासींचं अस्तित्व फक्त शो-पीस/डाटा इतकचं? - April 8, 2021
Leave a Reply