शाहू महाराजांचा राष्ट्रवाद आणि जाती निर्मूलन..

साक्य नितीन

“महार, मांग वगैरे हलक्या मानलेल्या जातींना मी वकिलीचा सनदा देतो या योगाने उच्चवर्णीय लोकांचा अपमान होतो असे काही बड्या लोकांस वाटते. पण ही त्यांची चूक आहे. विद्या घेऊन दान तपे थांबून, नंतर समाज बरोबरीचे हक्क देईल या विचारात बुचकळ्या खात पडण्यापेक्षा त्या एकदम दस्यत्वातून मुक्त करून आजपर्यंत जगात ईतर कोणत्याही ठिकाणी दृष्टित्पत्तीस न येणाऱ्या समाजाच्या जुलूमाचा आणि निर्दयपणाचा अंत करावा. या योगानेच खरे राष्ट्रकार्य होईल अशी माझी दृढ समजूत आहे. त्या मार्गानेच आपला कार्यभार उरकला जाणार आहे. काळाकडे बोट दाखवुन काहीही न करणाऱ्या समाजधुरंधारांनी अन्य मार्ग स्वीकारल्यास त्यांचा त्यासच तो लखलाभ होवो!”

“जातीभेद नाहीसे झाले पाहिजेत हे हल्ली बऱ्याच लोकांस कबूल झाले आहे. हे खरेच आहे परंतु प्रश्न एवढाच आहे की, त्या कामाची सुरुवात कोठून व्हावयाची? ज्या ज्या जातींना हलके मानले जाते. त्यांनी जातीभेद मोडावा असे, म्हणणे साहजिकच आहे. परंतु हया दिशेने त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी, त्यांचा तादृष्य परिणाम होणार नाही. या कामी उच्च म्हणविणाऱ्या जातींकडूनच सुरवात झाली पाहिजे. प्राचीन काळापासून वंशपरंपरागत वर्चस्व त्यांनी सोडून देण्यास तयार झाले पाहिजे. जपानमधील जातिभेदाचा बिमोड होण्यास मोठे कारण उच्च वर्गाच्या ‘सामुराई’ लोकांनी सुरवात केली हेच आहे. तसे झाले नसते तर जपानची स्थिती सुधारली नसती. जातीभेद मोडण्याचे प्रयत्न केवळ खालच्या वर्गाकडून सुरू झाल्यास केवळ अनर्थावह होण्याचा संभव आहे. तेच काम उच्च म्हणविणाऱ्या लोकांकडून प्रथम झाल्यास, हे स्वार्थत्यागाचे उदाहरण इतर सर्व जातींना बोधप्रद होईल. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, हल्लीच्या स्थितीचा उपयोग करून वैमनस्य न वाढविता प्रत्येक जातीने आपली सुधारणा करून आपला दर्जा वाढवून घेण्याचा व वरच्या पायऱ्यांवर चढण्याचा प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे. वरील जातींनीही जरूर तर काही पायऱ्या खाली येऊन, त्यांना हात देऊन, वर घेतले पाहिजे. असे झाले म्हणजे सुरळीतपणे आणि सलोख्याने, हे जातीभेद मोडण्याचे बिकट काम सिद्धीस जाण्याचा संभव आहे. आम्हासारख्या मराठ्यांना सुद्धा जात मोडून एकी करण्यास भाग पाडले पाहिजे. धर्मबंधनाच्या अडचणी कित्येक लोक पुढे आणतात परंतु तशी स्थिती नाही. गेल्या युद्धात हिंदू-मुसलमान मेसापोटेमिया युद्धात खांद्याशी खांदा लावून लढले. या कामी त्यांना धर्माचा अडथळा झाला नाही. फक्त आपण एकाच राष्ट्राचे भिन्न भिन्न भाग आहोत किंवा एकाच देशाचे भिन्न भिन्न अवयव आहोत, या एकाच भावनेने सर्व लोक प्रेरित झाले होते.”

( ३० मे १९२० रोजी अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेच्या अध्यक्षपदावरून शाहू महाराजांनी केलेल्या भाषणातील उतारा )

वरील या छोट्याश्या उताऱ्यातून जातीव्यवस्था निर्मूलन आणि राष्ट्रवादाकडे पाहण्याचा शाहू महाराजांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. जातीजातीत विभागल्या गेलेल्या देशात कनिष्ठ जातींवर होणाऱ्या जुलूमाचे, अन्यायाचे निर्मूलन हेच खरे राष्ट्रकार्य असे शाहू महाराज मानतात. १९२० चा काळ म्हणजे भारतात टिळकपर्वाचा अस्त होऊन गांधीपर्वाची सुरवात होण्याचा काळ. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे एकीकडे ब्रिटिश सरकार विरोधात सशस्त्र क्रांतीचे वारे वाहात होते तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारकडून काही राजकीय हक्क आणि सवलती मिळवण्यासाठी आंदोलन सुरू होते. अश्या धामधुमीत शाहू महाराज अस्पृश्य समाजावरील अत्याचाराचे निर्दालन करणे हेच खरे राष्ट्रकार्य जाहीर करतात ही मोठी क्रांतिकारी गोष्ट होती.

या भाषणात शाहू महाराजांनी जातीनिर्मूलनाच्या चळवळीची जबाबदारी उच्चवर्णीयांवर टाकली आहे. शाहू महाराजांचा हिंदु धर्माचा आणि हिंदू मानसिकतेचा अभ्यास असल्यामुळे धर्मसुधारणेचा अधिकार केवळ वरच्या जातींना आहे हे शाहू महाराज जाणून होते म्हणूनच त्यांनी ती जबाबदारी वरच्या वर्गावर सोपवली. १९३६च्या एनिहीलेशन ऑफ कास्ट या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जाती निर्मूलनाची जबाबदारी वरच्या वर्गांवर टाकतात. जातीनिर्मूलनाच्या कार्यात महार-मांग या अस्पृश्य जातींची भूमिका फार मर्यादित आहे हे कटू सत्य आंबेडकरवाद्यांनी स्वीकारलं पाहिजे. महार-मांग फार तर जातीव्यवस्थेविरोधात प्रक्षोभ व्यक्त करू शकतात पण जातीनिर्मूलनाच्या लढ्यात वरच्या जातीचे सहकारी बनण्याखेरीज ईतर कोणतीही भूमिका निभावू शकत नाहीत हे सत्य स्वीकारलं तर बऱ्याच अंशी वाया जाणारी आपली ऊर्जा, वेळ वाचू शकतो.

याच भाषणात पुढे हिंदू-मुस्लिम संबंधांवर शाहू महाराजांनी केलेले भाष्य हे हिंदू-मुस्लिमवादाला कायमची मूठमाती देण्यास पुरेसे आहे. हिंदू, मुस्लिम, महार, मराठे हे एकाच राष्ट्राचे भिन्न भिन्न अवयव आहेत ही बाब जर तत्कालीन समाजाने स्वीकारली असती तर पुढे अनेक अनर्थ टळले असते. राष्ट्राची हीच परिभाषा आज आरएसएस सारख्या राष्ट्रविरोधी संघटनेस मान्य नाही. शाहू महाराजांचा हा inclusive Nationalism आणि त्या विरोधातला आरएसएस, सावरकरवाद्यांचा Exclusive Nationalism यातला भेद वरच्या जातींनी विशेषतः मराठा तरुणांनी समजून घेतला पाहिजे. छत्रपती शाहू महाराज ही मराठा समाजाची लेगसी आहे. दुर्दैवाने बहुसंख्य मराठा तरुण लेगसीपासून दूर होत चालला आहे किंवा त्याला जाणीवपूर्वक शाहू महाराजांपासून दूर केले जात आहे. यातला धोका प्रबुद्ध मराठा तरुणांनी ओळखून ही लेगसी जपण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना आंबेडकरवाद्यांनी सहकार्य केले तर तेच शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.

छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन !

साक्य नितीन: हे आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत आणि व्यवसायाने Freelance IT integrator आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*