प्रज्ञा जाधव
नामकरण हि पुरातन काळापासून चालत आलेली मानवी कृती आहे. नामकरणाची प्रक्रिया दिशादर्शक असते. व्यक्तीची, स्थानांची आणि वस्तूंची नावं आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, आपल्या जगण्याच्या संदर्भांची माहिती पुरवतात. “द मीन्स ऑफ नेम्स: अ सोशल हिस्टरी” (१९९८) या स्टिफेन विल्सन लिखित पुस्तकात ते म्हणतात कि “प्रत्येक नामकरणाचा, नावांचा संदर्भ असतो, विशिष्ट गुण असतात, ते जागृती निर्माण करणारे असतात, नावं प्रभावी संदेश पोहोचवत असतात”
वर्चस्ववादी समाज व्यवस्थेचे एक सुस्पष्ट असे वैशिष्ठ्य म्हणजे, नामकरणाचे अधिकार हे वंचित जातसमूहांतील लोकांकडून काढून घेणे– प्रामुख्याने सार्वजनिक जागांचे नामकरण करण्याचे अधिकार हे मूठभर तथाकथित उच्च जातीयांकडेच असावेत असा अलिखित नियम हा समाज पाळतो. नामांतर आंदोलन सुमारे दोन दशकं चाललेला संघर्ष हा दलितांनी तत्कालीन “मराठवाडा” विद्यापीठाचे नामांतर करून विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी लढलेला लढा हा व्यापक स्वाभिमानाचा लढा आहे.
जागतिक संदर्भात नामांतराच्या चळवळीचा अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि, अनेक परिवर्तनवादी चळवळी नामांतराच्या प्रक्रियेत सक्रिय असल्याचे दिसते, वसाहतवादाने निर्माण केलेले वर्णविद्वेषी प्रतीकांचा धिक्कार करून, नामांतर करून नव्याने वर्तमानाची निर्मिती करण्याची प्रक्रिया दिसून येते. याचे एक उदाहरण म्हणजे अर्जेंटिनातील ख्रिस्टोफर कोलंबस चा पुतळा काढून त्या जागी बोव्हिलिअन स्वातंत्र्य समारातील वीरांगना जुआना ऍझूरडी चे स्मारक बांधण्यात आले आहे. आंबेडकरवाद्यांनी मराठवाड्यात त्या काळी नामांतरासाठी साठी छेडलेला लढा हा या अशा अनेक परिवर्तनवादी चळवळींपैकी एक लढा आहे, ज्या चळवळींचे ध्येय, इतिहासातील वंचित-मागास जातवर्गीय लोकसमूहांबद्दल चे विकृतीकरण खोडून काढणे, सार्वजनिक जागांचे नामकरण करण्याचा, यथायोग्य सामान अधिकार प्रस्थापित करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतिहासाने विशिष्ट उद्देशाने लपवून ठेवलेल्या त्या वंचित जातींतील प्रगमनशील व्यक्तींचा सन्मान करणे आहे.
नामांतराचा लढा हा शैक्षणिक संस्था म्हणजे सार्वजनिक संस्था आहे, ज्यात कोणाचेही वर्चस्व नसावे, जिथे जाण्याचा सर्वांना सामान अधिकार असावा यासाठी पुकारलेला लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न आणि नामांतर चळवळीची व्याप्ती लक्षात घेता, असे कळते कि नामांतराची मागणी निव्वळ भावनिक नव्हती तर त्याला विस्तृत वास्तविकतेची सुद्धा बाजू होती. जातीयवादी समाजाच्या मूलभूत वैशिष्ट्याला आव्हान देणे होते, वर्षानुवर्षे मागास जात वर्गांतील लोकांना प्रगतीच्या वाटेवर येण्यासाठी मज्जाव करण्याचा जो प्रघात होता त्याला नामांतर आंदोलनाने आव्हान दिले गेले.
नामांतराची मूळ मागणी डावलत नामविस्तारावर इथल्या प्रस्थापितांनी, सामाजिक-राजकीय शक्तींनी दलितांची बोळवण केली. नामांतरचे यश किंवा अपयश या प्रश्नांकित बाबी आहेत, परंतु जात-वर्चस्ववादी व्यवस्थेविरुद्ध चा हा लढा सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक मैलाचा दगड आहे.
चळवळी कुठल्या पद्धतीने आठवाव्यात, अभ्यासाव्यात याचा विचार करताना काही प्रश्न पडतात, ते म्हणजे चळवळींची नैतिकता कुठल्या आधारावर स्पष्ट होते, या लढ्यात जीव गमावलेल्या शहिदांच्या कुटुंबातील व्यक्तींचे काय झाले? त्यांच्याबद्दल कितपत लिहिले गेले, ज्ञात आहे?
इतिहासाची मांडणी नव्याने व्हावी, ती मांडणी ज्यांचा तो इतिहास आहे त्यांच्याचकडून व्हावी, वर्तमानातील लढे हे इतिहासात घट्ट रुजलेले आहेत, ते केवळ दलितांचे भावनिक हुंकार नाहीत त्यांचा जागतिक संदर्भ अतिशय व्यापक आहे..
~~~
वरील मजकूर हा Prabuddha Journal of Social Equality मध्ये 2018 च्या पहिल्या अंकातील प्रकाशित लेखाचा काही भाग आहे, जो इथे अनुवादित करून प्रकाशित करत आहोत, हा लेख येथे वाचायला मिळेल: http://prabuddha.us/index.php/pjse/article/view/14
- आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे - June 10, 2022
- महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे - March 8, 2021
- बिजनेस पार्टनर्स हवे आहेत - November 26, 2020
Leave a Reply