मक्रणपूर परिषद :जयभीम जयघोषाचा आरंभ…

प्रवीण मोरे

विदर्भात जयभीमचा जयघोष झाल्याचे सांगण्यात येते. मात्र जयभीमचा पहिला स्वर मराठवाड्याच्या भूमीतच १९३८ उमटला.. अन् भाऊसाहेबांनीच त्याची सुरुवात केली.

स्वाभिमान गमावलेल्या दलितांना बाबासाहेबांमुळेच आत्मसन्मानाचे बळ मिळाले. मात्र त्यासाठी दलितांना खूप संघर्ष करावा लागला. इतिहासांच्या पानांनी दुर्दैवाने या युध्दात दलित योगदानाची नोंदच घेतली नाही. त्यावेळी दलित स्वातंत्र्य सेनानी, नेते, कार्यकर्ते गुलामीतून बाहेर पडत होते, त्याचबरोबर ब्रिटिशांबरोबरही लढत होते, एवढेच काय जुलमी निजाम जो मराठवाड्यावर आपली सत्ता गाजवत होता, त्याच्या विरुध्दही लढत होता. राजकीय, सामाजिक जातीयतेच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी स्वातंत्र्यासाठी अनेक आघाड्यावर लढण्याचे काम दलितांना करावे लागले. बाबासाहेबांना तत्कालीन हैद्राबाद (निजाम) स्टेटमध्ये भाषणबंदीचे आदेश होते. आर्यसमाज, स्टेट काँग्रेस कम्युनिस्ट स्टेट शेड्युलकास्ट फेडरेशन (एस.सी.एफ)यांनी निजामी धोरणास कट्टर विरोध करायला सुरुवात केली होती. आंध्र-तेलंगणा, हैद्राबाद, कर्नाटक, बिदर मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड या ठिकाणी निजामाला त्यांच्या रझाकार संघटनेस सर्व मार्गांनी रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. प्रामुख्याने जुलमी कासीम रझवीला शह देण्यासाठी अनेक ठिकाणी सभा, परिषदा भरविण्यात आल्या, काही ठिकाणी गोळीबारही करण्यात आला होता. मात्र मक्रणपूर परिषदेचे आयोजक दलित मित्र भाऊसाहेब मोरे श्यामरावजी जाधव यांच्यामुळे बाबासाहेबांचा मराठवाड्यात प्रवेश झाला. कन्नड गावाजवळील शिवना नदीचे पात्र यात कन्नड शिरावरील भाग हा (निजाम) हद्दीत तर समोरचा म्हणजे “”मक्रणपूर” चा भाग हा ब्रिटिश हद्दीत होता. ज्याचे जुने नाव (डांगरा) होते. तेव्हा शिवना नदीच्या ब्रिटिश हद्दीतील तीरावर सभेचे आयोजन असल्याने निजाम हद्दीतून दलित जनता, कार्यकर्ते सभेसाठी जाऊ नये म्हणून निजामी पोलिस नदीपात्राजवळ कन्नड येथे तैनात होते, परंतु नदीचे एकच ठिकाण नव्हते मक्रणपूरला जाण्यासाठी, तेव्हा आजच्या मराठवाड्यातून म्हणजेच निजाम हद्दीतील विविध ठिकाणांहून बाबासाहेबांना पाहणे ऐकण्यासाठी ग्रामस्थ, कार्यकर्ते जंगलातून-शेतातून कन्नड मक्रणपूरला दाखल झाले होते.

बाबासाहेब उद्धारकर्ते आहेत एवढा मोठा माणूस आपल्या भागात येतो आहे ही भावनाच सर्वांसाठी प्रेरणादायी होती. बाबासाहेब येणार म्हणून ते ठिकाण लोकांनी श्रमदानाने स्वच्छ करून ठेवले होते. दलितांना आत्मसन्मान, भान, स्वाभिमान मिळवून देण्याच्या दृष्टीने सर्वार्थाने ही परिषद ऐतिहासिक ठरली.
यांनी घेतला मक्रणपूर परिषदेत सहभाग
चोखाजीसाठे, सयाजी पठारे, सुखदेव जाधव, दगडू पुंजाजी नरवडे, वामनराव सक्राजी थोरात, केशरकाकू सातदिवे, रंभाजी अमृता लोटसर, आनंदा नागू मनूर, शिवराम सखाराम जाधव, तुळशीराम कोंडाजी निकाळे, सयाजी मालेगावकर, रंगनाथ गेणू साळवे, ताराबाई भिकाजी थोरात, कचराबाई शामराव जाधव, कासाबाई शिवराम मोरे, नाथा रमाजी पवार, गुंजाजी भागाजी मोरे बापू मोरे.

परिषदेतील ठराव असे
– नमस्कार ऐवजी‘जयभीम’ नावाचा जयघोष करणे
– निजामाचान व मुस्लिम बनविण्याच्या धोरणाचा निषेध
– मेलेल्या जनावरांचे मास खाण्याची प्रथा बंदचे आवाहन
– स्वाभिमानाचे जीवन जगावे असे अमूल्य मार्गदर्शन.
– जुलमी निजाम दलितांचे शोषण करीत असल्याचे पटवले
– दलितांना धार्मिक,राजकीय हक्कांपासून दूर ठेवल्याची जाणीव करून दिली.

~~~

साभार: शाम तांगडे यांचे फेसबुक पेज

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*