एक वही एक पेन: अभिवादनाकडून चळवळीकडे !

विश्वदीप करंजीकर

एक वही एक पेन अभियानाच्या वहीपेन वाटपासाठी आम्हाला अनेक गरजू शाळांकडून संपर्क केला जात आहे. ठरवलेल्या काळात सर्व शाळांची पाहणी आणि वाटप करण्याचे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. अनेक शाळांतून फोन येतात तेव्हा ते विनंती करतात की जर समजा ३०० विद्यार्थी असतील तर तुम्ही किमान १०० विद्यार्थ्यांना वहीपेन तरी द्या. लहान मुलांच्या बाबतीत असे असमान वाटप केले तर ज्यांना वहीपेन मिळाले नाही ते चिमुकले विद्यार्थी नाराज होतात.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एक वही एक पेन देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी कमी लोकांनी प्रत्येकाने जास्त साहित्य दिले होते. यावर्षी अनेक सन्माननीय व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात साहित्य तर दिलेच परंतु त्याचबरोबर एक वही एक पेन वहीपेन देणाऱ्यांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. अनेकांनी स्वत:हून सहभाग नोंदवला.

आम्ही वहीपेन वाटप करताना प्रथम प्राधान्य हे सरकारी, निमसरकारी, मनपा, नपा, नप अशा शाळांना देतो. त्यानंतर विद्यार्थ्यांची परिस्थिती, त्यानंतर शाळेच्या सभेवतालची सामाजिक पार्श्वभूमी आणि मग अनुदानित/विनाअनुदानित असे प्राधान्यक्रम ठरवून देत आहोत.

वरकरणी हा प्राधान्यक्रम फार सोपा वाटतो परंतु सर्वात जास्त गरजूच्या क्रायटेरियामध्येच शेकडो शाळा आहेत. आम्हाला आतापर्यंत १७-१८ शाळांनी संपर्क केलेला आहे. आम्हाला वाटले होते की सरकारकडून शाळांना भरीव मदत होत असेल पण असे नाहीये. विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके आणि खिचडी दिली जाते. (वेळेवर, मुबलक दिले जाते का यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते). मात्र कोणालाही स्टेशनरी, वही, पेन सरकारकडून दिले जात नाही. हे मात्र आमच्यासाठी धक्कादायक ठरले.

मी मागच्या वर्षीपर्यंत एसीच्या थंड हवेत बसून विचार करत होतो की सरकार विद्यार्थ्यांना सगळे काही पुरवत असेल. पण ते तसे नाही. सरकारच्या काही मर्यादा असतील असे गृहित धरुयात. शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क आहे हे थोडावेळ विसरुयात.

गेल्या वर्षी मिळालेल्या साहित्याचे आम्ही ५ शाळांमध्ये वाटप केले होते. यावर्षीच्या अंदाजानुसार ७-८ शाळांपर्यंत आम्ही पोहचू शकू असा अंदाज आहे. हे लिहण्याचे कारण म्हणजे रोज विविध शाळांतील शिक्षकांशी फोनवर बोलणे होत आहे. ते त्यांच्या शाळेच्या परिस्थितीबद्दल फार पोटतिडकीने बोलत असतात. शाळेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळावे म्हणून धडपड करतात. मला अनेकांशी फोनवर बोलल्यानंतर फार अस्वस्थ वाटायला लागले आहे.

कारण मी ऐषोआरामात जगत होतो तेव्हा मला या गोष्टींचा फरक पडला नव्हता. आता जेव्हा गोष्टी कळू लागल्या आहेत आणि डोळ्यांनी विद्यार्थ्यांची अवस्था पाहिली तेव्हा मनात कालवाकालव होते. आम्ही जो ‘एक वही एक पेन’चा कार्यक्रम हाती घेतला तेव्हा फक्त अभिवादनापुरता सीमित होता. आता जेव्हा इतक्या पुढे आलोय तेव्हा याकडे आम्ही चळवळ म्हणून पाहतोय.

पण मी याच्याकडे समाजसेवा म्हणून पाहत नाही. समाजसेवा म्हणजे व्यक्तींवर केलेले उपकारच. करणाऱ्याच्या डोळ्यात अहंकार आणि घेणाऱ्याच्या डोळ्यात लाचारी निर्माण करण्याचा कार्यक्रम म्हणजे समाजसेवा. मला ते काही करायचे नाहीये.

शिक्षण आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहिले नाही पाहिजे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकार आणि प्रशासनातील धोरणनिर्मितीमध्ये असते. शिक्षण देशाचे भविष्य काय असेल हे ठरवते. देशाचे भविष्य शिक्षणातून सुरक्षित करण्यासाठी ठोस कृती करावी लागेल. ठोस कृती नेमकी करायची हे मला माहित नाही. पण माझी त्यावर काम करण्याची तयारी आहे. तुम्ही सगळे सोबत आलात तर हे काम गतीने होईल, नाही आलात तरी होईलच. पण जास्त वेळ लागेल.

एक दिवस देशातील सगळ्या सरकारी शाळेतून CBSE शिकवले गेले पाहिजे असं स्वप्न आम्ही सगळी आंबेडकरवादी तरुण पिढी पाहत आहोत. बघुयात कुठपर्यंत शक्य होतयं ते !

~~~

विश्वदीप करंजीकर- (फेसबुक आंबेडकराईट मूव्हमेंट सदस्य) एम. टेक.आहेत आणि गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज येथे विसिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*