आनंद दिवाकर चक्रनारायण
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील शोषित पीडित आणि वंचित समाजाकडून उच्च शिक्षण घेऊन त्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे हे स्वप्न पाहिले होते !
या स्वप्नाचा पाठपुरावा करतांना त्यांनी पीपल्स एजुकेशन सोसाइटी ची मुंबईला स्थापना केली आणि या संस्थेद्वारे औरंगाबादेत नागसेनवन येथे मिलिंद महाविद्यालय आणि मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन केले.
या महाविद्यालयात प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्वाश्रमीचे संस्कार सोडून बौध्द संस्कृतीतला बदल स्वीकारत होता, आणि त्याला या वातावरणात सामावुन घेण्यासाठी प्राध्यापक मंडळींची मोठी कसोटी लागणार होती. येणारा विद्यार्थी एकदमच गावकुसाला सोडून पुस्तकांच्या जगात प्रवेशीत झाला होता. बाबासाहेबांनी या महाविद्यालयात अतिशय कुशल आणि कुटुंबवत्सल प्राध्यापक आणि प्राचार्यांची नेमणूक केली होती. यामध्ये मिलिंद महाविद्यालयात प्राचार्य डॉ म. भी. चिटणीस, प्राचार्य डॉ म.ना. वानखडे, प्राचार्य डॉ जी. एस. लोखंडे, प्राचार्य एस. आर. हणमंते, प्राचार्य ल. बा. रायमाने यांचा समावेश होतो.
मिलिंद महाविद्यालयात होत असलेल्या सामजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक साहित्यिक चळवळीचे प्रा ल. बा. रायमाने हे एकमेव साक्षीदार आज वयाची 83 वर्षे पूर्ण करीत आहेत.
1963 ला ते मराठी वाङ्मय विषय शिकविण्यासाठी प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले, आणि तेथून ते या मिलिंद नागसेनवन परिसरातील वातावरणात रममाण झाले. साने गुरुजींचे राष्ट्र सेवा दलाचे संस्कार घेऊन आलेले रायमाने सर कधी आंबेडकरमय झाले हे कळलेच नाही.
सर्वात पहिला आणि अभिनव प्रयोग जर कुणी केला असेल तर त्याचे श्रेय रायमाने सरांनाच द्यावे लागेल. मिलिंद च्या वाण्ड्गमयिन इतिहासात मिलिंद हस्तलिखित पाक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या मनातील हुंकार आणि धम्मस्वीकारानंतर झालेला बदल स्वतःच्या हस्ताक्षराद्वारे लिहिण्यासाठी रायमाने सरांनी प्रेरित केले, हे मिलिंद हस्तलिखित पाक्षिक दि 12 डिसेंबर 1963 रोजी प्रकाशित झाले !
हे हस्तलिखित पाक्षिक महाविद्यालयात दर्शनी भागात काचेच्या फ्रेम मध्ये ठेऊन एक नवा प्रयोग समस्त विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांसमोर ठेवला. या पहिल्या अंकापासूनचे सर्वच संपादक सरांनी विद्यार्थीच ठेवले !
पहिल्या अंकाचे संपादक होते प्रा. डॉ. यशवंत मनोहर आणि योगीराज वाघमारे. या मिलिंद हस्तलिखित पाक्षिकाद्वारे एक संदेश दिला की “मिलिंद हस्तलिखिताचे स्वरूप आज हस्तलिखितच आहे ! याला छापील स्वरूप येणार नाही कशावरून? किंवा हस्तलिखितातील एखादा लेखकच स्वतंत्रपणे एखादे वृत्तपत्र काढणार नाही कशावरून ?” या ठिकाणी हा संदेश आज 65 वर्षानंतर खरा ठरताना दिसतोय, दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक बबन कांबळे हे मिलिंद महाविद्यालयात जरी नाही शिकले पण त्यांनी मिलिंदच्या भित्तीपत्रकातून सम्राट आकारला आहे असे आम्हांस वाटते! या भित्तीपत्रकाने विद्यार्थ्यांस एक अशी संधी उपलब्ध करून दिली की आपणही लिहू शकतो आणि आपण लिहिलेले साहित्य आपल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांपर्यंत पोहोचवू शकतो, ते एक आजच्या वर्तमानपत्राचे प्रारूप होते असेही आम्हांस वाटते, जे विद्यार्थी त्यात लिहीत त्यांचे लिहिलेले सर्वच विद्यार्थी आणि प्राध्यापकमंडळी वाचत आणि त्यांना शाबासकी देत, अभिनंदन करीत !
आज जसा एखाद्या वर्तमानपत्रात लेख वा बातमी आली की त्या लेखकाचे व बातमीदाराचे कोडकौतुक हौते तसेच त्यावेळी मिलिंद भीत्तीपत्रकात प्रकाशित झालेल्या हस्तलिखित मजकुराबाबत होत असे. याच हस्तलिखितांतून स्मृतिशेष प्रा सुखराम हिवराळे , स्मृतिशेष प्रा सुखराम हिवराळे ,स्मृतिशेष प्रा प्र.ई. सोनकांबळे, स्मृतिशेष प्रा वामन निंबाळकर , स्मृतिशेष प्रा अविनाश डोळस ,प्रा डॉ यशवंत मनोहर , योगीराज वाघमारे , हरीश खंडेराव ,प्रा विजयकुमार गवई , मथुरा खैरे, भगवान भटकर, राम दोतोंडे, शांताराम हिवराळे, डॉ अरुणा लोखंडे, डॉ कमलाकर गंगावणे आदी साहित्यिक कवी समीक्षक कथाकार जन्माला आलेत !
~~~
आनंद दिवाकर चक्रनारायण
दैनिक वृत्तरत्न सम्राट जिल्हा प्रतिनिधी औरंगाबाद आंबेडकर कल्चरल ऑर्गनायझेशन चे सचिव आहेत
- आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे - June 10, 2022
- महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे - March 8, 2021
- बिजनेस पार्टनर्स हवे आहेत - November 26, 2020
Leave a Reply