प्रजासत्ताक भारताची गरिमा (?)…..

मानसी एन.

स्त्रोत – इंटरनेट

मोदी सरकारने २०१७-१८ मध्ये ‘लाल किल्ला’ ‘दालमिया भारत’ या खाजगी कंपनीकडे देखभालीच्या नावाखाली हस्तांतरित केला, तेव्हा या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या सन्मानाला धक्का पोहोचला नाही. मात्र, शेतकरी जेव्हा लाल किल्ल्यावर पोहोचून सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा लगेच लाल किल्ल्याच्या ‘गरिमेला’ धक्का पोहोचतो. आंदोलनाला डाग लागतो. नसलेल्या अहिंसेला मूठमाती मिळते.

यांनी मात्र निरपराधांच्या रक्ताचे पाट वाहिले तरी चालतात! 

अनेक प्राचीन बौद्ध लेण्या, स्तूप उद्ध्वस्त करुन, त्यांची विटंबना करुन, शेंदूर फासून, इथल्या मूळ इतिहासाचं विकृतीकरण करुन इथली मूळ संस्कृती आपल्या नावावर गोंदवू पाहाणाऱ्यांना इथल्या मूळ वारशाच्या पाऊलखुणा ध्वस्त करताना काहीच वाटलेलं नाही. आणि हे ऐतिहासिक वारशाच्या गरिमेची गोष्ट करतात.

याच राजधानी दिल्लीत जेव्हा भारतीय संविधानाच्या प्रतींची होळी केली, तेव्हा संविधानविरोधी ब्राह्मणी, मनुस्मृतीचे धर्मांध पाईक, पुरुषसत्ताक मेंदूंना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आरक्षणविरोधानं पछाडलेल्यांचे अहंकार सुखावले.

तेव्हा या देशाच्या गरिमेला काहीच झालं नाही.

याच भारत देशात प्रधानसेवकांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कुठलीही पूर्वसूचना न देता संपूर्ण टाळेबंदी लादली. हजारो कामगार, मजूर आपल्या पोराबाळांसह, गरोदर लेकी बाळींसह शेकडो मैलाची पायपीट करत आपापल्या गावी जायला निघाले, पोटात अन्न पाण्याचा कण नसताना मार्चच्या रखरखत्या उन्हात  टाचा घासून मरायला भाग पाडणाऱ्या या अमानुष विकासवादी सरकारने कसलीही भीड बाळगली नाही. कष्टकरी मजूर कामगारांना हरतर्‍हेनं असहाय अवस्थेत लोटून,त्यांची क्रूर चेष्टा करताना या देशाच्या गरिमेला धक्का बसला नाही.

हाथरसच्या ठाकूरांनी हालहाल करुन जिचे लचके तोडले, उन्मादी क्रौर्य माजवून उच्चजातीय लांडग्यांनी आपले कंड शमवले. जिला ‘निर्भया निर्भया’ म्हणून सवर्ण भांडवलशहाधार्जिण्या माध्यमांनी त्या अमानुष घटनेचं गांभीर्य बोथट केलं. छळ करुन मारुन टाकलेली मुलगी दलित जातीतली म्हणून या देशातल्या स्वतःला अभिजन म्हणवणाऱ्या आधुनिक वगैरे लोकांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं. तिचं चारित्र्यहनन केलं. तिला, तिच्या कुटुंबीयांना आजही न्यायापासून वंचित ठेवलं, तेव्हा या महान देशाची गरिमा धुळीस मिळाली नाही.

हाथरस हे फक्त एक उदाहरण आहे. हा देश बलात्कारी आहे. इथल्या मातीत हजारो वासनांध, जात्यंध वृत्ती फोफावल्या आहेत. कारण, तसं खत पाणी घालणार्‍या वृत्तीही इथं निपजल्या आहेत. विषमतेनं बरबटलेल्या संस्कृतीत दुसरं काय होणार?

एकीकडे उठसूठ भारतमातेचा जयजयकार करताना दुसरीकडे दरक्षणी इथल्या माणसांना, जंगलांना, नद्यांना ओरबाडून त्यांची विटंबना करताना कुणालाही कसलीही गरिमा वगैरे आठवत नाही.

झारखंडमधली कोयला देवी सगळे विसरुन गेले असतील. तिची ११ वर्षांची लेक ‘भात, भात’ म्हणून भुकेनं व्याकूळ होऊन मेली. आधारकार्ड रेशनकार्डला लिंक केलं नाही, म्हणून तिला रेशनवर धान्य मिळालं नाही. कुणी तरी भीक द्यावी इतकंही तिचं नशीब नव्हतं. अशा भुकेकंगाल होऊन मेलेल्यांना, रस्त्याकडेला झोपणाऱ्यांना ज्यांना कुणीही जाता येता आपल्या कारनं चिरडून जावं, कुठल्याही सरकारी कागदावर ज्यांची नोंद नाही अशा खिजगणतीतही नसलेल्या लोकांना हा देश कधीतरी ‘आपला’ वाटला असेल का???

आता सुजलाम सुफलाम वंदे मातरम् म्हणावसं वाटत नाही. त्यातला फोलपणा रोज सिद्ध होतोय.

उठसूट अॉरगॅनिक प्रोडक्ट्स,गच्चीवरील बाग आणि  तिथं भाजीपाला पिकवून फोटो बाजी करणारे, शाकाहार शुद्ध शाकाहार असं उठता बसता म्हणणारे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना अत्यंत निष्ठूर होताना दिसतात. उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या अनेकांना कृषी कायदे कुठले, शेतकरी का आंदोलन करतात असं थोडं विचारुन बघितलं. तर, ‘उगाचच! मोदींना अडचणीत आणण्यासाठी.’ अशी उत्तरं मिळाली. उच्चभ्रूंकडे अंगुलीनिर्देश यासाठी की ते सगळे ‘मेरिटधारी’ आहेत.खूप अभ्यास करुन ते पदास पावले आहेत. त्यांच्यालेखी बाकीचे सगळे सुमारसद्दी, आरक्षणवाले. म्हणूनच!

या देशाचा प्रधान सेवक देश अदानी-अंबानीला विकतो, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशाच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्याची आवई उठवून नाट्य घडवावं तसं आपल्याच सैनिकांना बॉम्बस्फोटांत ठार मारलं जातं, एक भुंकणारा पत्रकार (?) नव्हे, दलाल अर्णव गोस्वामी आणि भद्रलोकांतला पार्थो दासगुप्ता  त्यांच्या लव्हचॅटमध्ये मोदी, शहा, कैलासवासी जेटली यांबरोबरच प्रकाश जावडेकर वगैरे मंत्र्यांची काहीही कसलीही न ठेवता हुकलेपणा करतो आणि खासगीत या सगळ्यांची जी काही प्रतिमा आहे ती उघड करतो. संवेदनशील, सुरक्षेला बाधा पोहोचवणारी माहिती असल्या नीच मनोवृत्तीच्या दलालांकडे पोहोचवली जाते. इतकं सगळं उघड होऊनसुद्धा या देशातले लोक मूक-बधीर होतात. काहीच बोलत नाहीत, उसळत नाहीत, तेव्हा या देशाच्या (?) गरिमेला धक्का बसत नाही.

समाजकल्याण मंत्रीपदाची गरिमा धुळीस मिळवणाऱ्या धनंजय मुंडेंना कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे न जाता क्लीन चिट दिली जाते. त्यांचे आका, साहेब याबाबत त्यांना अभय देतात. आणि ….महिला आयोग, दक्षता समिती आणि अनेक तडफदार झाशीच्या राणीच्या भक्त बायका गप्प बसतात.

कारण, या फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतल्या अनेक बायका या राजकीय पुढारी, मंत्री, आमदार,खासदार, अधिकारी यांची अंगवस्त्रे असण्याची परंपरा फार प्राचीन आहे. त्यामुळे इथे गरिमा बिरिमा असलं काही नसतं. इथे फक्त ठेवलेल्या, ठेवलेले!

जातीच्या नावावर नाडल्या आणि गाडल्या गेलेल्यांना माणूसपणाचे हक्क-अधिकार, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या सगळ्याच आघाड्यांवर कायमस्वरूपी नकार मिळाला. त्यांच्या इतकं  स्वातंत्र्य, समता, बंधुत्वासाठी, जातीअंतासाठी आग्रही आणि प्रयत्नशील इतर कुणीही दिसत नाही. सर्वांना समान धाग्यात बांधणाऱ्या, विषमतेच्या दावणीला बांधलेल्यांना संविधान माणूस म्हणून आत्मप्रतिष्ठा बहाल करतं. हे सगळ्या माणसांच्या स्वातंत्र्य,समता,बंधुत्वाचं, समान संधीचं, भारतीयत्वाचं सूक्त जगण्याच्या प्रत्येक पायरीशी एक आश्वासक अवकाश निर्माण करतं. त्याला प्रेरणा मानणाऱ्या, त्याचा पुरस्कार करणाऱ्या मनांना आज चेष्टेचे आणि द्वेषाचे धनी व्हावे लागले आहे. 

या विचारशून्य, विवेकशून्य प्रहरांत संविधान एक ताकदीचा, ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे द्वेषाचे डोळे कितीही विखारी असतील, तरी काही हरकत नाही. संविधान हा या देशातला सौहार्द आणि समाजमन जाणीवपूर्वक प्रदूषित करणार्‍या विषावर उतारा आहे. 

काल आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढणाऱ्या ह्या शेतकरी बांधवांना सगळे पुरोगामी ह्या शेतकरी बांधवांमुळे देशाच्या गरिमेची हानी झाली आहे असा कांगावा करत होते तर तो कालचा दिवस विशेष अस काय असेल तर तो म्हणजे कालचा दिवस हा होता ह्या देशाचा प्रजासत्ताक दिवस.

संविधानिक मूल्यांना समजून घेण्याचा, त्यांना नीट माहित करुन घेण्याचा दिवस. आपले मूलभूत अधिकार कुणी नाकारू शकत नाही. ते जर नाकारले जात असतील, तर त्याविरोधात आवाज उठवणं, दमन करणाऱ्यांच्या विरुद्ध  ताकदीनं उभं रहाणं, प्रसंगी दोन हात करण्याची तयारी ठेवणं यात काहीही गैर नाही. कारण, कुणी अवतार पुरुष, अवतार स्त्री, योगी, साध्वी इ.इ. येऊन तुम्हाला यातून वाचवणार नाही. 

आपल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी एकवटलेल्या शेतकऱ्यांनी आज झोपेचं सोंग घेतलेल्या, कला आणि तंत्रज्ञानाचं कातडं पांघरलेल्या तमाम अभिजनवादी, ब्राह्मणी, जातीयवादी, वर्चस्ववादी, सोयीस्कर संवेदनशीलतावादी, दोन्ही दरडींवर हात ठेवणारे अवसानघातकी पुरोगामी, सुसंस्कृततावादी,हस्तीदंती मनोऱ्यात बसून रस्त्यावरच्या आंदोलनांची चिकित्सा करणारे, न्यूज चॅनल्सच्या स्टुडिओत बूड टेकून ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांचं यशापयश मोजणारे भाड्याचे तट्टू, अनामिक प्रश्नांनी अस्वस्थ होणारे नवझवकवी, दारिद्र्य, भूक, वगैरे आपल्या कथांतून मांडून आतड्यांना पीळ आणि ह्रदयाला पाझर फोडणारे लेखक…ज्यांना कृषिसंस्कृती कशाशी खातात हे माहित नाही, असे सगळेच. अशांच्या भूमिकांवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. हेच बेगडी, वारा येईल तशी पाठ फिरवणारे लोक या देशाचे दुश्मन आहेत.

आज हिंसा आणि ‌अहिंसेचा शब्दच्छल करणाऱ्या तमाम ‘अमुकवादी’ ‘तमुकवादी’ लोकांना फाट्यावर मारावंसं वाटतंय.रस्त्यावरची आंदोलनं करायला धाडस लागतं. पोलिसांचा हाग्यामार खायला जिगर लागतं. ‘मी मोर्चा नेला नाही,मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही’, यावर माना डोलवण्याइतकं सोप्पं नाही ते.

बाकी, देशभावना, बंधुत्व क्षीण होताना दिसतंय.

माणसं बिकाऊ झालीत. सौदेबाज झालीत. देशहिताचा सौदा करण्यास धजावली. याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, हे सत्य आहे!

यातून कुणाचीही सुटका नाही!

मानसी एन.

लेखिका कोल्हापूर येथील रहिवासी असून त्यांचं शिक्षण M.Sc.(Microbiology), M.A.(Political Science) असे आहे, तसेच त्या विविध सामाजिक प्रश्नांच्या स्वतंत्र अभ्यासक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*