यल्गार परिषदेचा आंबेडकरी समाजाला काडीचाही फायदा नाही

विकास कांबळे

यल्गार वगैरे परिषदांमुळे आंबेडकरी समुहाचा काडीचाही फायदा नाही, उलट अशा परिषदांमुळे नुकसानच झालेल आहे. येत्या 30 जानेवारीच्या यल्गार परिषदेत मुख्यतः डावे आणि त्यांचे काही फुटसोल्जरच सहभागी असल्याच गेल्या आठवड्यात पुण्यात होतो तेंव्हा स्पष्टपणे जाणवल. पुणे आणि देशभरात डावे आणि फुटसोल्जर्स लोक यल्गार परिषदेला आंबेडकरी समाजाचा पाठिंबा असल्याच चित्र उभ करु पाहत आहेत. देशभरातल्या काही प्रसिद्ध कार्यकर्तेही याला हजेरी लावणार असल्याच समजल, अर्थात आंबेडकरी समाज या परिषदेत सहभागी व्हावा यासाठी चांगलीच तयारी केल्याच दिसतय. पण आता याला आम्ही अजिबात भुलणार नाही आणि आमच्या लोकांनाही या भुलथापांना बळी पडू देणार नाही, हे ब्राह्मण सवर्ण पुरोगाम्यांसोबतच, डावे आणि त्यांच्या फुटसोल्जर्सनी लक्षात घ्याव.

यल्गार परिषदेला पोलिसांनी सुरवातीला परवानगी नाकारली होती, काल परवा तिला परवानगी मिळाल्याची बातमी ऐकली आणि आजपर्यंत सतत त्रास देणारा प्रश्न पुन्हा डोक वर काढू लागला. म्हणजे आजपर्यंत Solidarity, समविचारी वगैरेच्या गप्पा मारणारे हे डावे-पुरोगामी लोक आजपर्यंत आंबेडकरी समाजाला नुकसानीकडे घेऊन जाणाऱ्या, अडचणीत आणणाऱ्या या असल्या परिषद किंवा आंदोलने-मोर्चे वगैरे का घेत असावेत? हा प्रश्न काही आजपर्यंत सुटला नाही मला. आजपर्यंत स्वतःच्या जीवावर एकही आंदोलन उभही करु न शकणारे हे डावे-पुरोगामी आंबेडकरी समुहाला दावणीला बांधून आपल्या पोळ्या भाजत आलेत. या असल्या आंदोलने-परिषदांऐवजी या लोकांनी कधीच दलित-आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा अस एखाद आंदोलन-परिषद का घेतली नाही किंवा घेत नाहीत? म्हणजे आजपर्यंत कधी जात आधारित जनगणना करण्याची मागणी करणारी परिषद किंवा मग दलित-आदिवासी, शोषितांना अतिरिक्त जमिनींच वाटप व्हाव यासाठी किंवा मग शासकीय नोकरीतील बॅकलॉग भरुन घेतला जावा वगैरे महत्वाच्या प्रश्नांसाठी एखादी परिषद वगैरे का घेत नाहीत लाल सलामवाले???

ब्राह्मण-सवर्ण डावे-पुरोगामी लोकांनी उत्पन्नाच्या साधनांच्या पुनर्वाटपाबाबत मागास गणलेल्या समुहासोबतच ब्राह्मण सवर्ण म्हणवल्या जाणाऱ्यांत जनजागृती करणारी परिषद घ्यावी. यल्गार वगैरे करायचाच असेल तर तो दलित-आंबेडकरी समुहाला गळाला लावणारा यल्गार न करता ब्राह्मण सवर्णांना माणसात आणणारा यल्गार करावा आणि तोही थेट सवर्णांच्या वस्त्यात करावा, असा माझा मित्रत्वाचा सल्ला राहील या ब्राह्मण सवर्ण डाव्या-पुरोगामी जमातीला. खरतर मानवतावादी चळवळीला तुमची खुप गरज आहे, तुम्हीच लोक आहात जे तुमच्या लोकांना त्यांनी माणसात याव, जातीचा माज सोडून जीवन जगाव अशी साद घालू शकता पण त्यासाठी पुर्वअट म्हणजे आधी तुम्हाला माणसात याव लागेल. कातडी पांघरुन माणूसकीच ढोंग करुन दलित-आदिवासी, शोषितांमध्ये निर्माण होणाऱ्या आक्रोशाला वाट मोकळी करुन द्यावी, या समुहात उभ्या राहणाऱ्या आणि योग्य मार्गावर असलेल्या चळवळी, मागण्या भरकटवता याव्यात आणि या चळवळी आपल्या ताब्यातच रहाव्यात, मुख्य शोषक असलेले ब्राम्हण आणि त्यांनी लादलेली ही ब्राम्हणी व्यवस्था उघडी पडू नये हेच मुख्य हेतू सवर्ण डावे-पुरोगाम्यांचा असावा असच इतिहास दाखवून देतो.

यल्गार परिषद घेतली जाणार हे समजल्यानंतर मी अनेक आंबेडकरी मित्र-मैत्रिणींशी चर्चा केली. या चर्चानंतर आंबेडकरी विचारधारेच्या जवळपास सर्वच कार्यकर्त्यांचा या परिषदेला विरोध असल्याच मला जाणवल. तेंव्हा डाव्यांनी आणि त्यांच्या फुटसोल्जरांनी स्वतःच्या नावे यल्गार परिषद वगैरे भरवावी किंवा कसलाही नंगानाच करावा आमची अजिबात हरकत नाही, पण यात आंबेडकरी समाजाला ओढू नये. या असल्या परिषदांच खापर आमच्या माथी मारल जाऊ नये. ब्राह्मण सवर्ण डाव्यांनी स्वतः च्या जीवावर एखाद आंदोलन उभ कराव मग ते यशस्वी होवो किंवा अपयशी त्याच आम्हाला कौतुकच वाटेल.

विकास कांबळे

लेखक इंडिपेंडट रिसर्चर असून फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*