विकास मेश्राम
भारत १५ ऑगस्ट १९४७ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि २६जानेवारी १९५० आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला.
याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.
भारतात अनेक जाती आणि धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वर्गाचे लोक एकत्र राहतात. जगातील सर्वोत्तम संविधान आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख होते. भारतीय संविधानाचं स्वरूप कसं असावं, त्याची चौकट त्यांनी आखली, विविध विषयांवरील तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती, त्यांच्या सूचना ध्यानात घेऊन त्या राज्यघटनेत कशा येतील याचा विचार बाबासाहेबांनी केला. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी जो मोठा वाटा उचलला आहे त्यामुळे त्यांना राज्यघटनेचा शिल्पकार म्हटलं जातं.राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया ही प्रदीर्घ होती.
९ डिसेंबर 1946 रोजी भारताची घटना समिती पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांनी भविष्यातल्या भारताची दिशा ठरवली.
२९ ऑगस्ट १९४७ साली घटनेची मसुदा समिती (Drafting Committee) निर्माण झाली. डॉ. बाबासाहेबााची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. या समितीवरच राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी टाकली होती. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी. टी. कृष्णम्माचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी. एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले. राज्यघटना निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती.
२१ फेब्रुवारी १९४८ साली मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा अधिकृत मसुदा घटनासमितीला सुपूर्द केला. त्यानंतर घटना समितीत त्यावर सविस्तर चर्चा केली. मसुदा समितीने तयार केलेल्या मसुद्यांवर त्यानंतर एक अहवाल प्रसिद्ध केला. घटना मसुद्यावर ११४ दिवस विचारविनिमय केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मांडला. तो ठराव मंजूर झाल्याचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घोषित करण्यात आले. त्या दिवशी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांची त्यावर स्वाक्षरी झाली. राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची एकूण तीन वाचने झाली. प्रथम वाचन ( ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८),दुसरे वाचन(१५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर १९४९),तिसरे वाचन
(१४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९).
भारतीय राज्यघटनेतील एकूण सदस्यांपकी त्या दिवशी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत हे राष्ट्र प्रजासत्ताक गणराज्य झाले. २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
घटना समितीच्या एकूण ११ बठका झाल्या. २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीची शेवटची बठक झाली. सर्व सभासदांनी त्या वेळी भारताच्या राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या.
उद्दिष्टांचा ठराव – पंडित नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. २२ जानेवारी १९४७ रोजी हा ठराव घटना समितीने एकमताने मंजूर केला. या ठरावाने घटना समितीला दिशा देण्याचे आणि तिचे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्याचे कार्य केले. त्यातील काही तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत-
राज्यघटना कामकाज समित्या – घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. विशेष कामकाजासंबंधीच्या काही महत्त्वाच्या समित्या पुढीलप्रमाणे होत्या.मसुदा समिती (अध्यक्ष- डॉ. बाबासाहेब आंबडेकर),मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती (अध्यक्ष- सरदार वल्लभभाई पटेल), घटकराज्यांबरोबर बोलणी करणारी समिती (अध्यक्ष- डॉ. राजेंद्रप्रसाद),केंद्र राज्यघटना समिती (अध्यक्ष- पं. नेहरू),मसुद्याची चिकित्सा करणारी समिती (अध्यक्ष – आल्लादी कृष्णस्वामी अय्यर)
जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना मोठी आहे. सुरुवातीला राज्यघटनेत २२ प्रकरणे,
३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत २४ प्रकरणे, ४४८ कलमे आणि १२ परिशिष्टे आहेत.
भारताची राज्यघटना अंशत: ताठर आणि अंशत: लवचीक आहे. घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही सर्वसामान्य बाबीसाठी पुरेशी लवचीक आणि महत्त्वाच्या बाबीसाठी पुरेशी ताठर आहे. त्याचा योग्य मेळ भारतीय राज्यघटनेत घालण्यात आला आहे.
राष्ट्रपतींच्या नावे सर्व कारभार चालत असला तरी राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागावे लागते. या पद्धतीत पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख असतात.
भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यांसाठी स्वतंत्र सरकार आहे. राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात केंद्र व घटकराज्य यांच्यातील अधिकार विभागणी केली आहे. त्यांच्यातील वाद निष्पक्षपणे सोडविता यावेत, म्हणून स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण केली आहे. केंद्र व राज्य सरकारमधील सत्तासंबंध पाहिल्यावर आपणाला केंद्र सरकार घटक राज्यापेक्षा प्रबळ झालेले दिसते, म्हणून काही विचारवंतांच्या मते, भारताला पूर्ण संघराज्य न म्हणता आभासात्मक संघराज्य म्हणतात.
भारताच्या राज्यघटनेने स्वतंत्र न्यायमंडळाचा पुरस्कार केला आहे. न्यायमंडळावर दडपण येऊ नये, म्हणून न्यायाधीशाचे निवृत्ती वय, त्याचा कार्यकाळ घटनेने निश्चित केला आहे. विविध प्रकारचे वाद मिटविण्यासाठी कोणत्याही दबावापासून मुक्त असणारी न्यायव्यवस्था निर्माण केली आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० ला ती अंमलात आणली गेली. तेव्हापासून आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो.भारतीय लोकशाहीमुळेच वेगवेगळ्या गटांना संसदेत प्रतिनिधित्व मिळालं आहे. भारतीय लोकशाही बळकट करण्याचं श्रेय हे भारतीय स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेची निर्मितीच्या प्रक्रियेलाच द्यावं लागेल. भारतीय संविधान हे डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिश्रमातून, अभ्यासातून, आणि संशोधनातून निर्माण झालं आहे.म्हणून गणराज्य दिन चिराऊ होवो
विकास मेश्राम
लेखक गोंदिया येथील रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.
- जागतिक भूक निर्देशांकात भारताची स्थिती ‘अत्यंत गंभीर’, 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर - October 17, 2022
- बिल्कीस बानो खटल्यातील दोषींची मुक्तता: समाजाच्या बधीरतेवर प्रश्नचिन्ह - September 9, 2022
- सकस आहाराचा अभाव आणि वाढणारी बेरोजगारी - August 20, 2022
Leave a Reply