मथुराबाई,भविष्य आणि आठाणे

सातवीत असेन..गावाच्या मध्यात पांढ-या मातीची गढी..वर पाटील राह्यचे.लोहार,कुंभार,सोनार-बाम्हणादी सर्वांची ठरीव साच्यात सभोवती जमीनीवर घरं ! रामोशी आणि सिताराम हे एकाच ‘सितारामोशी’ या शब्दातून सहज उमगायचं. चौकात लाकडी खांबावर चौकोनी काचांच्या फ्रेममध्ये दिवा लावला जाई..खुटकंदील तो !! दिवाबत्ती,दवंडी आणि रवण (रात्रीची गस्त) इ.सितारामोश्याची कामं! रघुनाथ-इसा वारकाच्या खोपटासमोर त्यांच्याच उसण्या वस्त-याने केवळ हाताने चाचपून ते आपल्या डोक्याची स्वत: लिलया हजामत करत..रवण करताना रात्रीच्या शांततेत…” रामभाऊ खरबड………..” या आवाजासह सितारामोश्याचं खोकरणं आजही मनात हळुवार भिती निर्माण करतं..

सडकेवरच्या नव्या वस्तीत घर..सोबतीला बाबु निशिगंध,रामा लांडगे,श्रीपती लोंढे,एकनाथ रंभाजी,लक्ष्मण सातपुते,बाबु गोदवडे,अनुमाय,लक्ष्मी दादाराव,सखाराम-जायना,संभा-कोंडाबाई,सारजा-गिरजा,श्रीपती आण्णा इ.राहात.कुणाच्याही चुलीतला विस्तु आणून चुल पेटायची.गरीबीतही सौख्य नांदे..बाईसह,कलुमावशी,आवडी,सरूभाबी,खुळमी प-यागा झावळात निघून सकाळी हरभ-याच्या भाजीचं गठुडं घेवून परतायच्या, वस्तीत गुलाबगिरी महाराजांच्या घराची भर पडली.सोबत मथुराबाई! अंगापिंडाने भरीव,भगव्या वस्त्राधारी महाराजासमोर त्या किरकोळ भासत..सडपातळ,उभट सालस चेहरा असलेल्या मथुराबाईला महाराज कधीतरी झोडपून काढायचे तेव्हा कुणी सहसा तिकडे फिरकत नसत! त्यांच्या ऐकीव(!) चमत्कार-जादुटोण्याचा तो वचक असावा !!

दुपारच्या सुटीनंतर शाळेत परतताना मथुराबाईंनी मला हाटकलं..”हे वाचून दाखवतो का ? “
“हो.” मी थांबलो. पुस्तक हाती घेतलं. नव्या कापडावर ठेवलं. मुखपृष्ठावरील चौकोनातल्या अंकांवर त्यांनी श्रद्धापुर्वक डोळे मिटून बोट टेकविलं,बोटाखालचा अंक ‘९’ मी टिपला..पान ९ वाचलं..त्यांचं त्या दिवसाचं ते भविष्य होतं! योग उत्तम.. दिवस शुभ,फलदायी.. व संततीप्रप्तीच्या लक्षणांनी सुखावल्यामुळे मला त्यांनी आनंदाने आठाणे दिले..पन्नास पैसे!! दिवसभराच्या खुरपणीच्या बारा आणे मजुरीच्या काळात आठ आण्यांचं मोल खुप मोठं होतं.. कंपासपेटीचा खुळखुळा वाजवीत मी शाळा गाठली. दिसलो की मथुराबाई मला बोलावत..आदराने त्या बोट टेकवत, मी भविष्य-वाचन करी.. वर हमखास आठाणे मिळत.. तो पुढे प्रघात पडला.

गरजेपोटी माझे पाय आपोआप तिकडे वळू लागले.. त्यांना काय हवं ते उमजलेलं.. बोटांखालचे आकडे बदलून रूचेलसे भविष्य वाचून मी त्यांना आनंद देत राहिलो.. सारं पुस्तक त्यांच भविष्य झालेलं ! मी फसवत होतो.. की त्या गरजुला मदत करत होत्या-वाचनाचा तास घेत होत्या; की आणखी काय..मला कधीच कळलं नाही.. कळण्याचं ते वयही नव्हतं! काही असो,मोठ्या माणसांच्या मनाच्या खोलीचा तळ लागतच नाही !! औरंगाबादेतून परतण्याआधी त्यांनी गाव सोडलेलं,तोवर त्यांना संतती नव्हती.. पुढे भेट नाही.. एकाकीपणे शोध सुरूचय.. मनाच्या कोंदणात जपल्या सुखवापसीसाठी.. साभार.

~~~


भारत सातपुते: अंबाजोगाई.ऑगस्ट २०१३ मध्ये शिक्षकी संपली..म्हातारा झालो..पिळ मात्र जात नाही..शिक्षक,त्याचं चालणं..बोलणं..पाठीवरून हात फिरविणं..हळुवार मनाची मशागत करून रुढ जातीपलिकडं जावून कायम नाती प्रस्थापित करणं..गणितच पण मनाच्या डोहात डुंबत..तळ गावेस्तोवर बुडी घेणं,श्वास असेपर्यंत तिथेच थांबणं..जातीच्या भिंती किमान काही क्षण तरी मनातून उद्धवस्त करणं.. देशप्रेम जपत समता,बंधुता,स्वातंत्र्य, व न्यायादी तत्वांशी बांधील राहून विद्यार्थ्यामध्ये सत्व उतरविण्याचं काम थांबवायला सेवानिवृत्ती माझी मालक थोडीचय ? करत राहतो जमेल तसं..विशेषत: लिहीत राहतो..मनात येत जातं.. शब्द उमटत जातात.. बाकी परिचय देण्याएवढा मी मोठा कधी होवूच शकलो नाही..अजुनही विद्यार्थ्यांच्या वयाचा मी स्वत:ला समजत आलेलाय.. कारण त्यांच्याकडून रोज काहीतरी शिकत होतो.. आजही सुरूचय.. थांबतो.. अंबाजोगाई सेवानिवृत्त मुख्याध्यापक..

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*