डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता

अंजली अरुण पगारे

मुंबई मध्ये सुरुवातीला बरीचशी वर्तमानपत्र अस्तित्वात होती परंतु अस्पृश्यांची सुख दुःख त्यामध्ये कधीच मांडली जायची नाहीत. त्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या वेदना ,प्रश्न प्रकट करण्यासाठी 31 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र सुरू केले. आणि आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता तेवढीच प्रेरक आणि तेवढीच प्रगतशील आहे.
याच त्यांच्या पत्रकारितेची ओळख करून देण्यासाठी आजचा मी हा विषय ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता ” निवडला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका निश्चित भूमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते . विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी सरकारने 1917 साली साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने दलितांच्या सामाजिक तसेच राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे जबरदस्त साधन असावे, असे वाटले. ‘पंखाशिवाय जसा पक्षी, त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते’ हे त्यांना तीव्रपणे जाणवत होते. आणि जी काही उपलब्ध वृत्तपत्रे होती ती तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी, त्यात प्रत्येक वेळी अस्पृश्यांवर अन्याय करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले आणि त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय आणि सामाजिक पत्रकारिता. त्यावेळी वर्तमानपत्रात ताज्या घडामोडी, बातम्या नसायच्या असायची ती फक्त माहिती आणि ती जनतेला प्रबोधनासाठी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे :

मूकनायक – समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी तसेच सर्व समाजाला अस्पृश्यता नक्की काय? हे पूर्ण भारताला समजवण्यासाठी त्यांनी ‘मूकनायक’ पाक्षिक वृत्तपत्र 31 जानेवारी, 1920 रोजी सुरू केले. मूक अस्पृश्यांचे नायकपण आपण स्वीकारल्याचे त्यांनी जाहीर केले. मूकनायकाने त्यांच्या पुढील घणाघाती चळवळीची जणू नांदीच म्हटली. राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य त्यासाठी त्यांना लाभले होते. पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये ते म्हणतात,
‘आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱया अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱया स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीची हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही प्रलाप त्यातून निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींना बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱया उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱया जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.’

मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी बिरुदावली –

‘‘काय करून आता धरुनिया भीड।
निःशक हे तोंड वाजविले ।।1।।
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण।
सार्थक लाजोनी नव्हे हित ।।2।।

मूकनायक च्या पहिल्याच अंकापासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना करकचून विरोधच झाला. पण बाबासाहेब च ते प्रचंड शिकलेले , विद्वान, इंग्लंड मध्ये शिक्षण घेतलेले बाबासाहेब यांनी प्रगतशील पत्रकारिता बघितलेली होती त्यामुळे पुढे त्यांना कसली अडचण आली नाही,अडचण इतकीच की त्यांना त्यांचा वाचकवर्ग फार कमी लाभलेला. त्यावेळी अस्पृश्याना शिक्षणासाठी खुप कष्ट घ्यावे लागत. त्याचबरोबर त्यांचा सहकारी वर्ग ही अथक प्रयत्नांनी त्यांना लाभला परंतु बाबासाहेबांची कीर्ती ऐकून ते ही मोठ्या हिमतीने त्यांना सहाय्य करत होते.

बहिष्कृत भारत – त्यानंतर ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केले. या पाक्षिकाचे ते स्वतः संपादक होते. या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वतः लिहीत होते . काही आर्थिक कारणांमुळे ‘बहिष्कृत भारत’ 15 नोव्हेंबर, 1929 रोजी बंद पडले.

जनता -त्यांनतर ‘जनता’ ह्या वृत्तपत्राचे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते आणि वृत्तपत्राचा पहिला अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित झाला. देवराव विष्णू नाईक हे या वृत्तपत्राचे संपादक होते. ‘जनता’ सुरुवातीला पाक्षिक होते. 31 ऑक्टोबर 1931 पासून ते साप्ताहिक झाले. या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणजे ‘गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा, म्हणजे तो बंड करून उठेल’ अशी होती. बाबासाहेब त्यावेळी मुख्य विवेचन हे संपादकीय मध्ये लिहीत आणि बाकीचे गंभीर विवेचन , युक्तिवाद , दाखले ,पुरावे हे इतर अंकात लिहिले जात होते. ‘जनता’ 1955 सालापर्यंत सुरू होते.

प्रबुद्ध भारत – 4 फेब्रुवारी 1956 रोजी त्याचे नामकरण ‘प्रबुद्ध भारत’ असे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने ‘बहिष्कृत भारत’मध्ये आढळते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा आग्रह धरलेला होता. त्यांची सर्व पत्रे याच ध्येयवादाने भारलेली . नैतिकता हा तर त्यांच्या वृत्तपत्राचा कणाच . महाराष्ट्राला ध्येयशील पत्रकारितेची परंपरा, म्हणून व्यथित अंतःकरणाने, पण परखडपणे आपल्या ध्येयापासून वंचित होणाऱ्या वृत्तपत्रांना त्यांनी आपल्या मूळ वैचारिक बैठकांची जाणीव करून दिली. वृत्तपत्रांनी आचारसंहिता पाळली नाही आणि त्यांचे तंत्र स्वैर असले, तर सामान्य निरक्षर माणसे रानभेरी होतील, असे त्यांना वाटे.
त्यांच्या मते व्यक्तिपूजा ही देशातील अनेक वृत्तपत्रांना लागलेली कीड आहे. व्यक्तिपूजा आंधळी असते. त्यामुळे नीतिमत्ता ढळते. म्हणून वृत्तपत्रांनी नीतिमत्तेला बाधा येणार नाही आणि सत्याचा सूर बदलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.म्हणून त्यांनी निःपक्षपाती पणे पत्रकारिता केली. वृत्तपत्र हे शोषणाचे माध्यम बनवणाऱ्या प्रवृत्तींना त्यांनी नेहमीच धारेवर धरले.भडक, विकृत आणि भावनांना आवाहन करणारे लेख लोकमानस घडवू शकणार नाहीत, लोकजीवनाला नवे परिणाम देऊ शकणार नाही, अशी त्यांची खात्री होती.
जाहिरात आणि नीतिमत्तेचा संबंध बाबासाहेबांना अपरिहार्य वाटे. जाहिरातांशिवाय वृत्तपत्रे जगू शकत नाही, हे खरे असले तरी वृत्तपत्रांनी जाहिरातींच्या आहारी जावे का आणि कितपत जावे? आर्थिक कारणांसाठी जाहिराती आवश्यक असल्या तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात यासंबंधी संहिता पाळायला हवी, असे बाबासाहेब म्हणत.

समाज उन्नतीचे साधन म्हणून त्यांनी वृत्तपत्राकडे पाहिले. लौकिक ऋण फेडण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा प्रभावीपणे वापर केला. “स्वराज्याला आमचा विरोध नाही , स्वातंत्र्य मिळायलाच हवं परंतु जे अस्पृश्य स्वातंत्र्य मिळत नसल्यामुळे स्वतःची उन्नती करून घेत नाही आणि उन्नती होत नसल्यामुळे त्यांच्या जवळचे जे नागरिक आहेत त्यांना ही त्याचा त्रास होतो, सबब राजकीय स्वातंत्र्य बरोबरच सामाजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य ही त्यांना मिळायला हवं अशी सांगड बाबासाहेबांनी आपल्या पत्रकारितेत घातली ” . म्हणून मूकनायक , बहिष्कृत भारत यातले त्यांच्या लिखाणाने भरभरून गेलेले अंक वाचताना हा फक्त वकिली युक्तिवाद न करता संपादक म्हणून राजकारण , धर्म व्यवस्था आरोपाला प्रत्युत्तर नाही ,तर उत्तर शोधून काढतोय , ग्रंथ ,रामायण ,महाभारत सगळं सांगतोय , यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने अशी एक निर्भिड पत्रकारिता जन्माला आली जी वरवर जरी एकेरी वाटली तरीही ती सर्वसमावेशक होती व सर्व समाजाला अस्पृश्यता नक्की काय आहे ? जातीव्यवस्था , हिंदू धर्माचा प्रश्न नक्की कसा आहे ? अस्पृश्यतेचा प्रश्न कसा भेडसावतो ? हे पूर्ण भारताला समजवणारी होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेले विचार, भूमिका आजही तंतोतंत लागू पडते, यावरूनच त्यांची दूरदृष्टी आणि विचारांची खोली दिसून येते.

अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम!
जय भीम!
नमो बुद्धाय!

अंजली अरुण पगारे

लेखिका सध्या पत्रकारितेच्या तिसऱ्या वर्षात शिकतआहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*