माझ्या आयुष्याचा तू अल्फा-ओमेगा आहेस!

सागर अ. कांबळे

आपली पहिली भेट आठवत नाही
तू घरातच भेटलास मात्र
कळायला लागत असताना
तू ‘आमचा’ आहेस हे कळत गेलं
मग तू गाण्यांत जयंत्यांत भेटत राहिलास अधूनमधून
आपण एवढे ओळखीचे न्हवतो तेव्हा

एके दिवशी अचानक तू राष्ट्रगीतात भेटलास
भारत भाग्यविधातातील सूर,
तिरंग्याच्या अशोकचक्रात भेटलास
बोधिसत्व प्रियदर्शी राजा

कपाटंच्या कपाटं, सेक्शन्स भरून
तुला कित्तेक खंडांतून ओसांडून वाहताना पाह्यले

मग मी परदेशी गेलो
सारे इझम पांघरून पाहिले
तुझ्यापासून सुटलो असं वाटलं
ठेच लागल्यावर तूच आठवलास
इतका तू रक्तात भिनलास

मी खूपदा
जावू पाहतो लांब तुझ्यापासून
व्यक्तिवादाच्या उत्सवात
कधी मौनात, आत्मचिंतनात
कृतज्ञतेतून तिथेही तू उचंबळून वर येतोस

प्रियेशी गुजगोष्टी करताना
आईच्या मांडीवर निजताना
रस्त्यात भिडताना
स्टेजवर नडताना
अश्रू पुसताना
झाडाला बिलगताना
तू तिथेही सोबत असतोस

मला विश्वनिर्मितीचे ज्ञान नाही
पण
माझ्या आयुष्याचा तू अल्फा-ओमेगा आहेस

(अल्फा-ओमेगा : सुरुवात आणि शेवट)

सागर अ. कांबळे

लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

1 Comment

  1. खुपच मार्मिक उपमा दिल्यात तुम्ही सर.
    जयभीम सर

Leave a Reply

Your email address will not be published.


*