तेव्हा सखे सप्रेम जयभीम!

सुरेखा पैठणेे

प्रिय मैत्रिणी…

आमच्यावर लादलेल्या अज्ञानाला विज्ञानाने दूर सारून, वैचारिक पुस्तकांचा दिवा जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरून १४ एप्रिल हा दिवस साजरा करतो…

खरे तर हा दिवस एक आमच्या माणूस म्हणून गणल्या जाण्याचा दिवस. आमच्या माय मावशीने गावात एखादं नवं लुगडं घातलं तरी गावातील पाटलीनीच लुगडं चोरीस जायचं आन त्या नेसलेल्या लुगड्याच धडुत होऊन जिंदगी लिपली जायची. गावगाडा ओढत असलेल्या इथल्या खांद्याना सन्मानाने ताठ कणा मिळवून दिला तो ह्याच दिवसांने…

आमच्या घरात एकवेळ पैठणी, कांजीवरम नसेल पण पोटच्या लेकाला बाबासाहेबावानी साहेब बनवायचे ह्या विचाराने चार घरची धुणी भांडी अजून कशी करता येईल ही जिद्द आहे..
आमच्या घरात उंची भांडे नसतील पण डोळ्यात अंजन घालणारी अन प्रकाश पेरणारी पुस्तकांची रास मात्र खच्चून असते… बाप 6 डिसेंबर ला गेला की समजायचे संध्याकाळी 4 पुस्तक घरात येतील…

जयंतीला आमच्या वाड्या, वस्त्या, झोपड्यातुन, आमच्या आया बहिणी पांढरी साडी नेसून मिरवणुकीत जाताना तू खिडक्या बंद करून घेते, ना मला वाईट नाही वाटत, फक्त आज कुठे उरली जातपात असे जेव्हा तू एखाद्या पुरोगामी मंचावरून उच्च स्वरात बोलतेस ना तेव्हा तुझी बंद असलेली खिडकी दगड मारून फोडावीशी वाटते ग…

सगळ्या सणांना, हॅप्पी अमुक हॅप्पी तमुक म्हणून शुभेच्छा देणारी तुझी फेसबुकची वॉल नेमकी १४ एप्रिलला कशी काय लॉक असते हेच मला कळत नाही….

तू म्हणतेस बाबासाहेब देव नाही, त्यांची पुस्तके वाचून त्यांना आचरणात घ्या, राणी आम्ही त्यांना देव बनवून देव्हाऱ्यात नाहीच बसवले पण हो आपल्या जन्मदात्याबद्दल आपल्या मनात जो आदर असतो ना तोच आदर आमच्या मनात आहे त्यांचायसाठी आहे ग..

तू आणखी एक म्हणत असतेस,’ बाबासाहेब तुम्ही जातीत बंदिस्त केलेय, महापुरुष तुम्ही पुतळ्यात बंद केले’, अग महापुरुष जेव्हा काळाच्या परिघाला व्यापून उरतो न तेव्हा तो एका जातीचा उरतच नसतो. तू म्हण न कधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तू दे ना कधी घोषणा तुझ्या मुख्यधारेतल्या प्रवाहाला वळण देऊन आण ना आंबेडकर चौकात…
सखी।मी जेव्हा जयभीम म्हणते ना तर ते केवळ अभिवादन नसते तर तो एल्गार असतो माझ्या स्त्री असण्याचा, तो निनाद असतो माझ्या माणूस असण्याचा…
तेव्हा सखे हीच आमची दिवाळी आणि हाच आमचा सण…

तेव्हा सखे सप्रेम जयभीम! ☺️

सुरेखा पैठणे

लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री /वक्ता /निवेदिकाआहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*