राकेश अढांगळे
इतिहासात देशाला सोने की चिडिया असे म्हटले गेले. पण बऱ्याचश्या लोकांना त्याचा काळ सांगता येत नाही. युरोपियन इतिहासकारांच्या मते सम्राट अशोक यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांचे हेच मत होतं, मोर्यन काळाला त्यांनी सुवर्णकाळ असे म्हटले. त्याकाळची अर्थव्यवस्था जाणून घेणे महत्त्वाचे वाटते. म्हणून मी थोडक्यात तिचे संकलन केले आहे.
सम्राट अशोकाच्या काळातील अर्थव्यवस्था..
शेती करणे हा त्या वेळचा प्रमुख व्यवसाय होऊन, ग्राम जीवनाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे व्यापार वाढला आणि नागरी म्हणजे शहरी जीवनाला प्रारंभ झाला. मौर्यांच्या उत्कृष्ट प्रशासनामध्ये समृद्धीचे युग आले. आर्थिक भरभराट झाली. यामुळे अनेक कलांचा विकास व्हायला मदत झाली.
सरकारी कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन किती कर घ्यायचा ते ठरवत असत. त्यावेळी शेतकऱ्यांचा कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाई. काही गावे विविध कारणाकरिता करमुक्त करण्यात आले होते. लुंबिनी हे गाव बुद्धांचे जन्मस्थळ असल्याने करमुक्त होते. दुष्काळासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी राजा शेतकऱ्यांचे दुसरे पीक काढून घेऊ शकत असे. सर्व प्रकारच्या धान्यांचे उत्पादन होई. मासेमारीवर हि कर घेतला जात असे.
झाडाच्या सालीपासून, पानांपासून व कापसापासून वस्त्र बनवण्याचे उद्योग होते. कपड्यावर सोनेरी कशिदा काढली जाई. धातुकाम प्रगत अवस्थेत होते. वैद्यकीय व्यवसाय उत्तम पणे चालत होता. अशोकाने सार्वजनिक दवाखाने उघडले होते.
अशोकाच्या काळात विदेशी व्यापार भरभराटीला आला होता. देशी व्यापाऱ्यांना पूर्ण संरक्षण होते. मसाल्याचे पदार्थ, कपडे, रत्न, दागिने, हस्तिदंती पशुपक्षी यांचा व्यापार चाले. मालाची ने-आण जलमार्गाने तसेच महामार्गाने होत असे. बाजारातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर निर्बंध होते. फसवणूक,कमी वजन, भेसळ यांसाठी कठोर शिक्षा होत्या.
व्यापाऱ्यांनी किती नफा मिळावा त्याची टक्केवारी निश्चित करण्यात आली होती. ग्राहकांच्या मिरवणुकीवर कठोर बंदी होती. प्रमाणाबाहेर मिळवलेला नफा सरकारी तिजोरीत जमा केला जाई. मध्यस्थांच्या ही नफ्यावर तसेच निर्बंध होते. व्यापारी वस्तूंवर एक दशांस कर घेतला जाईल. थोडक्यात, औद्योगिक व्यवस्थापन खूप विकसित झाले होते.
ठराविक काळासाठी व्याज निश्चित करून सरकारी तिजोरीतून कर्ज काढता येत असे. कर्जावर साधारणपणे दरवर्षाला 15 टक्के एवढा व्याजदर होता. तक्षशिला ते पाटलिपुत्र हा महामार्ग त्याकाळी फार महत्वाचा होता. जहाज बांधणीचा उद्योग विकास झाला होता. बंदरांचा विकास करण्यात आला होता. श्रीलंका-ब्रह्मदेश येथे नेहमी जहाजांची ये-जा चाले.
अपट साम्राज्याचा कारभारासाठी फार मोठे प्रशासन होते. सरकारी कर्मचाऱ्यांवर, दान धर्मावर मोठा खर्च होत असे. वर्षांमध्ये 354 दिवस कामकाजाचे असतं. यात सार्वत्रिक सुट्टीचे दिवस असत. सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकारी उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग खर्च केला जाई.
सार्वजनिक इमारती बांधणे, कालवे बांधणे, दवाखाने हमरस्ते बांधणे, वृक्षलागवड करणे, विश्रांतीगृहे बांधणे त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केला जाई. सुदर्शन तलावावर धरण बांधण्यात आले होते. औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी पैशाची तरतूद असे. महत्त्वाचे म्हणजे सम्राट अशोक जो दानधर्म करीत असे तो पैसा शक्यतो सम्राटाच्या मालकीच्या जमिनीच्या उत्पादनातून खर्च केला जाई. खाणकाम, उद्योग क्षेत्र, सार्वजनिक कर्ज याविषयी अंदाजपत्र मांडले जात असे.
सम्राटाने रयतेच्या कल्याणाचा ध्यास घेतला असल्याने सगळी प्रशासन यंत्रणा जनकल्याणासाठी वापरली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे स्वरूप पालटले होते. त्याला त्याचे साम्राज्य ‘कल्याणकारी साम्राज्य’ करायचं होते. त्याला अफाट संपत्ती जमवायचा लोभ नव्हता. जना कल्याणावर खर्च केल्याने लोकांचे जीवनमान उंचावले होते. स्वार्थ न पाहता सार्वजनिक जबाबदारीने अधिकाधिक लोकांचे कल्याण कसे साधता येईल याचे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला सम्राट अशोकाच्या काळातील अर्थव्यवस्थेत मिळते.
राकेश अढांगळे
लेखक मुंबई येथील रहिवासी असून कॉमर्स शाखेचे पदवीधर आहेत, तसेच आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत.
- छत्रपती शाहू महाराजयांच्या नजरेतून पेशवाई. - December 31, 2023
- साऱ्या विश्वाला बुद्ध हवा! - May 26, 2021
- सम्राट अशोकाच्या काळातील अर्थव्यवस्था… - April 20, 2021
Leave a Reply