तो दम ‘आंबेडकरवादी’ नावातच आहे…

डॉ सुनील अभिमान अवचार

आम्ही तुम्हाला हवे असणारे दिनदुबळे दलित नाही

आम्ही आहोत व्यवस्थेच्या विरोधात निळे झेंडे हातात घेऊन उभे पँथर
आम्ही आहोत स्वाभिमानी जयभीम
आम्ही आहोत प्रबुद्ध भारत!
तुमचे दलित लेबल
गांडगोटा करून फेकले आहे
आम्हाला आमचे ठरवू द्या नव्या शक्यता तपासू द्या!
आम्ही ठरवू आम्हाला कोणत्या आरश्यात पहायचे आहे ?

ह्या ब्रोकन हातानी चवदार तळे पेटवले
वर्ण व्यवस्थेचा जाचक बेड्या तोंडून बोद्धधम्म स्वीकार केला
आम्ही भारतीय म्हणून संविधानाची उद्देशिका काळजात कोरली
आम्ही आहोत सनातन व्यवस्थेच्या छाताडावर बसलेले
नव्या युगाचे आंबेडकरी आंदोलन
जगभरातील शोषित आहेत आमचे ब्रदर्स

हा युगाचा अंधार
हे युगाचे शोषण
हे युगाचे भेदाभेद
हे युगाचे क्रूर यातना
ही लादलेली गरिबी
मेन स्ट्रीम मध्ये विकणार असाल?
सेलेब्रिट करणार असाल ?
पुढील पिढ्या माफ करणार नाही!

तुमच्या चिरबंदी बुरुजाला
तडे जाणारे नाव
‘दलित’ नाहीच!
तो दम ‘आंबेडकरवादी’ नावातच आहे

डॉ सुनील अभिमान अवचार

लेखक हे समकालीन कवी- चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’, ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’, हे त्यांचे महत्वाचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.’Our WORLD is Not for SALE ‘आणि ‘We, the Rejected People of India’ हे त्यांच्या मराठी कवितेचे इंग्रजीत अनुवाद झालेले काव्यसंग्रह आहेत. अवचार यांचे साहित्य जात, लिंग, वर्ग भेदाच्या मुक्तीदायी अवकाशासाठी उभे राहणारे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*