मुक्ता साळवे: पहिली क्रांतिकारी विद्यार्थिनी

प्रा. सचिन गरुड

“एकोणिसाव्या शतकातील ब्राह्मणी धर्माच्या विषमता, आचार-विचारांच्या विरोधात पेटून उठलेली भारतीय समाजातली पहिली क्रांतिकारी विद्यार्थिनी “

जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाडयात जानेवारी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. परंतु ही सवर्णजातीय मुलींची शाळा होती. त्यांत चार ब्राहमण,एक मराठा,एक धनगर अशा दलितेतर मुली शिकत होत्या. त्यानंतर त्याचवर्षी पुण्यातल्या महारवाडयात सावित्रीबाई व जोतीबांची आत्या सगुणाबाई क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली अस्पृश्य मुलामुलींची शाळा त्यांना सुरु करावी लागली. ब्रिटिश वासाहतिककाळात ब्राह्मणीव्यवस्थाक ज्ञानबंदीविरोधात शूद्रातिशूद्र जातीजमाती आणि सर्वजातीय स्त्रिया यांच्यासाठी शिक्षणप्रसाराचे क्रांतीकारी कार्य करतांना फुले दाम्पत्याने केवळ शाळा स्थापन करून त्या चालविल्याच नाही तर त्याद्वारे क्रांतीकारी भान असलेले विद्यार्थीही घडविले. फुले दाम्पत्याचे प्रारंभिक काळातील हे शैक्षणिक कार्य जातिव्यवस्थाअंताच्या ध्येयवादातूनच गतिमान झाले होते.त्यांनी आरंभिलेले शिक्षणप्रसाराचे क्रांतीकारी कार्य मुख्यतः जातिव्यवस्थेतील सर्वहारा जातीस्तरातून म्हणजे दलितजातीस्तरातून तसेच ‘जातिव्यवस्थेच्या प्रवेशव्दार असणा-या’सर्वजातीय स्त्रीघटकाला समोर ठेवूनच गतिमान झाले होते. 1848 पासून 1855पर्यंत त्यांनी सुरु केलेल्या महारमांगाच्या सर्वाधिक शाळा पुण्यातील महारवाडयांमध्येच स्थापित केल्या होत्या. त्याकाळात नाना पेठ,भवानी पेठ,मंगळवार पेठ, वेताळ पेठ, जुना कसब्याचा पूर्वभाग बहुसंख्य दलितवस्त्यांचा परिसर होता. मार्च 1852 मध्ये त्यांनी वेताळपेठेत मुलींची तिसरी शाळा काढली. या शाळेत शिकलेली मुक्ता साळवे ही 14 वर्षीय अस्पृश्य(मातंगजातीय) मुलगी त्या काळात आपल्या शालेयजीवनात लिहिलेल्या आत्मकथनात्मक निबंधात जे जातीव्यवस्थाविरोधी क्रांतीकारी भान व्यक्त करते, ते आधुनिक भारतीय इतिहासातील जातीव्यवस्थाविरोधी स्त्रीमुक्तीचे आद्यपर्व आहे.

त्याकाळात ब्राह्मणांप्रमाणेच अस्पृश्यजातीय आपल्या मुलींना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते आणि मुलांबरोबर मुलींना वर्गात बसविण्यास नापसंतीदर्शवित. म्हणून मुली वेगळया काढून त्यांची एक नवीन शाळा सुरू करण्यात आली. महारमांग, चांभार यांच्या मुलामुलींसाठी चालविलेल्या वेगवेगळया शाळांसाठी फुले यांचे दलित सहकारी लहूजीबुवा मांग (साळवे), राणबा महार, गणु शिवाजी मांग, धुराजी अप्पाजी चांभार इ.नी1 आपापल्या जातबांधवांचे प्रबोधन करून मुलामुलींना शाळेत पाठविण्यास प्रवृत्त केले होते. फुले यांचे व्यायामपटटू गुरूजी लहूजीबुवा साळवे(1794-1881)2 यांनी आपली पुतणी3 मुक्ता गणोजी साळवे हिलादेखील या शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठविले होते. ‘ज्ञानोदय’ या नियतकालिकातील 1855च्या ऐतिहासिक नोंदीनुसार मुक्ताचा फुले यांच्या शाळेत 1851-52 च्या दरम्यान प्रवेश झाला असावा, असा एक अंदाज करता येतो. या मुलींच्या शाळेत सावित्रीबाई व सगुणाबाई क्षीरसागर यांच्यासह उस्मान शेख यांची बहिण फातिमा शेखही शिकवत असत. सावित्रीबाई या आधुनिक भारतातील पहिल्या शिक्षिका तर फातिमा शेख हया भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या.4

फुले दाम्पत्यांचा लढा केवळ सार्वजनिक शिक्षणप्रसाराच्या कार्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी ब्राह्मणीविषमतेविरोधात सर्वंकष मानवमुक्तीचा लढा उभारला होता. जातीस्त्रीदास्यविरोधात संघर्ष करण्यासाठी त्यांनी शूद्रातिशूद्र जातींना आणि स्त्रियांना सक्षमपणे उभे करण्याचे काम सुरू केले होते. त्यांच्या दैनंदिन बोलण्यात, शिकविण्यात तसेच वर्तनात व्यवस्थाविरोधी संघर्षाचे विचार तेजस्वीपणे प्रकटत होते. त्यांच्या या क्रांतीकारी शिकविण्याचा परिणाम म्हणून या शाळेतील एक मांग विद्यार्थीनी मुक्ता साळवे ही घडली. तिने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ‘मांग-महाराच्या दुःखाविषयी निबंध’ या नावाचा निबंध लिहिला. दलितांच्या शोषण-पीडन दमनाचा अनुभव ती आपल्या आईवडीलांनी सांगितलेल्या दुःखद अनुभवाच्या आधारे कथन करते. मात्र पेशवाईतील जातीय अत्याचार आणि ब्रिटिश राजवटीत बदलणारे जातीवास्तव यांचे तुलनात्मक भान तसेच ब्राह्मणी धर्माची कठोर चिकित्सा हे दोन महत्वपूर्ण वैशिष्टे या निबंधाच्या संहितेमध्ये स्पष्टपणे अधोरेखित होतात. या ऐतिहासिक, धार्मिक चिकित्सेचे ज्ञान तिला फुले दाम्पत्याच्या शाळेतच प्राप्त झाले आहे. या निबंधातील तिच्या विद्रोही वैचारिकाभिव्यक्तीवर फुले यांच्या क्रांतीकारी अध्यापनाचा स्पष्ट प्रभाव जाणवतो आहे. फुले यांनी आपल्या विद्रोहक अध्यापनतंत्रातून मुक्तासारख्या हजारो वर्षे जातीव्यवस्थाक ज्ञानबंदी असलेल्या व पूर्णतः दडपलेल्या दलितजातीस्तरातून येणा-या अल्पवयीन विद्यार्थीनीला तिच्या जातीवास्तवाचे विद्रोही भान दिले आहे. ती किती प्रखरतेने दलितजातींवरील अन्यायअत्याचाराची व ब्राह्मणीप्रभुत्वाची विचक्षण चिकित्सा करू शकते हे तिच्या निबंधावरून स्पष्ट होते. अशी विश्लेषण करण्याची बौ ध्दिकक्षमता तिला फुलेप्रणीत अध्यापनतंत्रातून प्राप्त झाली आहे. फुले दाम्पत्याचे अध्यापनतंत्र समाजपरिवर्तक जातीभानाच्या अनुभवातून विकसित झाले होते.त्यांनी चालविलेल्या शूद्रातिशूद्र मुलींच्या शाळेत तसेच ब्राहमण मुलींच्या शाळेत समान अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात असतांनाही शूद्रातिशूद्र मुलींच्या तुलनेत ब्राहमण मुलीं अंतिम परीक्षेत सरस ठरतात आणि त्यांच्या प्रबल जातीय,कौटुंबिक शैक्षणिक परंपरेमुळे प्रगती करतात. हे या दाम्पत्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक परंपरा नसलेल्या, ज्ञानबंदी व जातीयशोषण होणा-या अतिशूद्रांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयोग-प्रयास केले. मात्र त्यांच्या हया विद्यार्थी-घडवणुकीच्या विलक्षण कार्यसामर्थ्याबरोबरच या मांतग मुलीच्या अत्यंत तल्लख ज्ञानग्रहणक्षमतेचाही येथे विचार केला पाहिजे. केवळ तीन वर्षे शाळेत विद्याभ्यास करणा-या या मुलीची स्वतंत्रपणे व धाडसाने आपले विचार मांडण्याची ओजस्वी प्रज्ञा तिच्या निबंधलेखनाभिव्यक्तीतून सहजपणे प्रकटली आहे. शिक्षणामुळे तिला आत्मभान प्राप्त झाले आहे. अल्पवयात, अल्पकालीन शिक्षणाद्वारे तिला जे विलक्षण स्वंयभान आणि समाजभान प्राप्त झाले, ही घटना भारताच्या आधुनिक इतिहासात विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल . परंतु ब्राह्मणीसंस्कार प्रबळ असलेल्या अभ्यासकांनी भारताच्या इतिहासात मुक्ता साळवेची दखलही घेतलेली नाही.

युरोप-अमेरिकेत सार्वत्रिक शिक्षणामुळे आमुलाग्र परिवर्तन घडू शकले. सार्वत्रिक शिक्षणाने तेथील सरंजामशाहीची पाळेमुळे उखडून टाकण्यास फार मोठा हातभार लावला होता, याची फुले यांना समर्पक जाण होती. भारतातही जातीव्यवस्थेने लादलेल्या ज्ञानबंदीविरोधात ब्रिटिशांनी निर्माण केलेली सार्वत्रिक शिक्षणाची शक्यता अचूकपणे हेरून या शिक्षणाद्वारे शोषित-शाषित दलित जातींमध्ये आत्मभान जागे होईल आणि त्या जातीविरोधी संघर्ष करण्यास पुढे येतील असा त्यांचा विश्वास होता. याचा अर्थ, ब्राह्मणी व्यवस्थेच्या संदर्भात शिक्षण व ज्ञानाची कल्पना फुले यांनी सत्तेच्या स्वरूपात गांभीर्याने जाणली होती ब्राह्मणी प्रभुत्व व ज्ञान यांच्या द्वंद्वात्मक व्यवहाराच्या जाणीवेमुळे ज्या ब्राह्मणी ज्ञानाने, ज्ञानबंदीच्या भौतिक रचनेने जातीसंबधाची जडणघडण करून ती टिकवून ठेवली होती म्हणून या पार्श्वभूमीवर ब्रिटिश वसाहतकाळात भारतात रूजू होवू पाहणा-या सार्वत्रिक शिक्षणाच्या अर्थात भांडवली लोकशाहीप्रधान ज्ञानविज्ञानाच्या गतीशिलतेच्या द्वारे भारतीय जाती-सामंती बेडया तोडण्याचा प्रयत्न केला जावू शकतो, हा फुले प्रणीत विश्वास त्यांच्या विद्यार्थीनीमध्येही निर्माण झाला होता हे मुक्ताच्या निबंधावरून स्पष्ट होते. जातीसामंती व्यवस्थेने महार-मांगावर जी वेठबिगारी, हजेरी घेण्याची पध्दती लादली होती, त्या विरोधात ज्ञानप्राप्तीचा आणि ज्ञानाद्वारे जागे होवून जातीविरोधी संघर्ष करण्याचे आवाहन ती करते. उमा चक्रवर्ती तिच्या निबंधाबद्दल प्रतिपादन करतात की, हा निबंध जातीय दुःख व ब्राह्मणीविचारसरणीवर प्रहार करतो. मात्र ज्ञानाच्या जातीसापेक्ष मुक्तीच्या जाणीवेकडे चक्रवर्तींचे दुर्लक्ष झाल्याने तिच्या निबंधातील दलितस्त्रीच्या जातीय दुःखाचे संदर्भ जातीपितृसत्ता किंवा जातीयलिंगभाव यांचे अनन्यसाधारण वैशिष्टये प्रतीत करतात या अनोख्या ऐतिहासिक संदर्भाचा वेध घेण्यास चक्रवर्तीना मर्यादा पडतात. ब्रिटिशकाळात अस्पृश्यांची सक्तीची वेठबिगारी बंद झाल्याचे व कायदयाची समान संधी मिळाल्याचे सांगत असतांना अस्पृश्यांच्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणा-या उदारमतवादी ब्राह्मण सुधारक व ब्रिटिश सरकार यांच्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते

तिचा हा निबंध ‘ज्ञानोदय’ च्या अंकात 15 फ्रेबुवारी 1855(पूर्वार्ध) आणि 1 मार्च 1855(उत्तरार्ध) अशा दोन भागात छापून आला. त्यापुढील अंकात या निबंधावर प्रतिक्रिया म्हणून दोन पत्रेही छापली गेली.हा निबंध त्याचवर्षी इंग्रजसरकारच्या मुंबई राज्याच्या शैक्षणिक अहवालामध्ये शासनाने छापला. म.फुले, बाबा पदमजी व रेव्ह.मरे मिचेल यांचे मित्र असलेले आणि ख्रिस्ती झालेले ना.वि. जोशी यांनी आपल्या ‘पुणे शहराचे वर्णन’ या ग्रंथातही मुक्ताच्या निबंधाचा काही भाग छापला. हा ग्रंथ 1868 मध्ये प्रकाशित झाला.पूना कॉलेजचे प्राचार्य, सरकारी शिक्षामंडळीचे प्रमुख व फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे हितचिंतक मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबागवाडयात आयोजित केलेल्या जोतीबांच्या एका सत्कारसमारंभात किमान तीनेक हजार लोकांच्या उपस्थितीत मुक्ताने हा निबंध वाचला होता.त्यावेळी कॅंडी यांनी तिचे कौतुक केले व तिला चॉकलेट देऊ केले, तेव्हा तिने बाणेदारपणे ‘सर, आम्हाला चॉकलेट नको, वाचनालयाची सोय करून दया!’ अशी मागणी केली.त्याकाळात या दलित लहान कुमारवयीन मुलीने पुस्तकांची व ग्रंथालयाची मागणी करणे, ही आधुनिक भारतातील इतिहासातील अत्यंत विलक्षण व क्रांतिदर्शी घटना होती. आधुनिक सार्वत्रिक शिक्षण व ज्ञानप्रसाराचे केंद्र बनू पाहणा-या पुस्तके/ग्रंथालय याकडे ज्ञानबंदी लादलेल्या समाजघटकातील नव शिक्षित अल्पवयीन मुलीने मुक्तीगामी ज्ञानव्यवहाराला गती देणारे साधन म्हणून पाहणे, ही तिची विचक्षण दृष्टी फुलेदाम्पत्यांच्या ध्येयवादी जातीपितृसत्ताअंतक शैक्षणिक मोहिमेचे फलीत होते. आणि त्याची सर्जनात्मक व लढाऊ ग्रहणशीलता त्यांच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी पूर्वास्पृष्य दलित मुलीतच अधिक तीव्रतेने साकार व्हावी, इतपत त्याची विलक्षण ऐतिहासिक अनन्यता आहे.

अहमदनगर येथून १८४२ पासून अमेरिकन ख्रिस्ती मिशनरींनी चालविलेल्या ‘ज्ञानोदय’ या नियतकालिकाचे संपादक डॉ. सॅम्युअल बेकन फेअरबॅक यांनी नंतरच्या काळात फुले यांच्या शाळेला भेट दिली,त्यावेळी त्यांच्यासमोर मुक्ताने हया निबंधाचे वाचन केले. तिच्या या निबंधवाचनाने प्रभावित होऊन त्यांनी तो ज्ञानोदयच्या अंकात क्रमषः दोन भागात छापला. 15 फ्रेबुवारी 1855च्या अंकात या निबंधाचा पूर्वार्ध छापताना संपादकांनी प्रस्तावनावजा टिप्पणी लिहिली. त्यात म्हटले की, ‘पूणे येथील जोतीबा माळी (फुले) यांच्या अतिशूद्रांच्या (मांग-महारांच्या) शाळेत आम्ही गेलो असतांना तेथे एका मांगाच्या चौदा वर्षीय मुलीने आमच्यापुढे हा निबंध वाचला तिने या शाळेत तीन वर्षे विद्याभ्यास केला आहे. हिंदूधर्माच्या राज्यात त्यांच्या सत्तेखाली नीच मानलेल्या अस्पृश्यांना पराकाष्ठेचे दुःख सोसावे लागते. अशा दुःखाबदद्ल तसेच आपल्या आईबापाच्या मुखाने स्वजातीचे जे हाल हवाल ऐकले त्याविषयी तिने आपले हृद्गत निर्भयपणे व निःपक्षपणे लिहिले आहे. पूर्वी मांग, महारांना किती दुःख सोसावे लागत असत या विषयीचा वृत्तांत सदरहु मुलीच्या बापाने आमच्यापाशी सांगितला आहे, तो पुढे अवकाशानुसार ज्ञानोदयद्वारे प्रकट केला जाईल. परंतु आता त्या मुलीला स्वतः आपल्याविषयी बोलू देतो…’5

ज्ञानोदयकर्त्यानी या निबंधावर अत्यल्प स्वरूपात संपादकीय संस्कार केलेले आहे. त्याचेही स्पष्टीकरण देतांना त्यांनी आवर्जून नोंदविले आहे की, ‘या निबंधांतील भाषा व मजकूर पहिल्या सहा कलमापर्यंत कोठे कोठे किंचित सुधरला आहे,परंतु जेव्हां तो जगप्रसिध्द करण्याचा बेत झाला तेव्हां त्या बाईने जे स्वबुध्दीने लिहिलें तेंच लोकांस समजावें व त्यावरुन तिच्या शहाणपणाचे व अभ्यासाचें त्यांनी अनुमान करावें म्हणून त्यांत कांहींच फेरफार न करितां तें तसेंच सादर केले आहे… ’ निबंधाचा उत्तरार्धही प्रकाशित करतांना त्यांनी लिहिलेल्या अत्यल्पशा प्रस्तावनावजा टिपनात-‘‘हा निबंध त्या मुलीने स्वहस्ताने लिहिल्याप्रमाणे -हस्वदीर्घसुध्दा अक्षरशः आहे. त्यात काहीच फेरफार केला नाही. मजकुराची कलमे मात्र नवी आहेत व पुनरूक्तीमुळे कोठे मजकुर गाळला आहे.’’6 असे पुनश्च म्हटले आहे.

शिक्षणामुळे आत्मभान प्राप्त झालेल्या मुक्ताला तिच्याभोवतीच्या जातीपुरुषसत्ताक वास्तवाची उकल करण्याची बौध्दिकक्षमता अल्पवयातच विकसित करता आली आहे.जातीव्यवस्थाक धर्म,समाजरचना,राज्यव्यवस्था व अर्थरचना आदींच्या अनेक गुंतागुंतीच्या पैलूंची परखड चिकित्सा करता आली आहे. तिच्या हया आत्मकथनात्मक निबंधात ती ब्राहमणीव्यवस्थेच्या विरोधात ‘तळतळाटा’च्या बोलीत अभिव्यक्त होत आहे.तिच्या अभिव्यक्तीत तीव्र वेदनाव्यग्रतेबरोबरच तितक्याच तीव्रतेची बंडखोरी प्रत्ययास येते. अस्पृश्यतेच्या पीडादायी जैविकानुभूतीतून ती वेदनाव्यग्र कैफियतेत व्यक्त होत असतानाच या व्यवस्थेला नकार देत आहे. या तीव्र नकारातून दलितांच्या शोषणपीडनदमनमुक्तीचे जैविक ध्येय प्रकट करीत आहे.

हया निबंधाचे अनन्यसाधारण वैशिष्टये असे की, जोतीबा फुले यांचे कोणतेही लेखन प्रसिध्द होण्याअगोदरच त्यांच्या या बुध्दिमान व विद्रोही विद्यार्थिनीचा निबंध प्रकाशित झाला आहे.७ असेही म्हणता येईल की, एकोणिसाव्या शतकात स्त्रियांच्या लेखनाचा प्रारंभ मुक्ताच्या निबंधापासून झाला आहे. यापूर्वी मध्ययुगात भक्तिआंदोलनातील मदाइसा, नागाइसा इ.महानुभाव तसेच मुक्ताबाई,जनाबाई, गोणाई, सोयराबाई, बहिणाबाई इ. वारकरी कवयित्रीनी मराठीत रचनाकेलेल्या प्रसिध्द आहे. मात्र ब्रिटिश वासाहतिक काळात प्रथमच मराठीत लिहिणा-या चार स्त्रियांचा उल्लेख करता येईल. मुद्रणोत्तर कालखंडात कदाचित संपूर्ण भारतात आणि मराठीत सन 1882 पर्यंत प्रथमच वैचारिक लेखन करणा-या हया चार स्त्रियांमध्ये मुक्ता साळवेचा समावेश करावा लागतो. यामध्य अमेरिकेतून आलेल्या नासिक येथील मिशनरी मिसेस सिंथिया फॅरार यांचे ‘कुटुंबप्रवर्तननीती’ हे मराठीतील पहिले स्त्रीलिखित पुस्तक 1835 मध्ये प्रसिध्द झाले. फुले यांनी फॅरार यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मुलींची शाळा सुरू केली होती,असे खुद्द फुले यांनीच म्हटले आहे.अहमदनगर येथील त्यांनी चालविलेल्या मुलींच्या शाळेला भेट दिल्यानंतर फुले प्रभावित झाल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या ध्येयवादी फॅरारबाईंचा ग्रंथ एकुण 56 पृष्ठसंख्येंचा असून Hints for the Improvement of Early Education and Discipline  या इंग्रजी ग्रंथाच्याआधारे तो लिहिला आहे. त्यामध्ये भारतीय स्त्रीदास्याबदद्ल चिकित्सा केलेली असली तरी ती सापेक्षपणे जातीव्यवस्था आणि पुरूषसत्ता यांच्या अविभाज्य सबंधांत अत्यंत औपचारिक स्वरूपात आहे. ख्रिश्चनधर्माच्या प्रचाराच्या हेतुने हे लेखन केले आहे तरीही भारतीयसमाजातील स्त्री-पुरूषविषमतेबदद्ल एका पाश्चात स्त्रीची पितृसत्ताविरोधी भूमिका त्यात प्रकट झाली आहे. फॅरारबाईच्या या प्रकाशित पुस्तकानंतर प्रकाशित स्त्रीसाहित्य म्हणजे 1855 मध्ये प्रसिध्द झालेला मुक्ता साळवेचा निबंध. मुक्ताच्या निबंधप्रकाशनानंतर तब्बल सव्वीस-सत्तावीस वर्षानंतर सन 1882 मध्ये फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्री-पुरूष तुलना’ हे तितकेच विद्रोही पुस्तक प्रसिध्द झाले.8 त्याचवर्षी ताराबाईंच्या पुस्तकानंतर पंडिता रमाबाई यांचे ‘स्त्रीधर्मनीती’ हे पुस्तक मराठीत प्रसिध्द झाले. ब्राह्मणीव्यवस्थेच्या विरोधात पंडिताबाई यांनी ख्रिश्चनधर्म स्वीकारला होता. मात्र ताराबाई शिंदे यांच्याप्रमाणे त्या प्रखर जातीपितृसत्ताविरोधी भूमिका घेतांना दिसत नाही. ‘स्त्रीधर्मनीती’त त्या आर्य हिंदू पतिव्रताधर्माच्या ब्राह्मणी जाणीवेच्या चौकटीत लेखन करीत होत्या.तुलनेत मुक्ताचा लहानसा निबंध आणि ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्री-पुरूष तुलना’ हे पुस्तक फुले यांनी उभारलेल्या जातीपितृसत्ताविरोधी लढयाची अर्थात सत्यशोधकचळवळीची दोन अत्यंत विद्रोही वैचारिकतेची अस्त्रे होती, जी अनुक्रमे प्रातिनिधिकरित्या दलित व मध्यमजातीस्तरांतून आलेल्या स्त्रियांनी निर्माण केली होती.

मुक्ता साळवेने तिच्या शाळकरी आयुष्यात लिहिलेला एकमेव प्रकाशित निबंध आज उपलब्ध आहे. तिने पुढील जीवनकाळात आणखी काही लिहिले होते किंवा नाही याचा इतिहास अद्याप तरी अज्ञात आहे. तिच्या पुढील जीवनचरित्राविषयी कोणतीही माहितीदेखील अद्याप आपण शोधू शकलो नाही किंबहुना तिच्याबद्दल आणखी काही माहिती देणारे कोणतेही ऐतिहासिक दस्तावेज आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही.‘ज्ञानोदय’ने तिचा निबंध फेब्रु.-मार्च1855 मध्ये छापला, त्यावेळच्या छापील माहितीनुसार ती चौदा वर्षाची होती. आणि ती फुले यांच्या शाळेत किमान तीन वर्षापासून शिक्षण घेत असल्याचा स्पष्ट उल्लेखही त्यांत केला आहे. यावरुन असा अंदाज करता येतो की,तिचा जन्म1840-41च्या दरम्यान कधीतरी झाला असावा. याखेरिज तिची जडणघडण,शिक्षण,कुटुंब व इतर जीवनकार्य याबद्दल जवळजवळ काहीच माहिती देता येणे,शक्य होत नाही.9 मुक्ताचा निबंध ही वासाहतिक काळातील दलित स्त्री-पुरुषांच्या जीवनव्यवहाराची माहिती देणारी अत्यंत मर्यादित व अपुरी संहिता असली तरी
भारतीय स्त्रीमुक्तीचा प्रश्न जातीव्यवस्थेशी अविभाज्यपणे जोडलेला आहे.हे एकोणिसाव्या शतकात पहिल्यांदा मांडणारा तो लेखी दस्तावेज आहे

~~~

तळटीपा:
1) त्याकाळात आडनांवावरून व्यक्तीची ओळख नोंदविण्याची प्रथा जवळजवळ नव्हती. व्यक्तीच्या जातीच्या नावाने त्याची ‘आडनांव’म्हणून ओळख होत असे ब्रिटिश वासाहतिककाळात जनगणना सुरू केल्यानंतर या देशात आडनावे नोंदवण्याची पध्दत मोठया प्रमाणात सुरू झाली. दलित व मध्यमजातीयांमध्ये जातीचा नामोल्लेख आडनांव म्हणून करण्याऐवजी जातीनामविरहीत आडनांवे लावण्याची पध्दत साधारणतः विसाव्या शतकाच्या प्रारंभाला रूढ झाली. तत्पूर्वी लहुजी मांग, राणबा महार, धुराजी चांभार, सावजी सुतार किंवा जोतीबा माळी अशी जातीवाचक आडनावेच नोंदवली जात असत व ओळखली जात असत.

2)लहुजी साळवे वस्ताद हे जोतीबांचे तालीमीतले गुरु. शारीरिक कसरतींबरोबरच ते तलवार, दांडपट्टा, भाला इ.सशस्त्र प्रशिक्षण देत असत. वासुदेव बळवंत फडके हाही त्यांचा चेला होता. नंतरच्या काळात लहुजी जोतीबांचे शरीरसंरक्षक म्हणूनही कार्यरत होते. साता-यात झालेल्या1857च्या उठावात रंगोबापूसोबत लहुजीचे चाळीस प्रमुख लोक लढले. परंतु ते सर्व ब्रिटिशांच्या तावडीत सापडले.बहुतेकांना फाशी,जन्मठेपेच्या कठोर शिक्षा देण्यात आल्या. जोतीबांच्या सहकारी कार्यकर्त्यांची मांग जातीमधली मोठी फळी अशा त-हेने संपुष्टात आली. अस्पृश्यांसाठी शाळा सुरु करुन त्या प्रभावीपणे चालविण्याच्या कार्यात लहुजी,राणबा महार आदींनी प्रचंड परिश्रम घेतल्याबद्दल जोतीबांनी त्यांचा सतत कृतज्ञतेने उल्लेख केलेला आहेतअशा लढवय्या,विद्रोही लहुजीच्या कुटुंबातच मुक्ताचा जन्म झाला होता.

3)बहुसंख्य अभ्यासक हे मुक्ता ही लहुजीची पुतणी होती,असे सागंतात.तर काहीजण तिला लहुजीची नात मानतात. परंतु गणोजी साळवे हे लहुजींचे भाऊ होते, हे तथ्य बहुमान्य झाल्यामुळे मुक्ता ही त्याची पुतणी होती असे कथन स्थापित होत आहे.

4) मुक्ता साळवे प्रमाणेच फातिमा शेख यांच्या जीवनचरित्राविषयी जवळजवळ काहीच माहिती उपलब्ध होत नाही. सावित्रीबाई फुले व सगुणाबाई क्षीरसागर यांच्याबरोबरच फातिमा यादेखील शिक्षिकेचे प्रशिक्षण देणा-या मिसेस मिचेल यांनी चालविलेल्या नॉर्मल ट्रेनिंग स्कुलमध्ये शिकल्याचा संदर्भ उपलब्ध आहे. परंतु आपल्या शाळांमध्ये प्रशिक्षित ब्राहमणेतर शिक्षिका असाव्यात या मुख्य उद्देशाने जोतीबा व सावित्रीबाई यांनी नॉर्मल ट्रेनिंग स्कूल सुरू केले होते. या ट्रेनिंग स्कुलमधील पहिली विद्यार्थिनी फातिमा ही होती. 1852पर्यंत फुलेदाम्पत्याने पुणे परिसरात अठरा ते वीस शाळा सुरु केल्या होत्या. या शाळांमधून सावित्रीबाई व सगुणाबाई यांच्यासह फातिमाही ध्येयवादी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. एका उपलब्ध जुन्या फोटोत सावित्रीबाई, सगुणाबाई क्षीरसागर आणि त्यांच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यासोबत फातिमाही आहे. हया एका दुर्मिळ छायाचित्राखेरीज सावित्रीबाईनी जोतीबांना लिहिलेल्या 10 ऑक्टो. 1856 च्या एका पत्रात तिचा उल्लेख आढळतो. त्यात फातिमा कुरकुर न करता शाळेच्या कामासाठी भरपूर कष्ट घेत आहे असे म्हटले आहे. फुले यांनी 1849 मध्ये पुण्यात उस्मान शेख यांच्या वाडयात प्रौढांसाठी शाळा स्थापन केली होती. दलित सहका-यांबरोबरच ख्रिश्चन (लिजिटसाहेब) तसेच गफार बेग मुंशी, उस्मान शेख व फातिमा शेख या मुस्लिम सहका-यांचाही फुले यांच्या कार्यात मोलाचा सहभाग होता. फातिमांच्या कार्यामुळे आणखी इतर मुस्लिम स्त्रियाही शिक्षण घेऊन या कार्यात सहभागी झाल्या असाव्यात की काय? याविषयीही काहीच माहीती उपलब्ध नाही.

5) आपल्या दलित सहका-यांच्या सहाय्याने फुले व ‘ज्ञानोदय’कर्ते यांचा पूर्व पुण्यातील दलित वस्त्यांशी म्हणजेच महार-मांगाच्या वस्त्यांशी घनिष्ट संबंध होता, असे ज्ञानोदयच्या या प्रास्ताविकातून जाणवतेव फुले यांचे घरही त्याकाळी पूर्व पुण्यातील दलित वस्तीत होते. 1848 पासून 1854 पर्यंत त्यांनी महार-मांगाच्या शाळा येथील महारवाडयात सुरू केल्याचे शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील आपल्या लेखात म्हणतात. (नरके हरि (संपा.) आम्ही पाहिलेले फुले पृष्ठ 183) याचा अर्थ, मुक्ता साळवे ज्या मातंग वस्तीत रहात असे त्या वस्त्यांमध्ये फुले यांचा नित्याचा संबंध येत असे.

6) निबंधाच्या पहिल्या भागात (अनुक्रमे 2,3,4,5,6 असे) कलमवार केलेले आहेत. दुस-या भागात मात्र कलमवार केलेले नाही. दुस-या भागातच काही मजकुर गाळला असावा.

7)1855मध्ये फुले यांचे पहिले लेखन‘तृतीयरत्न’ या नाटकाच्या स्वरुपात ओळखले जाते.परंतु त्यांचे पहिले प्रकाशित लेखन(‘छ.शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा’,‘ब्राहमणाचे कसब’इ.संहितेच्या स्वरुपात) 1869मधील आहे.

8) डॉ.स.ग. मालशे यांनी हे पुस्तक 1975 मध्ये काढले. डॉ.मालशे ताराबाईंचा जीवनकाल 1850 ते 1910 असा देतात. ताराबाईंच्या ब्राह्मणीपितृसत्ताविरोधी टीकेवर लोखंडे, भालेराव, घोले या फुले यांच्या सहका-यांनी प्रतिकुल मते मांडली होती व फुले यांनी त्यांच्या पुरूषप्रधान मतांचा समाचार घेतला होता. फुलेउत्तरकाळातील सत्यशोधक चळवळीने ताराबाईंना पूर्णतः बेदखल केले. त्यांचे ‘स्त्री-पुरूषतुलना’ हेच एकमेव पुस्तक आजपर्यंत उपलब्ध झाले आहे. ताराबाईंच्या जीवनचरित्राविषयी आणि त्यांनी त्यानंतर काही लिखाण केले होते की नाही याबदद्ल काहीही माहिती मिळत नाही.

9)लहुजी वस्तादाच्या जीवनकार्यावर आधारित एका कादंबरीत मुक्ताच्या जीवनकार्याबद्दल काल्पनिक माहिती प्रसृत करण्यात आली आहे.त्यांत लिहिले आहे की,..‘.मुक्ताचा निबंध इंग्रजीत भाषांतरित करुन इंग्लंडच्या राणीकडे पाठवण्यात आला.मुक्ता पुढे डिप्रेस्ड् क्लास मिशनमध्ये सहभागी झाली नि तिने रात्रीच्या शाळांमधून शेकडो अस्पृश्य मुलांना शिकवून तयार केले….’(घोडे,अनंत-‘सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद’, मुक्ताई प्रका. मलकापूर,2000 पृ.72) 1906 मध्ये विरा. शिंदे यांची डिप्रेस्ड् क्लास मिशन स्थापित झाली.स्थापनेच्या काळापासूनच जर ती या मिशनमध्ये सहभागी होऊन कार्य करीत असेल तर त्यावेळी तिचे वय 65पेक्षा जास्त असू शकते.परंतु ही माहिती केवळ कल्पनारचित आहे.अशा त-हेचे कल्पनारचित एका अर्थाने मुक्तासारख्या अनेक विद्रोही दलित स्त्रियांचा इतिहास ब्राहमणीव्यवस्था नष्ट करते किंवा जातपितृसत्तेत त्यांची शोकांतिका होते,या भीषण वास्तवाकडे दुर्लक्ष करते आणि त्याविरोधात प्रतिमिथकाचे रचित उभारते.

संदर्भ:

१. कीर, धनंजय (१८५७) महात्मा जोतीराव फुले– आमच्या समाजक्रांतीचे जनक, पॉप्यू. प्रकाशन., मुंबई.
२. जोशी, ना. वि. (खानोलकर, गं. दे.– संपा)(१९७१), पुणे शहराचे वर्णन, साहित्य संघ प्रका., मुंबई.
३. फडके, य.दि.(संपा)(१९९१) महात्मा फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
४. फरार मिसेस (१८३५), कुटुंब प्रवर्तननीती; नाशिक
५. मालशे, स.ग. (संपा)(१९९०) कै. ताराबाई शिंदेकृत स्त्रीपुरुषतुलना, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई
६. नरके, ह. (संपा)(1993), आम्ही पाहिलेले फुले, म. फुले चरित्र साधने प्रका. समिती, मुंबई
७. नरके, ह. (संपा)(२००६), महात्मा फुले साहित्य आणि चळवळ, म. फुले चरित्र साधने प्रका. समिती, मुंबई
८. रमाबाई, पंडिता (१९६७), स्त्री धर्मनिती, रमाबाई मुक्ती मिशन केडगाव(पुणे)
९. लेले, रा. के. (१९८४) मराठी वृत्तपत्रांचा इतिहास, कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे

टीप: हा लेख यापूर्वी सचिन गरुड लिखित “मुक्ता साळवे, फातिमा शेख आणि लहुजी वस्ताद, प्रतीके व समकालीन सांस्कृतिक राजकारण” या पुस्तकात प्रकाशित झाला आहे, याच लेखाची सुधारित आवृत्ती येथे लेखकाच्या परवानगीसह प्रकाशित करत आहोत.

प्रा. सचिन गरुड: हे इतिहासतज्ञ, लेखक आणि आंबेडकरी कार्यकर्ते आहेत. ते क. भा. पा. कॉलेज, इस्लामपूर, सांगली येथे साहाय्यक प्राध्यापक व इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यांच्याशी “garudsachin38@gmail.com” या ई-मेल आयडी वर संपर्क साधता येईल.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*