जे एस विनय
मला काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन प्राइम वर तेलुगू चित्रपट पलासा १९७८ पाहण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्राचा असलो तरी मला वेगवेगळ्या भाषांमध्ये जाती-विरोधी निवेदनावरचे चित्रपट पहायला आवडतात.
काही मुख्य मुद्द्यांकडे जाण्याचा प्रयत्न करू.
आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा नावाच्या छोट्या गावात हा सिनेमा सेट करण्यात आला आहे. बहुजन आणि वर्चस्व असलेल्या उच्च-जाती यांच्यातील या शोषणकारी नात्यावर चित्रपट केंद्रित आहे. प्लॉटच्या तपशिलामध्ये जाणार नाही. मोहन राव आणि रंगा राव हे दोन भाऊ (अस्पृश्य) समाजातील आणि २ व्यापारी उच्च जातीच्या मालकांमधील संघर्षाबद्दल कथा मुख्यत्वे फिरते आहे. कथा प्रेक्षकांना धरून ठेवते आणि चित्रपटाची गती खूप वेगवान आहे. चित्रपट बहुधा फ्लॅशबॅक मोडमध्ये दाखवला आहे .
चित्रपटाच्या पहिल्या काही मिनिटांतच प्रत्येक पात्रांची जात स्थाने स्पष्ट होतात. जेव्हा काही कॅमेरा त्यांच्यावर फिरत असेल तेव्हा सावकारांना त्यांच्या पवित्र धाग्यांसह काही वेळा पाहिले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ” कास्ट्स इन इंडिया ” या पुस्तकांमधील शब्द मला आठवतात : “खरे पाहता जात ही एकटी अशी नसतेच किंबहुना ‘अनेक जाती’ ह्या मात्र असतात. याचे मी आपणांस उदाहरण देतो. स्वतःकरिता जाती बनविताना ब्राम्हणांनी ब्राम्हणेतरांत जातीची निर्मिती केली. माझ्या मते हे स्पष्ट करावयाचे झाल्यास स्वतःला कोंडून घेताना ब्राम्हणांनी इतरांना बाहेर राहण्यास बाध्य केले.” [१]
मला तेलुगू भाषा समजत नसली तरी, जेव्हा मी माझ्या मित्रांकडे तपासणी केली तेव्हा त्यांनी नमूद केले की वापरलेली बोली उत्तर आंध्र प्रदेशातील आहे, ती तेलुगु चित्रपटांमध्ये सामान्यतः वापरली जात नाही कारण ती “शुद्ध” बोलीभाषेत येत नाही. गाणी स्थानिक लोक गायकांद्वारे गायली गेली आहेत आणि वापरली जाणारी वाद्ये बहुतेक स्थानिक बहुजन वापरतात तीच आहेत. बहुजन समाजातील महिलांचे चित्रण खूप स्वाभिमान आणि सन्मानाने दर्शविली गेले आहे. त्या शोषक जातींच्या पुरुषांच्या वासनेला बळी पडण्यास धिटाईने विरोध व नकार देणे असो किंवा जेव्हा स्त्रिया त्यांच्या पुरुषांना सन्मानाने जगण्यासाठी प्रोत्साहित करतात तेव्हा असो .
चित्रपटात बऱ्याच वेळेस “शोषित घटकांची एकता ” ही संकल्पना दर्शविली गेली आहे . “पैशाची किंवा शक्तीच्या आमिषाने बहुजन बळी पडतात ” या संकल्पनेला तोडण्याचा प्रयत्न केला आहे . सिनेमातील बर्याच पात्रांमध्ये खूप ताकद आहे. जसं राव बंधूं, 2 सावकार, दलित ख्रिश्चन पात्र पोलीस निरीक्षक सेबस्टियन जे चित्रपटाचे केंद्र स्थान पात्र आहेत, राव बंधूंच्या पत्नी, बैरागी, इ.
बहुजनांना देखील त्यांच्या स्वत: च्या मार्गाने महत्वाकांक्षी असल्याचे दर्शविले जाते, त्यांना नेहमी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चांगले जीवन व भविष्य हवे असते. बहुजनांना बदल समजून घेण्यात व स्वीकारण्यात अग्रेसर म्हणून दाखवले आहे. उदाहरणार्थ, डॉ. आंबेडकर व त्यांचे सिद्धांत समजल्यानंतर मोहन राव आपला धार्मिक धागा सोडून फेकून देतो . जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या काळाशी जुळवून घेण्यासाठी पाश्चात्य नृत्य शिकण्याची इच्छा व प्रयत्न सलेल्या मोठ्या राव चा आणखी एक उदाहरण आहे . एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की असं कधीच वाटत नाही की राव बंधू आपल्या शक्तीचा गैरवापर असरशन(assertion) शिवाय कशासाठी करत आहेत . बर्याच वेळा ते स्व-रक्षणासाठी किंवा अत्याचारी लोकांना धडा शिकवण्यासाठी करतात जे चित्रपटात योग्य वाटते .
जातीच्या अत्याचाराचा प्रकारही वेगळा दाखवला आहे. नेहमी सारखा जातीय अत्याचार दाखवला तर आहेच , त्या व्यतिरिक्त जातीभेद पण दाखवला आहे उदाहरणार्थ जेव्हा निवडणुकाच्या तिकीट वाटप सुरु असतं, जेव्हा सर्वात जास्त सक्षम असूनही राव यांना त्यांचा योग्य वाटा दिला जात नाही!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचे अनुसरण करून, चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. करुणा कुमार यांनी राजकीय शक्ती तसेच कला, संगीत, शिक्षण या क्षेत्रांमध्ये बहुजनांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे स्थान भेटणे सुचविले आहे. विद्यापीठाच्या जागांवर झालेल्या संस्थागत खून, चंदुरू आणि लक्ष्मीपेता जातीय अत्याचार याबद्दलही ते बोलतात. उच्चवर्णीयांच्या भ्रामक स्वरूपाला न येण्यासाठी त्यांनी बहुजन एकतेवर लक्ष केंद्रित केले आहे.
ही संकल्पना पुढे येण्यासाठी दिग्दर्शक करुणा कुमार यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. याचा सार थोडक्यात, हा चित्रपट जातीय अत्याचाराच्या विरुद्ध विद्रोहच्या पार्श्वभूमीवर एक थ्रिलर आहे. हे चांगले आहे की बहुजन पार्श्वभूमीवरील दिग्दर्शक आता स्वतःच्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवू लागले आहेत. आणि या गोष्टीचा आपण नक्की स्वागत करायला हवा आणि प्रोत्साहन द्यायला हवा !
जे एस विनय
लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात तसेच जातविरोधी परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय आहेत .
संदर्भ:
१. Castes in India: http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_castes.html#:~:text=Castes%20exist%20only%20in%20the,in%20they%20closed%20others%20out.
- झुंड- मानवी अस्तित्वाची लढाई - June 16, 2022
- जयंती: सामाजिक विचार आणि स्वायत्ततेचा उत्सव - December 4, 2021
- सारपट्टा परमबराई : ब्राह्मण-सवर्ण परंपरेला एक जोरदार मुक्का - September 2, 2021
Leave a Reply