नव्या क्रांतीच्या विचारांचा पॅंथर…

ॲड.अमोलकुमार वाकोडे

नव्या क्रांतीच्या विचारांचा पॅंथर.

१९६६ साली ह्यू.पी. न्यूटन आणि बॉबी जी. सील या कृष्णवर्णीय तरुणांनी ब्लॅक पॅंथरची स्थापना कॅलिफोर्निया मधील ऑकलॅंड येथे केली.त्या काळात या ब्लॅक पॅंथरवर भारतीय वृत्तपत्रांमध्ये चर्चा होत्या आणि म्हणून सिद्धार्थ विहार मधील विद्यार्थ्यांमध्ये या ब्लॅक पँथर संघटनेविषयी चर्चा सुरू झाली व त्यांना हे संघटन आपलेसे वाटू लागले. भारतीय जातीवादी समाजव्यवस्थेने घालून दिलेल्या विचाराला तोडण्यासाठी अशीच एक संघटना आपल्याकडे असली पाहिजे असे ठाम मत बहुसंख्य विद्यार्थ्यांमध्ये झाले. आणि याच काळामध्ये मागासवर्गीयसमूहावर अन्यायाचा कळस होत आहे असे पेरुमल समितीने अहवाल सादर केला.

मग काय क्रांतीची बीजे रोवली गेली.
संतप्त आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांनी, तत्कालीन नेत्यांनी म्हणजे पद्मश्री नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, राजा ढाले , ज.वी.पवार व इत्यादी यांनी सिद्धार्थनगर मुंबई मध्ये 29 मे 1972 ला दलित पँथर संघटनेची स्थापना केली.

एकूणच या चळवळीच नेतृत्व युवक आणि विद्यार्थ्यांकडे असल्याकारणाने पॅंथरची वाटचाल जबरदस्त वेगाने झाली. पॅंथर मधील नेते हे अभ्यासक, साहित्यिक असल्यामुळे पॅंथरने आंबेडकरी चळवळ व साहित्याला नवसंजीवनी दिली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मागासवर्गीय समूहावर दिवसेंदिवस वाढता अन्याय रोखण्यास तत्कालीन राज्य सरकार अपयशी ठरत आहे म्हणून दलित पँथरने आक्रमक पवित्रा उचलला व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले,
“माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही
चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू”.

१५ ऑगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा “काळा स्वातंत्र्यदिन” हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली व दलित पॅंथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पॅंथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पॅंथरमधे प्रवेश केला. प्रत्येकाला पॅंथर ही संघटना आपल्या मनातील असंतोषाचे विचारपीठ वाटत होती.

पॅंथरने आपल्या जाहीर केलेल्या भूमिकेत म्हटले आहे;

“दलितांचा मुक्तिलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. अल्प: बदल आम्हाला नको… आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला सार्‍या देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. हृदयपरिवर्तनाने, शिक्षणातील उदारमतवादाने आमच्यावरील अन्याय, आमचे शोषण थांबणार नाही. आम्ही क्रांतिकारक समूह जागे करू, संघटित करू. या प्रचंड समूहांतील संघर्षामधून क्रांतीची लाट येईल. सनदशीर अर्ज, विनंत्या, सवलतीच्या मागण्या, निवडणुका, सत्याग्रह यामधून समाज बदलणार नाही. आमच्या समाजक्रांतीच्या कल्पना व बंड या कागदी जहाजाला पेलणार नाही. त्या मातीत रुजतील, मनात फुलतील, पोलादी वाहनातून सणसणत अस्तित्वात येतील.”

खूप लोक पॅंथर विषयी लिहिताना अन्यायाचा प्रतिकार ,जुलमाविरुध्द बंड ,जशास तसे उत्तर असे लिहीतात पण माझ्या मते सामाजिक विचारांचे प्रबोधन आणि त्या प्रबोधनातून क्रांतीची ठिणगी पेटवणारा विचार म्हणजे पॅंथर होय. पण ह्याच क्रांतीच्या ठिणगी चा विचार हा येतो तरी कुठून…..?

तर तो येतो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या एका वाक्यातून, “गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल”, या वाक्यात मला क्रांतीच वादळ दिसतं, कारण की शांत असलेल्या समूहाला जेव्हा त्याच्या शांततेचा अनादर झालेला आहे याची परिपूर्ण जाणीव होते त्यावेळेला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे तो या इतिहासात झालेल्या अनेक क्रांतीच्या प्रवृत्तीला आवाहन दिल्याशिवाय राहत नाही, एव्हाना इतिहासात आपली वेगळी ओळख तयार करून जातो.

दलित पँथरचा विचार होता तरी नेमका कोणता…? सामाजिक विचारांचे प्रबोधन हा संघटनेचा गाभा आहे. त्यामध्ये लोकशाही तत्व रुजवणे, लोकशाही प्रणाली ही भारतातील जातीयवादी मानसिकता असलेल्या लोकांना पचनी पाडणे हे उद्दिष्ट दलित पँथर आपल्या उराशी बाळगून काम करीत होते. दलित पॅंथर संघटनेचे प्रमुख तत्त्व जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, विज्ञानवादी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करून प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना म्हणून समाजात ओळखली जाते. पँथरचा प्रभाव इतका मोठा होता की आजही आमच्या बापाला पॅंथर हे नाव नवीन उर्जा देऊन जाते म्हणून तर हा विचार आहे की जो आपल्या दबलेल्या विचारांना स्वाभिमानाची जाणीव करून स्वाभिमानी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. विविधतेने नटलेल्या म्हणण्यापेक्षा विषमतेने नटलेल्या या देशाला पॅंथर समतेच्या विचाराची ठिणगी पेटवून देताना आपल्याला दिसतो.

पँथर ने भारतीय समाजव्यवस्थेला जाणीव करून दिली की भारतीय संविधानात दिलेल्या सामाजिक न्याय, बंधुता , समानता या तत्त्वानुसार सर्वांना चालावे लागेल, अन्यथा सवर्णांनी जर त्यांची पायरी सोडली तर तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जाईल.

समताधिष्ठित विज्ञानवादी समाजव्यवस्था जर निर्माण करायची असेल तर आपल्याला अशा संघटनांना व अशा विचारांना बळ द्यावेच लागेल आणि जर आपल्याला हे विचार असंविधानिक वाटत असले तर मागासवर्गीय समूहाला कधी परदेशी शिष्यवृत्ती क्रिमीलेयर लावुन संख्या कमी करतो, कधी शिष्यवृत्ती देण्याचे टाळतो, कधी बॅकलॉग न भरता त्या बॅकलॉग वर ओपणची भर्ती करतो, तर कधी बार्टी सारख्या संस्थेला फंड अभावी ताटकळत ठेवतो, तर कधी पदोन्नतील आरक्षण जीआर काढुन बंद करतो तर कधी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी वितरित करत नाहीत सामाजिक न्याय विभागातील १०५ कोटी रु माघारी जातात. आणि केला जरी तरी तो पुरेसा करत नाही.याला आपण संविधानिक तरतुदी बोलणार का मग….?

म्हणून या शोषित समूह घटकांवर आजच्या तथाकथित आधुनिक राजकीय गिधाडांनी जिवंत माणसांच्या अंगावरील माणसाचे लचके तोडणे असा अन्याय अत्याचार कितपत योग्य आहे…?
म्हणून या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्यायाची तलवार म्हणून एका पॅंथरची गरज नेहमीच राहणार.

क्रांतिकारी जय भीम!

ॲड.अमोलकुमार वाकोडे

लेखक अधिवक्ता असून मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे संलग्न आहेत, तसेच ते Ambedkarite Law Student Association, Maharashtra चे संस्थापक सचिव आहेत.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*