प्रतित्यसमुत्पाद आणि बुध्द

विश्वदीप करंजीकर

प्रतित्यसमुत्पाद, अनित्यता, दु:ख, अनात्मता आणि निर्वाण यासारखे महान सिध्दांत शोधून जगाला विज्ञानाच्या ६०० शाखांकडे नेणाऱ्या महान शास्त्रज्ञाचा, तसेच मानवमुक्तीच्या कल्याणाचा मार्ग अहिंसेच्या माध्यमातून दाखवणारा एक मनुष्य म्हणजे बुध्द. बुध्द म्हणजे ज्ञानी. बुध्दीमान.

रानटी अवस्थेतून नागरिकीकरणाकडे जाताना मानवजातीला आपली प्रगती करण्यासाठी तीन मार्ग सापडले. कर्मकांड, भक्ती आणि ज्ञान. यापैकी ज्ञानाचा मार्ग हाच महान मानला गेला आहे. आज ज्ञानाच्या जोरावर मनुष्यप्राण्याने अचाट-अफाट प्रगती केली आहे. ज्ञान ही शाखा सुरु करण्याचे काम बुध्दाने केले. जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवला. संपूर्ण पृथ्वीवर पहिले दोन विद्यापीठ उभे राहिले. तक्षशीला आणि नालंदा. यांची प्रेरणा बुध्दाचीच होती. संपूर्ण जगाला बुध्दीमत्तेचे धडे या विद्यापीठांनी दिले. जवळपास ६०० विषयात जगाला मार्गदर्शन करणारा भारत हा एकमेव देश होता.

बुध्दाने दिलेले तत्वज्ञान हे धम्म आहे. धर्म नाही. धम्म म्हणजे काय ?

१. निष्पाप, निष्कलंक आणि शुध्द चारित्र्य जपून जीवन जगणे.
२. हिंसा, चोरी, खोटे बोलणे, व्याभिचार करणे आणि दारु पिणे यांपासून कायम परावृत्त होणे. 
३. निर्वाण प्राप्त करणे : म्हणजे जीवंतपणी सुखी जीवन जगणे. सर्व प्रकारच्या लोभ, मोह, राग, आसक्ती, वासना यांपासून विरक्त होणे. निर्दोष जीवन जगणे म्हणजे निर्वाण. 
४. माणसाचे आयुष्य हे कणाकणाला एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत परावर्तित होत असते. या जगात शाश्वत असे काहीच नाही असे मानणे. वस्तू तीच असते परंतु तिची अवस्था सतत बदलत असते. Only change is constant. याच विचारातून शुन्यवादाचा उदय झाला. त्यातूनच विज्ञानाची निर्मिती झाली. 
५. धम्म म्हणजे विश्वातील नैतिक व्यवस्था कायम राखणे. 
६. मनुष्यामध्ये विद्वत्तेबरोबरच सदसदविवेकबुध्दीची निर्मिती करणे म्हणजे धम्म.
७. आयुष्यभर उच्च चारित्र्य धारण करणे म्हणजे शील पाळणे. 
८. सर्व प्राणिमात्रांविषयी करुणा बाळगणे. म्हणजे सर्व प्राणीमात्रांना जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करणे.
९. माणसामाणसांमध्ये मैत्री भाव वृध्दींगत करणे.
१०. सर्व प्राणिमात्र हे एक समान आहेत असे मानून समता प्रस्थापित करणे.

या धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी बुध्दाने धम्म समजलेल्या भिक्खूंचा संघ तयार केला. या संघाने युरोपाच्या प्रवेशद्वारापासून ते चीनच्या शेवटच्या टोकापर्यंत हा धम्म नेला.

गौतम बुध्द-त्यांनी दिलेला धम्म-त्या धम्माचा प्रचार करणारा संघ असे तीन महान तत्व मिळून बौध्द तत्वज्ञान बनते. जे मानवी आयुष्यातील दु:ख दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. बुध्दत्व ही मनाची अवस्था आहे. ती प्राप्त करता येते. हा धर्म नाही विचार आचरणाचा भाग आहे. जीवनमार्ग आहे. कोणीही तो अमलात आणू शकतो.

अशा या महान तत्वज्ञानाची देणगी मानवजातीला देणाऱ्या तथागत गौतम बुध्दांची आज जयंती. आज वैशाखी बौध्द पौर्णिमा. सर्वांना बौध्द पौर्णिमेच्या अनेक अनेक मंगलकामना !

विश्वदीप करंजीकर: गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज येथे विसिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*