गोवंश-हत्याबंदीची ऐतिहासिक पार्श्वभूमी: आपण मटणाला मटण का म्हणतो?

गौरव सोमवंशी

पुण्यामध्ये मी काम करत असतांना माझा एक मित्र Upsc/Mpsc ची तयारी करत होता. एक दिवस कळले कि फडणवीस सरकार ने गोवंशहत्या बंदी आणल्यामुळे त्याच्या वडिलांची मुंबई मधील नोकरी गेली आणि त्यांना हैदराबादला शिफ्ट व्हावे लागले. परवा पेपर मध्ये वाचले कि कोल्हापुरी चप्पलांची विक्री सुद्धा अतिशय कमी झाली आहे कारण कि चामडे महागलं म्हणून.

बरं हे पण काहीच नाही जेव्हा आपण शेतकऱ्यांचा विचार करतो तेव्हा पाहतो कि आधी शेतकरी हे आपली गुरं-ढोरं म्हातारी झाली, त्यांचं खाद्य महागलं किंवा दुष्काळ पडला तरचं ती त्यांना मांसासाठी विकता यायची. पण आता बंदीमुळे आणि त्यावरून दुष्काळ या सगळ्यामुळे सध्याची परिस्थीती किती तरी पटींनी बिकट झालीये. जी गुरं-ढोरं शेतकरी हा अगदी दिवस-रात्र सांभाळायचा आणि ज्यांच्या सोबत त्याची एक नैसर्गिक पार्टनरशिप होती, त्यांच्यावर आता हक्क गाजवणारे दुसरेच लोकं आहेत. या बंदी विरुद्ध ऍड. प्रकाश आंबेडकरांनी मोर्चेहि काढले.

आणि आता नवीन नियमानुसार तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ बीफ खाऊ शकता पण गोवंश-हत्या मात्र बंद राहणार. (शब्दांमध्ये बरेच काही असते. गोवंश-“हत्या” म्हणणारेच गांधी “वध” म्हणतात. )
म्हणजे श्रीमंत लोकांचे चोचले पुरवले जातील पण जो शेतकरी त्याच्या गुरं-ढोरांसोबत दिवसभर श्रम करतो आणि त्यांना सांभाळतो, त्याच्या नशिबी मात्र फक्त त्रासच वाढून ठेवलेला आहे.

हे असं का होतंय? या मागे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का? तर मध्यमयुगीन युरोपचा इतिहास वाचताना मला एक गोष्ट निदर्शनास आली. आणि मी यापुढे जे लिहिले आहे तो शब्दांचा इतिहास आहे, ज्यामध्ये तुम्हाला माणसं सुद्धा गुंतलेली दिसतील.

बरं एक विचार करा, इंग्रजीमध्ये चिकनच्या मांसाला आपण चिकनच म्हणतो, मग cow/bull च्या मांसाला ‘beef’/बीफ का म्हणतो? चिकन असेल कि एकच शब्द, पण बीफ आल कि दोन वेगवेगळे शब्द का? तसंच pig (डुक्कर) आणि pork (पोर्क) असे दोन वेगवेगळे शब्द का?

याच्या उत्तरासाठी आपण युरोपमधील १०६६ A.D. या वर्षात जाऊया, त्यावर्षी नॉरमंडीच्या फ्रेंच राजा विल्यमने (William of Normandy) इंग्लंड ला पराभूत करून त्यावर फ्रेंच राज्य प्रस्थापित केले होते. इंग्लंड मध्ये तेव्हा अँग्लो-सॅक्सन (Anglo-Saxon) भाषा बोलली जायची (इंग्रजी चा मुख्य पाया म्हणजे अँग्लो-सॅक्सन भाषा). त्याकाळी अँग्लो-सॅक्सन लोक म्हणजे मुख्यतः शेतकरी आणि कामगार वर्ग होता, तर प्रस्थापित नॉर्मन-फ्रेंच (Norman-French) समाज हा त्यांच्या डोक्यावर शोषक म्हणून येऊन बसला.

आजच्या महाराष्ट्रामधील शेतकऱ्यासारखाच तिथला शेतकरी हि आपली गुरं-ढोर आणि इतर जनावरं सांभाळायचा. Cow, Chicken, Bull, Pig, Turkey, Ox, Bullock, हे सगळे मूळचे अँग्लो-सॅक्सन शब्द.

हा कष्टकरी अँग्लो-सॅक्सन समाज त्या जनावरांसोबत दिवस रात्र राबायचा, पण त्याचं मांस हे नॉर्मन-फ्रेंच लोकांच्या पोटात जायचं. मग आता एक नॉर्मन-फ्रेंच शोषक वर्गातील व्यक्ती जेव्हा जेवायला बसायचा, तेव्हा ताटात वाढलेल्या समोरील जनावराला त्याच्या नॉर्मन-फ्रेंच भाषे मध्ये नाव घ्यायचा. जसं कि अँग्लो-सॅक्सन लोक हे शेळी ला शिप (sheep) म्हणायचे पण नॉर्मन-फ्रेंच लोक हे त्याच जनावराला “मटण” (mouton) म्हणायचे.
म्हणून मग पुढील नॉर्मन-फ्रेंच शब्द त्या मांसासाठी वापरण्यात आली, कारण कि जनावर सांभाळणाऱ्यांमध्ये आणि ते खाणाऱ्यांमध्ये दोन स्पष्ट वर्ग निर्माण झालेले होते, आणि यामुळे मग पुढे जाऊन जनावरांच्या नावांमध्ये आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या मांसाच्या नावांमध्ये तफावत निर्माण झाली.

अजून उदाहरण म्हणजे (पहिला शब्द नॉर्मन-फ्रेंच आणि ब्रॅकेट मधला शब्द अँग्लो-सॅक्सन):
porc (pig), veau (calf), boeuf (ox or bullock), mouton (sheep).

(पुढे जाऊन मग porc चं pork, boeuf च beef, आणि mouton च mutton असं हलकासा बदल होऊन आजच्या शब्दात रूपांतर झालं.)

मग चिकन आणि टर्की (turkey) यांच्या मध्ये असं का नाही झालं ? कारण कि चिकन आणि टर्की हे त्या शोषक नॉर्मन-फ्रेंच वर्गातील लोकांमध्ये जास्त लोकप्रिय नव्हते आणि म्हणून ते स्वस्त सुद्धा होतं, आणि म्हणून ते अँग्लो-सॅक्सन लोकांनासुद्धा खाता यायचं. म्हणून आपण आज इंग्रजी मध्ये ज्या पक्षापासून चिकन मिळते या पक्ष्याला सुद्धा चिकन म्हणतो आणि त्यापासून मिळणाऱ्या मांसालासुद्धा चिकनच म्हणतो ( जसे कि “बकरा-मटण” असे दोन वेगळे शब्द आहेत त्या प्रमाणे नाही).

आता परत गोवंश-हत्या बंदी वर येऊया. “बीफ-बॅन” या मधील बीफ या शब्दामधेच शोषक-शोषिताचा इतिहास असतांना जर आज त्याच इतिहासाची अजून क्रूरपणे पुनरावृत्ती होत असेल तर आपला पुरोगामी महाराष्ट्र किती पुढे चाललाय याचा अंदाज लावता येईल.

आयुष्यभर गुरां-ढोरांचा सांभाळ करणारा, त्यांच्या सोबत शेतात राबणारा, त्यांच्या सोबत अक्षरशः मिळून-मिसळून राहणारा वर्ग वेगळा (इकडे भारतामध्ये त्याला ‘जातच’ म्हणावी लागेल) आणि त्यावर वरवरचा खोटं प्रेम दाखवून आपली सत्ता आणि ताकत वापरून त्या गुरं- ढोरांवर आणि त्या लाचार शेतकऱ्यावर जुलूम करणारा वर्ग वेगळा.

आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये जर कोणत नातं अबाधित जोपासता आल आहे तर ते आहे शोषक-शोषितांच नातं. पुरोगामी महाराष्ट्राची पुरोगामी शोकांतिका.

~~~

गौरव सोमवंशी मुक्त संशोधक, वैज्ञानिक, सामाजिक, तंत्रज्ञान
इत्यादी विषयांचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*