आडवी चिरी

पूजा वसंत ढवळे

साऊ …
परंपरेचा उंबरठा ओलांडून
जेंव्हा तू वेड्यात काढलंस
इथल्या वेद,स्मृती, श्रुतीनां
आणि आजही आमचं
धजावत नाही काळीज,
कल्पना करायला
तेंव्हाच्या त्या
सनातन्यांच्या पोटातील पोटशुळाची…
किती,किती तो प्रखर विरोध होता.
गुलामगिरीची सवय लागलेल्या
गरीब,विधवा, बोडक्या बायकांचं
प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या तुला.
पण तरीही तू भ्याली नाहीस
किंचित तिळभरही..
तुझ्यावर शेण, उष्ट, खरकटं
फेकत गेले ते
दगड, धोंडेही उगारले त्यांनी तुझ्यावर.
पण, तू मात्र ओतत गेलीस
त्यांच्याच मुली, बायकांवर
शिक्षणाचं घमघम दरवळणारं शिक्षणरुपी अत्तर.
जात पातही ‘ न ‘ विचारता
इथल्या पुरुषी सत्तेनं
बळजबरी उपभोगल्या गेलेल्या..
स्त्रियांच्या योण्यातून
टच्चून भरली गेलेली गर्भाशयं
तू मोकळी करत गेलीस
नऊ महिन्यांच्या ओझ्यातून
कधी-कधी वाटतं विरोधकांशीही दंडाच्या जोरवर करू शकली असतीस तू दोन हात…
परंतु,
तुला हिंसक मार्गाने क्रांती करायचीच नव्हती..
तुला पेरायची होती ‘ क्रांतीफुले ‘
अत्यंत शांत, संयमी पणे.
बुद्धांच्या विचारांचा धागा विणून..
त्यातून निर्माण केल्यासही ‘तू ‘
अनेक मुक्ता.
मुक्ततेचा पुरस्कार करणाऱ्या..
साऊ,
तू केला नाहीस कधीही भेदाभेद
मांगनी, म्हारणी, कुणबीन आणि बामणीनीत
जोडीला फातेमाला घेऊन
लावलस वळण आमच्या हाताना..
गिरवायला शिकवलेस अक्षरं
क, ख, ग, घ…
तेंव्हा आपसूकच परंपरेचे जोखड
घरंगळायला लागले,
तुझ्या लेखणीच्या तालावर..
अगं..
सरस्वतीनेही पाणी भरलं,
तू आणि जोतिबांनी
खुल्या केलेल्या हौदावर
तू अंगिकरलास सत्यावर आधारित
विश्वकुटुंबावाद
जोतिबांच्या प्रेरणेने…
बुद्धत्वाच्या नाळेपर्यंत पोहोचणारा..
आई,
अखेरपर्यंत आग्रही राहिलीस तू..
सत्याच्या निष्टेवर, असत्यशी झगडत..
लाथाडलस अनिष्ट वृत्तीनां
आणि चराचरात प्रेम पेरत राहिलीस.
आपुलकीने, ममतत्वाणे प्लेगचे रुग्ण
पाठीवर वाहत राहिलीस, शेवटच्या श्वासापर्यंत..
आणि शेष सोडलास तो
उच्च जीवन मूल्यांचा आदर्श
तुझ्या लेकिबाळीसाठी,
प्रसंगाला भिडण्याचं,
दहा हत्तींच बळ
गोंदवून गेलीस,आमच्या मस्तकात..
म्हणूनच…
तर
‘आम्ही साऱ्या तुझ्या लेकी *मुक्ता’.
मिरवतोय
भाळी आडवी चिरी
तुझ्या विचारांची, संघर्षाची, जिद्दीची आणि धाडसाची…

पूजा वसंत ढवळे

लेखिका नांदेड येथील रहिवासी असून वाणिज्य शाखेच्या स्टुडंट असून कवियित्री आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*