दलितत्व नव्हे मानवत्व अंतिम!

गौरव सोमवंशी

आज काकांशी फोन वर बोलतांना पँथर राजा ढालेंचा विषय निघाला आणि त्यांना थोडे गहिवरुनच आले. ते सांगत होते की ‘जेव्हा पँथर राजा ढाले भाषण द्यायचे तेव्हा प्रत्येक श्रोत्यामागे २ पोलिस असणारच असे समीकरण होते’ हे त्यांनी गर्वाने नमूद केलं.

चळवळीत पूर्णवेळ, संपूर्णपणे बुडालेले असतांना त्यांनी ज्ञान-निर्मितीचे नियंत्रण आपल्या हाती घेऊन स्वतंत्र आवाज प्रस्थापित केला, दलिततत्व हे अंतिम ध्येय नसून माणुस म्हणून पूर्णपणे आपली ठळक ओळख मांडणे हे त्या मुख्य विचारांपैकी एक.

या विचाराला धरून आपल्या पिढीने तो अजून पुढे न्यायला हवा होता, आणि काही जण तसं जिद्दीने करतायंत सुद्धा. पण त्याच वेळी असं कोणीतरी ज्याने जवळपास उभं-सगळं आयुष्य बाहेर जगलेलं आहे आणि ते आता ‘मी दलित म्हणून बाहेर पडतो’ असं तीस-चाळीस वर्ष जुनं झालेलं दलित आत्मचरित्रावरील एक नरेटिव्ह पुढे आणतं आणि मग यासंदर्भात जगभर पुस्तके वाटली जातात, कोणीतरी पाश्चात्य देशांतील सर्वोच्च संस्थांमधून शिक्षण घेऊन परत भारतात येऊन हे सांगत फिरतं की अमेरिकेतसुद्धा मी दलितच आहे आणि संविधान कसं अपुरे आहे वगैरे, तेव्हा असं वाटतं की इतकी वर्षे माझ्या अगोदरच्या पिढीने पुढे आणलेला लढा आपण मागे तर घेऊन नाही जात आहोत ना?

बाबासाहेबच म्हणाले होते ना की पुढे नेता नाही आला तरी चालेल, पण हा लढा मागे येऊ देऊ नका.

अश्यावेळी पँथर राजा ढाले आज आपल्यातून गेले आणि यामुळे एका वैचारिक आणि ज्वलंत नजरेने भविष्याकडे पाहणारे डोळेच आज मिटले आहेत हे जाणवतं.

या पिढीला पुन्हा नव्याने सुरुवात करणे गरजेचे झाले आहे. डिग्री किंवा शीर्षके किंवा कोणती नोकरी, कोणतं कॉलेज यापेक्षा परत एकदा विचारांनीच एकमेकांना पारखण्याची गरज आज आहे, मेरिटचे मिथक बाजूला सारून परत नव्याने ज्ञान-निर्मिती करणे गरजेचे आहे, ज्याची सगळी जबाबदारी ही “प्रत्येकाची” असेल, अगदी प्रत्येकाची.

आपण स्वतःचे माणूसपण जगाला ठासून सांगत, आता जो कोणी शोषक असेल त्यानेच स्वतःची ओळख ‘माणूस’ म्हणवून घेण्याऐवजी इतर काहीही म्हणवुन घ्यावे हे अधोरेखित करायची वेळ आली आहे.

आज सगळी अस्वस्थता आहे मनात, म्हणून नंतर कधी यावर सविस्तर वेगळं लिहून काढेन. आज पँथरला केवळ शेवटचा पण कायमचा मनात प्रतिध्वनी बनून जिवंत राहील, असा एक ‘जय भीम’!!

~~~

गौरव सोमवंशी मुक्त संशोधक, वैज्ञानिक, सामाजिक, तंत्रज्ञान
इत्यादी विषयांचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*