व्ही शांताराम आणि लागूंचा गांधीवादी ‘पिंजरा’ शेवटी शोषित समूहालाच बदनाम करतो

सिद्धांत बारसकर

कशाचाही अतिरेक हा दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करतोच. एखाद्याची नैतिकता दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारी असु शकते. किंवा ती करतेच. पिंजरा पाहताना हे ट्रिगर झालं. त्यातला मास्तर याचाच एक नमुना आहे. मास्तरने सारा गाव आदर्श केला. त्या गावाला सरकारी पुरस्कार मिळाला. तरीही मास्तरला त्याच्या आदर्श नैतिक गावावर भरोसा नव्हता. त्या गावात एकदा तमाशा येतो आणि एका तुच्छ नाची विषयी नैतिक गांधीवादी अश्या मास्तरच्या मनात प्रचंड भिती निर्माण होते. मग मास्तर त्यांना गावात तमाशा करू देत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की मास्तरचा नैतिकतेवर आदर्शवादवर एवढाच विश्वास होता तर त्याने गावात तमाशा ठेवून आपल्या गावकरी स्वरूपी विद्यार्थ्यांची परिक्षा घ्यायची होती, पण तसे न करता परिक्षकास पळवून लावले.

जेव्हा ती चंद्रकलाबाई मास्तरला परनवागी मागायला शाळेत जाते तेव्हा चा सीन आठवा. चंद्रकलाबाई वर्गाच्या समोर मास्तरची विनवणी करत उभी असते. तिच्या मागे न्हावी कुंभार आणि वाणी उभा असतो. ती सर्वांना त्यांचा कामधंदा विचारते. तिघेही आपापला कामधंदा सांगतात. मग चंद्रकलाबाई म्हणते जसा केस कापणे, मडकी बनवणे आणि किराणा विकणे हा धंदा आहे तसा लावणी करणे हा माझा धंदा आहे. (जो तिच्यावर जातीव्यवस्थेने लादला गेला आहे) यावर नैतिक आदर्शवादी मास्तर त्याची तुलना चोरीशी करतो. आणि तिचे व्यवसाय स्वातंत्र्य सुध्दा नाकारतो. मग तमाशा फड गावात न लावता नदीच्या पलीकडे माळावर लावला जातो. आणि मास्तर ची भिती खरी ठरते त्याच्या नैतिक आदर्शवादाचा ढकोसला तुटतो आणि सारा गाव लावणी पाहण्यासाठी जातो. दोन दिवस गेल्यानंतर सकाळसकाळ नैतिक आदर्शवादी मास्तर पाटील आणि गुंड सदृश लोकांना घेऊन पालाकडे जातो. मग त्यांना धमकावतो शेवटी त्याची नैतिकता त्याला हिंसा करण्यास भाग पाडते. पालावर स्त्रिया असतात त्या कोणत्या अवस्थेत असतील हे न पाहता पालात घुसून नासधूस करणे हा जवळपास विनयभंगाचा प्रकार म्हणावा लागेल.

मास्तरच्या नैतिक आदर्शवादाच्या संकल्पनेत लावणी सादर करणे किंवा पाहणे वाईट आहे. पण पुरस्कार मिळवलेले गाव लावणी पाहायला जात तेव्हा मास्तरच्या क्रायटेरियात गाव फेल होते. तरीही तमाशा पुन्हा उभारण्यात येतो. आता मात्र आदर्शवादाची परिक्षा देण्याची वेळ मास्तर वर येते. शेवटी मास्तरच्या येण्यामुळे तिथे आफरातफरी होते त्यात चंद्रकला बाईचा पाय मुरगाळतो. मग मास्तर नैतिक जबाबदारी म्हणून तिला लेप लावायला जातो. तसं मास्तरचा वट पाहता ब्रम्हचारी मास्तर सहज कोणत्याही वैद्यास चंद्रकला बाईंना लेप लावण्यासाठी पाठवू शकत होता. असो. त्यानंतर चंद्रकलाबाई त्यांच्या अदाकारी दाखवतात आणि मास्तरचे बिंग फुटते. आदर्शवाद ब्रम्हचर्य आणि नैतिकतेचा बँड वाजून मास्तर तथाकथित पिंजऱ्यात सापडतो. पुढे मास्तरच्या आयुष्याचं पोतरं होतं.

यावरून शेवटी या मास्तरच्या निर्णयांच अधोगतीच खापर चंद्रकलाबाईच्या डोक्यावर फोडल जातं. चंद्रकलाबाईनी जरी त्याला भूलवलं असलं तरी भूलायचं की नाही ते मास्तरच्या हातात होत. मास्तर दुधखुळा नव्हता. शेवटी मास्तर पुण्यात्मा होतो आणि चंद्रकलाबाईची वाचा जाते म्हणजे त्या पापी ठरतात. आता ह्यात पुरूष्याच्या अधोगतीला त्यापेक्षा एका सवर्ण पुरूषाच्या अधोगतीला एक बहुजन नायकीन जवाबदार ठरवली जाते. व्ही शांताराम-श्रीराम लागू हे बहुतेक गांधीवादी-समाजवादी प्रवृत्तीचे वाटतात. कदाचित असतीलही पण त्यांच्या कलाकृतींवरून तर असेच वाटते. आता गुजरातच उदाहरण घ्या तेथील लोकांनी राज्यभर दारूबंदी केली आहे तरीही लोक दारू प्यायचं सोडत नाहीत. शिवाय येथूनच गांधीची अतिरेकी अहिंसा आली आणि इथेच सर्वात हिंसक दंगल झाली. अण्णा हजारेनी गांधीवादी नैतिकतेच पांघरुण घेऊन संपूर्ण जनतेला देशोधडीला लावलं. राजकारण्यांना शिव्या देणारे आदर्श नैतिक आंदोलक केजरीवाल सुध्दा राजकारणी झाले. खैरलांजीला आदर्शगावाचा पुरस्कार मिळाला का तर म्हणे ते तंटामुक्त वगैरे होते आणि इथेच भारतीय समाज्याच्या तथाकथित नैतिकतेचे उरले सुरले वाभाडे निघाले होते. आपल्याला अभिप्रेत असणारी नैतिकता ही नेहमी पोकळ ठरते. मग ती समाजवादी, हिंदुत्ववादी असो की गांधीवादी. तरही समाज कधीही मास्तरला, अण्णा हजारेला, गुजरातच्या पावन धर्तीला, खैरलांजीला पुरस्कार देणाऱ्या लाडक्या नेत्याला दोषी धरत नाही. आणि तरीही उलट प्रश्न हे नेहमी शोषिताला विचारतात शोषकाला नाहीत.

सिद्धांत बारसकर

लेखक सोलापूर येथील रहिवासी असून B.B.A. चे विद्यार्थी आहेत.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*