अमोल आनंद नलिनी निकाळजे

मानवाला इतर प्राण्यांपेक्षा तल्लख मेंदू लाभल्याने मानवाने स्वतःच्या बुद्धीने अनेक गोष्टी केल्या ज्या इतर प्राण्यांना जमल्या नाहीत. उदा. मानवाने एक सभ्य संस्कृती निर्माण केली, त्या संस्कृतीची विशिष्ट तत्त्वे निर्माण केली. हि तत्त्वे सर्वांवर बंधनकारक केलीच त्या बरोबर आपले वर्चस्व राखण्यासाठी धर्म निर्माण केला. त्यातूनच पुढे धर्मव्यवस्था निर्माण झाली.
जगामध्ये आज जो काही हिंसाचार होत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे धर्म, वंश, लिंग, भाषा यावरून होणारा भेदभाव हा आहे. धर्माचा तर हिंसाचाराशी अत्यंत जवळचा संबंध आहे. गेल्या काही वर्षात घडणाऱ्या दहशतवादी घटना, त्यांचा धर्माशी निकटचा संबंध, त्यात जाणारे निर्दोष लोकांचे बळी हे सर्व पाहता आपणाला धर्म, धर्माच्या नावाने होणारा दहशतवाद आणि त्या माध्यमातून घडणारा हिंसाचाराची सांगड घालता येईल. धार्मिक दहशतवादाच्या ज्या काही घटना घडत आहेत त्यातल्या बहुतांशी घटनांच्या पाठीमागे धर्माचे अपुरे व सोयीस्कर आकलन कारणीभूत आहे.उदाहरण द्यावयाचे झाल्यास ईसिस मुळे जगात होणारा हिंसाचारा पासून भारतात होणारया गूजरात मधील उना मधील गोरक्षक आणि त्यानी धर्माच्या नावाने केलेला जातिय हिंसाचार; एखाद्याच्या खाद्यपध्दती मुळे आपला धर्म भ्रष्ट होत आहे हे विधान अतिशय हास्यास्पद व कमकुवत स्वरुपाचे आहे.काही वेळा गोरक्षा कशा साठी याचे उत्तर उपयुक्त पशू असल्याने ते पुज्यनीय असे मिळते, जे उपयुक्त ते पूज्य असं असेल तर सर्व चराचरात देवत्व आहे या संतानी केलेल्या विधानाला बाधा येत नाही का? त्याच न्यायाने मग शेळी,कोंबडी आणि इतर पशू कसे काय भक्ष्य म्हणून पहाता येईल. जगतमान्य संताच्या विधान आपआपल्या सोयीने आपल्याला पूरक असेल तेव्हा आचरणात आणावे हा ढोंगीपणा नाही का ? विशेषत: विविध धर्मा मधील असणारया वर्चस्ववाद आपण समजू ही शकतो, परंतू हिंदू धर्मातील असून सूध्दा केवळ जात पध्दतीने ठरवून दिलेल्या व्यवसाया आधारित केलेल्या कामामुळे एखाद्यास धर्मरक्षणाच्या, गोरक्षणाच्या नावाने अमानूष प्रकारे मारले जाते हे भारताला प्रगत राष्ट्र मानणारयासाठी अतिशय शरमेची बाब वाटते.जातीय व्यवस्थेनुसार धर्माचे आचरण करणारयानी वंश परंपरागत लादलेली गुलामी स्विकार केलेल्या समाजाला अजून किती दिवस अश्या विषमतेचे चटके सोसावे लागणार आहे आणि यातून अलिप्त राहू पहाणारा परंतू भविष्यात केव्हा तरी त्यांनाही धर्माने निर्माण केलेल्या जातीय व्यवस्थेचे बळी व्हावे लागणार आहे याचेही भान ठेवावे लागेल.
हजारो वर्षांपासुन सर्व प्रकारच्या समाजांमध्ये सोयीस्करपणे स्त्रीयांना दुय्यम काय तर ‘गुलामांसारखी’ वागणूक देत आपण इथपर्यंत आलोत. कालही तेच होतं आणि आजही तेच आहे. आधी, विष्णूचे पाय दाबताना लक्ष्मी दिसत होती, अग्निपरीक्षा देताना सीता दिसत होती. आजच्या आधुनिक जगात, पायलट ऐटीत विमान चालवतो आणि एयर होस्टेस चहा-पाणी देताना दिसतात. आजही घरची स्त्री तिच्या स्वतःच्या घरात सर्वात जास्त राबते. 18-18 तास अविरत काम करते. तरीही शेवटी १०० रुपयांच्या खर्चासाठी तिला मोकळीक नाहीये. स्त्रि नोकरी करणारी असो अथवा कुंटूंब संभाळणारी तिला तीचे निर्णय घेण्याची अधिकार नाही आहे शिक्षण , व्यवहायीक जिवनात जोडीदार निवडी पर्यंत सर्व निर्णय हे पुरुषसत्ताक पध्दतीनेच होत असते हि परिस्थिती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. जाहिररीत्या कितीही आमच्या ईथे समानता आहे असे भासविणारया कुंटूंबा मध्ये ही जेव्हा मूलीच्या जोडीदार निवडीचा विषय येतो तेव्हा विशिष्ट धर्मा व्यतिरीक्त, जाती व्यतिरिक्त ,भाषे व्यतिरिक्त जोडीदार निवड असे उपदेश केले जाते आणि त्याचे पालन होत आहे का हे कटाक्षाने पाहीले जाते आणि हि बंधन झूगारुन देणारया साठी ओनर किलिंग हा पर्याय आहेच . देशात अतेरेकी कारवाई मूळे मृत्यूमूखी पडणारया पेक्षा जास्त लोक दरवर्षाला जातीय व्यवस्थेमूळे होणारया हिंसाचारामूळे मरत आहे हे सत्य नाकारता येणार नाही.
भारतीय घटनेच्या प्रास्तविक मध्ये ‘धर्मनिरपेक्ष’, ‘न्याय’, ‘समानता’, ‘बंधुता’ या शब्दांचे वाचन करुन अथवा त्याचे जाहिर युक्तिवादात उदाहरण देउन काहीच साध्य होणार नाही आहे. परंतु, आपण सर्व भारतीयांनी या शब्दांचा संविधानाला अभिप्रेत असलेला अर्थ समजावून, त्याला अंगीकृत करून घेण्याचा प्रयत्न केल्यास हा एक नेहमीसारखा सोपस्कार,सामाजिक भान जपण्यासाठी केलेला प्रपंच न ठरता त्यातून बरंच काही साध्य होऊ शकेल.
अमोल आनंद नलिनी निकाळजे
लेखक युवा पॉवर मासिकाचे संपादक आहेत

Wonderful article . Hats off