गेल यांचे कार्य व लिखाण सदैव समतावादी, आंबेडकरवादी चळवळीला प्रेरणा देत राहील

प्रशांत पुरुषोत्तम भवरे

प्रख्यात विचारवंत, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ओमवेट यांचे दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांच्या राहते घरी, कासेगाव, सांगली महाराष्ट्र येथे निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या.
७० च्या दशकात आपल्या विद्यार्थी दशेत अमेरिकेवरून भारतात आलेल्या व नंतर इथेच स्थायी झालेल्या गेल यांनी भारतीय समाज स्वरूप, रचना व स्थिती याचा फार गहन अभ्यास केला. इथल्या सामाजिक असमतेचे मूळ ही जातीप्रथा असल्याचे त्यांना कळले , त्याचा सखोल अभ्यास करून या असमतेचा नायनाट करून समाजात समता प्रस्थापित करण्याकरिता गेल जीवनभर झटल्या.

या धरणीवर जन्मलेल्या त्या सर्व विद्वान समतेच्या पुढाऱ्यांना त्यांनी आपल्या लिखाणात उतरविले. एरवी समाजापुढे असलेल्या विशिष्ट जाती वर्गाचा असामाजिक, असमतेचा ब्राह्मणवादी इतिहासाला लाथ मारून त्यांनी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ चा मार्ग सांगणाऱ्या तथागत बुद्धापासून समतेच्या इतिहासाची मांडणी करत आणली. असमानतेचा पुरस्कार करणाऱ्या व ती टिकून ठेवणाऱ्या ब्राह्मणवादी विचारसरणीवर त्यांनी सडकून टीका केली. मूठभर विशिष्ट जातीच्या लोकांनी देशभर लोकांना शूद्र-अतिशूद्र बनवून यातनेच्या खाईत ढकलणाऱ्या या जातीप्रथेचा गेल यांनी धिक्कार केला. त्यांच्या लेखणीत बुद्ध, फुले, कबीर उतरले. तुकोबांच्या अभंगांना आपले शस्त्र बनवून गेल यांनी मानव मुक्तीच्या संग्रामात प्रतिगाम्याना धूळ चारली. प्रतिक्रांतीच्या आधी बुद्धाने केलेल्या क्रांतीचा, ज्याने समस्त मानवजातीच्या उद्धराचा मार्ग दाखविला, गेल यांनी त्या बुद्ध धम्माचा या देशातील प्रवास आपल्या लिखाणात रेखाटला आहे.
सुलभ, सोपी, सरळ पण स्पष्ट अशी त्यांची लेखनी. विषयाचा अथांग अभ्यास व त्या नंतर आलेली त्यांची प्रभावी मांडणी हे त्यांच्या लिखाणाचे विशेष. विस्तृत ग्रंथसंपदा, त्यातून विविध विषयाचे तर्कसंगत विश्लेषण गेल आपल्यासाठी व आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ठेवून गेल्या आहेत.

गेल यांनी सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध, शोषणविरुद्ध बंड पुकारले. मग ते स्त्रीमुक्ती चळवळीतील त्यांचे अफाट योगदान असो की, कष्टकरी शेतकरी-कामगार यांच्या प्रश्नांचा मुद्दा असो गेल नेहमी आपल्या लिखाणातून तसेच चळवळीतील कार्यकर्ता या भूमिकेतून त्यांच्या न्याय हककासाठी लढल्या.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मानवमुक्ती व कल्याणाच्या पथाचा गेल यांनी पुरस्कार केला. बाबासाहेबांच्या अफाट कार्याला समजून, त्यांच्या सामाजिक व वैचारिक चळवळीला पुढे नेण्यासाठी गेल यांनी आपले प्रामाणिक योगदान दिले आहे.
गेल यांनी त्यांच्या जीवनातून व क्रांतिकारी लेखनातून आपल्या सर्वांसमोर मांडले की एक असा समाज की जिथे शोषण नाही, अन्याय नाही, मानव जातीत कसलाही भेदभाव नाही, जिथे समता, बंधुभाव आणि मैत्री नांदते अशा समाजाची, अशा ‘बेगमपुरा’ ची निर्मिती शक्य आहे.

गेल यांचे कार्य व लिखाण सदैव समतावादी, आंबेडकरवादी चळवळीला प्रेरणा देत राहील.

प्रशांत पुरुषोत्तम भवरे

लेखक यवतमाळ येथील रहिवासी असून LLB च्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*