वैचारिक अभिवादनातून शैक्षणिक क्रांती !

आम्ही ‘एक वही एक पेन’ अभियान दरवर्षी आपल्यासमोर घेऊन येतो. याहीवर्षी आम्ही प्रचंड ऊर्जा घेऊन हे क्रांतिकारी अभियान राबवणार आहोत. या वर्षी आम्ही १२+ इतक्या शाळांपर्यंत वहीपेन, शैक्षणिक साहित्य पोचवू शकलो. आपल्या सर्वांची डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांवर असलेली निष्ठा आणि आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच हे शक्य झाले आहे. आपल्याशिवाय हे अभियान अपूर्ण आहे.

गेल्यावर्षी आम्ही औरंगाबाद जिल्ह्यात ७-८ शाळांपर्यंतच पोहचू शकलो. महाराष्ट्रातील इतर फॅम छावणी सदस्य त्यांचा लेखाजोखा मांडतीलच. यावर्षी आपण दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही १२+ शाळामंध्ये वहीपेन पोचवू शकलो. खरतरं गेल्या वर्षी फक्त वहीपेन आम्हाला प्राप्त झाले होते. यावर्षी आम्हाला कंपास बाॅक्स, दप्तर, स्केच पेन बाॅक्स इतर साहित्य प्राप्त झाले. ही आमच्यासाठी नवीनच गोष्ट होती. अभियानाची व्याप्ती वाढल्याचे हे संकेत आहेत.

एक अनुभव सांगावा वाटतो. आम्ही तीन वर्षापासून हे अभियान सातत्याने चालवले आहे. हे या अभियानाचे चौथे वर्ष आहे. गेल्या काही वर्षात या अभियानामुळे आमची जडणघडण होत गेली आहे. यावर्षी २०१९-२०२० हे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर आम्ही वहीपेन वाटप सुरु केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशाला, पालोद वस्ती ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथे वहीपेन वाटप करताना आॅगस्ट महिना उजाडला. जूनपासून दोन महिने उशिरा आम्ही त्या शाळेत पोचलो. आम्ही ज्या दिवशी शाळेत वहीपेन घेऊन पोचलो तो त्या शाळेचा पहिला शैक्षणिक दिवस होता. विद्यार्थ्यांचे पालक आमच्याकडे येऊन म्हणाले की जर वहीपेन मिळाले नसते तर आम्ही अजून दोन महिने आमच्या मुलांना शाळेत पाठवू शकलो नसतो. हा फार विचलित करणारा अनुभव होता. तिथून वापस येताना आम्ही सर्वांनी या अभियानाला कधीच थांबवायचे नाही हे मनाशी पक्के ठरवले.

अनेकांसाठी हे अभियान विशिष्ट समूहासाठी, विशिष्ट लोकांना उद्देशून, विशिष्ट लोकांना आकर्षित करण्यासाठी चालवलेले अभियान वाटू शकते. परंतु, तसे नाहीये. आम्ही कधीही ‘शिक्षण’ हा विषय हाताळताना फक्त ‘विद्यार्थी’ हा केंद्रबिंदू मानला आहे. एखाद्या शाळेत वहीपेन वाटताना विशिष्ट मापदंड न ठेवता सर्व विद्यार्थ्यांना सरसकट सर्वांपर्यंत मदत पोचवली आहे. तुमच्यासाठी ‘एक वही एक पेन’ हे अभियानापुरते मर्यादित असेल पण आमच्यासाठी ही क्रांतीकारी चळवळ आहे.

आता हे अभियान फोटोसेशन, प्रसिध्दी यांच्या फार पुढे निघून गेले आहे. सरकारी शाळांचे वाढते खाजगीकरण, शिक्षणाचे झालेले बाजारीकरण पाहता या कृतीकार्यक्रमाची व्याप्ती फार मोठी होणे गरजेचे आहे.

म्हणून आम्ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण राहत असलेल्या जिल्हा-तालुका-गावपातळीवर ‘एक वही एक पेन’ अभियान राबवणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातील नवीन पिढी अत्यंत चांगल्या पध्दतीने सुशिक्षित होणार आहे. अभियानाचे सदस्य बनण्यासाठी अभियानाची पूर्ण माहिती, आचारसंहिता आणि नियोजन प्रक्रियामध्ये सहभागी होण्यासाठी आपण संपर्क कराल हाच संकल्प आम्ही बाळगतो.

~~~

विनित,
फेस आॅफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम), महाराष्ट्र

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*