लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतील माणसं..

“माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली” ही आण्णा भाऊंची छ्क्कड माहीत नसलेला माणूस दुर्मिळच! पण मीही त्यापैकी एक होते. अगदी उच्च शिक्षण घेईपर्यंत.रणजीत कांबळे या शाहिरकडून ही छक्कड ऐकली. त्या क्षणापासून आण्णा भाऊ साठेना भेटण्याचा चंगच बांधला. अर्थात ही माणसं त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातून भेटतात. पण एक पाय संसारात आणि एक पाय ज्ञानसागरात असलेल्या महिलेला अवघडच होत. पण ग्रंथालयातून पुस्तक शोधण्याचा माझा प्रयत्न चालूच होता, तो असफल ठरला. काही माणसं असतात जी वाचनाच्या सागरात अखंड तरंगत असतात (कारण मला वाचनात बुडालेली भेटलीच नाहीत). अशाच ज्ञानसागरतील माणसाने अर्थात वकिलसाहेब सुजीत निकाळजे यांनी  मला हा आण्णा भाऊंचा खजिना मीळवून दिला. ही सर्व प्रस्तावना याचसाठी महत्त्वाची वाटते कारण माझ्या समाजातील असंख्य सुशिक्षित महिला या खजिन्यापर्यंत पोहचल्याच नाहीत. कारण आपला सहवास हा उच्चशिक्षित माणसांसोबत नसतोच मुळात. या वकिलांनी मला चैत्याभूमीवरील BARTI आणि महाराष्ट्र शासनाकडून विकल्या जाणार्‍या या अमूल्य पुस्तकांबद्दल माहिती दिली आणि पुस्तक खरेदी करण्याबद्दल प्रोत्साहनही दिल. हा जो आयुष्याला वाचनाचा मुलामा देण्याचं जे काम या वकिलाने केल ते दुर्मिळ आहे. पुस्तक घेण्यास प्रोत्साहन देणारे कमीच असतात. निदान माझ्या चाकोरीबद्ध आयुष्यात मी तरी पाहिलं नाही. त्यामुळे संगत गुण म्हणतात ते अगदी खरं  आहे. ही झाली साठे यांच्या पर्यन्त पोहचण्याची पार्श्वभूमी.

आण्णा भाऊंची माणसं म्हणजे निश्चितच करारी बाणा आहेत. मला जितकी समजली तितकचं मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न. फकिरा तर सर्वांनाच भावला. आण्णा भाऊ साठे म्हटलं की फकिराच नाव सर्वांच्या तोंडी मी ऐकलेले  आहे पण माझ्या  मनाला चटका लावते ती त्याची आई राधा आणि बाप  राणोजी. कमरेला आपल्या  दोन पोरांसाठी (फकिरा आणि सादु), पेढ्याची पिशवी बांधून आपल्या गावात जत्रा भरविण्यासाठी जोगनि पळवून आणली. कमरेला पेढ्यांची पिशवी पोरांसाठी बांधणारा बाप आणि जोगणी पळवून आणणारा वीरगडी.पोरांसाठी मृदु बाप आणि गावासाठी निधड्या छातीने मरणाला आव्हान देणारा  असा फकिराचा बाप होता॰ (ज्या गावाची जोगनी त्या गावाची जत्रा अशी रीत) त्यासाठी जीव गेला तरी तमा बाळगायची नाही. आपल्या गावात जत्रा भरावी म्हणून राणोजीने आपला जीव धोक्यात घालून शिगावची जोगणी पळवून आणली. आपल्या गावाची जोगणी पळवली म्हणून शिगावच्या लोकांनी राणोजीच शिर वाटेगावच्या हद्दीत येऊन छाटल. पण जोगणी वाटेगावची झाली. गावासाठी एकट्या राणोजीने शिगावची जोगणी पळवून आणली. आणि त्याचमुळे वाटेगावात जत्रा भरू लागली.  गावासाठी फकिराच्या बापान जीव दिला. मग फकिरा बापासारखा का होऊ नये? आई राधाची जीवाला चटका लावणारी माया, फकीरासाठी हरघडी डोळ्याला येणारं तिच मायेनं  भरलेलं कोमल हृदय दर्शवत. असा बाप आणि आई हीच खरी फकिराची दौलत होती. राणोजीच आणि राधेच प्रतिबिंब म्हणजे सर्वांचा फकिरा. 

स्त्री जीवाला जीव देते, आकाशाएवढी अथांग माया करते पण तिच्यावर झालेल्या अन्यायाला ती सडेतोड उत्तरही देते. परंतु हा समाज त्या उत्तराला पचवू शकत नाही आण्णा भाऊंची लेखणीतील ‘आवडी’ प्रत्येकाच्या हृदयात घर करणारी आहे. आवडीचं माहेर घरातलं अस्तित्व  एखाद्या सर्वसामान्य घरातील मुलीला प्रचंड हेवा वाटेल असच असत. नावाप्रमाणेचं ती सर्वांची आवडती असते. समाजाच्या रिवाजाप्रमाणे चालरीत सांभाळून लग्न होत. तिला लग्नानंतर कळतं की तिच सौभाग्य हे तिला सांभाळणार नसून तिच्यासाठी घातक आहे. आता तिला जीव मुठीत घेऊन येणारी प्रत्येक रात्र आणि दिवस काढायचा आहे. तिच्या सर्व भावभावना मातीमोल झालेल्या पाहून तिचा जीव आक्रोश करू लागतो. अशा पेचप्रसंगात असताना स्त्रीसुलभ भावनांना सुखावणारा धनाजी रामोशी तिला आवडतो. आवडी त्याच्यासोबत संसार थाटते. जनमताप्रमाणे पाटलाची सून रामोश्याचं  घर घुसते आणि मग होतो प्रलय! फक्त सूडाग्नीचा! घर घुसल्यामुळे समाज नावचं ठेवतो. आवडीचा भाऊ कपटाने तिचा खून करतो यात तिची बहीण त्याला साथ देते. आवडीच्या भावाला चौदा वर्षाची शिक्षा होते.  चौदा वर्ष शिक्षा भोगून आल्यानंतर नावाजलेला पहिलवान पण बहिणीचा खून केला म्हणून गावात आणि घरातही थारा नाही. बहीणीवर जिवापाड प्रेम करूनही शेवटी रामोश्यासोबत पळून गेली म्हणून तिचा खून केला. आवडीचा नवरा धनाजी रामोशी यानेही चौदा वर्ष वाट पाहून, शिक्षा भोगून आलेल्या तिच्या भावाचा खून केला. मग गाव म्हणू लागलं प्रेम कराव तर असं, वैर कराव तर असं आणि मराव तर असं.  आवडीचा खून करून चौदा वर्ष शिक्षा भोगूनही तिच्या भावाच्या मनातील सल  त्याला भयमुक्त करीत नव्हती. सुडाने पेटलेला धनाजी त्याला मारूनच आवडीच्या खुनाचा बदला घेणार होता. आवडीचा भाऊही पहिलवान होता पण केलेल्या खुनाचा त्याला पश्चाताप झाला होता. पश्चातपाच्या अग्नीतच तो पराभूत झाला होता. धनाजीच्या  एका वारातच तो गतप्राण झाला.

या तिघांच्या शोकांतिकेला गावानं दाद दिली पण चावडीत दाद मागताना जिवंतपणी धनाजी आणि आवडीला मरणाच्या खाईत सोडलं. गावाने या वैराच कौतुक केल, प्रेमाचही केल पण मरणोत्तर, हीच खरी आज ही, शोकांतिकाच आहे हेच दुर्दैव. आजही आवडी बळी जातात पण तिच्या भावासारखे पश्चातपाच्या आगीत होरपळणारे दिसतच नाहीत. भाऊंची माणसे निराळीच आहेत राग यावा, चीड यावी अशी खूप कमी माणसं मला भेटली.

वारणेच्या खोर्‍यात, चित्रा, संघर्ष, वैजयंता, आग, माकडीचा माळ, आघात, या सर्व कादंबर्‍यामधील माणसं आपापल्या जीवन संघर्षाने मनात घर करतात. चित्रा तिची बहीण सोना सोबत मुंबईत राहायला येते.पण सोना या मुंबईत वेश्या व्यवसाय करीत असते. गरिबीने तिला हा व्यवसाय करायला भाग पाडलेले असतं. तिच्या आयुष्यात आलेली क्रूरता चीड आणते. ज्याला नवरा समजून  आपलं शरीर तिनं ज्याच्या स्वाधीन केलेलं असतं तोच तिला वेश्या व्यवसायात आणणारा पहिला पुरुष असतो. आजाणतेपणी या विषण्ण जाळ्यात ती अडकते. अचानक आणि परिस्थितीने हतबल असलेली चित्रा जेव्हा मुंबईत बहीणीकडे येते तेव्हापासून दोघी बहीणींचा संघर्ष सुरू होतो.  तो संघर्ष या व्यवसायापासून चित्राला दूर ठेवण्याचा आणि तिची अब्रू जपण्याचा. अखेर या मुंबईच्या मायानगरीत ही चित्रा आपली अब्रू सांभाळून एका चांगल्या पुरुषाची पत्नी होते. एका स्त्रीने स्वत:ची अब्रू जपण, वखवखलेल्या नजरेपासून आणि वासनेने बरबटलेल्या माणसापासून, याची भयंकर जाणीव या चित्राने करून दिली.

‘वैजयंता’, तमाशात नाचणार्‍या आईच्या पोटी जन्म, बापाच नाव माहीत नाही म्हणून हा समाज आपल्या पोरीचं लग्न होऊ देणार नाही अशी तिच्या आईला सतत रुखरुख.  पण उमा सोबत लग्न होईल अशी तिच्या आईला आशा असते, कारण संसार थाटण्यापूर्वी उमाचे आई-बाप ही तमासगीरच असतात. परंतु बिनबापाची पोर म्हणून ते नकार देतात. एकाच आगीत होरपळून सुद्धा एकमेकांचा दुस्वास  करणे हे काही नवीन नाही.  वैजयंता आणि उमा यांचाही एकमेकांवर जीव असतो. स्वत:च्या प्रेमाला आणि तमाशा या कलेला स्वाभिमानाच्या शिखरावर पोहचविण्याच काम या दोघांनीही केलं. तामसगीर हे गरीब असतात. प्रसंगी पैशाने माजलेले नराधम या तमाशातील स्त्रीयांचे आणि त्यांच्या अस्तित्वाचे धिंडवडे उडवितात हे किशोर शांताबाई काळे यांच्या ‘कोल्हाट्याच पोर’ या पुस्तकात वाचलं होत. परंतु ताठ मानेने आणि अब्रूदारपणे तमाशा या कलेला उदात्त करता येते हे भाऊंच्या वैजयंताने दाखऊन दिले. आणि तमाशा या कलेविषयी पहिल्यांदाच माझ्या मनात आदर निर्माण झाला. सलाम या लोकशाहीराच्या तमासगीरांना!

भटक्या जमाती म्हटलं की पालातील माणसं आणि मनोरंजन करणारी माणसं इतकच मला माहीत होत. विमल मोरेंच्या ‘पालातील माणसं’ या पुस्तकातून त्यांच्या कठोर रूढी परंपरा कळल्या होत्या. स्त्रीयांची होणारी अवहेलना प्रकर्षाने जाणवली होती. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा मांनववंशशास्त्रीय दृष्टीकोणातून  अभ्यास करताना भटक्या जमातींचाही अभ्यास करण्याचा योग आला होता. पण अण्णा भाऊंची  भटक्या जमातीतील माणसं अवलिया आहेत. आणि म्हणूनच मी केलेल्या तुटपुंज्या अभ्यासाचा मला हेवाच वाटला असो.

काळगावच्या माळावरची ही माणसं, यंकू माकडवाला,बाळया डोंबारी, पार्‍या डवरी, गोसावी, नंदिवाले, सापगारुडी, दरवेशी, अशा कित्येक जमातीतील होती. यातीलच गोसाव्यांनी गावातील देवळाजवळील झाडीतील माकड धरून आणून शिजवून खाल्ले. गावकर्‍यांनी पाटलाकडे या सर्व भिकार्‍यांना माळावरून घालवून देण्याची विनंती केली. पाटलाने गोसाव्याना माकड खाण्याचा जाब विचारला. हनुमान देव आहे, माकड देवासमान आहे मग तुम्ही देवालाच मारून खाता ?  एका वृद्ध गोसाव्याने सांगितले की ‘पोट’ हा आमचा सगळ्यात मोठा देव आहे. त्याने आम्हाला ही माकड खाण्याची परवानगी दिली. पोटासमोर कुठलाच देव दिसत नाही.

यंकू माकडवाल्याच गंग्या नावाचं माकड जसं यंकू शिकविल तसं करायचं आणि आपल्या धण्याला जगवायच. यंकुला दुर्गा नावाची पोरगी असते. आई वारल्यामुळे यंकुच तिची आई आणि बाप दोन्ही असतो. सुगी लागलं तसं गावोगावी फिरून पोत भरीत हा यंकू, आपली दुर्गा, गंग्या, आणि रंगी माकडीन यांना घेऊन फिरत असतो. आई नसलेली पोर आणि गावोगावी भटकंती अशा परिस्थितीत  पोरीला सांभाळण्याची कसरत या बापान केली. शेवटी पोरीच्या लग्नादिवशीच तिला पळवून न्यायला आलेल्या गुंडासोबत लढता लढता गतप्राण झाला. आपल्या धन्याचं प्रेत पाहून गंग्या माकडानं झाडाच्या शेंड्यावरून उडी मारून जीव दिला. हे पाहून रंगी माकडीन वेड्यासारखी करू लागली. क्षणात तिनेही स्वत: डोक आपटून जीव दिला. आणि काळगावचा माळ  माकडीचा माळ म्हणून ओळखला जाऊ लागला. स्थिर आयुष्य जगणार्‍या आणि मध्यमवर्गीय नोकरदारांच्या आयुष्यात प्राण्याला थाराच नसतो. मी मुंबईत पाळीव कुत्रा पाहते  तोही ऐट मिरवणारयांच्याच हातात! गंग्या माकडासारखा जीवाला जीव देणारा अवलिया प्राणी मात्र यंकू माकडवाल्या अवलियालाच मिळणार. आता जीवाला जीव देणारी माणसं तर मिळतच नाहीत मग प्राणी कुठून मिळणार.

शाम, रोझी, दाभाडे,शिला, अनंत, ही आणि अशी सर्व माणसं म्हणजे प्रेम आणि आपुलकीचा निर्मळ  झरा आहेत. आयुष्यात येणार्‍या कठीण प्रसंगांना धिराने तोंड देत जगायचं पण तिरस्कार कुणाचाच करायचा नाही, अगदी जगण्याचा आणि वैरी असला तरी त्याचाही! कारण यातला वैरी सुद्धा जिवंतपणी पश्चातापाने होरपळतो आणि स्वत: च्या चुकीची जाणीव करून घेतो. ही जाणीव असणे माणूस असण्याच लक्षण आहे. आज समाजात माणसाला आपण चुकलोय असं वाटतच नाही. चूक सुधारून, दुसर्‍याला प्रेम देऊन, जगण्याचा आनंद घेणारे दिसतही नाहीत. म्हणूनच अण्णा आणि त्यांची माणसे त्या गरिबीतही सुंदर आणि उदात्त होती आणि राहतील.    

~~~

मयुरी अशोक आढाव-करंडे यांनी एमएसडब्ल्यू केले आहे, तसेच त्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून Mphil-PhD स्कॉलर आहेत. आंबेडकरी बुद्ध-धम्माबद्दल बौद्ध महिलांचे दृष्टीकोन समजून घेणे हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*