‘मूकनायक’ म्हणजे आंबेडकरी पत्रकारितेची सुरुवात!

यशवंत भंडारे

छपाईच्या तंत्रज्ञानाच्या शोधाने जगभर प्रबोधनाच्या युगाचा प्रारंभ झाला. हा शोध क्रांतीकारक ठरला. इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात मुद्रण कलेचा उगम चीन मध्ये झाल्याचं ग्रहीत धरलं तरी खऱ्या अर्थानं विकसित मुद्रण केलेचा विकास होण्यास इ.स. 1450 हे वर्षे उजाडावे लागलं. त्याचं श्रेय गूटेनबेर्क यांच्याकडे जातं. भारतामध्ये मुद्रण तंत्र प्रथम इ.स. 1556 मध्ये माहीत झालं.यावर्षी गोव्यात पोर्तुगीज लोकांनी एक मुद्रणालय सुरु केलं. परंतु त्यावर छापलेल्या पहिल्या पुस्तकाची भाषा आणि लिपी मात्र परकीय होती. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक छापखाना उभारला होता परंतु त्यांना तो सुरु करणं शक्य झालं नाही, त्यांनी तो 1674 मध्ये गुजरातमधील भीमजी पारेख या व्यापाऱ्यास विकली. तथापि, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मुद्रणची सुरुवात 1812 मध्ये झाली. त्यावर्षी अमेरिकन मिशनने मुंबईत मुद्रणालय सुरु केले. त्यांनी रामपूर येथून देवनागरी लिपीचे काही खिळेही त्यासाठी आणले होते. त्यावर 1817 मध्ये छापलेले एक पुस्तक उपलब्ध आहे.

मुद्रण तंत्राची सुरुवात झाल्यानंतर गेल्या पाच शतकापासून जास्त काळ या तंत्रानं सुसस्कृंत समाजावर एक प्रकारे प्रभूत्व ठेवलं आहे. आणि ज्ञानाचा ठेवा जतन करुन ज्ञान प्रसाराचे काम कौशल्यानं केलं आहे. साधारणपणे ज्या काळात मोठे वैज्ञानिक शोध जगात लागत होते. त्याच काळात मुद्रण तंत्राचा शोध लागल्यानं ज्ञानाच्या प्रसाराला फार मोठी मदत झाली. शिवाय समाजातील आर्थिक किंवा सैध्दांतिक दृष्टया सांस्कृतिक संगमाला चालना मिळाली. त्यामुळं जगातील ज्ञान पसरण्याला मुद्रणाच्या शेाधामुळं फार मोठी चालना मिळाली. म्हणून मुद्रणाच्या शोधाला ज्ञान प्रसाराच्या दृष्टीनं ऐतिहासिक महत्व आहे. मुद्रणामुळं ज्ञानाचा साठा होण्यास आणि त्याची अविरत वाढ होण्यास मदत झाली. प्रत्येक पुढील युगाला मागच्या ज्ञानाचा ठेवा मिळाला आणि त्या त्या काळातील माणसांनी पूर्वीच्या ज्ञानांचा उपयोग करुन त्यात नवीन भर घातली. परंतु भारतात मात्र हे सर्व ज्ञान कुलूपबंद होतं. केवळ काही लोकांपुरतं मर्यादीत होतं. हे कुलूपं तोडण्याचं काम ब्रिटिशांच्या आगमनानंतर झालं. त्यामुळे अनेक वर्गाला त्यातही शुद्र-अतिशुद्रांसाठी अशा ज्ञानाच्या मंदिराचं कुलूपं तोडल्यानं त्या मंदिरांची दारं थोडी खिळ खिळी झाली. त्या ज्ञानरुपी मंदिरात सर्व प्रथम अशा उपेक्षितांना महात्मा जोतिबा फुले यांनी सर्व प्रथम प्रवेश दिला. त्यामुळं या ज्ञान मंदिरातील ज्ञानरुपी प्रकाशानं हा समाज थोडासा प्रकाशमान होऊ शकला. ब्रिटिशांच्या धोरणांचाही त्यास हातभार लागला.समाज सुधारकांनी सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून बळ देण्याचं काम केलं.अर्थात एकोनिसाव्या शतकात भारतासह महाराष्ट्रात प्रबोधनाला सुरुवात झाली.

ब्रिटिशांच्या भारत आगमनानंतर त्यांनी सुरु केलेल्या सर्व प्रकारच्या सुधारणांमुळं आधुनिक वैचारिक क्रांतीची बीजं देशात रुजण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणजे विवेकवादाचे तेजस्वी हत्यार परजून समाजसुधारकांनी समाजाला नवे परिमाण, नवा प्रत्यय आणि नवी गतीमानता देण्याचे प्रभावी अन् जोरकस प्रयत्न महाराष्ट्रात केले. प्रबोधनपर्वाचे नियंते म्हणून एकोणिसाव्या शतकातील समाजचिंतक आणि समाजसुधारक यांना संपूर्ण श्रेय द्यावे लागेल. प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थेची पुर्नमांडणी करणे, जागरण करणे, परिवर्तनास मानवी मन तयार करणे आणि मानवाला सर्वांगीण प्रतिष्ठा मिळवून देण्याचा विचार समाजमनावर बिंबवण्याचं काम मराठी वृत्तपत्रसृष्टीनं केलं. कारण, ‘‘ ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षाच्या काळात येथे समाजरचनेची जी तत्वे मान्य आणि रुढ झाली होती. त्यातील जवळजवळ प्रत्येक तत्व मानवी प्रतिष्ठेला घातकं असेच होते. कलियुगाची कल्पना, नियतीवाद, संसाराची उपेक्षा, तर्काची अवहेलना, जन्मनिष्ठ उच्चनीचता , शब्द प्रामाण्य ही तत्वे व्यक्तीच्या स्वत्वाची पायमल्ली करणारी होती. येथील आचार धर्म, त्यांचे सर्व कर्म कांड, त्यांच्याच आधाराने उभारलेले होते. असल्या धर्माच्या अनुयायांमध्ये मानवी कर्तृत्वाचा निर्देशांक असा कोणताही गुण निर्माण होणे शक्य नव्हते, ’’ असे मत डॉ. पु. ग. सहस्त्रबुध्दे यांच्या ‘केसरीची त्रिमूर्ती ’ या ग्रंथात नोंदवले आहे. या मतावरुन तत्कालीन समाज जीवनाची प्रचिती येते. त्यामुळे वृत्तपत्र हे आधुनिक विकासाचे आणि लोक शिक्षणाचे प्रभावी साधन आहे, हे ओळखून त्याचा वापर समाज सुधारकांनी मोठ्या नियोजकतेने केला.

महाराष्ट्राने नेहमीच देशाचं वैचारिक आणि प्रबोधनाचं नेतृत्व केलं आहे. त्यातही आधुनिक माध्यमांचा अर्थात वृत्तपत्राचा-नियतकालिकांचा त्यासाठी चपलखपणे वापर करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर राहिला. वृत्तपत्रांच्या माध्यमातून संपूर्ण देशातील समाजमनावर परिणाम करु शकणारे प्रबोधक, विचारवंत, समाजसुधारक आणि संपादक महाराष्ट्राच्या मातीतूनच निर्माण झाले आहेत. त्यांच्या वैचारिक वारसाचं स्फुल्लिंग घेऊन नवसमाज निर्मितीचं काम सुमारे दीडशे ते पावने दोनशे वर्षांपासून सुरु झालं आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातही नवविचार आणि नवीदिशा देण्याचं काम या मंडळींनी केलं आहे. महाराष्ट्राच्या नि देशाच्या सर्वांगिन प्रगतिचं आणि वृत्तपत्रांचं घनिष्ट असं नातं राहिलं आहे. मराठी वृत्तपत्रांनी समाज सुधारणा,राष्ट्रउभारणी,राष्ट्राची प्रगति,समाजप्रबोधन आणि समाज जागृतीचा जणू विडाच उचलेला असल्यानं भारताच्या नव्या जडणघडणीच बहुतांश श्रेय मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना , पत्रकारांना नक्कीच द्यावं लागेल.

भारतातील पहिलं वृत्तपत्र 18 जानेवारी 1780 रोजी जेम्स ऑगस्ट हिकी या ब्रिटिश ग्रहस्थानं “बंगॉल गॅजेट’’ या नावानं सुरु केलं. विशेष म्हणजे हिकी यांनी आपलं वृत्तपत्र “सर्वांसाठी खुलं असेल आणि ते कुठल्याही दडपणापासून मुक्त असेल.” असं जाहिर केलं. त्याच्या अधिक भारतीय होण्याच्या कारणांमुळं ब्रिटिशांनी त्याला हे वृत्तपत्र बंद करण्यास भाग पाडलं. तसं पाहीलं तर भारतीय भाषेतील पहिलं वृत्तपत्रही समाजसुधारकानचं सुरु केलं. ते म्हणजे राजाराम मोहन राय यांनी . त्यांनी 1820 मध्ये “संवाद कौमुदी ” या नावाचं वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केलं. तर मराठीतील पहिलं दर्पण नावाचं वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलं. जांभेकर यांनी 188 वर्षापूर्वी दर्पण सुरु करतांना पहिल्या अंकात त्यामागची मांडलेली भूमिका खऱ्या अर्थानं प्रबोधन, माहिती, शिक्षण आणि मनोरंजन या वृत्तपत्राच्या मूळ हेतूशी समरस होणारी आहे. “ नव्या ज्ञानाचा, पाश्चात्य विद्यांचा लोकांना परिचय व्हावा, त्याचा अभ्यास व्हावा आणि त्याव्दारे देशाची समृध्दी व्हावी, लोकांचे कल्याण साधावे” असे सांगून जांभेकरांनी धर्म आणि समाजसुधारणांसाठी पोषक अशीच भूमिका घेतली होती. अर्थात “ज्ञानाधारित समाज (knowledge Based Society) ची संकल्पना मांडली होती”.

लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 1881 मध्ये केसरीची सुरुवात केली. पण आगरकर आणि टिळकांमध्ये वैचारिक मतभेद झाले अन् 1887 मध्ये केसरीतून आगरकर बाहेर पडले. त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरु केले. टिळकांनी ‘केसरी’ नव्या भूमिकेतून चालवला. केसरी संबंधी टिळकांनी व्यक्त केली. भावनाच त्यांचा वृत्तपत्रविषयक हेतू स्पष्ट करतो. ते म्हणतात, “लोकमत जागृती, खळबळ व संघशक्ती उत्पन्न करणे हेच वृत्तपत्राचे या दृष्टीने आमचे मुख्य कर्तव्य असते, असे आम्ही समजतो. आम्ही केसरीत जे लेख लिहितो ते केवळ राज्यकर्त्यांकरिता नसून, आमच्या मनातील विचार, तळमळ किंवा जळफळ सर्व मराठी वाचकांच्या मनात उतरावी एवढया करिताच आहे. आमच्या लेखाचा जर असा परिणाम होत नसेल तर आमचे श्रम फुकट गेले असे आम्ही समजू.” अर्थात टिळकांना लोकांत जागृती करण्याबरोबरचं त्यांना संघटित करुन त्यांना कृतीप्रवण करावयाचे होते. म्हणजे लोकांत जागृती करुन स्वातंत्र्य लढयासाठी एकत्र करुन स्वातंत्र्याच्या समरात भारतीय जनतेला सहभागी करुन घ्यावयाचे होते.

टिळकांच्या वृत्तपत्रीय हेतूच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासोहब आंबेडकर यांचाही हेतू असाच होता. टिळकांनी ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मुक्त करण्यासाठी लोकजागृती करावयाची होती तर बाबासाहेबांना वृत्तपत्राच्या माध्यमातून अस्पृश्य समाज बांधवांमध्ये जागृती करुन, त्यांचे संघटन करुन अस्पृश्यांना आत्मपरिक्षण करण्यास बाध्य करुन त्यांच्यात आत्मसन्मानाची, सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची प्रेरणा निर्माण करुन त्यांना स्वकियांबरोबरच्या संघर्षाला जुंपावयाचे होते. टिळकांचा शत्रू एकच होता तो म्हणजे ब्रिटिश. बाबासाहेबांना स्वयकियांबरोबरच (म्हणजेच उच्चवर्णिय ), ब्रिटिशांशीही दोन हात करावे लागत होते. स्वजातीतील अज्ञानाविरुध्दही संघर्ष करुन स्वकीय अस्पृश्यांमध्ये चेतना निर्माण करण्याची मोठी कसरत बाबासाहेबांना करावी लागत होती. सर्वार्थनं गलितगात्र झालेल्या समाजात समग्र सामाजिक क्रांतीची बीजं पेरावयाची होती.

अस्पृश्यांतील नवा माणूस परंपरागत मानसिकता झुगारुन देऊन स्वत:ची नवी सृष्टी निर्माण करणारा असेल,अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. त्या धारणेला बळ मिळावे म्हणून त्यांनी वृत्तपत्रासारखे माध्यम स्वीकारले. अन् 31 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायकची’ सुरुवात केली. लोकशिक्षण आणि लोकसेवा ही वृत्तपत्रांची मूलभूत प्रेरणा असते, त्यातून समाजधारणेचे महान काम करता येऊ शकते, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होता. समाजधारणेबरोबरच समाजनिर्मितीची प्रतिज्ञा वृत्तपत्र करीत असतात, त्यामुळे त्यांना प्रसंगी संघर्षसन्मुखता स्वीकारावी लागते. शोषण, दास्य, हुकुमशाही याविरुध्द प्रसंगी जहाल रुप धारण करावे लागते, परंतु भारतातील वृत्तपत्र पुष्कळदा आपल्या स्वीकृत कार्यापासून दूरावलेली आहेत. परिणामी तत्वच्युती आणि लाचारी स्वीकारणारी वृत्तपत्र मानवी कलह आणि नैतिक अध:पतनाला कारणीभूत ठरतात. जेव्हा वृत्तपत्र लोकमत जागविणे आणि जगविणे या आपल्या बांधीलकीपासून दूर जातात तेंव्हा सभ्यता, संस्कृती, लोकभावना आणि लोकमानस याची प्रतिमा मलिन करतात. याची जाणीव ठेवून बाबासाहेबांनी पत्रकारितेचे कार्य सुरु केले. त्याच तत्कालीन वृत्तपत्रांचा अस्पृश्य समाजाप्रती विशेष असा दृष्टिकोन होता. पांढरपेशी दृष्टिकोणातून ते अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे पाहत असतं. त्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांना खूप मर्यादा होत्या. ‘‘सामाजिक प्रश्नांचे हे रण प्रामुख्याने पांढरपेशांपुरतेच मर्यादित होते. बहुजन समाज आणि त्या पलिकडील असलेला दलित वर्ग त्यांच्या सामाजिक तसेच अन्य प्रश्नांची जाणीवही फारशी निर्माण झाल्याचे आढळत नाही, ’’ असे रा. के. लेले यांना ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ग्रंथात नोंदविलेले मत वस्तुस्थितीचे द्योतक आहे.

तथापि, महात्मा जोतीराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून 1 जानेवारी 1877 मध्ये कृष्णराव भालेकर यांनी ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र सुरु केले. ‘दीनबंधू’ची सुरुवात एका अपरिहार्यतेतून झाली होती. ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथात डॉ.गंगाधर पानतावणे यांनी याबाबत नेमके बोट ठेवले आहे. ते म्हणतात, ‘‘ ब्राम्हणेत्तर वृत्तपत्रेही एका अपरिहार्य गरजेतून जन्माला आल्यामुळं शेतकरी, कष्टकरी यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांचा उहापोह त्यातून होत असे. शुद्रातिशुद्रांमध्ये नवी जागृती निर्माण करण्याचा आणि धार्मिक शोषणाचा समाचार घेऊन त्यास कारणीभूत असणाऱ्या वृत्ती प्रकृतींचा शोध घेण्यासाठी दीनबंधू, दीनमित्र, शेतकऱ्यांचा कैवारी, अंबालहरी, विजयी मराठा, यासारख्या ब्राम्हणेत्तर पत्रांनी आपली लेखणी परजली. त्यामुळे ह्या पत्रांना त्याकाळी विरोधही फार मोठ्या प्रमाणात झाला.’’ यावरुन तत्कालीन पत्रकारितेचे स्वरुप, भूमिका आणि कार्य करण्याची पध्दती लक्षात येते.
विशेष म्हणजे ब्राम्हणेत्तर वृत्तपत्रांनी ब्राम्हणेत्तरांची अस्मिता जागविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. परंतु ब्राम्हणेतरातील बहिष्कृत वर्गाला, या वृत्तपत्रांत फारसे स्थान नव्हते. ‘‘बहुतेक ब्राम्हणी पत्रांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांची उपेक्षा केली. त्यांच्या मुक्तीलढ्याचा उच्चार केला नाही. हे आपण समजू शकतो. परंतु महात्मा फुल्यांच्या तत्वज्ञानातून उभे राहिलेल्या ब्राम्हणेत्तर पत्रांनी अस्पृश्याच्या मूलभूत प्रश्नांवर कधीही भर दिला नाही. …… अस्पृश्यांच्या मुक्तीसंग्रामाला प्राथम्य आणि प्राधान्य देण्याची या पत्रांची तयारी नव्हती. तेंव्हा आपले प्रश्न आपणच मांडले पाहिजे, ही भूमिका दलितांना घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आपल्या सुख-दुखाचा, व्यक्तीमत्वाचा , संघर्षाचा विचार स्वत: व्यक्त करण्याची गरज ज्या पहिल्या दलित पत्रकाराला वाटली त्याचे नाव गोपाळबाबा वलंगकर. त्यांनी 1888 मध्ये ‘ विटाळ विध्वंसन’ नावाची पुस्तिकाही लिहिली होती. ते 1886 मध्ये लष्करातून निवृत्त झाले होते. त्यांनी ‘दीनबंधू’ आणि इतर वृत्तपत्रांतून लेखन करुन अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

दलितांचे पहिले संपादक म्हणून शिवराम जानबा कांबळे यांचा उल्लेख करावा लागतो. 1 जुलै, 1908 रोजी जन्माला आलेले, शिवराम कांबळे यांचे ‘सोमवंशीय मित्र’ हे पहिले दलित पत्र होय . त्यापूर्वी म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांच्यापूर्वी किसन फागू बंदसोडे यांनी तीन वृत्तपत्र काढल्याचे म्हटले जाते. त्यात 1901 मधील ‘मराठी दीनबंधू’ , 1906 मधील ‘अंत्यज विलाप’ आणि 1907 मधील ‘महारांचा सुधारक’ यांचा समावेश होतो. परंतु ही तीनही पत्र प्रकाशित झाली किंवा नाही याची माहिती मिळाली नसल्याचे डॉ. गंगाधर पानतावणे यांनी नोंदविले आहे. शिवराम जानबा कांबळे यांचा जन्म पुणे येथे 1875 मध्ये झाला होता. कांबळे यांचे कोल्हापूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘मराठा दीनबंधू’ या पत्रात पहिले पत्र 15 ऑक्टोबर 1902 रोजी प्रसिध्द झाले होते. नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथे 18 फेब्रुवारी, 1879 रोजी जन्मलेल्या किसन फागू बंदसोडे यांचे गोपाळबाबा वलंगकर आणि शिवराम कांबळे यांच्याबरोबरीचे कार्य आहे. समाजाचे निरीक्षण आणि समाजासाठी करावयाची कर्तव्य यातून घडलेले चिंतन, लेखनाच्या रुपाने त्यांनी प्रगट केले. देशसेवा, सुबोध पत्रिका, मुंबई वैभव, ज्ञानप्रकाश, केसरी आणि काळ या त्यावेळच्या वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांसंबंधीचे लेखन प्रकाशित केले. त्यांनी निरश्रित हिंद नागरिक (1910), विटाळ विध्वंसक (1913) आणि मजूर पत्रिका (1918) हे वृत्तपत्र सुरु करुन त्यांनी दलितांचे प्रश्न जगाच्या वेशीवर मांडले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्व दलित पत्रकारांनी कधी प्रखर तर कधी सौम्य भाषेचा वापर करुन अत्यंत जोमदार कार्य आपल्या लेखणीद्वारे केले. त्यांच्या पत्रकारितेच्या उद्दिष्टांकडे सुक्ष्मपणे लक्ष दिल्यास त्यांची पत्रकारिता केवळ नि केवळ अस्पृश्यांच्या जागृतीच्या उद्दिष्टाने जन्माला आली होती. प्रामुख्याने अस्पृश्यता घालवणे, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी हिंदू समाज आणि ब्रिटीश सरकार यांच्याकडे विनंती करणे, अस्पृश्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, अस्पृश्यांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करुन देणे, समाज, धर्म, संस्कृती, इतिहास, अस्पृश्याची एकूण स्थिती याबाबत वैचारिक लेखनही प्रसिध्द करणे ही त्या पत्रकारितेचा हेतू राहिला. त्या पत्रकारांच्या लेखनास भाषेचा डौल नव्हता परंतु अंत:करणाला भिडणारी सरळ आणि सुलभ भाषा हीच त्यांच्या विचारवहनाचे माध्यम होते. तथापि, बाबासाहेब पूर्व पत्रकारांच्या पत्रकारितेला राजकीय चळवळ आणि राजकीय विचारांची पार्श्वभूमी नव्हती. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाच उदय व्हावा लागला. वस्तुत: राजकीय हक्कापेक्षा सामाजिक हक्कांची लढाईच त्यांना महत्वाची वाटली आणि त्या हक्काच्या मागणीसाठी त्यांनी लोकप्रबोधनाचा वसा घेतला होता.

‘ भावी उन्नती आणि तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही,’’ असा ठाम विश्वास असलेल्या डॉ.बाबासाहेबांनी ‘मूकनायक’च्या हेतूचा पहिल्या अंकात मांडलेल्या उद्देशातून त्यांच्या पत्रकारितेची दिशा स्पष्ट होते. बाबासाहेब म्हणतात, ‘‘आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाय योजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती आणि तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर केंव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रताप निघतात. अशा पत्रकारांना आमचा इशारा आहे की, कोणतीही एखादा जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही.’’

इंग्रजीत एक म्हण आहे, ‘‘व्हू विल वॉच द वॉचमन’’ पहारेकरी नेमून जबाबदारी संपत नाही, तर तो झोपला आहे की जागा आहे हेही बघावे लागते. एरवी तो झोपलेलाच असण्याचा संभव असतो. हे काम वृत्तपत्रांनी करावयाचे असते, तेच तत्कालीन वृत्तपत्रांच्या संपादकांनी दुर्लक्षित केले होते. वृत्तपत्रांनी समाजात ‘जागल्या’ म्हणून काम करावे, असेही म्हटले जाते. ‘जागल्या’ जर एकाच जातीच्या हिताचा विचार करणारा असेल तर इतरांच्या हितांचा पालापाचोळा होतो. तेच तत्कालीन पत्रकारितेत होत होते, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अशा मनोवृत्तीच्या पत्रकारांची चिड होती. म्हणून त्यांनी अगबोटीचे उदाहरण देऊन हा विचार अधिक ठळकपणे स्पष्ट केला. ते म्हणाले, ‘‘ज्या प्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारुने जाणूनबूजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीत छिद्र पाडले तर सर्व बोटी बरोबर त्यालाही आधि किंवा मागाहून जलसमाधी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार, यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहित साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पडतमूर्खाचे लक्षण शिकू नये.’’ वृत्तपत्रांनी सर्वच जातींच्या कल्याणाचा विचार करावा, त्या अनुषंगाने भूमिका घ्यावी.स्वार्थ प्रेरित आणि स्वहिताच्या मागे लागलेले पत्र स्वत:बरोबरच इतरांचेही नुकसान करतात. या मनोगतात बाबासाहेबांनी वृत्तपत्रांची नैतिक जबाबदारी नेमकी कोणती असावी, हेच ठामपणे सांगितले आहे.

एकूण काय तर गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे रंजन करणे हे काही त्या काळच्या सर्वच वृत्तपत्रांचे मुख्य ध्येय नव्हते. स्वदेश संरक्षण करण्यासाठी आपले साधन नेहमी लख्ख धारदार ठेवण्याची दक्षता त्यांनी ‘जागल्या’ सारखी घेतली. तीच जागल्याची भूमिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या सर्वांगीन विकासासाठी स्वीकारली. ती भूमिका त्यांनी केवळ स्वीकारली नाही तर ती भूमिका त्यांनी यशस्वी केली. शाहू महाराज यांनी उदार हस्ते केलेल्या अडीच हजार रुपयांच्या मदतीतून बाबासाहेब यांनी मूकनायक या पाक्षिकांचा प्रारंभ केला. ‘मूकनायक’ हे नावही अर्थपूर्ण असच होतं. हजारो वर्षापासून मूक झालेल्या समाजाचे नायकत्व स्वीकारुन ‘मूक’ झालेल्या समाजाला जागवण्याचं कार्य सुरु करण्याची जणू घोषणाच त्यांनी केली होती. आजचे मुके उद्या नक्की बोलू लागतील हा विश्वास त्यांना उपेक्षित समाजाला द्यावयाचा होता. रा.क.लेले यांनी मूकनायक हे नाव मूकजनांना बोलायला लावण्याचे साधन आहे, हे सूचित करणारे होते. ‘मूक करोती वाचालम’ याचा पडसादही नावात आढळतो. मूक असलेला, दबलेला असा हा समाज आहे. तरी गर्जना करुन नायक बनण्याची धमकीही त्याच्यात आहे, असा आत्मविश्वासही नावातून दृग्गोचर होतो,’’ असे मत नोंदविले आहे. वृत्तपत्रासारख्या लोकसंवादाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी प्रबोधनाची ज्योत पेटवली. मूकनायक सुरु केलं तेव्हा बाबासाहेब सिडनेहॅम या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक होते. म्हणून ते ‘मूकनायक’चं संपादक पद स्वीकारु शकत नव्हते. त्यामुळं त्यांनी पांडूरंग नंदराम भटकर या तरुणाकडे संपादकत्वाची जबाबदारी सोपवली. तथापि, मूकनायकच्या अंकातलं सर्व लेखन प्रामुख्यानं बाबासाहेब करत असतं. मूकनायकच्या पहिल्या चौदा अंकातील लेखन-संपादकीय बाबासाहेबांनी लिहिले. अस्पृश्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल अशा स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज मूकनायकनं पूर्ण केली होती. पाक्षिक ‘मूकनायक’चा रजिस्ट्रेशन क्रमांक बी 1430 होता. दर शनिवारी त्याचा अंक प्रकाशित होत असे. ‘मूकनायक’ शीर्षकाच्या उजव्या बाजूला जाहिरातींचे दर तर डाव्या बाजूस वर्गणीचा दर छापलेला असे. जाहिरातीचा दर असा लिहिला जात असे. ‘‘कॉलमच्या दर ओळीस पहिल्यावेळी पाच आणे, दुसऱ्या वेळी चार आणे आणि कायम आडीच आणे.’’ किरकोळ अंकाची किंमत दीड आणा होती. ‘मूकनायक’चे कार्यालय 14, हरारवाला बिल्डींग, डॉ. बाटलीवाला रोड, पायेबावडी, वरळ, मुंबई येथे होते. त्याची छपाई का. र. मित्र यांच्या ‘मनोरंजन’ छापखान्यात होई. ‘मूकनायक’ सुरु झाले तेव्हा लोकमान्य टिळक हयात होते. इतर अनेक वृत्तपत्रांची दखल घेणाऱ्या केसरीनं ‘मूकनायक’ची दखल घेण्याचं सौजन्य दाखवल नाही. जागा नसल्याचे कारण देऊन पैसे घेऊन जाहिरात छापण्यासही ‘केसरी’नं नकार दिला.

बाबासाहेबांना इंग्रजीत विचार करण्याची आणि लिहिण्याची सवय होती. त्यामुळे मूकनायकसाठी लेखन करताना ते प्रथम इंग्रजीत लिहित आणि त्याचे नंतर मराठीत स्वत:च भाषांतर करत. बाबासाहेबांचे सर्वच लेखन प्रामुख्यानं इंग्रजी भाषेतून आहे. त्यांनी मराठी भाषेत केलेले लेखनही तितकेच मौलिक आहे. त्याचे प्रमाण कमी आहे. परंतु गुणात्मक दृष्य खूपच उपयुक्त आहे. त्यांचे मराठी भाषेतील लेखन काहीसे दुर्लक्षित राहिल्याचे जाणवत असले तरी त्यांच्या विचारवहनाला त्यामुळे मोठी मदत झाली आहे. त्यांच्या मराठी भाषा प्रेमाचे प्रतिबिंब मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुध्द भारत या चार वृत्तपत्रांच्या माध्यमातून उमटले आहे.

लोकजागृती, प्रबोधन आणि परिवर्तनासाठी लोकांच्याच भाषेत संवाद साधावा लागतो. तोच संवाद जनसामान्यांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांच्या वैचारिक , मानसिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची नांदी ठरतो, हे बुध्दाने पंचविशसे वर्षापूर्वी हेरले होते. त्यामुळे त्यांनी तेव्हा अभिजनाच्या संस्कृत भाषेत संवाद साधला नाही लोकांच्या दैनंदिन व्यवहारातील ‘पाली’ भाषेचाच वापर केला. ज्यांना लोकांशी थेट संवाद साधून समग्र परिवर्तनासाठी जनमत तयार करावे लागते ते जनतेचीच भाषा बोलतात. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा समाज मोठ्या प्रमाणात निरक्षर, अज्ञानी परंपरांच्या जोखडात जखडलेला होता. त्याला त्या जोखडातून बंधमुक्त करावयाचे होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याच भाषेचा वापर त्यांच्यासाठीच्या लेखनासाठी केला आणि थेट संवादासाठीही केला. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनास कुठेही इंग्रजी वळण लागू दिले नाही. हल्ली अर्धशिक्षितही मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा नुसता भडीमार करतात. परंतु बाबासाहेबांची मराठी भाषा अस्सल मराठी भाषा होती. मराठी भाषेचा निखळ झराच जणू त्यांच्या मराठी लेखनातून खळाळताना दिसतो. जणू मराठी मन, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जगणाऱ्या माणसाला असा उधारपणा आणि उपरेपणा करण्याची गरजच भासली नाही. त्यांच्या मराठी लेखनाचा दुसरा विशेष गुण म्हणजे त्यांची भाषा कारण नसताना ग्रांथिक आणि क्लिष्ट बनविण्याची त्यांना कधीच आवश्यकता वाटली नाही. आभासी अन् स्वप्नाळू विश्वात स्वत:ला हरवून न घेता बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या उत्थानाची जाणीव कायम जागृत ठेवली. त्यांचे मूकनायकातील लेखन त्याची प्रचिती देते. मूकनायक व्यवस्थितपणे चालू राहील याची खबरदारी बाबासाहेब स्वत: घेत होते. संपादक पांडूरंग भटकर जरी असले तरी व्यवस्थापक म्हणून साताऱ्याचे ज्ञानदेव घोलप यांची नियुक्ती केली होती. ‘मूकनायक’ला साजेशी बिरुदावली ही त्यांनी अभ्यासाअंती शोधून निश्चित केली. लोकसंत तुकाराम महाराजांच्या अभंगाची त्यांनी निवड केली.

‘‘ काय करु आता धरुनिया भीड ।
नि:शंक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण ।
सार्थक लागून नव्हे हित ।। 1 ।।

तुकारामांनी या अभंगात ‘मूकजनां’च्या अवस्थेचे वास्तव चित्रण तर केले आहेच त्याशिवाय ‘आपली मुकी बिचारी कुणी हाका’ अशी अवस्था करुन घेण्यात काही अर्थ नाही, असा सूचक भावही व्यक्त केला आहे. मूकनायकच्या पहिल्या अंकातील अग्रलेखाचे शीर्षक ‘मनोगत’ असे देऊन मूकनायक सुरु करण्याच्या मागची त्यांची नेमकी काय भूमिका आहे, हे विषद केले आहे. या अंकात अग्रलेखाबरोबरच स्फूट आणि सामाजिक कार्यासंबंधीची माहितीही देण्यात आली होती. मूकनायकच्या पहिल्या अग्रलेखात बाबासाहेंबातील बिन्नीच्या संपादकांचे सर्व गुण दिसून येतात. संपादकाकडे इतिहासाचा, संस्कृतीचा, धर्माचा, वर्तमानात जगण्यासाठी आणि भविष्य कवेत घेण्याची दृष्टी असावी लागते. ती बाबासाहेबांच्या ठाई ओतप्रोत भरलेली होती. म्हणूनच मूकनायकच्या पहिल्याच अंकात ते उराशी बाळगलेल्या ध्येयसिध्दीसाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी आपली वाणी, लेखणी झिजवणार असल्याचा सुतोवाच करतात. त्यांना कसा समाज आणि कसे राष्ट्र हवे आहे, याचेही दिशादर्शन त्यांनी या अंकात केले आहे. धर्मवाद, जातीवाद, सर्व प्रकारच्या विषमतेला मूठमाती देऊन नव्या समता, बंधुता आणि मानवता वादावर आधारित समाजाचे स्वप्न ते पाहताना दिसतात. त्यांच्या पत्रकारितेचा हाच ध्येयवाद होता.

वृत्तपत्राकडे आपण तर समाजाच्या आशा अपेक्षांचा दर्पण (आरसा) म्हणून पाहात असू तर त्यातून आपणास खूप काही मिळावयास हवे. सामाजिक चळवळीला नेमकी दिशा मिळावी. आरसा जसे तटस्थपणे काम करते तसेच काम वृत्तपत्राच्या संपादकांने वैचारिक नेतृत्व देऊन करणे आवश्यक असते. त्यामुळे संपादक दूरदृष्टीचा आणि व्यापक वैचारिक गुणांचा परिपोष अंगी असलेला असावा. वृत्तपत्र हे सामाजिक अस्त्र असते. त्या अस्त्रातील स्फोटकांची आणि सामर्थ्यांची परिपूर्ण जाणीव संपादकांना असावी लागते. लोकांच्या प्रश्नांना, समस्यांना, त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या घटकांना, समाजाच्या प्रगती आड येणाऱ्यांना घटकांशी दोन हात करण्याची तयारी संपादकांच्या लेखनीत असावी लागते. आपले विचार आणि भूमिका निर्भिडपणे मांडून लोकमत बनवण्याचा सातत्याने अग्रही संपादकास धरावा लागतो. विशेष म्हणजे समाजामध्ये विशिष्ट विचारांचा प्रसार करुन समाजाचे मत परिवर्तनही साध्य करावे लागते. या सगळ्या संपादकीय गुणांची शिदोरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपादकीय लेखातून वाचकाच्या समोर उलगडून दाखविली.

मूकनायकची घडी व्यवस्थित बसल्यानंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी 5 जुलै, 1920 रोजी ते इंग्लंडला रवाना झाले. पांडूरंग भटकर यांना मूकनायकच्या वाटचालीबाबत दिशादर्शन देऊन त्यांनी त्यांना या कामासाठी तयार केले होते. भटकर व्यवस्थापक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मूकनायक चालवत होते. 1908 मध्ये पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमधून इंटरपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या भटकरांचे लहान असतानाच ब्राम्हण मुलीशी विवाह झाला होता. भटकरांच्या विवाहास खूप विरोधही झाला होता.त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यावी आणि त्यांच्या शिक्षणाचा उपयोगही व्हावा म्हणून बाबासाहेबांनी त्यांना ही जबाबदारी दिली होती. परंतु दोन मुलं असलेल्या भटकरांना आर्थिक चणचण भासू लागल्यानं त्यांनी मूकनायकची जबाबदारी सोडून पोर्ट ट्रस्टमध्ये नौकरी स्वीकारली. मूकनायक चालवण्याचे त्यांचे मन:स्वास्थ्यही राहिलेले नव्हते. त्यामुळे ते मूकनायकच्या जबाबदारीतून ते मुक्त झाले. त्यानंतर ज्ञानदेव घोलप यांनी मूकनायकचे संपादकत्व स्वत:कडे घेतले. हा सगळा प्रकार जेव्हा बाबासाहेबांना लंडनमध्ये कळला तेंव्हा ते तेथील अभ्यासात खूप व्यग्र होते. तरीही वेळ काढून ते मूकनायक कोणत्या पध्दतीने, कोणत्या विचारधारेवर चालवावा. याबाबत लंडनमधून सूचना करत असतं.

घोलप यांनी मूकनायकचे कार्यालय बाबासाहेबांची परवानगी न घेता मुंबईतून साताऱ्यास हलवले. मूकनायकमुळे घोलप यांना संपादक म्हणूनन दलित समाजात मानसन्मान मिळाला. सामाजिक कार्याचा लळा असल्यामुळे सामाजिक प्रश्नांवर लिहिण्याचे, भाषणं देण्याचेही त्यांना विलक्षण वेड होतं. घोलपांनी मूकनायक कसेबसे दोन वर्षे टिकविले. परंतु मूकनायकच्या व्यवस्थेसाठी जे मंडळ बाबासाहेबांनी नेमले होते त्यांना मूकनायकचा हिशोबच न सांगण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यातच मूकनायकवर कर्जाचा बोजा वाढवून या नियतकालिकावर आपलीच मालकी असल्याचा दावाही दाखल केला. एवढेच नव्हे तर ज्ञानप्रकाश सारख्या वृत्तपत्रांतून बाबासाहेबांशी जाहीर वादही घातला. या सगळ्या प्रकारामुळे बाबासाहेबांना खूप मन:स्तापही झाला होता.

मूकनायकच्या व्यवस्थापन मंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सीताराम शिवतरकर, बाळाराम आंबेडकर, बाळाराम खडकर, संभाजी गायकवाड, संभाजी संतुजी वाघमारे आदींचा समावेश केला होता. बाबासाहेबांचे लंडनहून शिक्षण पूर्ण करुन 3 एप्रिल, 1923 रोजी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना मूकनायकबाबत वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे बाबासाहेबांनी घोलप यांच्या कृत्याबाबत जाहीर स्पष्टीकरण दिले. आता आपला मूकनायकशी काही संबंध राहिला नाही. असा जणू खुलासाच त्यांनी केला. पूर्वीच्या मूकनायकचे संस्थापक आपणच आहोत, अशा आशयाचे पत्र त्या वेळच्या ज्ञानप्रकाश, गरिबाचा कैवारी आणि लोकमान्य वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते. घोलप यांनी ज्ञानप्रकाशमध्ये लेखन करुन बाबासाहेबांना प्रत्युत्तर दिले. लंडनहून परतल्याबरोबर मूकनायकच्या वादाबाबत बाबासाहेबांना लगेच पत्रव्यवहार करावा लागल्याने त्यांचे खूप खटू झाले. दरम्यान घोलपांनी साताऱ्याहून मूकनायकचे काही अंक प्रसिध्द केले अन् 16 एप्रिल, 1924 रोज मूकनायक बंद पडले.

मूकनायक बंद पडल्यानंतर बाबासाहेबांनी 3 एप्रिल, 1927 रोजी ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकाची सुरुवात केली. बहिष्कृत भारतही बंद पडल्यानंतर 24 नोव्हेंबर, 1930 रोजी ‘जनता’ पाक्षिकाची सुरुवात केली. जनता 25 ते 26 वर्षे सुरु होतं. ‘जनता’चे साप्ताहिकात रुपांतर 31 ऑक्टोबर, 1931 मध्ये करण्यात आलं. जनता 4 फेब्रुवारी, 1956 पर्यंत सुरु होत. जनताचं रुपांतर 4 फेब्रुवारी, 1956 रोजी ‘प्रबुध्द भारत’ मध्ये करण्यात आलं. समता हे समता सैनिक दलाचे मुखपत्र होते. त्याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. ते 29 जून, 1928 रोजी सुरु करण्यात आलं होतं. ते 1929 पर्यंत सुरु होतं. देवराव नाईक बाबासाहेंबाचे अनुयायी होते.

मूकनायक दोन तीन वर्षातच बंद पडले तरी त्यातून ज्या विविध प्रश्नावर अग्रलेख, स्फूटलेख आणि पत्रव्यवहारातून जे विचारमंथन झाले. ते त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडण समजावून घेण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक स्वरुपाचे आहे. मूकनायकमधील लेखनाने अस्पृश्य आणि अस्पृश्यतेरांच्या एकूण परिस्थिती संबंधीची कल्पना आली. प्रत्यक्षात दलिताच्या परिस्थितीचे चित्र अस्पृश्य समाजातील कार्यकर्त्यांसमोर आल्याने त्यानाही आपल्या कार्याची दिशा आखता आली. 1923-24 नंतर अस्पृश्य आणि अस्पृश्येत्तर कार्यकर्त्यांनी जी वृत्तपत्र काढली त्यांच्यासाठी मूकनायक म्हणजे आदर्श उदाहरण झाले. मूकनायकमुळे राजकीय आणि सामाजिक कार्याची कोणती दिशा असावी हे स्पष्ट झाले. तसेच त्यातून समाजकारण आणि राजकारणाला चालना मिळाली. त्याचबरोबर मराठीतील कोणत्याही एका वृत्तपत्राला जी बाब कळाली नाही ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकच्या माध्यमातून घडविली. ती म्हणजे अस्पृश्य समाजाला त्यांनी आपल्या लेखनीने विचार प्रवृत्त, कर्तव्य सन्मुख आणि अंतर्मुख बनविले आणि एवढेच नाही तर स्वत:च्या समाजापलीकडे पाहण्याचा परिचयही त्यांनी आपल्या लेखनीने घडविला. वैचारिक लेखनास आणि वृत्तपत्रीय लेखनात व्यक्तिमत्वाचा आणि अभिव्यक्तीच्या बिंब प्रतिबिंबभावांचा संबंध असतो. म्हणून बाबासाहेबांचे लेखन ओजस्वीतेचे, जिवंत आणि ज्वलंतपणाचे रुप धारण करते. ‘‘लोकहितवादीचा किंवा लोकमान्य टिळक’’ यांची लेखन शैली मर्दानी (Masculine) आहे. तिचा पुरुषी थाट तिच्या प्रभावी अभिव्यक्तीतून अधिकच खूलून दिसतो. नवा समाज घडविण्याचा ईर्ष्येला आणि उर्मिला धारदार, ओजस्वी तसेच सामर्थ्यसंपन्न भाषेचा अवलंब करावा लागतो. बाबासाहेबांच्या मर्दानी लेखन शैलीचे तर ते अंगभूत गुणविशेषच होते,’’ असे डॉ. गंगाधर पानतावणे यांनी म्हटले आहे. ते सार्थ वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन महाराष्ट्रातील समाजाचे प्रबोधन तर निष्ठापूर्वक करतेच . त्याचबरोबर नवविचारांच्या साहाय्यानं समाजाच्या उत्कर्षाचा पाया मजबूत करते. हजारो वर्षांपासून ज्ञानवंचित आणि विद्यावंचित राहिलेल्या अस्पृश्यांकरिता नवविचार नक्कीच जीवनदायी ठरले. लोकशिक्षणाशिवाय अस्पृश्य समाज हा जागृत होऊ शकणार हे ओळखून बाबासाहेबांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जन प्रबोधनाचे कार्य केले. या देशातील समस्त शोषित-वंचितांच्या परिवर्तनासाठी विचारांचे टॉनिक देणारे महापुरुष, युगप्रवर्तक संपादक म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागते. प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा अद्भूत संगम बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वात झाल्यामुळे त्यांचे लेखन विलक्षण प्रेरणादायी, विचारप्रवण आणि परिवर्तनाची नांदी ठरले. विचार जेव्हा जनसमुदायांच्या मनाची पकड घेतात, तेंव्हा ते एक खरोखरीची सामाजिक शक्ती बनतात, यांची प्रचिती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रीय लेखनातून येते. त्यांनी अज्ञाताचा वेध घेत ज्ञाताचा परिघ विस्तारण्याचे काम केले. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे भावविश्व राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक पैलूंपुरतेच मर्यादित होत नाही. तर या गोष्टीचा त्यात समावेश आहेच परंतु त्या पलीकडे त्यांच्या पत्रकारितेला व्यापक सांस्कृतिक मूल्य आहे. म्हणून हा सामाजिक न्यायमूल्यांची प्रखर जाणीव जागृती करणारा ठरला आहे.

लेखक उपसंचालक (माहिती) या पदावर , विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथे कार्यरत आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*