डॉ.भूषण अमोल दरकासे
मेरिट, भारतात मेरिट बद्दल होत असणारी चर्चा हि उल्लेखनीय आहे, तिचे जे विविध पैलू आहेत ते समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. मेरिट बद्दल बोलताना तिचे तात्विक स्वरूप सर्वप्रथम जाणून घेणं गरजेचं आहे. मेरिट च्या विविध व्याख्या तपासून पाहिलं तर असं समजून येईल कि त्यात दोन भाग अंतर्भूत
आहेत ते म्हणजे एक विशेषतः ‘चांगले किंवा पात्र असण्याची गुणवत्ता’ तर दुसरे विशेषत: ‘स्तुती किंवा बक्षीस पात्र’. पण जर आपण त्याला विविध बाजूनी तपासून पहिले नाही तर हा मतितार्थ पूर्णतः एकांगीक असेल.
खरंच एखादी व्यक्ती मेरिटोरिअसआहे हे कसे ठरेल?
कोणते सामाजिक आणिव्यक्तिगत घटक मेरिटला न्यायी अथवा अन्यायी बनवतात ?
मेरिटधारी असे समजतात कि, जे स्पर्धेमध्ये जिंकलेत किंवा त्याना जे यश प्राप्त झाले आहे ते पूर्णतः त्यांच्या बुद्धिमत्तेने अथवा कष्टाने मिळाले आहे आणि त्य्याचमुळे ते स्तुती किंवा बक्षीस पात्र आहेत किंबहुना त्यापलीकडेही जाऊन ते असे मानतात कि अशी रचना नैतीकरित्या न्याय्य आहे . समान समाजात जिथे संधीची समानता आहे (अशी परिस्थिती समाजात असणे हे अशक्य जरी नसले तरी प्राप्त करणे नक्कीच अवघड आहे) तिथे सुद्धा अशी भावना तयार होणे समाजाला कितपत न्यायी बनवते हे पण प्रश्नात्मकच आहे, त्यावर नंतर चर्चा करू…
परंतु हि जी वैचारिक मानसिकता जिंकलेल्या मध्ये तयार होते तीच जर वास्तविकअसमान समाजात जिथे संधीची असमानता आहे तिथे तयार होणे म्हणजे गुणवत्तेची उधार चमक खरेदी करण्यासारखं आहे. याचे कारण असे कि जे स्पर्धेमध्ये जिंकलेत ते असे समजतात कि त्यांचे यश हे त्यांनी स्वतः स्वयंनिर्मित आणि स्वयंपूर्ण असे आहे, जी कि पूर्णतः चुकीची धारणा आहे.
समाजात जिथे हजारो वर्षांपासून काही घटकांना दुर्बल ठेवण्यासाठी तयार केलेल्या दुष्ट चालीरीतींना ज्याला काही सुशिक्षित लोक धर्म म्हणतात अशा असमान समाजात काही शोषणकर्त्या वर्गाकडे/ जातींकडे/ समूहाकडे एक विशिष्ट असे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक भांडवल असून त्याचा वाटा व्यक्तिला यशस्वी होंण्यासाठी कितपत फायदेशीर ठरवतो याची गणना मेरिट च्या गप्पा मारताना न करणे म्हणजे शुद्ध पाखंडपणा होईल.
एखादी व्यक्ती एका समाजव्यबस्थेत खालच्या पायरीतून वरच्या पायरीत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या काही सुविधा, उदा. शैक्षणिक उपलब्धी, आरोग्य सेवा उपलब्धी, या किती सहजरित्या त्या समाजातील सर्व व्यक्तींना मिळू शकतात हे बघणे गरजेजचे आहे. असमानतेचा भस्मासुर झालेल्या समाजरचनेत अशाप्रकारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक भांडवल असलेले काही विशिष्ट जातिसमूह स्वतःचे हे फायदे एकांकित करून आपल्या पुढच्या पिढीला आरामात हस्तांतरित करतात. त्यामुळे ‘जोपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता अथवा प्रतिभा त्यांना नेईल’ अथवा ‘आपण प्रयत्न केल्यास आपण करू शकतो’ हि असली ब्रीदवाक्य वास्तविक असमान समाजव्यवस्थेत जी कि व्यक्तीच्या किमान गरजा पण भागवू शकत नाही अशा समाजव्यवस्थेत ती बाष्कळ गप्पां शिवाय काहीही नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक भांडवल असलेल्या काही विशिष्ट जातिसमूहांनी स्वतःची गुणवत्ता वंशपरंपरागत कुलीन आणि खानदानी बनवली आहे.
बरेच जण अशी टीका करतील कि असमान समाजात हे बरोबर आहे पण जर सर्वाना संधीची समानता उपलब्ध करून दिली तर हा दोष दूर होईल. परंतु तत्वज्ञ मिचएल सॅनदेल यांच्या ‘द टायरनी ऑफ मेरिट’ या पुस्तकात ते असे मांडतात कि जिथे संधीची समानता आहे अशा समाजात देखील शुद्ध गुणवत्ता हि नैतिक किंवा राजकीयदृष्ट्या असमाधानकारकच असेल. कारण जे जिंकलेत ते असे समजतात कि त्यांचे यश हे त्यांनी स्वतः स्वयंनिर्मित आणि स्वयंपूर्ण असे आहे आणि हि भावना त्यांना गर्विष्ठ बनवते.
समजा दोन व्यक्ती आहेत, दोनीही समप्रमाणत मेहनत करतात असे मानू, परंतु एकाजवळ असेटॅलेंट आहे जी कि सध्य समाजव्यवस्था स्वतःसाठी अधिक उपयुक्त समजते आणि दुसऱ्याजवळ असे कोणतेही टॅलेंट नाही असे समजू.
जेंव्हा दोघेही समप्रमाणत मेहनत करू शकता तर फक्त काही अशा गोष्टीमुळे जी कि व्यक्तिविशेषच्या हाताबाहेर आहे त्यामुळे फक्त एकालाच अधिक महत्व प्राप्त झाले आणि दुसऱ्याला नाही, या रचनेत पहिला कोणत्या नैतिकतेवर खरा उभारतो हे समजणे अवघड आहे.
आपल्या समाजात काही विशिष्ट गुणवत्ता असणार्यांना अधिक महत्व दिले जाते, परंतु सध्याच्या समाजात अथवा पुढे अस्तित्वात येणाऱ्या समाजव्यवस्थेत कोणती गोष्ट समाज महत्वाची मानतो अथवा मानेल हे एखाद्या व्यक्तीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ती समप्रमाणात मेहनत करू शकते तर फक्त विशिष्ट गुणविशेषाच्या अभावामुळे समाज त्यावर तीच कृपादृष्टी दाखवत नाही जी कि ते अशा व्यक्तीवर दाखवते जो त्या गुणविशेषाने विशारद आहे.
तत्वज्ञ जॉन रौवल्स यांच्या नुसार बुद्धिमत्ता हि देखील देखील समाजात आणि व्यक्तीव्यक्तीमध्ये अनिश्चित आणि अहेतुक प्रकारे प्राप्त असतात. या एकप्रकारे त्या व्यक्तीला प्राप्त झालेला नैसर्गिक वाटा अथवा बक्षीसच असते ज्याच्यावर त्या व्यक्तिविशेषाचे स्वयंपूर्ण हक्क नसून समाजाच्या हक्काचे असतात असे मानले तर चुकीचे नाही असे ते ‘अ थेअरी ऑफ जस्टीस’ या पुस्तकात मांडतात. काही ह्या गोष्टीला प्रश्नर्थी नजरेने पाहतील परंतु जॉन रौवल्सच्या मतेएखाद्या व्यक्तीची , प्रयत्न करण्याची इच्छासुद्धा त्याच्या नैसर्गिक क्षमता, कौशल्य आणि त्याच्यासाठी उपलब्ध विविध पर्यायांमुळे तसेच आनंदी कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते.
उदा(जस्टीस- व्हाट्स द राइट थिंग टु डू बाय मिचएल सॅनदेल/ ऑनलाईन कोर्से मधील एक उदाहरण):: एका सर्वे मध्ये असं आढळून आलं कि घरातील जन्माने थोरलीव्यक्ती हि अधिक मेहनती आणि यशस्वी ठरते. जर यशाची चावी इतक्या अनिश्चित गोष्टीवर जरअवलंबून असेल तर एखादीव्यक्ती थोरल्या जागेवर जन्माला येणे हे कोणाच्याच हातात नाही.(हे उदाहरण फक्त यशस्वी असण्याच्या अनेक शक्यता आणि अशक्यतेची अनिश्तितता दर्शवण्यासाठी दिलेले आहे.)
यशस्वी असणे आणि नसणे यात विविध अनिश्चित गोष्टींचा वाटा असतो जसे कि बुद्धिमत्ता, मेहनत करण्याची क्षमता, घरात मिळणारे वातावरण, शैक्षणिक उपब्धता, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती अथवा तो विशिष्ट समाज तुमच्यकडे असलेल्या गुणवत्तेला किती उपयुक्त मानतो.
काहींचं असं म्हणणे असेल कि,नाही, जो कष्ट करेल आणि मेहनत करेल त्याला फळ नक्कीच मिळेल,
बरोबर आहे पण मिळणारे फळ हे फक्त केलेल्या मेहनतीच्या प्रमाणातच मिळेल हे नक्की नाहीये.
आपण हे उदाहरणे समजू घेऊ या,
उदा:सध्या स्टॅन्ड-अप कॉमेडी चे समाजात खूप फॅड आहे तर एखादी व्यक्ती खूप छानजोक करते म्हणून ती एखादा कामगार आहे जो दिवसभर दगड फोडून पैसे कमवतो त्यापेक्षा अधिक लायक आहे का?
मेहनतीचा विचार केला तर दिवसभर दगड फोडणारच अधिक मेहनती वाटेल तरीपण त्याला पैसे आणि प्रेस्टिज हा समाज तेवढे देत नाही जितके कि तो जोक ऐकण्यासाठी देतो. आणि याचाच अर्थ असा कि, एखादा कॉमेडियन, कामगारपेक्षा कोणत्याच प्रकारे नैतिकरित्या अधिक लायक आहे हे सिद्ध होत नाही. त्यामुळे एवढेच सिद्ध होत कि सध्या समाज हा दगड फोडण्याच्या कामापेक्षा जोक ऐकण्याच्या कामाला अधिक महत्व देतो. ह्याच दोन्ही व्यक्ती हजारो वर्षपूर्वी जन्माला आल्या असत्या तर कदाचित परिस्थिती उलटी झाली असती आणि कोणीही उभे राहून जोक ऐकण्यासाठी किंचितकही पैसे दिले नसते .
सांगण्याचा हेतू एवढाच कि व्यक्ती यशस्वी होते तेंव्हा ते यश हे त्या व्यक्तीने स्वयंनिर्मित अथवा स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण असे नसून त्यात बऱ्याच अनिश्चित आणि आकस्मिकत घटकांचा वाटा असतो ज्यावर कोणीही ताबा ठेवू शकत नाही त्यामुळे यशस्वी झालेल्या लोकांनी हा विजय पूर्णतः स्वतःची क्षमता, प्रयत्न, निर्विवाद कर्तृत्व मानले नाही तर तो आपले समाजाप्रती असणारे देणे विसरणार नाही व जे या स्पर्धेत काही अनिश्चित आणि आकस्मिकत घटकांमुले मागे राहिलेत त्यांच्याकडे हीनतेच्या नजरेने अथवा जे मागे राहिलेत ते त्याच पात्रतेचे आहेत असे न मानता सर्वांगीण समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करतील.
मेरिट काही सामाजिक असमानतेच्या आकस्मिक आणि अनिश्चित घटकांना दूर करू शकतो परंतु तरीपण ती नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि क्षमता तसेचविशिष्ट समाज तुमच्यकडे असलेल्या गुणवत्तेला किती उपयुक्त मानतोअशा आकस्मिक आणि अनिश्चित घटकांना दूर करण्यात अयशस्वी ठरते.
आता प्रश्न असा उभा राहतो कि असमान शैक्षणिक उपलब्धता दूर करणे सोपे आहे पण असमान नैसर्गिक देणगी(बुद्धिमत्ता आणि क्षमता) ह्या वर तोडगा काढणे अशक्य आहे.
त्यावर एक उपाय असा आहे कि हुशारांना,स्पर्धेत जिंकलेल्याना त्यांची प्रतिभा विकसित करण्यासाठी आणि वापरण्यास प्रोत्साहित करा, परंतु या प्रतिभेला समाजात आणि आर्थिक बाजारात मिळणारा फायदा मग तो आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा हे फक्त त्या व्यक्तिचे स्वयंपूर्ण स्वयंसिद्ध असे नसून त्यात संपूर्ण समाजाचा वाटा आहे हे समजने गरजेचे आहे. जिंकणे केवळ त्यांच्याच मालकीचे नाही, परंतु ज्यांना समान नैसर्गिक देणगीचा अभाव आहे त्यांनाही यात सामायिक केले पाहिजे.
भारतातील शैक्षणिक स्थितीचा एक आढावा पाहू,कृतिका शर्मा यांच्या द प्रिंट मधील लेखातील माहितीनुसार,देशात फक्त 97 आयआयटी(IITs), एनआयटी(NITs), आयआयएम(IIMs) आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIITs) आहेत.
केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणासाठी 50 टक्क्यांहून अधिक निधी, गेल्यातीन वर्षांत, देशातील केवळ 3 टक्के विद्यार्थ्यांकडे गेला आहे – जेभारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), भारतीय व्यवस्थापन संस्थां(आयआयएम), आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) या संस्था मध्ये शिकतात.
आयआयटी, आयआयएम, एनआयटीमध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या फक्त 3% आहेत परंतु त्यांना 50% सरकारी निधी मिळतो.
उर्वरित 97 टक्के विद्यार्थी देशातील 65५ उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातात आणि त्यापैकी निम्याना सार्वजनिक निधीतून फंड येतो आणि एकत्रितपणे, त्यांना एकूण सरकारी निधीच्या निम्म्यापेक्षा कमी रक्कम मिळते.
रितिका चोप्रा यांचा ‘द इंडियन एक्सप्रेस’ च्याआर्टिकल‘20 वर्षांनंतर, बोर्ड टॉपर्स कुठे आहेत?’मधील लेखातील माहितीनुसार, आज अर्ध्याहून अधिक टॉपर परदेशात राहतात, अमेरिका हे पसंतीचे ठिकाण आहे. बहुतेक विज्ञान आणि तंत्रज्ञानात आहेत. आयआयटी त्यांचा सर्वात आवडता पदवीधर पिट-स्टॉप आहे.निम्म्याहून अधिक टॉपर्स (86 पैकी 48) इंजिनीअरिंगला पदवी म्हणून निवडले – फक्त 12 जणांनी वैद्यकशास्त्राची निवड केली, ज्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, दहा पैकी सहा जणांनी आयआयटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. 36 टक्के लोकांनी आयआयटीमध्ये त्यांच्या पहिल्या पदवीचा अभ्यास केला, 65 टक्के ज्यांनी इंजिनिअरिंगचा पहिली पदवी म्हणून अभ्यास केला तो त्यांनी आयआयटी मधून केला.
वरील दोन लेखातील माहितीवरून असे समजते कि काही अभिजन (एलिट) संस्थांना (फक्त ३ टक्के विद्यार्थी) सार्वजनिक फंड मधून भरमसाठ फंड जात असून तेथील मेरीटधारी विद्यार्थी शासकीय सार्वजनिक फंड मध्ये शिकून परदेशात प्रस्थान करतात. त्यांच्या गुणवत्तेत समाजाचा काहीच वाटा नाही असं म्हणून कसे चालेल, जेंव्हा त्यांना 50% सरकारी शैक्षणिक निधी मिळतो आणि बाकी 97 टक्के विद्यार्थी जे देशातील 65५ उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातात त्यांना उर्वरित 50% सरकारी शैक्षणिक निधी मिळतो.
आता एक वेगळी माहिती पाहू, ‘शाळा कुठे उभारली जाईल हे जात कशी ठरवते’,चंद्रमा बनर्जी यांच्या लेखातील माहितीनुसार, आयआयटी-दिल्ली संशोधकांनी केलेल्या संशोधनातील काही महत्वाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत,
संशोधनातअसे दिसून आले आहेकी उच्च जातीच्या गावांना दलित गावांपेक्षा माध्यमिक शाळा मिळण्याची शक्यता दुप्पट आहे.त्यांना आढळले की देशात 10 एससी बहुल गावांसाठी आणि प्रत्येक 12 एसटी बहुल गावांसाठी फक्त एक माध्यमिक शाळा आहेआणि नवीन मिळवण्याची शक्यता एससी/एसटी बहुल गावांमध्ये प्राथमिक स्तरावर 75% वरून माध्यमिक स्तरावर 9% वर येते. एससी बहुल गावांमध्ये सर्वात मोठी घट मात्र गुजरातमध्ये आहे- प्राथमिक स्तरावर 94% पासून माध्यमिकस्तरावर 4%-त्यानंतर छत्तीसगड (96% ते 6%), आंध्र प्रदेश (96% ते 12%), मध्य प्रदेश (87% ते 3%) %) आणि महाराष्ट्र (86%ते 6%). एसटी-वर्चस्व असलेल्या गावांसाठी, मध्य प्रदेशात सर्वात जास्त घट आहे-प्राथमिक स्तरावर 91% पासून माध्यमिक स्तरावर 6%. त्यानंतर छत्तीसगड (94% ते 9%), गुजरात (97% ते 13%), महाराष्ट्र (93% ते 14%) आणि आंध्र प्रदेश (86% ते 8%) आहे.
देशभरात एससी- आणि एसटी बहुल गावांना सार्वजनिक शाळा मिळण्याची 9% संधी आहे, तर गैर-एससी/एसटी गावांना 17% संधी आहे.
आम्हाला असे आढळले आहे की एसटी लोकसंख्येचा जास्त वाटा असलेल्या गावांमध्ये राहणारे विद्यार्थी केवळ सार्वजनिक शाळा उपलब्ध नसल्यामुळेच नव्हे तर या गावांच्या दुर्गम भागामुळेही प्रवास करतात. तथापि, एससी-केंद्रित गावांसाठी, सार्वजनिक शाळांची अनुपलब्धता दूरच्या प्रवासाचे मुख्य कारण असल्याचे दिसते.
अभ्यासात असे म्हटले आहेकी “आमचे निष्कर्ष दर्शवतात की सार्वजनिक शाळांच्या तरतूदीमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास जातींविरुद्ध पद्धतशीर पक्षपातहोत आहे.” याचा अर्थ एससी/एसटी मुलांसाठी कमी सार्वजनिक शाळा आहेत आणि या शाळांच्या अनुपलब्धतेमुळे त्यांना दूरचा प्रवास करून जावे लागत आहे.
एकदा विद्यार्थ्यांनी प्राथमिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, माध्यमिक स्तरावर पुढे जाण्याचा निर्णय शाळेपासून अंतर, कौटुंबिक उपजीविका वाढवणे, औपचारिक शिक्षणात अनास्था आणि शालेय वातावरणातील भेदभाव यासारख्या अनेक घटकांमुळे प्रभावित होतो.
नवीन माहिती नुसार, ऑगस्ट 2021 मध्ये शालेय मुलांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन लर्निंग (SCHOOL) द्वारे वंचित घरांमध्ये सुमारे 1,362 शाळकरी मुलांचे (वर्ग 1 ते 8) नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाने आपला अहवाल ‘लॉकड आऊट : एमेरजेंसि रिपोर्ट ऑन स्कूल एडुकेशन ’या नावाने जाहीर केला आहे.‘
इथे वंचित म्हणजे जी पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवत आहेत असा लावला आहे हे विशेष नोंद करण्यासारखं आहे.
संशोधनातील काही महत्वाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत,
ग्रामीण भागात, फक्त 8 टक्के आणि शहरी भागात, केवळ 24 टक्के नियमितपणे ऑनलाइन अभ्यास करत आहेत. शिवाय, सर्व नमुन्यांच्या मुलांपैकी केवळ 9 टक्के मुलांचे स्वतःचे स्मार्टफोन होते.
दलित आणि आदिवासींची अवस्था अजून बिकट आहे. अगदी वंचित मुलांमध्येही दलित आणि आदिवासी कुटुंबांची आकडेवारी वाईट आहे; ग्रामीण अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींपैकी फक्त 4 टक्के मुले (एससी/एसटी) नियमितपणे ऑनलाइन अभ्यास करत आहेत.स्मार्टफोनशिवाय घरात राहणाऱ्या नमुना मुलांची टक्केवारी एससी/एसटीसाठी 55 टक्के आहे, तर इतरांसाठी 38 टक्के आहे.
डझ ‘मेरिट हॅव अ कास्ट? या लेखात रजत रॉय यांनी नमूद केल्याप्रमाणे, “परीक्षेत (विशेषतः उच्च शिक्षणात) अधिक चांगले रँक मिळवण्यासाठी आणि अशा प्रकारे गुणवंत म्हणून ओळखले जाण्यासाठी, अनेक प्रकारच्या संसाधनांची आवश्यकता असते – आर्थिक (उत्तम प्राथमिक शिक्षण आणि प्रशिक्षण, इतर कामापासून स्वातंत्र्य) आणि सामाजिक आणि सांस्कृतिक (नेटवर्क, संपर्क, आदर, आत्मविश्वास आणि मार्गदर्शन) – आणि कठोर परिश्रम. ही सर्व भिन्न संसाधने उपलब्ध असणे हे सामाजिक संबंधांशी जोडलेले आहेत.”
भारतीय समाजातील सामाजिक संबंधांत जात हि सर्वात मोठी निष्टुर सामाजिक सत्यता आहे जी या संसाधनाची (मग ते आर्थिक असोत अथवा सामाजिक आणि सांस्कृतिक असोत) उपलब्धता असण्याची शक्यता ठरवते.
हेतुस्तव एवढेच कि, परीक्षेतील गणनाचे कारण काहीही असले तरी शैक्षणिक यशाचा अंदाज घेण्यासाठी प्रमाणित चाचण्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीच्या प्रकाशात स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.
नवउदारवाद आणि जागतिकरण यांनी एका विशिष्ट अशा मानसिकतेला खतपाणी घातले आहे ज्यात व्यक्तिवादाचे विचित्र स्वरूप समोर येत आहे. व्यक्तिवाद केंद्रित विचारसरणीमुळे, आपली कर्तव्ये किंवा काही जबाबदाऱ्या केवळ एक व्यक्ती म्हणूनच आपण स्वीकारणार, त्या आमच्यावर ऐतिहासिक ओळख असणाऱ्या समुदायातील सदस्य म्हणून दावा करत नाहीत असे मत बहुतांश समाजात दिसून येत आहे.
आमच्या पूर्वजांनी काही लोकांवर अत्याचार केला याला आम्ही सध्या जबादार नाहीत असे त्यांचे मत आहे.
व्यक्तिवादाच्या दृष्टिकोनातून, “मी स्वतः जे निवडले ते मी आहे.” किंवा मी स्वतः जे स्वतःहून करेल फक्त त्याच गोष्टीची जबादारी मी स्वतः स्वीकारेल.
मॅकीन्त्यर या भूमिकेत नैतिक उथळपणा पाहतो, हे चुकीचे गृहीत धरते की, “स्वत: ला त्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक भूमिका आणि स्थितींपासून वेगळे करता येते.कारण माझ्या जीवनाची कथा नेहमी त्या समुदायांच्या कथेत अंतर्भूत असते ज्यातून मी माझी ओळख प्राप्त करतो. मी भूतकाळासह जन्माला आलो आहे; आणि त्या भूतकाळापासून स्वत: ला व्यक्तिमत्ववादी विचारसरणीने वेगळे करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माझे वर्तमान संबंध विकृत करण्यासारखे आहे.”
यातून काही महत्वाचे विचार मांडण्याचा प्रयत्न असा कि भारतात सद्यपरिस्थीला समाज असमान आहे जिथे संधीची असमानता अजून हि विविध पैलूवर अवलंबून आहे ज्यात जात हा महत्वाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ आहे.
जर जातीच्या लोकसंखयेवरून हे ठरते कि एखाद्या गावात शाळा असेल कि नसेल तर इथे मेरीटच्या बाष्कळ गप्पा मारणारे एक तर मूर्ख आहेत अथवा ते जाणून आहेत कि यथास्थित जातीय उतरंड जपण्यासाठी हे आवश्यक आहे.
स्वतःला प्राप्त झालेल्या काही अनिश्चित आणि आकस्मित विशेषाधिकार हे व्यक्तीला मेरिटोरिअस जरी बनवत असले तरी ती गुणवत्ता स्वयंनिर्मित अथवा स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण अशी नाही आहे. परंतु ती तशी आहे असे समजल्यामुळे एक गर्विष्ठ समाजाची निर्मिती होत असून त्यामुळे एकंदर समाजाची हानी होत आहे हे जितके लवकर समजेल तेवढे बरे.
प्लेटोने ‘उदात्त खोटे’ असे वर्णन केले आहे,ते असे कि, ‘जे असत्य असले तरी विशिष्ट असमानता कायदेशीर म्हणून नागरिकांना स्वीकारण्यास प्रवृत्त करून नागरी एकोपा टिकवून ठेवते.’
प्रचंड असमानता असूनही तळाशी असलेले लोक जर त्यांनी प्रयत्न केले तर ते जिंकू शकतात हे सुद्धा एक असेच ‘उदात्त खोटे’मिथक आहे.
“हेलपिंग अ व्हिक्टिम ऑर हेलपिंग द व्हिक्टिम: अल्टरुईसम अँड आयडेंटिफियाबिलिटी,” या लेखात डेबोरा स्मॉल आणि जॉर्ज लोवेन्स्टाईन यांनी त्यांच्या चर्चा आणि निष्कर्षात ‘वियनरचा’ हवाला दिला की, “पीडित हे पीडीत आहेत कारण ते त्यांच्या परिस्थितीला जबाबदार नसतात आणि त्यामुळे ते सहानुभूती आणि दया निर्माण करतात.”
पण जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रतिकूल परिस्थितीसाठी जबाबदार मानले गेले तर परिणामी भावना सहानुभूती ऐवजी ‘राग आणि तिरस्कार’ निर्माण करतात. दुसरी व्यक्ती ‘अन्यथा करू शकते आणि करायला हवी होती’ या विश्वासातून संताप व्यक्त होतो आणि हि भावना त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी चा कल कमी करते.
लेखक मिचएल सॅनदेल यांच्या ‘द टायरनी ऑफ मेरिट’ मध्ये असे निष्कर्ष काढतात की, सुशिक्षित उच्चभ्रू लोक कमी शिकलेल्या लोकांपेक्षा कमी पक्षपाती नसतात; फक्त असे आहे की त्यांचे पूर्वग्रहांचे लक्ष्य वेगळे असतात.
सुशिक्षित उच्चभ्रू लोक हे कमी शैक्षणिक यश हे वैयक्तिक प्रयत्नांच्या अपयशाचे लक्षण मानतात.कारण ते असे समजतात कि कमी शैक्षणिक यश हे ती व्यक्ती आळशी आहे एवढेच नाही तर ते त्या व्यक्तीलात्याच्या प्रतिकूल परिस्थितीसाठी संपूर्णतः जबाबदार समजतात. त्यामुळे ते कमीशिक्षित व्यक्तींकडे अथवा मागे राहिलेल्यांकडे राग आणि तिरस्काराच्या नजरेतून पाहतात आणि हि भावना त्या व्यक्तीला मदत करण्यासाठीचाकल कमी करते.
सुशिक्षित उच्चभ्रू लोकच काय अगदी अल्पशिक्षितहि स्वतःलाच त्यांच्या परिस्थितीसाठी दोषी मानतात.
मेरिटची एक आदर्श वास्तविकता म्हणून सुरुवात होते पण गोष्टी कशा आहेत याबद्दल च्या दाव्यामध्ये त्याचे रूपांतरण होते.वास्तविकतेला आदर्श बनवताना हे लक्षात घेतले पाहिजे कि नक्कीच ती वास्तविकता आदर्श अशी आहे का?
मेरिट हि नक्कीच दोन पायरीमधील अंतर कमी करण्याची शिडी असू शकते, मुळात ती समाजा-समजातील गतिशीलतेचे लक्षण असू शकते परंतु त्याचा अर्थ ती समानतेची न्यायी मूर्ती आहे असा अर्थ लावणे हे नक्कीच चुकीचे ठरेल.
[या लेखातील विचार हे तत्वज्ञ मिचएल सॅनदेल यांच्या ‘द टायरनी ऑफ मेरिट’ आणि ‘जस्टीस- व्हाट्स द राइट थिंग टु डू’ या पुस्तकातून प्रभावित होऊन लिहण्यात आले आहेत. दिलेली उदाहरण हि मात्र स्वतः दिलेली आहेत. तसेच पुस्तकातील काही महत्वाचे क्लिष्ट विचार स्वतःला ज्या स्वरूपात समजण्यात आली ती सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यादरम्यान जर काही गोष्टींचा विपर्यास झाला असेल तर ती संपूर्णतःमाझी चूक असेल असे वाचकांनी समजावे. पुस्तकांतील काही वाक्य जशीच्या तशी भाषांतरित करून मांडलेली आहेत व त्या त्या ठिकाणी पुस्तकाचा उल्लेख दिलेला आहे.]
जय भीम
लेखक सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.
- फोडा आणि राज्य करा- सर्वोच्च न्यायालय आणि अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण - April 20, 2024
- छ. शाहू महाराजांनी ब्राह्मण वर्चस्वाशी केलेल्या संघर्षाचाअभिनव चंद्रचूड यांनी केलेला विपर्यास. - February 17, 2024
- द मिसएडुकेशन - January 1, 2023
Very well written sirji 👍
Very nice analysis