साहेबांचे संघटन कौशल्य: संस्मरण मान्यवर कांशीराम यांच्या जीवनाचे

देवेंद्र बनसोड

पशुतुल्य जीवन शूद्रातीशुद्रांच्या वाटेला आला असता, जगण्यासाठी अन्न वस्त्र इत्यादि करिता सवर्णांवर अवलंबून राहणे म्हणजे स्वाभिमानशून्य जीवन जगणे होय, 1845 मध्ये महात्मा जोतिराव फुलेंनी हे ओळखले. अज्ञानता नष्ट करण्याच्या दिशेने फुले नंतर बाबासाहेबांनी जी चळवळ चालविली तीच सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट होय. स्वाभिमान (आत्मसम्मान) हाच ह्या चळवळी चा गाभा होय, हे मान्यवर कांशीराम साहेबांनी अचूक हेरले होते.

पुढे बाबासाहेबांची चळवळ, त्यांच्या नंतर स्वबळावर चालणे कठीण झाले. रिपाई नेत्यांद्वारे पैसा व संसाधन जनरेट झाले नाही. आपला पैसा, आपली बुद्धी, आपली मेहनत व आपला वेळ खर्चून आत्मसम्मानाची, स्वाभिमानाची चळवळ परिणामकारक रीतीने चालविणे कांशीराम साहेबांनाच जमले. मान्यवर कांशीराम ह्यांच्यात कमालीचे संगठन कौशल्य होते. जवळपास 1971 ते 1979 पर्यन्त सातत्याने, कठीण परिश्रम घेऊन, बहुजन समजातल्या नोकरपेशा वर्गाच्या 2 टक्के लोकांनी, साहेबांना साथ दिली. ह्याच लोकांना समवेत घेऊन (BAMCEF) बामसेफ संगठन तयार केले. 1964 साली साहेबांना, बाबासाहेबांचे नाव प्रथमतः कळाले आणि 1971 पर्यन्त त्यांनी बाबासाहेबांना संपूर्णरीत्या वाचून आणि समजून घेतले होते. ह्याच अवधीत रिपाई चे चार गट पडले होते, त्यापैकी गायकवाड गटाने कॉंग्रेस बरोबर युती केली व 521 पैकी केवळ एक जागा (पंढरपूर) मिळविली. 1971 ला कॉंग्रेस तर्फे मोहन धारिया व रिपाई तर्फे दादासाहेब गायकवाड यांनी ही केलेली असमान युती, कांशीराम साहेबांना पटली नाही, व ते खूप निराश झाले.

नागपुरात, डिसेंबर 1979 मध्ये बामसेफ चे पहिले अधिवेशन असताना, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलंनांतर्गत निघालेल्या लॉन्गमार्च वर पोलिस लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्यांना, मेयो इस्पितळात बामसेफ च्या वतीने कांशीरामजी व सहकारी सोबत्यांनी रक्त दान केले.

मनुवादी (कॉंग्रेस) सत्ताधार्‍यांपुढे कोणतीही मागणी करण्याच्या कायम विरोधात कांशीराम साहेब होते. 1983 ला औरंगाबाद येथील सभेत साहेबांनी स्पष्ट केले, ‘हमें ऐसा नामांतर नहीं चाहीये’- जिथे बौद्ध व्यतिरिक्त जवळपास सर्वच जाती नामांतरच्या विरोधात आहेत. जेव्हा हा सर्व बहुजन समाज बाबासाहेबांच्या नावाला समर्थन देईल, तेव्हाच असा नामांतर आम्हाला मंजूर असेल.

बामसेफ तर्फे ऑपरेस्ड इंडियन (Oppressed Indian), बहुजन नायक, बहुजन संगठक, श्रमिक साहित्य सारख्या नियतकालिकांचे संपादन, प्रकाशन व त्याच बरोबर बामसेफ परिचय ही साहेबांनी लिहिलेली पुस्तिका, बामसेफ बूक बँक प्रोजेक्ट, को-ऑपरेटिव धरती वर, बामसेफ जनरल स्टोर्स, मेडिकल एड अँड एडवाईस सेंटर, लीगल एड अँड एडवाईस सेंटर ई. सुरू केले गेले.

6 डिसेंबर 1981 ला डी एस4 च्या स्थापने पासून संघर्षास सुरुवात झाली. ‘ओबीसी ची समस्या हीच देशाची सर्वात मोठी समस्या’, ह्या विषयावर देशव्यापी जनजागृती सुरू झाली. देशभर ह्या विषयावर सिंपोझियम आयोजित केले गेले. नागपुरात 16 जानेवारी 1982 ला, धनवटे रंगमंदिर येथे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, ह्या विषयी चर्चासत्र झाले.

24 सप्टेंबर 1982, म्हणजे पुणे कराराला 50 वर्षे पूर्ण होणार, त्याला कॉंग्रेस साजरा करणार, म्हणून साहेबांनी पुना पॅक्ट धिक्कार दिवस (Denunciation of Poona Pact) म्हणून पाळला व डिसेंबर महिन्या अखेरीस चंडीगढ पर्यन्त 25 धिक्कार परिषदा (Poona Pact Denunciation Parishad) घेण्यात आल्या. नागपुरात 3 ऑक्टोबर 1982 रोजी ही परिषद भरली होती, त्यात पहिल्यांदाच नागपुर मध्ये, मायावती सुद्धा आल्या होत्या. ह्या परिषदांद्वारे म. गांधी ची अस्पृश्य वर्गाशी केलेली दगाबाजी उघडकीस आणून, जाहिर धिक्कार करण्यात आला. परिषदांच्या काळातच शेवटी शेवटी, कांशीराम साहेबांचे वडील वारले, पण साहेबांनी गावी न जाता, कार्य सुरू ठेवले. त्यावर्षी, 24 सप्टेंबर ला साहेबांनी ह्या विषया निगडीत ‘ चमचा युग ‘ (An Era of Stooges) ही स्वतः लिहीलेली पुस्तक प्रकाशित केली.

1983 ला अन्याय मुक्त,अत्याचार मुक्त (Injustice free region) असे क्षेत्र , साहेबांनी देशभरात 5 जागी चिन्हित केले, त्यात नागपुर, सहारनपुर, होशीयारपूर, आग्रा सारख्या नगरांचा समावेश होता. त्यांनी पुढे ह्या क्षेत्रात आपल्या चळवळीचे लक्ष्य केंद्रीत केले व समाजात आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य सुरू केले. नागपुरात ह्या विषयावर परिषद, 9 ऑक्टोबर 1983 रोजी पार पडली.

6 डिसेंबर 1982 पासून 15 मार्च 1983 पर्यन्त इक्वालिटी अँड सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट (Equality and Self Respect Movement) अंतर्गत, ‘आत्मनिर्भरता, दो पांव दो पाहिये के जारिये’ सायकल मार्च चे आयोजन, देशाच्या चार ही कोपर्‍यांपासुन म्हणजे कन्याकुमारी, कोहिमा, कारगिल व पोरबंदर वरुन सुरवात करून, दिल्लीत समारोप केला. तेव्हा साहेबांनी स्वतः दिल्ली ते जम्मू हा लांब पल्ला वयाच्या 50 व्या वर्षी सायकल वर पूर्ण केला, व समाजात आत्मविश्वास जगवला.

संसदेत बहुजनांचे प्रश्न विचारात घेतले जात नाहीत , म्हणून त्यांनी ऑक्टोबर 1983 ला People’s Parilament म्हणजे जन-संसद सुरू केली व ह्या अंतर्गत नागपुरात कमाल चौक येथे जन-संसदेत बहुजनांच्या समस्यांवर ऊहापोह करण्यात आले.

बीआरसी (Buddhist Research Center) – दरम्यान 30-31 डिसेंबर ’83 ते 1 जानेवारी ’84, नागपुर च्या अंबाझरी गार्डन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या प्रांगणात 2 दिवासीय सेमिनार आयोजित करून, कांशीराम साहेबांनी बीआरसी ची स्थापना केली. 1 जानेवारी च्या खुल्या अधिवेशनात, सामान्य कार्यकर्ते व जनते समोर बुद्धिस्ट रिसर्च सेंटर चे कार्य व उद्दिष्टे ठेवण्यात आली. ह्याच सभेत भदन्त आनंद कौसल्यायन यांनी आपले उत्साही विचार मांडले.

बी एस पी स्थापने च्या अगोदर डीएस4 च्या अंतर्गत लिमिटेड पोलिटिकल अॅक्शन च्या माध्यमातून समाजात राजकीय प्रतिनिधित्व करिता जन-जागृती करण्यात आली, व ह्यातूनच एका राजकीय पक्षाची गरज निर्माण करण्यात साहेब यशस्वी ठरले. ह्यासुमारास डीएस4 नावाखाली हरियाणा व जम्मू आणि काश्मीर च्या निवडणुका लढविल्या गेल्या.

14 एप्रिल 1984 ला बी एस पी स्थापन झाल्यावरची पहिली निवडणूक म्हणजे महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघाची, आणि त्यात बीएसपी चे सर्वात पहिले उमेदवार प्रा. मा.म. देशमुख, पक्षा तर्फे महाराष्ट्र विधान परिषदेत नागपुर पदवीधर मतदारसंघात उभे करण्यात आले. प्रा. देशमुखांनी तेव्हा गंगाधर फडणवीस ह्यांना लढा दिला. त्यानंतर नोव्हेंबर 1984 ला, इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतरची लोकसभा सर्वसाधारण निवडणूक बीएसपी ने प्रथम लढविली.

14 एप्रिल 1984 ला बीएसपी ने स्थापने नंतर लढविलेली पहिली निवडणुक म्हणजे 1985 ची बिजनौर लोकसभा पोटनिवडणूक. ज्यात बीएसपी च्या मायावतींमुळे , रामविलास पासवान यांना सुमारे 5000 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा बहुजन समाज पार्टी ला 61,500 च्या जवळ मते मिळाली होती.

1985 ला कटरा चाँद खाँ बरेली ची , मुलींच्या शाळेजवळची दारूभट्टी हटविण्याकरिता बीएसपी च्या महिला आघाडी ने आंदोलन केले, त्या निमित्त साहेबांनी कॉंग्रेस चे मसीहा म. गांधी ची लकतरे काढलीत. दिल्लीत, बीएसपी तर्फे यमुना तटावरील झोपडपट्टी वासीयांसाठी फ्लॅट स्कीम अखत्यारुन, झोपडपट्यातले गलिच्छ जीवन पुर्णपणे सोडवण्या करिता आंदोलना मध्ये साहेबांनी एक नवे घोषवाक्य (नारा) देशाला ऐकवला , ‘ दो गज में हमारा वास, और हजारों एकड में मुर्दाघाट ? ‘, आणि हे चित्र बदलावे हेच ह्या आंदोलनाचे उद्दीष्ट होते.

1986 च्या हरिद्वार पोटनिवडणुकीत बीएसपी च्या उमेदवार कु. मायावतीजींनी , रामविलास पासवान ह्यांची ‘जमानत जब्त’ करवली. ह्या निवडणुकीत मायावतींना 1,25,000 च्या जवळ मते व चौथ्या नंबर वर पासवान ह्यांना 32,000 मते मिळाली होती.

1988 ला इलाहाबाद (आजच्या प्रयागराज) पोटनिवडणुकीत, व्ही पी सिंहांच्या विरुद्ध स्वतः मान्यवर कांशीराम उतरले होते. ‘ एक वोट एक नोट’, ही प्रचार यात्रा यावेळी साहेबांनी सुरू केली, व ‘राजा मांडा’ च्या ‘राजा नही फकीर है, देश की तकदीर है’ ह्या नाऱ्या वर ताशेरे ओढले.

त्याकाळी होणार्‍या प्रत्येक पोटनिवडणुकीत बीएसपी ची वाढती लोकप्रियता बघून राजीव गांधींना घाम फुटला, व त्यांनी उत्तरप्रदेशात होऊ घातलेल्या विधान सभा पोटनिवडणूका स्थगित केल्या.

9 ऑगस्ट 1990 ला देवीलाल च्या सभेत कांशीराम साहेब स्टेज वर उभे राहून, तत्कालीन पंतप्रधान आणि जनता दलाचे मुख्य नेते व्ही पी सिंहाना खुले आव्हान दिले, कि ज्यामुळे जनता दलात फाटाफुट रोवली जाणार होती. ह्याचीच धास्ती घेऊन 14 एप्रिल 1990 ला व्हीपीं नी बाबासाहेबाच्या जयंती ला राष्ट्रीय सुट्टी एका वर्षा करिता जाहीर केली (व ती आजतागायत सुरूच आहे). तेव्हाच बाबासाहेबांचा फोटो संसदेत लावला गेला व भारतरत्न हा सर्वोच्च मान बाबासाहेबांना दिला गेला. ह्या सर्व कांशीरामजींच्या बीएसपी च्या वाढत्या प्रभावला रोखण्याकरिता, जनता दलाच्या कोलांटउड्या होत्या. शेवटी जनता दलात फाटाफुट होण्याच्या आधीच भारतीय जनता पार्टी (BJP) ने आपला पाठिंबा काढून घेतला आणि व्ही पी ह्यांची पायउतारणी झाली.

बाबासाहेबांना भारतरत्न जाहिर झाल्यावर, पत्रकारांनी कांशीराम साहेबांना विचारले असता, साहेब म्हणाले होते कि, ‘ मुझे आधी खुशी ही हुयी है ‘. अर्धाच आनंद का? कारण महात्मा गांधींना अजून भारतरत्न देण्यात आलेले नाही. बापुंना मानणारी आतापर्यंतच्या सर्व मनुवादी, विषमतावादी सरकारांनी बापूंना भारतरत्न देण्या एवजी, (त्यांना सर्वात जास्त नापसंत असलेल्या) आमच्या बाबासाहेबांनाच का दिले? मला पूर्णरित्या आनंद तेव्हाच होणार, जेव्हा ही लोक बापूंना हा सन्मान देतील. परंतु ह्या लोकांनी अजूनपावेतो बापूंना राष्ट्रपिता (देशाचा बाप) बनवून ठेवला आहे. पण असे दिसते कि भारतरत्न हा सर्वोच्च मानला जाणारा सन्मान गांधींना देऊन, गांधींना इतर भारतरत्नांच्या श्रेणीत, त्यांच्या बरोबरीत, हे सत्ताधीश पक्ष आणू इच्छित नाही.

साहेबांचा ध्यास, खरं तर, केंद्रीय सत्ता काबिज केल्यावर, महात्मा जोतिराव फुल्यांना राष्ट्रपिता घोषित करणे होता. म्हणजे बाबासाहेब त्या राष्ट्राचे रत्न व्हावेत, ज्या राष्ट्राचे पिता महात्मा फुले असतील.

1992 ला मान्यवर साहेबांनी इटावा (युपी) लोकसभा पोटनिवडणूक, स्वबळावर जिंकून पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला तेव्हा लोकसभा अध्यक्षांसोबतच संपूर्ण सभागृहातील पक्ष-विपक्षांचे सांसदगण ह्यांनी आपल्या जागी उभे होऊन, साहेबांना मनःपूर्वक सन्मान दिला. माझ्या दृष्टीने भारतीय संसदीय इतिहासामध्ये हा एक अविस्मरणीय , अलौकिक क्षण होता.

संसदेची चर्चा निघालीच आहे तर, वर्तमान संसदेच्या परिस्थितीचा आढावा, माझी इच्छा नसताना ही, घेऊ या. भारतीय मीडिया ने थोपलेले वर्तमान पीएम, पुर्णपणे अयोग्य सिद्ध झाले आहेत, हे सर्वविदित सत्य आहे. देशाच्या संपूर्ण ज्वलंत समस्यांचे समाधान न करू शकणे, आणि विकासाच्या नावावर (भांडवलदारांना विकण्याकरिता) बुलेट ट्रेन, तर कधी नवे संसद भवन बनवण्याचे बहाणे, असा स्वतःचा कमकुवतपणा लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न, सरकारी पक्ष भाजप, आटोकाटपणे करत आहे. वर्तमान संसदे मध्ये चर्चा न करण्याचे सत्ताधार्‍यांचे एकूण एक बहाणे तयार असतात. पीएम व त्यांचा पक्ष संसद सत्र सुरू होण्या अगोदर एखादा असहनीय किंवा अनपेक्षित इश्यू निर्माण करून विपक्षाला भडकवण्याचे कार्य करतात. व नंतर विपक्षाची चर्चेची मागणी पीठासीन अध्यक्षा द्वारे धुडकविण्यात येते, व म्हणून विपक्ष बहिर्गमन करण्यास प्रवृत होतो, जेव्हा की वर्तमान संसद भवनात, 2014 पासून प्रत्येक सत्र व्यवधानात संपताना दिसते. तर मग नव्या संसद भावनाची गरज का? आणि आज वर्तमान संसद एक आखाडा बनलेला आहे. कदाचित सत्तापक्ष, नवीन संसद भावनास आखाड्याचा रूप न देण्यास, व सत्र नियमित चालू ठेवण्यास प्रतिबद्ध असतील, अशी आशा आपण का बाळगू नये.

6 डिसेंबर 1992 (बाबासाहेबांच्या पुण्यतिथि दिनी) ला, बाबरी मशीद विधवंसा नंतर केंद्राच्या नरसिंहराव सरकार ने यु पी च्या भाजप सरकार ला बरखास्त करून, कल्याण सिंहांना रामजन्मभूमी आंदोलनाचे हीरो बनविले. मीडिया द्वारे कल्याण सिंहानी जगभरातील राजकीय तज्ञांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. युपी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीनंतर, मुख्यमंत्री हे कल्याण सिंहच होतील असे रोज भाकीत होत असे. कांशीराम साहेबांनी, बाबरी विध्वंसाची खापर भाजप बरोबरच कॉंग्रेस (केंद्र सरकार) व सूप्रीम कोर्टावर फोडली, आणि म्हणाले कि, ‘ मै मुलायम सिंह यादव को सीएम बनाके रहुंगा’, व त्यांची ही भविष्यवाणी इतर राजकीय तज्ञांच्या भाकीतांपूढे खरी ठरली. अश्या प्रकारे साहेबांनी सर्व भविष्यवाण्या खोट्या ठरवून, मुलायम सिंह यादव ला डिसेंबर ’93 ला मुख्यमंत्री केले.

एसपी – बीएसपी युती ने युपी काबिज केल्यावर कांशीराम साहेबांनी मुंबई कडे मोर्चा वळविला. लगेच महाराष्ट्राच्या सीएम शरद पवारांनी, तडकाफडकी मराठवाडा विद्यापीठाचे नामंतर करण्याएवजी, बाबासाहेबांचे नाव जोडून , विद्यापीठाचे नाव विस्तारीत केले. साहेबांची सभा 16 जानेवारी 1994 ला मुंबईत होणार हे बघून तीळ संक्रांती ला, म्हणजे 14 जानेवारी ला, शरद पवारांनी कांशीरामजींची धास्ती घेऊन हा निर्णय घेतला, असे त्यावेळेस च्या दैनिकांनी आप आपल्या अग्रलेखातून नमूद केले.

10 जुलै 1994 ला साहेबांनी, Anti Defection Rally (दलबदल विरोधी रॅली) लखनऊ ला घेऊन, सीएम मुलायम ला चेतविले कि, तू पंचायत लेवल च्या लायकीचा ही नसताना, तुला मी युपीचा सीएम केला. बीएसपी च्या समर्थनाविना, आपली सरकार भक्कम मजबूत करण्याच्या प्रयत्नात, मुलायम ने, बीएसपीत फूट पडण्याचा डाव, डॉ मसूद अहमद (बीएसपी कोट्याचे शिक्षण मंत्री), ह्यांना हाताशी घेऊन, युतीधर्म भ्रष्ट केला. लगेच होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकीत सुद्धा मुलायम ह्यांनी, गुंडगिरीने बीएसपी ला नुकसान पोहचविले होते. म्हणून साहेबांनी दलबदल विरोधी रॅली घेऊन, बीएसपी आमदार पुर्णपणे संगठीत आहेत, व डॉ मसूद हा ‘ खोटा मुसलमान ‘ आहे हे लोकांपुढे आणले, आणि मुलायम ला सीएम म्हणून जीवनदान देऊन त्याला त्याची जागा दाखवून दिली. इथे साहेबांनी स्पष्ट म्हटले कि, ‘मीडिया में क्या खबर चलानी है, वो हम तय करेंगे’.

पुढे नऊ-दहा महिन्यांनंतर, 2 जून 1995 ला, इस्पितळातून सूत्रे हलवित कांशीराम साहेबांनी , एसपी बीएसपी युती तोडून, भाजप च्या समर्थनाने , बहन मायावतीजींना, 3 तारखेला युपी च्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा आसिन केले. तेव्हा साहेबांचे घोषवाक्य होते, ‘ मैं सबसे बडा मौकापरस्त हूँ. राजनीति में सभी मौकापरस्त होते हैं, लेकिन कोई स्वीकार नहीं करता’. तेव्हा अस्वस्थ झालेल्या मुलायम ने, गेस्ट हाऊस कांड घडवून आणले. बीजेपीच्या त्रिमूर्तींनी लगेच केंद्र सरकार व राज्यपालावर , जबरदस्त दबाव आणून, मुलायम ला बरखास्त करविले. मायावतीजींनी हे साढे चार महिन्याचे हे सरकार, अविरत मेहनती ने बहुजन समजाच्या हिताचे निर्णय घेत, त्यांच्या प्रेरणास्त्रोत (icon) महापुरुषांची स्मारके, पार्क इत्यादि बनविण्याचा धडाका चालविला. बीजेपी ला अश्यारीतीने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागला. शेवटी बीजेपी द्वारे समर्थन काढून घेण्या अगोदरच , मायावतीजींनी 17 October ’95 ला सीएम पद स्वतः सोडून, वि.स. निलंबित केली. ह्या दरम्यान, कांशीराम साहेबांनी, पेरियार जयंती निमित्त, महात्मा गांधी सोबत भगवान रामाची पण आलोचना केल्याचा बहाणा बीजेपी ने लाऊन धरला.

1996 ला लोकसभे सोबत, पुन्हा युपी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या. पुन्हा हंग असेम्ब्ली. कॉंग्रेस सोबत निवडणूक पूर्व युती करून, युपी वि.स. निवडणूक बीएसपी ने लढविली, पण बीएसपी ला काहीच लाभ झाला नाही. 425 असेंबली सीट पैकी कॉंग्रेस ला 100 जागा देऊन, तिला पिछ्लग्गु पार्टी बनवून, 1971 च्या पुणे इथे झालेल्या राष्ट्रीय युतीच्या घातीचा बदला साहेबांनी घेतला. ह्यावेळेस, काही महीने गेल्यावर, 21 मार्च 1997 ला, बीजेपी च्या समर्थनाने मायावती दुसर्‍यांदा सीएम झाल्या. ह्यामागचे चित्र असे कि, बीजेपी चे दिग्गज जोशी आणि आडवाणी ह्यांनी, साहेबांच्या दारी येऊन, प्रेस वार्ता च्या मध्यमातून सहा-सहा महिन्यांचे सीएम पद वाटून सत्तेत भागेदारी जाहीर केली. ह्यात बहन कु. मायावतींना पहिले 6 महीने मिळाले. हे सहा महीने सुद्धा बीजेपी ला तोंड दाबून बुक्क्याचा मार साबीत झाले. बीएसपी ला समर्थन देणे, बीजेपी करिता ‘गले की हड्डी’ ठरले. मायावतींनी मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा उचलून बहुजन समाज हिताचे कार्य व स्मारके उभारणे सुरू ठेवले. नंतर 6 महिन्यांनी, सत्ता हस्तांतरण कल्याणसिंहाला (बीजेपी) करून युतीधर्म प्रामाणिकपणे पाळला. जेव्हा कि, बीजेपी हाय कमांड (त्रिमूर्ति) मायावतीजींना सीएम पदावर अविरत ठेवण्याचे व त्यांच्या सोबत राष्ट्रपातळीवर चुनावी गठ्जोड करण्याच्या विचाराचे होते. 2002 ला मायावती, तिसर्‍यांदा सी एम झाल्या (बीजेपी च्या समर्थनाने). त्यावेळेस गुजरात दंगली शांत झाल्या होत्या. बीजेपी ने त्यांना पुन्हा समर्थन दिले होते. युपीच्या निवडणुका लोटून सहा-सात महीने झाल्यावर, म्हणजे बहनजी सीएम होण्याची बातमी मिळताच , अटल सरकारात केंद्रीय मंत्री असलेले, रामविलास पासवान हे फारच नाराज झाले, व 30 एप्रिल 2002 ला त्यांनी राजीनामा दिला. पण राजीनामा देण्याचे कारण वेगळे संगितले, ते म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2002 च्या गुजरात दंगली. मायावतीजींनी हे सरकार 25 ऑगस्ट 2003 पर्यन्त चालविले. ह्या कार्यकाळात बहनजी नी कोल्हापुरात, 26 जुलै 2002 ला येऊन, छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव, बीएसपी द्वारे साजरा केला. ह्या तिसरा कार्यकाळात सुद्धा कांशीराम साहेबांच्या छत्रछाये खाली, बीएसपी चा एजेंडा राबविण्यात आला, म्हणजे ‘बीजेपी की छाती पर मूंग दलना’ सिद्ध झाले.

15 सप्टेंबर 2003 ला हैदराबाद येथे, साहेबांना मेंदू रक्त्स्त्राव (brain hemorrhage) झाल्यामुळे, तब्बल 3 वर्षे बहनजींच्या देखरेखे खाली, साहेबांची पूर्ण मेडिकल ट्रीटमेंट होत राहिली. त्यावेळेस धिरूभाई अंबानी हे ब्रेन हॅमरेज ने लगेच चालते झाले, पैसा व विदेशी तज्ञ डॉक्टर जागेवरच राहले. पण साहेबांना तीन वर्षापेक्षा जास्त दिवस योग्य उपचारांमुळे जगता आले. साहेबांनी 9 ऑक्टोबर 2006 ला, आम्हास , बीएसपी चळवळी ला आणि मिशन ला मार्गी लाऊन ह्या जगाचा निरोप घेतला. सप्टेंबर 2003 ला चंद्रपुर येथील ओबीसी सभा, ही त्यांची शेवटची जाहीर सभा ठरली.

देवेंद्र बनसोड

लेखक मूळचे गोंदिया चे असून, नागपूर येथे स्थायिक आहेत. 1979 पासून BAMCEF, DS4 व आता BSP चळवळीत ते काम करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*