राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे

प्रत्येक देश हा त्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजांमुळे तयार होत असतो. त्या समाजात असणाऱ्या चालरीतींमुळे त्या देशाची संस्कृती तयार होत असते. आणि कुठलीही संस्कृती तयार व्हायला अनेको वर्षे जावी लागतात. नवी संस्कृती/जीवनपद्धती ही काही आभाळातून पडत नाही. आधीच्याच संस्कृतीतील टाकाऊ व कालबाह्य चालीरीती टाकून देवून, नव्या कालसुसंगत पद्धती स्वीकारल्या जातात, तसेच आपल्यापेक्षा जास्त विकसित असलेल्या संस्कृतींमधून देखील काही गोष्टी स्वीकारल्या जातात आणि अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतूनच आधीच्या संस्कृतीपेक्षा जास्त विकसित नवी संस्कृती तयार होते. स्वतःला कालानुरूप बदलणारी आणि नवतेचं स्वागत करणारी संस्कृतीच काळाच्या झंझावातातही टिकून राहते, पण समजा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा बाह्य हिंस्र आक्रमणांमुळे जरी अशी संस्कृती नष्ट झाली, तरी तीची जागा घेणारी नवीन संस्कृती देखील त्या अस्तंगत झालेल्या संस्कृतीच्याच गर्भातून उगम पावते. आणि ह्या नव्या संस्कृतीत त्या जुन्या संस्कृतीतील अनेक चालीरीती आहेत तशाच किंवा काही बदल करून स्वीकारल्या जातात. उदाहरणार्थ, अरब मुसलमानांच्या काही चालीरीती ह्या इस्लामीकरणाच्या आधी पासूनच्या आहेत. इराणमधे आजही पूर्वीच्या पारशी धर्माच्या चालीरीती दिसतात कारण ते लोक आजही नवरोज साजरा करतात.
अनेक वर्षे ‘टिकून’ राहिली, परकीय आक्रमणांना तोंड देवून ही शाबूत आहे, म्हणजे फक्त ‘टिकून राहणे’ हा काही ती संस्कृती किंवा तो धर्म महान असल्याचे द्योतक नाही. जर ती संस्कृती वा धर्म जगाला काही नवं देऊ शकत नसेल, स्वतः बदल करू शकत नसेल तर ती संस्कृती, तो धर्म महान आहे, असे म्हणणे चूकीचे आहे.
जेव्हा एखादी प्रगत संस्कृती नष्ट होते किंवा नष्ट केली जाते, तेव्हा तिच्या नष्ट पावलेल्या अवशेषातूनच नवी संस्कृती तयार होते. त्यामुळे बळ आणि आक्रमणाच्या जोरावर तिला नष्ट करणाऱ्या लोकांना ती संस्कृती पुन्हा अवतरेल ह्याची सतत भीती वाटत असते. कारण तिच्या भौतिक खानाखुणा जरी नष्ट केल्या तरी तिला मानणाऱ्या आम जनतेच्या मनात तिची बीजं कायम राहतात आणि कधीतरी ही नष्ट केलेली संस्कृती जगासमोर येतेच येते. रानटी मंगोलांनी अनेक संस्कृती नष्ट केल्या, पण आज त्या संस्कृती पुन्हा अभ्यासल्या जात आहेत, म्हणजेच त्या आजही जीवंत आहेत. पण मंगोलांचं काय? इतका मोठा प्रदेश जिंकूनही आज एका चतकोर राष्ट्रापुरते ते मर्यादित आहेत. काळाच्या एका टप्प्यावर स्पेन हा एक इस्लामी प्रदेश होता. पुढे तिथल्या ख्रिस्ती राजवटीने बळाच्या जोरावर तो देश पुन्हा ख्रिश्चन धर्मी केला. पण अनेकांनी लपून-छपून जुन्या चालीरीती आजतागायत चालू ठेवल्या आहेत.
इतका सगळा पसारा सांगण्याचं कारण म्हणजे, जुलूम आणि बळाच्या जोरावर जर एखादी संस्कृती वा धर्म नष्ट केला तरी ती संस्कृती, तो धर्म कधीच नष्ट होत नाही. आणि जर तो धर्म त्या प्रदेशातील जनसामान्यांनी मनापासून आचरला असेल, तर कितीही भ्रष्ट केला तरी ही तो आपले अस्तित्व कायम राखतो.
उदाहरणार्थ, बौद्ध धम्म.
जगातील अनेक लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, की ज्या भूमीवर तथागत जन्माला आले, त्या भूमीतून बौद्ध धम्म हद्दपार कसा काय झाला? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.पण मला तर नाही वाटत की, बौद्ध धम्म किंवा तथागत बुद्ध हे हद्दपार किंवा नष्ट झालेत म्हणून आणि भविष्यात पण असं काही होईल म्हणून. कारण बुद्ध आणि त्याचा धम्म हे कधीच नष्ट होणार नाहीत, तर नव्या स्वरूपात, विचारात ते सतत उगवत राहणार आहेत.
जगातील काही धर्मांनी त्यांच्या प्रचार-प्रसारासाठी तलवारीचा वापर केलाय. पण बुद्ध हा जगातील एकमेव असा व्यक्ती होता, की ज्याने रक्ताचा एकही थेंब न सांडता, कुठल्याही जोरजबरदस्ती विना आपला धम्मविचार जगातील एका मोठ्या भूभागावर पसरवला. ज्या काळात बुध्दाचा जन्म झाला, त्या काळी प्रचलित असणाऱ्या धर्माचा पाया हा असमानता व अन्याय हाच होता. निसर्ग जर स्त्री-पुरुष वगळता इतर कसलाही भेद मानत नसेल, तर माणसा-माणसात फक्त जन्माच्या आधारावर भेदभाव करणे, हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. सर्व मानव जर एकाच पद्धतीने जन्माला येत असतील तर असा भेद करणे अनैतिक असून प्रत्येक व्यक्ती ही जन्मतःच स्वतंत्र आहे आणि समानता व न्याय हाच निरोगी समाजाचा पाया आहे, हे तत्वज्ञान बुध्दाने सांगितले. कुठल्यातरी काल्पनिक शक्तीची भीती दाखवून, वर्तमानापेक्षा येणारा पुढील जन्म सुखकर व्हावा, म्हणून कर्मकांड करणे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि हे सर्व व्यर्थ असल्याचे त्याने सांगितले. ज्या समाजाच्या जीवीकेचा आधार हा शेती-पशुधन आहे, त्या पशूंचा बळी देणे, म्हणजे आर्थिक नुकसान तर आहेच आहे पण ती एक हिंसा आहे आणि या असल्या कर्मकांडाना काही अर्थ नाही, हे त्याने निक्षून सांगितले. मागच्या-पुढच्या जन्माचा विचार करत बसण्यात वेळ घालवणे चुकीचे आहे. सामान्य लोकांचा इतका विचार करणारा बुद्ध हा जगातील पहिलाच प्रेषित होता. आपला समता, न्याय व बंधुतेचा संदेश त्याने कुठल्यातरी अगम्य नाही तर जनसामान्यांना समजेल अशा भाषेत दिला. त्याच्या उपदेशात स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, देव आहे की नाही? आत्मा-परमात्मा ह्या गोष्टींपेक्षा सध्याचे जीवन कसे दुःखमुक्त करता येईल, यावरच जास्त भर असायचा. या सर्व कारणांमुळे बुद्ध आणि त्याचा धम्म त्याकाळच्या एका मोठ्या जनसमुदायाला अगदी सहजपणे अपील झाला. जन्माधारीत भेदभावांनी ग्रस्त असणाऱ्या समाजात हा विचार एक नवीन झुळूक होता. त्यामुळे फार कमी वेळात हा विचार अनेकांनी अंगीकारला. जनसमानतेवरच बुध्दाने भर दिल्याने व सर्व कर्मकांडाना नकार दिल्याने, त्यावेळी बळकट असलेल्या वैदिक धर्मव्यवस्थेला मोठा झटका बसला. त्यामुळे तर बुध्द आणि त्याच्या धम्म संपविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. आणि अतिशय हिंस्र पद्धतीने हा धम्म आणि त्याच्या खानाखुणा संपवण्यात आल्या. पण तरीही तो पूर्णपणे संपवण्यात त्यांना अपयश आले.
फक्त भारतच नाही तर अगदी आजच्या इराण-अफगाणिस्तानापर्यंत हा धम्म पसरला होता. आज जरी इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान इस्लामी राष्ट्रं असली, तरीही तिथे होणाऱ्या उत्खननांमध्ये आजही बुद्धच सापडतो आणि सापडत राहील. मी आधी म्हटल्याप्रमाणे, बुद्ध आणि त्याचा विचार हा नेहमीच समोर येत राहील.
हे सर्व लिहिण्याचे कारण आहे आजचा दिवस. धम्मचक्र-प्रवर्तन दिवस.


बुद्ध आणि त्याच्या धम्माला संपवण्याचे प्रयत्न हे त्याच्या हयातीतच सुरू झाले होते. पण या प्रयत्नांना आधीही कधी यश मिळाले नव्हते आणि पुढे ही कधी मिळणार नाही. कारण इतका बुद्ध आणि त्याचा विचार या मातीशी एकरूप झालेला आहे. कुठेही उत्खनन करा, तुम्हाला तोच सापडेल. सह्याद्रीच्या घनदाट अरण्यातील गूढ शांततेतही तुम्हाला ‘बुध्दम् शरणम् गच्छामि’ चा घनगंभीर स्वर ऐकू येईल. जरा मनाची आणि बुद्धीची दारं खोला, मग पाहा, इथल्या अनेक प्रसिद्ध मंदिरांत, चालीरीतींमध्ये, तत्त्वज्ञानात, लेण्यात तुम्हाला तो सापडेल. इतका तो आपल्याशी एकरूप झालाय. पण एक गोष्ट खरी की, त्याने जी रक्तरहित क्रांती केली, त्यामुळे ज्यांची दुकानं बंद झाली आणि सामाजिक वर्चस्वाला सुरुंग लागला, त्यांनी खूप क्रूरपणे बुध्द आणि बौद्ध धम्माला दाबून टाकले होते, झाकून आणि भ्रष्ट करून टाकले होते. त्यामुळे त्या तथागताची आणि त्याच्या सद्धम्माची पुन्हा ओळख होण्यासाठी आपल्याला आंबेडकरांची मदत झाली. आंबेडकरांनी फक्त आपल्यावरच नाहीत तर संपूर्ण मानवजातीवर फार मोठे उपकार केले आहेत. तसं पाहायला गेलं तर बुद्ध आणि त्याचा धम्म मान्यतेसाठी कुणाचे मोहताज नाहीत, पण बुध्दाच्या व्यक्तिमत्वावर चढवलेली नवव्या अवताराची पुटं झाडून त्याची एक तुमच्या-आमच्यासारखाचं पण असामान्य ‘माणूस’ म्हणून नव्याने ओळख करून देण्याचे आणि त्याच्या तत्त्वज्ञानात झालेली वैदिक भेळमिसळ काढून बौद्ध धम्म विचार शुद्ध स्वरूपात मांडण्याचे श्रेय मात्र बाबासाहेब आंबेडकरांचेच आहे. हा आपला जुनाच तथागत सिद्धार्थ गोतम बुद्ध त्याच्या शुद्ध रुपात आपल्याला परत दिल्याबद्दल आपण बाबासाहेब आंबेडकरांचे कायम आभारी राहू.
ज्या व्यक्तीला न्याय, समता, बंधूभाव, स्वातंत्र्य या मूल्यांची जाण आहे आणि जो बदलांवर विश्वास ठेवतो, वैचारिक स्वातंत्र्याची कदर करतो, त्या व्यक्तीला बुद्ध आणि त्याचा धम्म आपला वाटतो. बुध्दाने सक्तीने नाही तर मनपरिवर्तन करून आपला धम्म प्रसारित केला. जगात सर्व गोष्टी बदलणाऱ्या म्हणजेच अनित्य आहेत, त्यामुळे आपल्या तत्वज्ञानात, त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लागता कालानुरुप बदल करता येईल इतकी लवचिकता बुद्धाने ठेवली. आणि ‘केवळ मी सांगतो’ तेवढेच आणि तेच ऐका आणि आंधळेपणाने माझ्या उपदेशाचे पालन करा, असे न सांगता, माझा उपदेशही तर्काच्या, काळाच्या आणि व्यावहारिकतेच्या कसोटीवर घासून मगच आचरणात आणा, असा सल्ला ही दिला. मी पण माता-पित्याच्या पोटी जन्म घेतलेला मानवचं आहे, कोणी देवदूत नाही. असा पवित्रा घेणारा तो ‘माणसातला’ प्रेषित होता. या सर्व कारणांमुळे तो सर्वांना आपला वाटतो.
आपण ज्या धर्मात जन्म घेतो, तो धर्म प्रत्येकाला जीवापेक्षा प्यारा असतो. सहजासहजी कुणी आपला धर्म त्यागून दुसरा धर्म स्वीकारत नाही. त्यामुळे तर हिंदू धर्मात असणाऱ्या आणि त्या धर्माला अमानवी आणि क्रूर, अनैतिक बनवणाऱ्या जातीव्यवस्थेला नष्ट करून, त्याला एका नैतिक चौकट आणि मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी केला. हिंदू धर्मातच दलित समूहाला भेदभाव-विरहित मानाचे स्थान आणि समान सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकार मिळावेत म्हणून सुधारणा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण “जात” हाच ज्या धर्माच्या अस्तित्वाचा पाया आहे, त्या धर्माच्या ठेकेदारांनी आंबेडकरांच्या सर्व प्रयत्नांना विरोध करून आम्ही बदलणार नाही, हे उक्ती आणि कृतीने दाखवून दिले. आणि हा धर्म त्यागायला त्यांना अक्षरशः भाग पाडले. आणि केवळ हिंदू धर्मात ‘टिकून’ राहण्यासाठी आपल्या स्वाभिमानाशी समझोता करायला नकार देत, आपल्याला माणूस म्हणून ही साधी ओळख व इज्जत नाकारून, आपली आणि दलित समाजाची हरप्रकारे कोंडी करून गुदमरून टाकणारा हिंदू धर्म त्यागण्याच्या निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे हिंदू धर्मात ‘फूट’ पाडून तो धर्म खिळखिळा केला, म्हणून जे लोक आंबेडकरांना ‘धर्मद्रोही’ म्हणणात त्यांनी आधी ही सर्व परिस्थिती लक्षात घ्यावी.
एक साधं उदाहरण. समजा एका व्यक्तीला दोन घरांच्या समोर उभं केलं. एका घरात त्या व्यक्तीला फक्त अपमान, उपेक्षा, अतोनात कष्ट, अत्याचार आणि उपासमार मिळेल तर दुसऱ्या घरात पैसा-आडका नाही, पण मान-सन्मान, शारीरिक-मानसिक स्वातंत्र्य आणि सर्व प्रकारच्या विकासाची संधी, भेदभाव-विरहित समतेची वागणूक मिळेल. मग कुठलाही शहाणा माणूस पहिल्याऐवजी दुसऱ्याच घरात जाणं पसंत करेल. त्यामुळे धर्म त्यागाचा निर्णय घेवून आंबेडकरांनी कुठलीही चूक केलेली नाही. त्यामुळे ‘तुम्ही धर्मांतर का केले? ‘ हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार कुठल्याच वैदिक हिंदूला नाही. जर त्यांना कुणाला प्रश्न करायचाच असेल, तर त्यांनी हा प्रश्न, की दलित हिंदू धर्म का सोडत आहेत? सरळ सरळ ह्या धर्माच्या ठेकेदार असलेल्या उच्चवर्णीय जातींना विचारावा. स्वतःला हिंदूंचा तारणहार समजणाऱ्या संघाचे सरसंघचालक असणाऱ्या मोहन भागवतांनी देखील हा प्रश्न स्वजातीला विचारावा आणि जात नष्ट करणे हा कार्यक्रम संघाच्या अजेंड्यावर घ्यावा. उगाच ‘समरसतेच्या’ बाजारगप्पा करण्यात वेळ दवडू नये.
आंबेडकरांना बुद्ध-चरित्राची ओळख शाळकरी वयातच झाली होती. त्यामुळे बुद्ध त्यांना नवा नव्हता. बुध्दाने नेहमी मानवता आणि समतेवर भर दिला. त्याचा धम्म मनोविकासाला वाव देतो. त्यामुळे मुळातच प्रखर मानवतावादी असलेल्या आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्म स्वीकारला. हा धम्म ह्या मातीतला आहे, त्यामुळे बुद्धाकडे जाणे म्हणजे परत आपल्या मुळांशी जोडले जाणे आहे, म्हणून परकीय मातीत उगम पावलेले धर्म टाळून आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. याला आणखी एक महत्त्वाचे कारण की, बुद्ध आत्मा नाकारतो, त्याच्या धर्मात अशी कुठलीही तत्त्व नाहीत, की जी बदलता येणार नाहीत. म्हणून तर कालानुसार सुसंगत राहील असा हा विज्ञानवादी धम्म आहे. देव आहे की नाही? अशा निरर्थक वादात बुद्ध पडत नाही.
असा हा माणूसपण देणारा धम्म स्वीकारुन आंबेडकरांनी फार मोठी क्रांती केली. जुन्या धर्मातील हीन दर्जाने दिलेला न्यूनगंड दूर करून एक नवी ओळख त्यामुळे दलित समुदायाला मिळाली. जातीच्या उतरंडीत खाली दबलेल्या समाजाला स्वत्वाची जाणीव, एक नवीन जीवनपद्धत, नैतिक बळ ह्या धर्मांतरामुळे मिळाले. समुदायाच्या विकासासाठी त्याला नैतिक चौकट आखून देणे गरजेचे आहे, म्हणून तर आंबेडकरांनी बौध्द धम्मासोबत बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत.
काही लोक खोडसाळपणे विचारतात की, धर्म बदलून तुम्हाला काय मिळाले? त्यांना मी इतकेच सांगेन की, कसलीही ओळख नसलेल्या, आत्मविश्वास नसलेल्या समाजाला एक नवी ओळख यामुळे मिळाली आहे. ज्या लोकांना कोरोना झाला होता आणि पार आँक्सिजन लावण्याची वेळ आली होती, त्या लोकांना विचारा, की श्वास गुदमरल्यावर कसं वाटतं? तसाच अनुभव हिंदू धर्मरूपी कोरोनाचा त्रास हजारो वर्षांपासून सहन करणाऱ्या दलितांच्या वाट्याला येत होता आणि त्यांच्यासाठी बुद्ध आणि त्याचा बौद्ध धम्म हा आँक्सिजन आणि आंबेडकर हे उपचार करणारे डॉक्टर ठरले.
हे धर्मांतर म्हणजे काय लगेच पैसा देणारी लाँटरी नव्हती. मग या बदलाने दिले तरी काय? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तर तूप खाल्ले की लगेच रुप येत नाही. प्रगती आणि आर्थिक उन्नती होण्यासाठी संधी आणि अवकाशाची गरज असते. त्यासोबतच पाहिजे असतो तो आत्मविश्वास. एखाद्या विद्यार्थ्याला कितीही ट्यूशन्स वगैरे लावल्या पण त्याच्याकडे आत्मविश्वासच नसेल तर तो काहीच शिकणार नाही. तसंच एखाद्या खेळाडूकडे /कलाकाराकडे गुणवत्ता आहे, पण संधी नाही, तर तो चमक दाखवूच शकणार नाही. तर इथे गरजेचा असणारा आत्मविश्वास आणि संधी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ठळक ओळख’ या एका बदलाने दिली. नाहीतर मागच्या जन्माचे पाप म्हणून, नशीब म्हणून अत्याचार सहन करणाऱ्या समाजाला मागील जन्म-पुढील जन्म हे सर्व फाट्यावर मारणाऱ्या बुद्धाने हा Guilt complex काढायला मदत करून नवा rational approach दिला. त्यामुळे अस्पृश्यता हा शाप नसून बामणी फास आहे आणि तो झुगारलाचं पाहिजे, ही समज दलितांना आली.
धर्मांतर होताच गावोगावी दलितांनी पिढीजात लादलेली महारकीची कामे एका फटक्यात सोडली. तसेही ही असली मानहानी करणारी कामं सोडा, असा सल्ला आंबेडकरांनी आधीच दिला होता. पण आता दलित हिंदू नाही तर बौद्ध आहेत, त्यामुळे ही कामं करण्यासाठी आता त्यांना कुणी ही जबरदस्ती करू शकणार नव्हते. जी कामं करण्यामुळे आत्मविश्वास खच्ची होत होता, तीच कामं आता झुगारून टाकल्यामुळे एक नवा विश्वास आणि स्वाभिमानाची भावना दलितांच्या मनात निर्माण झाली. बस, गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, मग तो आपोआप बंड करून उठतो. ती जाणीव तर आंबेडकरांनी त्यांच्या लेखन आणि कार्याच्या माध्यमातून करून दिलीच होती, पण त्या बंडासाठी लागणारा आत्मविश्वास बुद्धाने दिला.
पासष्ट वर्षांचा कालावधी हा काही फार मोठा नाही. या कालावधीत खूप नाही तरी नजरेत भरेल इतकी प्रगती बौद्ध समाजाने नक्कीच केलेली आहे. आज मानवाधिकारांबद्दल सर्वात जास्त जागरूक असा समाज हा बौद्ध-आंबेडकरी समाज आहे. हे काही मी फुशारकी म्हणून सांगत नाही. देशात कुठेही वंचित समाजावर अत्याचार होऊदे, त्या विरोधात सर्वात आधी रस्त्यावर उतरणारा समाज हा बौध्द-आंबेडकरी असतो. दलित समाजावर अन्याय झाला, तर त्या अन्यायग्रस्त समाजाची जात कुठली? असा हलकट प्रश्न न करता पोरा-बाळा-बायकांसोबत हाच समाज रस्त्यावर येतो. आरक्षणाच्या लढाईत ही कुठली पोरं लाठ्या खायला पुढे होतात ते ही पाहा. कारण काही ही झाले तरी अन्याय सहन करायचाच नाय, ही शिकवण आणि आत्मविश्वास ह्या एका धर्मांतरामुळे आलाय.
आजही खेडेगावात सरपंचपद जर SC साठी राखीव झाले, तर त्यावर बौद्ध-आंबेडकरी समाजातील व्यक्तीची निवड करणे टाळण्याकडेच जातदांडग्यांचा कल असतो. कारण आपल्या संवैधानिक-राजकीय हक्कांप्रती हा समाज खूप जागरूक झालाय. एक नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडतानाच आपले राजकीय अधिकारही वाजवून वसूल करण्याची ताकद या समाजाला 1956 च्या 14 October मुळे मिळाली आहे. समजा उद्या जर का या देशावर ब्राह्मणी धर्मसत्ता आली, तर त्या विरोधात संविधानप्रेमी कार्यकर्त्यांना साथ द्यायला हाच समाज एका हातात आंबेडकरांची तसबीर आणि दुसऱ्या हातात संविधान घेवून उतरेल हे मी खात्रीने सांगतो.
आता या धर्मांतरामुळे आर्थिक-भौतिक फायदा काय झाला? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी सर्व संसाधनांवर असलेला ताबा सोडावा. आणि त्यांचे समान वाटप करावे अन् मग हा प्रश्न करावा.
केवळ धम्म स्वीकारला म्हणून कुणी बौध्द होत नाही. कारण “बौद्ध होणे” ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आधी स्वर्गप्राप्ती /मोक्ष ही ठराविक जातींची मक्तेदारी होती, पण बुध्दाने तर स्वर्ग/मोक्ष नाकारत ‘निर्वाण’ म्हणजे मनुष्यत्वाच्या कुठल्याही आसक्ती, भय विरहित परिपूर्ण अवस्थेवर भर दिलाय. आणि कुठलाही मनुष्य, म्हणजे अगदी तुम्ही आम्ही सुध्दा “बुद्ध” म्हणजे “परिपूर्ण ज्ञानी” होऊ शकतो, असा निर्वाळा ही दिलाय. त्यामुळे बौद्ध धम्म हा एक मार्ग आहे अधिक चांगला माणूस बनण्याचा, ह्या मार्गाचा मार्गदाता/मार्गदर्शक आहे तथागत सिद्धार्थ गोतम बुद्ध. कारण बुद्धाने स्वतः ला देव नाही तर मार्गदर्शक म्हटलेलं आहे. त्याच्या धम्माची ओळख आहे, चक्र, ज्याला आपण धम्मचक्र म्हणतो. चक्र हे निरंतर फिरत असते, त्याप्रमाणे बौद्ध व्यक्ती ही निरंतर स्वतः मध्ये बदल घडवत असते. कारण ‘अत्त दिप भवः’ हा बुद्धाचा उपदेश आहे.
ही धम्मज्योत आपला विकास तर करेलच, पण 14 October 1956 रोजी बाबासाहेबांनी आपल्या हातात धम्मरूपी मशाल दिली आहे. आणि ही मशाल ज्ञानाचा, मानवतेचा, समता-न्याय-स्वातंत्र्य-बंधुतेचा शीतल प्रकाश संपूर्ण देशात पसरवेल आणि ह्या सर्व तत्वांच्या उजेडात सारा भारत अज्ञान, जातीयतेचा अंधार दूर करून खऱ्या अर्थानं “बौद्धमय” होईल आणि बौध्द होण्यासाठी कुणाला दिक्षा घेण्याची गरज नाही. मनातून भेदभाव काढून टाका, प्रज्ञा-शील-करुणा या त्रिसरणावर विश्वास ठेवा, तुम्ही ही बौद्ध व्हाल.
धम्म-चक्र-प्रवर्तन दिनाच्या अनेक शुभेच्छा.
राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे
लेखक स्वतंत्र संशोधक आहेत

Leave a Reply