डॉ. प्रतिभा अहिरे
(फेक फेमिनिस्टाना कोलून)
मॅडम,
तुम्ही दादाचं काय म्हणताय,
आई,ताई,सईच काय इव्हन मलासुद्धा ठाऊक नसतो हो तुमच्या “सो काॅल्ड ” फेमिनिजमचा ‘फ ‘
आम्ही शतकानुतके हेतूतः गावकुसाबाहेर फेकेल्या गेलेली सुर्यफूलं
आता जगच बनलंय म्हणता खेडं
आपसूकच जगाच्या वेशीबाहेर….
राजवाडा.. महारवाडे..ते भीमनगर, प्रबुद्ध काॅलनी
या खडतर प्रवासात आमचं आधार कार्ड अन् पास
फक्त ‘जयभीम’
आमचा घास,श्वास खरंच फक्त जयभीम ….
आजही भाकरी,नोकरीच्या फ्रंटवरंच लढतोय
आमचा दादा….
वस्त्या,गावं जाळली जातात,लेकीबाळींची मायांग चावडीवर फाडली जातात…
तिथं तिथं हा उभा होतो मोर्चा आंदोलन होऊन ,
लढतो समशीर घेऊन…
प्रतिगामी, मनुवादी व्यवस्थेशी भिडतो तळहातावर शीर घेऊन…
तुमचं म्हणणं अगदी खरंय मॅडम,
याला ठाऊकच नाहीय फेमीनीझमचा ‘ फ’
हा अस्तित्वाच्याच लढाईत गर्क….
जयभीमचा रिंगटोन लावल्यामुळं हा कत्ल केला जातो,
सवर्णाच्या पोरीशी प्रेम केल्यानं मारला जातो,
तुकडे तुकडे केले जातात ह्याचे आरा मशीनमधे….
खून करून याचा देह शौचकुपात फेकला जातो….
पण तुमचं म्हणणं अगदी खरंय मॅडम,
ह्याला ठाऊकच नाहीय हो तुमच्या सो काॅल्ड फेमीनीझमचा ‘फ ‘
ह्यानं वाचली नाही कधी ‘सीमाॅन दि बोव्हा’
ह्याला ‘बेटी फ्रिडन ‘माहीती नाही,
‘ऍनओक्ले ‘ माहीती नाही…
काही काहीच माहित नाही….
रोजीरोटीच्याच विवंचनेत अडकलेला
Theory अन् concept च्या कोसों दूर असलेला….
मी करणार नाही त्याचं कसंलंही समर्थन
तो स्वतःची चड्डी धुत नाही अजूनही म्हणून…
पण.. तरीही जरा आसपास निरपेक्ष नजर टाका,
मानवी हक्काच्या तमाम चळवळीचा
हाच दिसेल तुम्हाला खंदा समर्थक, कार्यकर्ता
कोणत्याही चळवळीचा डाटाबेस निरपेक्षपणे गाळून पहा, खंगाळून पहा …
हाच दिसेल आसपास 100% हमखास …
फुले आंबेडकरी आंदोलन असो की बाबा आढावचं
‘एक गाव एक पाणवठा’,
‘दलित पॅन्थर’ असो की ‘मास मुव्हमेंट’
‘अनिस’ असो ‘मुलगी झाली हो ‘
स्रीमुक्ती आंदोलन असो, की तुमच्या ह्या फेमीनीझमची
द्वारसभा….
हातात बॅनर घेऊन हाच असतो ठामपणे उभा….
हा असा नाॅन अकेडेमीक person
कोणताही डिसकोर्स वाचून नाही हा activist झाला
झालेल्या अन्यायाविरूद्ध हा रस्त्यावर आलाय….
नसेल माहीती त्याला बोवा,ओक्ले
पण त्याला सांख्य विचारा,लोकायत विचारा,
फुले शाहू आंबेडकर,आगरकर विचारा,
शिवाजी विचारा ,जिवाजी विचारा…
मुक्ताबाई विचारा,जनाबाई,रमाबाई,,ताराबाई विचारा
आपल्या मातीतली माणसं ,त्यांचं जगणं वाचत अन् आंदोलन लढत मोठा झालाय हा….
तुमचा कोणताही डिसकोर्स वाचून हा अॅक्टिव्हीस्ट नाही झालाय…
अन्यायाविरूद्ध डरकाळत हा रस्त्यावरती आलाय….
ते जाऊ द्या मॅडम,
आपण नक्की कुठल्या मॅडम ?
Otherwise घेऊ नका ,
बाईला मातृभूमी नसते हे ठाऊकय आम्हाला
मॅडम….
पण आपली पर्वती,काळाराम मंदिर, चवदार तळं,
बेलछी- अंतरवेली इव्हन खैरलांजी ते खर्डा कुठल्याच मोर्चा आंदोलनात कशी आपली भेट नाही झाली?
तुमचं कुळ,वर्ण जात,गोत्रं नाही मला शोधायचं…
पण परिवर्तनाच्या वाटेवर कसे भेटलो नाही आपण? असो, त्याचं असंय की,
आमच्याकडे कधी इथल्या तर कधी बाहेरच्या मॅडम येतात…
आमचं जगणं, राहणं, गाणं, खाणं discuss करतात,
आपल्याशा वाटतात…. .
आम्ही करतो त्यांचा पाहुणचार ,
दादा तर खूपच करतो आदर सत्कार…
त्या डाटा कलेक्ट करतात,
पेपर करतात,डाॅक्टरेट,पोस्टडाॅक डाक्युमेंट्रीज, मोड्युल्स,
अन् बरंच काही टाईप करतात इंग्रजीत
लॅपटॉप, कॉम्प्युटरमधे, कापी पेस्ट करतात ,
सेव्ह करतात …
फोटोज घेतात आमचे अन् आम्ही गहिवरून जातो त्यांच्या दरियादिलीमुळं….
मॅडम पब्लीश करून आणतात
आमचं मागास पातळीवरचं जगणं, खाणं, गाणं वगैरे.. reputed national, international peer
reviewed journal मधे…
आम्ही सद्गदित होतो..
मॅडम establish होतात, होतात फेमीनीस्ट वगैरे …
खरंतर आम्ही त्यांच्यासाठी निव्वळ डाटा
आम्हाला हवं तसं रेटा…
Otherwise घेऊ नका, पण आधी आपली खरंच भेट कशी नाही झाली?
कशी होईल म्हणा ? आपण सारे जीना नसलेल्या इमल्याचे वेठबिगार, जाती व्यवस्थेचे प्रवेशद्वार …
तुम्ही असाल तुमच्या मालकाच्या नदरापदरात
गढी,गुढीत गुडूप …
अन् आम्ही जोडीनं त्रैवर्णीयांच्या सेवाचाकरीत,येसकरकीत…
रानवनात,शेतीमातीत निळ्या आभाळाखाली,
तुम्ही शेजघरात , माजघरात ….
खूप ऋण मानत असाल सावित्रीचे, नाही?
तिनं काढल्या,वाढवल्या शाळा म्हणूनच उघडला तमाम बायांचा तिसरा डोळा ….
ठाऊक का तुम्हाला माय सावित्री?
तिच्या शाळेत तुमच्याच मुली जास्त होत्या, तुम्ही छान प्रगती केली, पुढे झेपावलात …
मॅडम,
तसं तुम्हाला ते कुठं अवघड असतं का मॅडम?
वरच्या माणसाला वरच्यावर झेलता येतात फायदे
नाही का?
तुमची शाळा कोणती?
तुम्ही कोणत्या बॅचच्या मॅडम?
कधी कुठं भेटच झाली नाही आपली
अन् आता काढताय खपली ?
तुम्ही अलीकडच्याच दिसताय
अशातच तुम्ही चमकू लागलात NGO वाल्यांसारख्या
तुमचे लिपस्टिक लावलेले माॅडर्नाईझ ओठ
फांऊडेशननी चमकणारा शहरी फेस
Highly qualified तुम्ही
तुमच्या उच्च जात,वर्ण, वर्गाच्या हायहिल्स घालून टकटक करीत ये जा करताय
विद्यापीठीय isolated केंद्रातून
National, international Seminars, workshops, conferences च्या well-polished Resource person ..
Flight चे बोर्डिंग पास, TA – DA चे फाॅर्म्स नेलआर्ट केलेल्या रंगीत बोटांनी नजाकतीनं भरता
Sexuality, masculinity, patriarchy,असं बोजड,अवघड लोंबणारे डूल हलवीत अॅन ओक्ले, अंजेला डेव्हीस च्या थाटात हातवारे करीत बोलता
खाजगीत ” दलित स्त्रियांची वेगळी चूल गरजेची आहे का? “
असं पोटतिडकीनं विचारता.. …..
मॅडम, तुमचा अन् आमचा stand pointच निराळाय हो मॅडम…
जोतिबानं झिरपण्याचा सिद्धांत नाकारल्याच ठाऊक असेल नं तुम्हाला , मॅडम ?
मान्य की साऱ्या बाया शोषीतच पण शोषणाचीही कॅटेगीरी अन् वर्गवारी असते नं मॅडम?
पॅराशूटमधून हिकारतभरल्या नजरेनं पाहता तुम्ही आमच्याकडे अन् आम्ही अगदिच लिलीपूटसारख्या दिसतो तुम्हाला मॅडम ….
तुम्ही कोणत्याही अवस्थेत लाभार्थी
तिकडे काय अन् इकडं काय ? तिकडं राहिलात तर जात,वर्ण, वर्गाचे लाभ
अन् आलात इकडं तर…क्रांतिकारी …
चित भी मेरी पट भी मेरी….
क्रांतिकारी…तुमचं लय भारी…
तुम्ही बनून जाता तात्काळ परिवर्तनवादी,फेमीनीस्ट
वगैरे… वगैरे …..
दोनो हाथ घी मे…
तुम्ही विचारता आम्हाला आयात केलेल्या नवनव्या concept, theories टर उडविण्याच्या पावित्र्यात,
मॅडम,
हा जो तुमचा so called ism दिसतोय नं,
त्यामागे घटनाकारांनी दिलेल्या संविधानाचा प्रिझमय …
हिंदू कोड बीलासाठीचा त्याचा संघर्ष ठाऊकय का मॅडम तुम्हाला ?
म्हणूनच इथल्या फेमीनीस्टांना नाही उभारावी लागली सफ्रेजीट चळवळ…
त्यानं सवाण करून ठेवली माती,
जाळली स्मृती, श्रृती
म्हणूनच तुम्हाला तटबंदी तोडून बाहेर पडता आलं तुम्हाला ठाऊकय का मॅडम हे ?
तुम्ही सांगता 1975 स्रीमुक्तीचा उदय
आम्ही इसवीपूर्व पाचवं शतक मानतो,
तुम्ही सीमाॅन द बोवा सांगता..
आम्ही महाप्रजापती गौतमी मानतो…
आमची प्रतीकं,आमचा इझम आमच्या मातीतलाय मॅडम
आयात केलेला नाही…
खरंचच अगम्य असतो तुमचा फेमीनीझम आम्हाला…
सावित्रीच्या शाळेत शिकलेली मुक्ताबाई,ताराबाई चालतात
पण साऊ मात्र तुम्हाला चालत नाही….
जातवर्गपितृसत्तेचं बोलता पण पहिल्यांदा कोलंबीयात जातीची संरचना मांडणारा महामानव तुमच्या
अकेडीमीयात बसत नाही….
असला तुमचा फेमीनीझम
आम्हाला काही रुचत नाही, पचत नाही ….
तुम्ही येताजाता घेता आमची information, processing करून
पुन्हा आम्हालाच ऐकवता,मार्गदर्शन करता हे तुमचं झक्कासच मॅडम…
आमचेच गहू अन् आम्हालाच जेऊ…
तरी हरकत नाही, आम्ही जपतो
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्यं….
तुमच्या आयात केलेल्या डिसकोर्समधे बुद्ध, फुले, आंबेडकर बसत नाहीत अन् आमचा फेमीनीझम त्यांच्याशिवाय असत नाही….
असो,
मॅडम,
होईल आमचा दादा दुरूस्त,
चळवळ करतेच ते काम,
पण तुम्ही ही जरा दुरूस्ती करा….
आम्ही घेऊच समजून तुमचं सारं काही
तुम्ही खरा इतिहास तपासा..
हा स्वावलंबनाचा धडा जरा तुमच्या दादालाही द्या….
बघा,जमतंय का ?
त्यामुळे आमचा दादा वाचेल जीवानिशी,अन् वाचेल फेमीनीझमचा रोजनिशी….
तुम्ही आतां आमची काळजी करायचं,
आमचा कैवार घ्यायचा,
अन् तालेवार व्हायचा पॅटर्न आता सोडून द्या…
आमचं प्रबोधन करायचं आता सोडून द्या….
आमच्या “बापजाद्यानं ” हयात घालवली
म्हणून तुम्हाला आता कंठ फुटला…
साऊच्या कष्टामुळंच हा फेमीनीझम तुम्हाला भेटला…
माणगावच्या परिषदेचा संदेश
आम्ही काळजात ठेवलाय जपून….
नेतृत्व यायला हवं ज्याच्यात्याच्या वर्गातून,
आम्ही बापाला credit देतोय म्हणून sophisticated कुत्सीतपणानं गालातल्या गालात हसाल….
पितृसत्तेची गुलाम म्हणून हिणवाल….
तुम्ही पितृसत्ता म्हणता ,आम्हाला पुरूष सत्ता ही संज्ञा योग्य वाटते…
तुम्ही ‘स्रीवादी आंबेडकर ‘सांगता,
आम्ही ‘आंबेडकरी स्रीवाद’ मांडतो…
आपला stand point चं वेगळाय हो मॅडम ..
मॅडम ,
तेवढं sisterhood चं बघा जमतंय का ?
अन् हो ,माणसं देशोधडीला लागलेली असताना
तुम्ही घेऊन आलात
हे चड्डीचं “मीम “
असो,
आमचा एकच कालजयी नारा जयभीम…जयभीम…!!
कवयित्री: डॉ. प्रतिभा अहिरे या नामांकित लेखिका,कवयित्री,आंबेडकरवादी कार्यकर्त्या आणि भाष्यकार आहेत. त्या शिवाजी कॉलेज, कन्नड, येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील, सिनेट सदस्यत्व तसेच ताराबाई शिंदे महिला अध्ययन केंद्राचे संचालक पदही त्यांनी भूषविले आहे. “समग्र फुले”, “सावित्रीच्या बेईमान लेखण्या” हि त्यांची काही पुस्तके प्रकाशित आहेत.
- आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे - June 10, 2022
- महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे - March 8, 2021
- बिजनेस पार्टनर्स हवे आहेत - November 26, 2020
Leave a Reply