रमाई ते माई एक संघर्षयात्रा

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे

दिनांक २७ मे २०२२ रोजी त्यागमुर्ती रमाई यांचा ८७ वा स्मृती दिन झाला. आज दिनांक २९ मे २०२२ रोजी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा १९ वा स्मृती दिन आहे.
हा एक योगायोग आहे की दोन्ही मातेचा स्मृती दिन एकाच महिन्यात एक दिवसा आड आलेले आहे. रमाई आणि डॉ. बाबासाहेबांचा २८ वर्षांचा संसार होता, आणि डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतचा जेमतेम ८ वर्षेचा सहवास होता.
रमाईच्या अनंत त्याग, कष्टामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बरेच काही ध्येय गाठता आले. असा त्याग कोणतीही स्त्रीने करणे दूर दूर वर कुठेच नाही.
२७ मे १९३५ साली रमाई यांचे निधन झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब एकाकी होतात, परंतु समाजाचे प्रश्न त्यांनी वाऱ्यावर सोडले नाहीत.. बाबासाहेब काही काळ रमाईच्या जाण्याने प्रचंड व्यथित झालेले होते. पण पुन्हा ते उभे राहिले की, “समाजाला माझ्या शिवाय दुसरा कोणीही वाली नाही”… १९३५ ते १९४८ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठ्या प्रमाणात देशहितासाठी त्यांचे कार्य चालूच होते. स्वतःच्या प्रकृतीकडे थोडेही लक्ष देत नव्हते. आणि त्यांच्या प्रकृतीची कोणी काळजी घेणारा जवळचा व्यक्ती ही नव्हता.
त्याच काळात धर्मांतराची घोषणा! थॉटस ऑन पाकिस्तान ग्रंथ लिहिणे, जाती पाती तोडण्यासाठी करत असलेले लिखाण, वर्तमानपत्र चालवणे, पुस्तके लिहिणे, स्त्रियांची चळवळ पुढे नेणे, ४० च्या दशकात अजून मोठी जबाबदारी आली स्वतंत्र पुर्व भारताचे पहिले कामगार मंत्री पद, एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री, ऊर्जा मंत्री आणि जलसंधारण मंत्री चार चार खात्याचे काम पाहणे ते देखील राष्ट्रीय स्तरावर भारताच्या संपूर्ण इतिहासात असे होणे नाही.
भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि त्यांच्या उन्नतीसाठी लिहिलेला हिंदू कोड बिल असो की संपूर्ण भारताला एकसंघ ठेवण्यासाठी लिखित स्वरूपात भारतीय संविधान लिहिण्याची जबाबदारी घेऊन अहोरात्र मेहनत वाचन लिखाण करणे असो.
परंतु वेळेवर आराम आणि वेळेवर जेवण करण्याचा कुठे त्यांना वेळ मिळत होता. दिवसरात्र समाज, राष्ट्र, राष्ट्रहित एकसंघ विचार त्यांच्या अवतीभवती असायचे. भारतीय संविधान तयार करत असताना त्यांच्यावर जबाबदारी आली होती ती त्यांनी जीवाची बाजी लावून पार पाडली. एवढे असताना त्यांची काळजी घेणारे कोणीच नव्हते. त्यात बाबासाहेब शारीरिक रित्या खूपच थकून गेलेले होते. त्यांना मधुमेह, पित्ताचे विकार, संधिवात, उच्च रक्तदाब, आणि डोळ्यांची नजर कमी होणे, एवढ्या आजारांनी त्यांना ग्रस्त करून ठेवलेले होते. त्याच वेळी त्यांना त्यांच्या (डॉ. मालवणकर) family डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्हाला आरामाची, वेळेवर जेवण, गोळ्या देण्याकरिता, सहायकाची आवश्कता आहे. तुमची देशाला नितांत गरज आहे. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला आणि डॉ. शारदा कबीर यांच्या सोबत नोंदणी पद्धतीने १५ एप्रिल १९४८ साली लग्न केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात जगण्यात अमुलाग्र बदल झाला. त्यामुळे पुढे त्यांना धम्माच्या कार्यासाठी अजून जोमाने कार्य करता आले.
१९४९ मध्ये भारतीय संविधान लिहून पूर्ण करून ते देशाला अर्पण करण्यात आले. २६ जानेवारी १९५० साली भारतीय संविधान भारतामध्ये लागू झाले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री पद म्हणून त्यांच्यावर आलेली मोठी जबाबदारी. १९५४ मध्ये सहावी बौध्द धम्म संगिती मध्ये त्यांचा भारताकडून महत्वाचा सहभाग, रंगून येथे बौद्ध धम्मावर जागतिक पातळीवरील भाषण, १४ ऑक्टबर १९५६ साली नागपूर येथे अशोकाविजयादशमी दिनी केलेले ऐतिहासिक धर्मांतर आणि १६ ऑक्टोबर १९५६ साली चंद्रपूर येथे केले धर्मांतर अशा अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक कार्य डॉ. माईसाहेब आंबेडकर सोबत असताना केलेले आहे. यात माईसाहेबांचा वाटा मौलाचा आहे.

टिका करायला काय जातंय! ??

एखाद्या व्यक्तीवर टिका करायला काय जातंय.. आणि आपले कोण काय वाकडे करणार आहे. समाजात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर शिंतोडे उडवणे त्यांची बदनामी करणे, त्यांला एखाद्या गोष्टीवर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे. ही कोणत्या संस्कृतीची संस्कृती आहे?
कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्या व्यक्तीचे जीवन मुश्किल करून टाकणे यातून काय साध्य करायचे आहे हे अजूनही समाजाकडून कळलेले नाही?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युला डॉ. माईसाहेब आंबेडकर यांना जबाबदार धरणे यातून काहीच निष्पन्न झालेले नाही.
माईसाहेब, त्यागमूर्ती रमाई यांची जागा कधीच घेऊ शकत नाही हे खरेच आहे, पण डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे ही कार्य बेदखल करण्यासारखे नाही. समाजाने त्यांना एक प्रकारे बहिष्कृतच केलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर माईसाहेब एकाकी झाल्या होत्या. त्या त्यांचा भाऊ दादर येथील पौतुगिज चर्च जवळ वास्तव्यास होते, तिथे त्या राहत होत्या.
दलित पँथरच्या चळवळीत माईसाहेब लोकांमध्ये दिसू लागल्या. रिडल्स् च्या मोर्चा मध्ये माईसाहेबांचा सहभाग अत्यंत महत्वाचा होता.

लेखक माईसाहेब यांच्या समवेत

मरणा नंतर ही यातना??

मला चांगले आठवत आहे माईसाहेब यांचे निधन २९ मे २००३ मध्ये झाले. बातमी टीव्ही न्यूज चॅनलवर आलेली होती. (तेव्हा जास्त प्रमाणात टीव्ही न्यूज चॅनल नव्हते) त्यावेळी मी बाबांना रडताना पाहिलेले होते. ठाण्यातून आम्ही वकील जगन्नाथ सोनावणे (नोटरी) यांच्या मारुती ओम्नी गाडी मधून आम्ही दादर येथे गेलो होतो. सोबत मी, प्रकाश मोरे, वकील एन जी भालेराव असे गाडीत बसून चैत्यभूमी दादर स्मशान भूमी मध्ये उपस्थित राहिलो होतो. आम्ही शेवटपर्यंत थांबलो होतो. सगळेच कार्यकर्ते आपापल्या घरी परत जात होते. त्यांच्या अस्थिकलश एका कठड्यावर ठेवलेले होते. काही उशिरा आलेले कार्यकर्ते अस्थिकलशाला वंदन करत होते.
कोणताही पुरावा नाही?
कोणतेही दस्तऐवज नाही?
कुठलाही सुगावा नाही? तरी माईसाहेब आंबेडकरांवर विषारी लिखाण काही महाभाग लोकं करत आहेत. आणि समाजाला त्याला उत्तर देण्यासाठी थोडाही वेळ नाही. किंबहुना काहींनी समाजात माईसाहेबांबद्दल जो गैरसमज पसरवला आहे स्वतःच्या फायद्यासाठी, तो दूर करण्याकरिता आपण पुढे का येत नाही. एक गोष्ट इथे नमूद करावेसे वाटतं की,
दी बुद्ध अँड हिस धम्म हा
ऐतिहासिक ग्रंथ लिहून डॉ. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म संघा बद्दल बऱ्याच गोष्टी ह्या स्पष्ट केलेल्या आहेत. एक बाब तुमच्या लक्षात आहे किंवा नाही मला माहिती नाही, १९५७ साली दी बुद्ध अँड हिस धम्म मराठी भाषेमधून पीपल्स् एज्युकेशन सोसायटीच्या हक्क अधिकारात ग्रंथाचे प्रकाशन झालेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्ध अँड हिस धम्म ग्रंथासाठी प्रस्तावना (इंग्रजी भाषेत) लिहिलेली होती. ती पीपल्स् एज्युकेशन सोसायटीच्या तथाकथित लोकांनी का छापली नाही? याचे उत्तर अजूनही ते देऊ शकले नाही. आज ही तुम्ही ग्रंथ वाचता त्यात डॉ. आंबेडकरांची प्रस्तावना का छापली जात नाही याचा जाब समाज कधी विचारणार? त्या प्रस्तावने मध्ये डॉ. बाबासाहेबांनी, डॉ. माई आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. परंतु हे काही तथाकथित नेत्यांना न पाचणारी आहे, असेच म्हणावे लागेल. द्वेषाने द्वेष निर्माण होणार, गैरसमजामुळे अधिक गैरसमज निर्माण होणार..? एका बाजूला आपण बौद्ध धम्माचे आचरण करायचे आणि दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीबद्दल द्वेष भावना ठेवायची हे आजच्या पिढीने ह्यातून काय बोध घ्यावे…!
दिनांक ३,४,५ डिसेंबर १९९८ रोजी
पूज्य डॉ. माईसाहेब आंबेडकरांचे आमच्या घरी येणे त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळणे आणि महामानवाच्या एक एक आठवणी सांगणे
आजही ते दिवस आमच्या डोळ्यात साठवून ठेवलेले आहेत…
तुमच्या आज १९ व्या स्मृतीस अभिवादन आणि पुष्पांजली

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे

लेखक अधिवक्ता असून कवी तसेच सामजिक कार्यकर्ता आहेत व ठाणे शहर येथील रहिवासी आहेत.

3 Comments

  1. खूप खूप धन्यवाद आपण माझा लेख वेळातवेळ काढून आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध केल्याबद्दल माझ्या कडून जेवढे समाज प्रबोधन करण्याचे होईल तेवढे करत राहील. जय भारत जय भीम😊👍👌

  2. छान, ह्यावर आपण सविस्तर चर्चा करू या, प्रज्ञेशजी.

Leave a Reply to Pradnyesh Sonawane Cancel reply

Your email address will not be published.


*