तुषार पुष्पदिप सूर्यवंशी
कॉम्रेड अमोल खरात हा जिंतूर तालुक्यातील केहाळ या ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिक्षण घेण्यासाठी आला आणि तिथून अमोल चा विद्यार्थी चळवळीचा प्रवास सुरू झाला. अमोल हा सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र चा माजी राज्य अध्यक्ष होता अतिशय शांत, प्रेमळ परंतु लढवय्या. समाजातील जात, पितृसत्ता आणि भांडवली व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलेला सोबतच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सतत लढा देणारा मग त्यात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न, वसतिगृहाचे प्रश्न शिक्षणाचे खाजगीकरण आणि त्यातून होणारे विद्यार्थ्यांचे शोषण या विरोधात अमोल लढत राहिला. देश पातळीवर कुठेही विद्यार्थ्यांचे शोषण होत असेल तर त्या प्रश्नांना कॉ. अमोल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून वाचा फोडत असे.
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेत काम करत असताना अमोलने संघटनेचे सांस्कृतिक लढे ज्यात “28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिवस शिक्षक दिवस” म्हणून साजरा करणे, “25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस स्री मुक्ती दिवस” म्हणून साजरा करणे, “कबीर बीज धर्म निरपेक्ष दिवस” म्हणून साजरा करणे, 14 फेब्रुवारी प्रेम दिवसाला विद्यार्थ्यांमध्ये “प्रेमाला होकार हिंसेला नकार” या शीर्षकाखाली कार्यक्रम आयोजित करणे असे अनेक संघटनेचे लढे आणि कार्यक्रम विद्यापीठात अमोल ने जिंकिरीने लढवले.
50 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या मुंबईच्या आझाद मैदानावरच्या बार्टीच्या आंदोलनात सरसकट 861 PHD धारक विद्यार्थ्यांना बार्टी ची फेलोशिप देण्यात यावी ही मागणी घेवून कॉ. अमोल खूप जिद्दीने लढला सरकार ने 861 पैकी फक्त 200 मुलांना फेलोशीप देवू अशी घोषणा करत 200 विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द केली होती आणि त्या यादीत अमोलचे नाव असताना देखील अमोलने ती यादी अमान्य करत मिळालेली फेलोशिप नाकारून सरसकट 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या म्हणून लढाई सुरू ठेवली आणि बार्टी चे ते आंदोलन यशस्वी झाले.
कॉ. अमोल डॉ. बाबा साहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि मार्क्स यांच्या विचारांनी प्रेरित होता आणि त्या मार्गाने चालत असताना कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक आणि जिद्दीने शेवटच्या श्वासाबरोबर लढत राहिला शेवटी दवाखान्यात उपचार घेत असताना देखील हॉस्पिटल प्रशासनाला कपकपत्या हातांनी स्वच्छता आणि चांगल्या सुविधा देण्यात याव्यात म्हणून निवेदन लिहिले असा लढवय्या कॉ. अमोल अखेर दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी ही चळवळ, मित्र परिवार, कुटुंब पोरकी करून सगळ्यांना सोडून निघून गेला.
अमोल दादा आणि माझी ओळख सत्यशोधक विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना झाली जिवाभावाचा मित्र, मार्गदर्शक कॉ. अमोल तू अनमोल आहेस तुझी स्मृती माझ्या कवितेत आणि डफावरच्या थापेवर नेहमी जिवंत राहील तू एक बंडाची पेटती मशाल आहे ती आम्ही निरंतर तेवत ठेवू.
जय भीम लाल सलाम..
निजला कसा शांत, तुझं बोलण्याचा लळा
घाई केलीस वेड्या, पोरका झाला मळा
गर्जना मुखी होती, जय भीम ची
चालतांना हाती गड्या, झेंडा लाल निळा
बरे दिसत नाही, अर्ध्यात सोडून जाणे
सोडून गेला सारे, पोरका झाला मळा
बापासाठी जगायचं होत अमोल..
सांग लेकरा कुठे शोधू तुला
ही आर्त हाक देणारा बाप हतबल आहे,
आतून तुटलेला आहे
गावं सोडून गेला शहरात हरवला म्हणे
आला नाही परत,
यायचा थांबायचा घेवून जायचा
पिढ्या घडविण्यासाठी विद्यापीठाच्या दारात लेकरांना
डोक्याला पकडत बापाच्या मी म्हणालो
खूप मोठा होता तुझा लेक !
हुंदके देत रडू लागला बाप अश्रू ओघळत होते
त्यांना पुसायची हिम्मत माझ्यात नव्हती
हुंदके थांबवत म्हणाला बाप मला
मोठा होता लेक माझा म्हणून परत नाही आला
मी बोललो नाही काहीच
रडत राहिलो, आतल्या आत कोसत राहिलो स्वतःला
मी शोधायला निघालो तर मला सापडेल ही अमोल
अभिवादन सभांमध्ये, मोर्चा, आंदोलन
मुंबईच्या आझाद मैदानावर लढतांना
विद्यापीठाच्या गेटवर जय भीम, लाल सलाम घालतांना
पण त्या तुटलेल्या बापाने कुठे जावं शोधायला
त्याला आता बाहेर पडता येईल का?
आवाज देता येईल का?
कोणाला दाखवता येईल का? मनावर झालेली जखम !
तुषार पुष्पदिप सूर्यवंशी
राज्य संघटक, सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र
9503521235
- “कॉम्रेड अमोल खरात एक बंडाची पेटती मशाल” निरंतर तेवत ठेवू. - September 26, 2023
Leave a Reply