हि. रा. गवई
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. मागील वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला पण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला आजही प्रश्न पडतोय खरंच आपण स्वतंत्र झालो काय? 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठे सारखा प्रतिभाषाली विचारवंत म्हणतोय ये “आजादी झुटी है देश की जनता भुकी है “मला आजही अण्णाभाऊ साठेंचा हा नारा तंतोतंत खरा वाटतोय .
अमृत महोत्सवानंतरही आजही मूलभूत गरजा बहुतांश लोकांच्या पूर्ण झालेल्या नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा ,आरोग्य व शिक्षण ह्या आमच्या मूलभूत गरजा खरेच पूर्ण झाल्या काय? आजही अतिदुर्गम ,आदिवासी भागात कुपोषणामुळे हजारो बालके दगावत आहेत. आदिवासी लोकांसाठी आम्ही अजूनही त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकलो नाही . अती दुर्गम भाग सोडा पण सामान्य नागरिकांना सुद्धा निवारा आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो नाही. म्हणून आजही निवाऱ्याची गरज भागवण्यासाठी मोबाईल टावर वर आमच्या एखाद्या तरुणाला आंदोलन करावं लागतं .यावरूनच आम्हाला आपल्या यशापशाचं मूल्यमापन करता येत. शिक्षणाविषयी तर बोलूच नये अशा प्रकारची देशात परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाने वाटेल त्याला स्वयम् अर्थसहाय्यित तत्त्वावर खिरापती सारख्या शाळा देऊ केल्या. व शैक्षणिक व्यवस्थेचा खेळ खंडोबा झाला .बोटावर मोजण्याएवढी गावातील सधन पालक आपली मुलं कॉन्व्हेंट मध्ये घालतात व सरकारी मराठी शाळा ओस पडत आहेत .ही भविष्याच्या दृष्टीने शैक्षणिक अराजकतेची नांदी आहे. आरोग्याच्या बाबतीत कोरोनाच्या काळात संपूर्ण देशाने अनुभव घेतला की आपल्या देशाची आरोग्य यंत्रणा कितपत सुविधायुक्त आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अंतर्भूत केलेलं लोक कल्याणकारी राज्य ही संकल्पना आम्ही पूर्णत्वास नेण्यात यशस्वी ठरलो काय? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या संविधानिक मूल्यांना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात हरताळ फासल्या जात आहे. एकीकडे आमच्या राष्ट्रीय प्रतीकांची छेडछाड केल्या जात आहे. तर दुसरीकडे अमृत महोत्सवात ध्वजारोहणाचा कार्यक्रम तीन-तीन दिवस घेतल्या जात आहे . ही बाब स्वागतार्ह असली तरी हा बेगडीपणा आम्हाला ओळखता आला पाहिजे. हर घर तिरंगा मध्ये राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होतो का याही बाबीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात संतांची व महापुरुषांची काही विध्वंसक लोकांकडून जाणीवपूर्वक बदनामी केल्या जात आहे. आणि प्रस्थापित सत्ता त्यांच्याच पाठीवरून मायेने हात फिरवत आहे . बदनामी करणारे आजही मोकाट कुत्र्याप्रमाणे भुंकत आहेत पण त्यांच्यावर शासकीय यंत्रणेचा कोणताही अंकुश नाही .स्त्री संरक्षणाचा स्त्री सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. महागाई बेकारीने सामान्य जनता होरपळून निघत आहे. व्यापारी वर्ग त्रस्त आहे .कर्मचारी वर्गासाठी ही फार काही चांगले दिवस नाहीत. अमृत महोत्सवा नंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात आम्ही पूर्णतः अपयशी ठरलो आहे. सध्या चांगले दिवस आहेत ते फक्त राजकीय कर्तुत्वाला.
न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व आम्ही केव्हाच मोडीत काढली आहेत. आम्ही संविधानाला गुंडाळून ठेवण्याच्या तयारीत आहोत .असे जर झाले तर देशात धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची अराजकता निर्माण झाल्यास त्याला कोण जबाबदार असेल? भारतीय संविधान हा या देशातील गोरगरिबांचा, सामान्य जणांचा, शेतकऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा, व्यापारी वर्गाचा, बहुजनांचा प्राण आहे. स्वातंत्र्यवीरांनी व संविधानकर्त्यांनी मोठ्या प्रयत्नाने सार्वभौम राष्ट्र ,धर्मनिरपेक्ष राष्ट्र, लोककल्याणकारी राष्ट्र ह्या संकल्पना स्वीकारलेल्या आहेत. विशिष्ट मूठभर लोकांच्या हितासाठी हे संविधान आम्ही मोडीत काढायला निघालेले आहोत .
अलीकडच्या काळात विचारवंतांच्या, लेखकांच्या, न्यायाधीशांच्या होत असलेल्या मोठ्या प्रमाणात हत्या व चोर सोडून संन्यासाला फाशी हा देशाच्या स्वातंत्र्यासमोरी ल फार मोठा आव्हानात्मक प्रश्न आहे . प्रत्येक भारतीय नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. हा प्रश्न सोडवण्यात आम्ही जर अपयशी ठरलो तर मोठ्या प्रयत्नाने मिळवलेले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही .असे जर झाले तर आपल्या पोटी आलेल्या आपल्या पिढ्या आपल्याला लाता घातल्याशिवाय राहणार नाहीत .देशात सगळीकडे सध्या खाजगीकरणाचे वारे वाहत आहेत. खाजगीकरणाने बेकारांच्या फौजेच्या फौजा निर्माण होत आहेत .या खाजगीकरणाने गोरगरिबांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही .म्हणून कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरणाला विरोध करणे अतिशय आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं ,संतांच्या विचारांच, सामान्य लोकांच्या हिताचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांच्या हिताचं शासन अस्तित्वात आणायचं असेल तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम सारख्या यंत्रणेला विरोध करायला हवा. प्रत्येक ग्रामपंचायतीने ईव्हीएम द्वारे आम्ही मतदान करणार नाही अशा प्रकारचा जर ठराव घेतला तरच ईव्हीएम यंत्रणा बंद पडू शकते .आज कोणत्याही प्रगत राष्ट्रात ईव्हीएम यंत्रणा अस्तित्वात नाही कारण त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोळ होऊ शकतो. म्हणून आपणही वेळेवरच शहाणं झालेलं देश हिताच्या दृष्टीने अधिक चांगलं. या अमृत महोत्सवी वर्षानंतर आपण प्रत्येकाने आप आपले प्रत्येक काम एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करावं. हीच आज राष्ट्रभक्ती आहे .कोणत्याही क्षेत्रातील कोणताही कर्मचारी हा त्या ठिकाणचा मालक नसून सामान्य लोकांचा सेवक असतो ही भावना आपल्या मनात असणे अतिशय आवश्यक आहे.
अलीकडच्या काळात निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर करून लोकशाही शासन पद्धतीवर जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे या माध्यमातून संविधानाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे ही फॅसिस्ट विचारसरणीची खेळी आम्ही वेळीच ओळखली पाहिजे .अशा पद्धतीने निवडणुकात पैशाचा गैरवापर होणं म्हणजे देशाचं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात घालणे होय. लोकशाही मूल्य ,कल्याणकारी राज्य, धर्मनिरपेक्ष राष्ट्र ,सार्वभौम राष्ट्र या संविधानिक मूल्यांना जाणीवपूर्वक हरताळ फासल्या जात आहे. व धर्मनिरपेक्ष राष्ट्रापेक्षा धर्मधिष्टीत राष्ट्रांची कशी आवश्यकता आहे. हे प्रसार माध्यमे वारंवार सामान्य जणांच्या मनावर बिंबवत आहेत. ही हिटलरशाहीची सुरुवात आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ प्रमाणे भारत बिकट आव्हानानी सैरभैर आहे. तर इंडिया मध्ये चंगळवाद फोफावत आहे. महागाईमुळे सामान्य माणसाचे बजेट रसातळाला पोहोचले आहे. ज्या गोष्टींची आवश्यकता नको आहे त्या गोष्टी शासन लोकांना देऊ पाहत आहे. गरज आहे दर्जेदार शिक्षणाची आणि मिळत आहे खिचडी. महागाईवर लगाम लावण्या ऐवजी एसटीमध्ये हाफ तिकीट दिल्या जात आहे .गरज आहे विद्यार्थ्याला पण सुविधा मिळते म्हातार्याला . अशा भिकार वृत्तीने देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. देशाला खरेच महासत्ता करायचे असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाचे कर्तव्य कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता कोणत्याही प्रकारचा पैसा न घेता प्रामाणिकपणे केले पाहिजे तरच आपल्या पिढ्यासाठी आपण मार्गदर्शक ठरू. प्रत्येकाने प्रत्येकाचे काम प्रामाणिकपणे करणे हीच आज मोठी राष्ट्रभती आहे . देशसेवा आहे. अन्यथा आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.
हि. रा. गवई.
श्री. शिवाजी हायस्कूल इसोली
अ. भा. म. सा. प.जिल्हा सल्लागार बुलढाणा
7387651514
- देश, संविधान, स्वातंत्र्यासमोरील बिकट आव्हाने - November 28, 2023
Leave a Reply