छत्रपती शाहू महाराज यांच्या नजरेतून पेशवाई.

राकेश अढांगळे

सोमवारी नववर्ष चालू होईल, १ जानेवारी २०२४. महाराष्ट्रातील शोषित समाज या दिवसाला विशेष महत्व देतो. याच दिवशी ५०० महारानी मुठभर इंग्रजासोबत कोरेगाव भीमा येथे लढाई केली आणि विजय मिळवून दिला. पेशव्यांचा पराभवाचे कारण त्यांचा अतिरेकीपणा होता. कोरेगाव भीमा येथील वीरसैनिकाना सलाम!

इंग्रजांच्या जुलुमी व्यवस्थेबद्दल तसेच त्यांच्या सुधारणावादी धोरणांचे आपण इतिहासात वाचन कमीअधिक प्रमाणात केले असेल, इंग्रजांच्या हाती सत्ता जाण्याची अंतिम फेरी ही ॲंग्लो-मराठा १८१८ चे युद्ध होय. अनेक लोक आता यावर आपण गुलाम कसे झालो ? १८१८चे युद्ध कसे वाईट व छत्रपती शिवरायानी उभारलेल्या स्वराज्याचा कसा अंत झाला? याविषयी बोलताना दिसतात. यामध्ये मध्यभागी ही कोरेगाव भीमाची लढाई आहे, त्यावर रोष असणे हे सुद्धा एक कारण. पेशवाई ही खरीखूरी शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या संकल्पनेत उतरत होती का? हा प्रश्न येथील लोकानी अगोदर स्वत:ला विचारायला हवा! पेशवाईच्या १८१८च्या अस्तानंतर ५६ वर्षानंतर शाहू महाराजांचा जन्म झालेला असताना, पेशवाई कशी होती? आणि तिचा अंत होणे चूक होते की बरोबर हे सुद्धा जाणने महत्वाचे आहे.. आज पेशव्यांचे वारस ब्राह्मण कमी तर ब्राह्मणेत्तर अधिक असल्याचे दिसतेय, दरवर्षी १ जानेवारी रोजी हे लोक महार समाजाची थट्टा करित असतात व पेशवाई जाण्याचे याना अत्यंत दुख झालेले असते. छत्रपती घराण्याचे वारस असलेले शाहू महाराजाना पेशवाई गेल्याचे दुख होते काय? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यासाठीच हा प्रपंच.!

शेकडो वर्षांच्या गुलामीनंतर इथे स्वराज्याची संकल्पना वास्तव्यात उतरविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकानंतर शिवशक सुरु झाले होते ते कुणी बंद केले? शिवाजी महाराजांचे आरमार इंग्रजाना सोबत घेउन कोणी नष्ट केले? शिवरायांच्या निधनानंतर, छत्रपती संभाजी कि राजाराम यांच्यात वाद निर्माण करणारे कोण? संभाजी महाराजाना क्रूरकर्मा औरंगजेबच्या हाती पकडून देणारे कोण? यावर उत्तर शोधले तर एकच जातीय धुर्त लोक भेटतील! याची अनेक ठिकाणी एतिहासिक नोंद आहे, पुरावे आहेत. पण आजही शिवछत्रपतीना युगपुरुषाचे स्थान देणारे बरेच लोक याच पेशव्यांची बाजू घेण्यात धन्य असून केवळ द्वेषापाई ते कोरेगाव भीमा लढ्याला विरोधी सांगून शोषित समाजाचे शोर्य नाकरुन ब्राम्हणांचे तळवे चाटण्यास आघाडीवर असतात. तर काही लोक ब्राह्मणी संदर्भाचे पुस्तके, लेख लिहितात.

योग्य अभ्यास व वाचन करुन अधिकाधिक पुरावे गृहीत धरुन एखाद्या निकालास येणे म्हणजे इतिहासाचे योग्य अवलोकन होते असे मी मानतो. परंतु इतिहास हा कधीही अंतिम नसू शकतो, वेळोवेळी नवेनवे पुरावे सापडले तर ते स्विकारणे हे इतिहास अभ्यासू लोकांचे वैशिष्ट असते. तसा मी काही अभ्यासक नाही, परंतु सुजाण वाचक जरुर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य कसे होते? याची आपल्याला कल्पना इतिहास वाचून मिळते, स्वराज्याची राजकीय बाजू काही राजकारणी व धर्मांध संघटना उचलून घेतात. कारण ती बाजू त्यांच्या हिताची आहे, पण मोडतोड करुन सांगितल्या जात्यात. परंतु सामाजिक, नैतिक बाजू कोणीही सांगत नाही ती आपल्याला शोधावी लागते किंवा काही मोजके इतिहासकार यावर व्यक्त होतात. खरेतर छत्रपतींचा वारसा पेशव्यानी जपला नाही, आपल्या हाती सत्ता आली म्हणजे “हम करे सो कायदा” असे स्वरुप पेशवाईत आले त्यातच त्यानी ‘शैतानी’ रुप स्विकारले. शूर सरदारांचा-सैनिकांचा वेळोवेळी अपमान, जातश्रेष्टत्वाचा मुद्दा, मनमानी कारभार व बाईचा नाद या गोष्टी पेशवाईत विकोपाला गेल्या होत्या. पेशवाईत जातीभेदाचे प्रमाण इतके वाढले कि त्याच्या जातीभेद व इतराना अपमानजनक वागणूकीतून व वरील नमूद कारणांतूनच पेशवाईची हार झाली..

अश्या ह्या पेशवाई बद्दल अनेकांचे गैरसमज आहेत. अनेकाना असे वाटते की ‘पेशवाई’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानी आपल्या मनगटावर विश्वास ठेवत, बुद्धीमत्तेच्या जोरावर, अठरापगड जातीना सोबत घेउन उभारलेल्या ‘स्वराज्याचा’ दुसरा भाग असावा? परंतु महाराजांचा राज्यभिषेक व शूद्र म्हणून त्यांना केलेला विरोध आपण कसे काय विसरु शकतो?मोरेपंत पिंगळे हा पेशवाच होता त्यानेच महाराजांना शूद्र म्हटले व राज्यभिषेकाला विरोध केला, नंतर तडजोड म्हणून गागाभटास तयार केले. शिवछत्रपतींच्या निधनानंतर याच पेशव्यांची धूसपूस चालू झाली आणि संभाजी महाराजांच्या विरोधात राणी सोयराबाई व छत्रपती राजाराम यांस उभे केले परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा रयतेवर व सरदार सैनिकांवर चांगला जम व विश्वास होता म्हणून स्वराज्याला लगेचाच तडा गेली नाही. परंतु काही वर्षानंतर यांचे दिव्यसप्न अतित्वात आले व मराठेशाहीचे यांनी पेशवाईत रुपांतर केले. छत्रपती शाहू राजांकडून गोड बोलून बाळाजी विश्वानाथ याने राज्य हाती घेतले व गादीवर बसल्यानंतर पेशवाईची सुरुवात झाली, तुरंत छत्रपती पद हे केवळ नाममात्र केले. पेशवाई स्वराज्याच्या विरोधात कशी होती? व तिचे काही अंशी स्वरुप आपण करवीरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या भाषणातून पुढे जाणून घेउया..

छत्रपती घराण्याचे एक महान राजे व आधुनिक काळात लोकशाही जन्मास येत असताना याच लोकशाहीला आधारस्तंभ म्हणून उभे असलेले राजर्षी शाहू महाराज यांचे मत पेशवाई विषयी काय होते? ते आपण तपासले पाहिजे, कारण छत्रपती घराण्याचे वारस व त्यांचा याविषयीचा अभ्यास यावरच आपल्याला पेशवाई व स्वराज्य या दोनी संकल्पना समजणे गरजेचे आहे. शाहू महाराज पुन्हा पेशवाई अवतरेल या भितीने एके ठिकाणी म्हणतात “इंग्रजी अधिकाऱ्याच्या हातून सत्ता काढून घेउन ती विद्यासंपन्न अशा अल्पसंख्यांक ब्राह्मण वर्गाच्या हाती देणे मला बिलकुल पसंत नाही.” कारण तसे केले तर पेशवाई येईल ही शाहू राजाना वाटत असे.. तर जातीभेद या देशाला गुलामगिरीच्या खाईत लोटण्यास कारणीभूत आहे. असे त्यांचे पक्के मत होते. म्हणून ते म्हणतात, “हिंदूस्तानाला जी गुलामगिरी आज हजारो वर्ष भोगावी लागते आहे. तिचे प्रधान कारण हे जातिभेद आहे.” – श्री. शाहू महाराज

शिवछत्रपतींच्या राज्यभिषेकाला शूद्र म्हणून विरोध अगदी शाहू महाराजांपर्यंत पहावयास मिळतो, कारण तो ठायी असलेला उच्चनीचपणा व पेशवाईचा माज. जातीभेदाचा उच्चांक गाठलेल्या पेशवाई व तिच्या प्रमुख समर्थकांवर शाहू महाराज पुढे म्हणतात.. “जातीद्वेष हा हिंदूस्थानाचा फार पुराणा रोग आहे. परशुरामाने पृथ्वी निक्षत्रीय केली, या म्हणण्यात जातीदेषाचे प्रतिबिंब पुर्णपणे पडलेले दिसेल. पेशव्यानी ब्राह्मणेत्तरांच्या घरावर गाढवाचे नांगर फिरवले याचेही कारण तेच. त्यांच्या शेंड्या व जानवी श्री शिवाजी महाराज व मराठे वीर यानी रक्षण केले तेच ब्राह्मण, ‘मराठे शूद्र आहेत’ असे बिनादिक्कत प्रतिपादन करतात याचे दुसरे कारण कोणते? या जातीभेदाची उचलबांगडी करावयाची असेल तर जातीभेदच मोडला पाहिजे. जातिभेद मोडून आपण सर्व एक होउ या.” ( हे भाषण शाहू महाराजानी मराठा वसतिगृह पायाभरणीवेळी सर्व मराठा बांधवाना उद्देशून केले होते)

पेशवाईत जातीभेदाला महत्व होते परंतु स्वराज्यात तसे काही नव्हते, प्रजा सुखी होती व एकोपा होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जातीभेदा विरोधातील प्रतिपादनात शाहू महाराज सांगतात “युरोपातील किंवा आमच्या देशातील थोर पुरुषांचे वर्तनभेद, त्या मोडण्याच्या अवश्यकतेची साक्ष देत आहे. ल्यूथर व श्री शिवाजी महाराज यांची चरित्रे आम्हास हेच शिकवितात. श्री शिवाजी छत्रपतीनी तर मुसलमानांचे मराठे करुन घेतले व देशकार्याकरिता महारमागांचे रिसाले व तोफखाने तयार करुन; स्पर्शास्पर्शाच्या विचारास जबरद्स्त धक्का दिला.” पुढे ते म्हणतात, “आता स्वराज्याच्या हक्काची मागणी करताना त्यांचीच ओरड जास्त आहे व स्वराज्याचे अधिकार मिळतील ते सर्व आमच्या ताब्यात रहावेत अशी त्यांची लटपट आहे. हे अधिकार केवळ त्यांच्याच वाट्याला न जावे व इतर लोकानाही यात हिस्सा मिळावा असे प्रतिपादन करणारे लोक यांच्यासाठी देशद्रोही, देशबुडवे दिसतात.” (आजही असेच शब्द वापरले जातात)

ब्राह्मणाकडे सत्ता जाणे व पेशवाईचा उन्माद काय? या विषयी पुन्हा शाहू महाराज काय म्हणतात ते पाहूया, “लोकांची तयारी नसतानाही असे अधिकार लोकांस दिले गेल्यास ते अल्पसंख्याक जातींच्या हातात पडतात व जातीभेदाने जखडलेल्या आमच्या देशात ते एकाच जातीच्या हाती जाउन स्वार्थबुद्धीने त्याना इतरांचे भयंकर नुकसान करण्याची आयती संधी मिळते. पेशवाईचा अलिकडील इतिहास या माझ्या म्हणण्यास भक्कम पुरावे देतो. स्वार्थाची साधने हाती आली म्हणजे चांगले लोकही वाईट व जुलुमी होतात. मग ज्यानी आज पिढ्यानपिढ्या इतरांस गुलामगिरीत खितपत ठेवले आहे. यांची तर इच्छा तसेच वागण्याची रित उघड उघड दिसत आहे. यांच्या हाती सत्ता जाउ नये या विषयी खबरदारी घेण्याची केवढी आवश्यकता आहे हे सांगण्यासाठी माझ्या भाषणाचा आशय असाच आहे. ‘केसरी’ वगैरे जहाल पत्रांचे धोरण व कावा कसा आहे हे आपणास माहिती आहेच..”

आता पेशवाईने मराठ्यांच्या केलेल्या नुकसानी संबधीत आणखी थोडक्यात छत्रपती शाहूंचे बोल पाहूया, “मराठ्यांचा इतिहास पहा, छत्रपती शाहू महाराजानी भूल होउन पेशव्यास अधिकाधिक सत्ता मिळविण्यास संधी मिळाली. याचाच परिणाम छत्रपतीचा कारागृहवास हा झाला. जातीभेद तीव्र झाले, जातिमत्सर वाढला व अस्पृश्यास तर गळ्यात गाडगे व कंबरेस फेसाटी बांधून फिरावे लागे.” स्वराज्याच्या काळात म्हणजे पेशवाई अस्तित्वात नसतानाही पेशवे म्हणून स्वराज्यात चाकरी करणारे कसे खुद्द छत्रपती यांच्या शिक्षणाला विरोध करित. याप्रसंगी शाहू महाराज म्हणतात, “श्री प्रतापसिन्ह महाराज छत्रपती हे पेशव्यांचे ताब्यात असता लहाणपणी लिहिणे, वाचणे शिकण्याचीही त्याना बंदी होती. तेव्हा त्यांच्या धोरणी आईने रात्री बारा वाजता उठवून त्याना ब्राह्मणेत्तर पंतोजीकडून लिहिणे, वाचणे शिकविण्याचे काम केले.” अर्थात सत्ता असो कि नसो हे किती विकृत होते हे यातून स्पष्ट होते.

जातीभेद किती वाईट आणि जातीभेदामुळेच आपल्यावर गुलामगिरीचे संकट आले असे शाहू महाराजांचे पक्के मत झाले होते. त्याविषयी ते अनेक सभेत जाहीरपणे मांडत असे. छ. शाहू म्हणतात, “परकी अंमलापासून सुटण्याचा प्रयत्न राजपूत क्षत्रियानी चांगलाच केला होता. पण जातिभेदानी पोखरलेल्या समाजस्थितीत तो यशस्वी झाला नाही यात नवल नाही. दुसरा मोठा आणि जास्त यशस्वी प्रयत्न मऱाठे लोकानी केला.. हे लोक सर्व देश जिंकतात की काय? असे एकवेळ वाटू लागले. पण मराठ्यांची राजसत्ता हळूहळू पण पुर्णपणे ब्राह्मणाच्या हाती गेल्याने ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर हा भेद तीव्र झाला व मराठी राजसत्ता नाश पावली.” या पेशवाईने छत्रपती घराण्याचे केलेले नुकसान म्हणून शाहूंची पेशव्यांवरील चीड खाली वाक्यातून जाणवते. ती अशी,”शाहू महाराजांच्या वंशजास पेशव्यानी लुप्तप्राय केले, तरी पेशवाईच्या अस्ताबरोबर साताऱ्याच्या प्रतापसिन्ह महाराजांचा उदय झाला.” – छत्रपती शाहू महाराज! अर्थात पेशवाईबद्दल शाहू महाराजांचा पाच पैश्याचीही सहानूभूती नव्हती.. याउलट शिवछत्रपतींविषयी शाहू महाराजांचे प्रेम किती होते व शिवछत्रपतींचा समतेचा वारसा जपण्यासाठी ते पुर्णपणे कटीबध्द कसे होते ते पहा, “श्री शिवछत्रपतींच्या नावाला किंवा त्यांच्या गादीला बट्टा लागेल असे नीच वर्तन माझ्याकडून होणार नाही. राज्यधिकारसुत्रे हाती अल्यानंतर मागासलेल्या जातीना वर आणण्याचे मी अनेक प्रयत्न केले आहेत.”

आजघडीला आपण धार्मिक धृवीकरणातून आपण दंगली पाहतोच, त्यातून नुकसान सामान्य कार्यकर्त्यांचे अधिक होते ते ही पाहिले आहेत. या गोष्टी पुर्वापार चालत आलेल्या आहेत. शाहूंचे याबाबतही बोल आहेत, ते म्हणतात “मुंबई, सोलापूर, अहमदाबाद, अमृतसर व लाहोर वगैरे ठिकाणी जे दंगे झाले त्यात सुशिक्षित पुढारी मागे राहून गोरगरीब लोकांवर प्रसंग आला, त्याचे कारण त्यांचे अज्ञान. पुढार्यांचा कावा त्याना समजला नसेल.” आजघडीला शिवाजी महाराजांचे व संभाजी महाराजांचे नाव घेउन काही नालायक व विकृत लोक तरुणांची माथी भडकवण्याचे प्रकार करतात तर काही राष्ट्रद्रोही संघटना धार्मिक धृवीकरण करतात त्यांच्याकरिता शाहू महाराजांचे हे बोल, ” जात्याभिमनाच्या, श्री शिवाजी महाराजांच्या व धर्माच्या आड राहून मी मुळीच गोळ्या मारीत नसतो. अश्या आडून गोळ्या मारण्याचा मी धिक्कार करतो. माझ्या मागासलेल्या बंधू भगिनीना गुलामगिरीत लोटू पाहतात त्यांचा मी धिक्कार करतो.” शाहू महाराज आज अस्तित्वात असते आणि शिवाजी महाराजांचे नावे कुणी तरुणांची माथी भडकावित दिसले असते तर कानशिलात लावून त्याची वरात काढली असती..

शाहू महाराजाना त्याकाळचा इतिहासाबाबत आवश्यक संसाधने असतील का? असे अनेक जण मत व्यक्त करतील आणि जुलुमी पेशवाई व शिवरायांचे स्वराज्य एकच होते, असे सांगण्याचा प्रयत्न करतील. पण शिवरायांबद्दल तसेच पेशव्यांसंबधीत संपुर्ण इतिहास माहीत असलेले ते छत्रपती घराण्याचे वारस असलेले शाहू महाराज होते शेवटी. त्याना छत्रपती घराण्याच्या इतिहासाबद्दल सर्वच माहीती होते, ते या आग्राच्या सुटकेबद्दल त्यांच्या वक्तव्यातून समजते,”माझे थोर व पूज्य पूर्वज, मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी हे आपल्या अनुयायांसह दिल्लीत अटकेत असलेवेळी, या महायोद्ध्याने या बिकट प्रसंगाला कसे तोंड दिले हे तुम्हाला माहीती आहेच.” शिवछत्रपतींचा व संपुर्ण मराठेशाही आणि पेशवाईचा इतिहास शाहूना माहीती होता व पेशवाई कशी होती ते स्पष्ट करित असत. त्यांचे राज्य शिवछतत्रपतींचे पेशवाईनंतरचे स्वराज्यच होते..

भारतात आजघडीला मुस्लिमद्वेष वाढविण्याकरिता मुघल आणि हिंदू राजे असे सरळ विभाजन धर्माच्या नावाने केले जाते, परंतु त्यावेळी लढाया ह्या साम्राज्यविस्ताराच्या महत्वकांक्षेणे होत आणि दोन्ही पक्षात हिंदू आणि मुस्लिम लढवय्ये असे म्हणून धर्मासाठी या लढाया होत्या असे सांगणे केवळ पक्षांच्या राजकिय हिताकरिता आहे हे तपासले पाहिजे. शाहू महाराज एकेप्रसंगी म्हणतात,” राज्य संपादन करण्याच्या महत्वकांक्षेने, पूर्वी या देशात लढाया झाल्या. अकबर, शिवाजी महाराज वगैरे महात्म्यांच्या काळी धर्मद्वेषाने किंवा जातीद्वेषाने कोणी लढाया करित नसत. अकबर बादशहाच्या पदरी मराठे, राजपूत, इतर हिंदू सरदार व लढवय्ये अनेक लोक होते. विजयनगरच्या राजाच्या पदरी किंवा श्री शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुसलमानांची सख्या कमी नव्हती. या सर्वानी स्वधर्मीयांबरोबर किंवा स्वजातीयांबरोबर लढण्याच्या प्रसंगी देखील आपले इमान कायम राखले. अशावेळी त्यांच्या निमकहलालपणा व बंधूप्रेम चांगल्याप्रमाणे दिसून येई.” मध्ययुगीन इतिहासावर धार्मिक राजकारण करणार्या व धुर्वीकरण करु पाहणार्या नीच राजकारणी व धुर्त संघटनांसाठी ही एका मराठा संस्थानाच्या महाराजाकडून कडकडीत चपराक आहे. त्यापुढे जाउनही शाहू महाराज म्हणतात “मराठ्यांच्या फौजेत मोठेमोठे मुसलमान सरदार होते, त्याचप्रमाणे मुसलमानांच्या फौजेत मराठे सरदार होते. औरंगजेब आणि श्री शिवाजी महाराज यांच्यावेळी उभय पक्षात हिंदू व मुसलमान सरदार होते. मराठे व मुसलमान यांचा हा परंपरागत धर्म आहे. ज्याचे खावे मीठ, त्याच्याशी रहावे नीट.” हे वाचून आजघडीला धर्माच्या नावावर आपले पोट भरणाऱ्या व तरुणाना भडकविणाऱ्या लबाड लोकांच्या पोटात दुखेल..

मराठा साम्राज्य काही काळानंतर ५ भागात विभागले होते, जेव्हा महिला म्हणून आहिल्यादेवी यांनी तलवार हाती घेतली तेव्हा ती पेशव्यांच्या पचनी जात नव्हती, त्यांचा मनू आडवा येत होता. पेशवे कुटनीती करायला लागले, तो प्रसंग पुढील प्रमाणे, “पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदोर वर चढाई केली. हे वृत्त तेजस्विनी अहिल्यादेवीला कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठविला त्या म्हणतात,”आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितूरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी? दुःखात बुडालेेल्यास आधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू? आता आपली गाठ रणांगणात पडेल! माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल.

पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही…”- रणरागिणी अहिल्यादेवी होळकर. तसेच महाराणी ताराराणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या त्यानाही पेशव्यांची मनसुबे, मनमानी, धेय्यधोरणे पसंत नव्हते. त्यानीही जेव्हा पानिपत युद्धात पेशव्यांचा पराभव झाला होता तेव्हा, “बरं झाले पेशवाई बुडाली” असे मत पेशवाई बाबत उद्धृत केले होते.

तर मित्रानो आपणांस माहीती आहेच कि, शाहू महाराज हे शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे आदर्श वारस व लोकशाहीच्या प्रारंभी युगातील आदर्श राज्यकर्ते होत. पेशवाई जर चांगली असती तर तिचे उदात्तीकरण शाहू राजानी केले असते, पेशवाई ही अत्यंत वाईट होती, जुलुमी होती, जातीभेदाचा परमोच्च शिखर गाठणारी राज्यपद्धती होती व मराठ्यांच्या साम्राज्याचा घात पात करुन उभी राहिली होती, असे असल्यामुळे छत्रपती घराण्यालाही पेशवाई गेल्याचे अंशत:ही दुख वाटत नव्हते, उलट पेशवाईने स्वराज्यात कलह निर्माण करुन पेशवाई निर्माण केली असे त्यांचे मत होते. परंतु आजच्या मराठा व ब्राह्मणेत्तर समाजाला पेशवाई जाण्याचे दुख: का होते? हे समजणे कठीण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मणशाही हजारो पट वाईट” त्याचे काही अंशी स्वरुप मी श्री शाहू महाराज यानी सांगितलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य ते पेशवाई या विषयीचे थोडक्यात आकलन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पेशवाई ही स्वत: स्वराज्याच्या कशी विरोधी वागली व ती किती वाईट होती म्हणून तीचा अतिरेकासोबत अस्तही झाला. परंतु काही नीच आणि कपटी लोकांद्वारे द्वेष पसरवण्याकरिता खोटे पसरविले जाते त्यासाठीच ही माहीती येथे सादर करित आहे. आजघडीला पेशवाईचे गुण गाणारे ब्राह्मणेत्तरही आहेत हे पाहून वाईट वाटते, असो स्वराज्याचे खरे शत्रू कोण? हे यातून स्पष्ट होते.. यातून लोक बोध घेतील अशी अपेक्षा करतो

राकेश अढांगळे

जय शिवराय!
जय भीम!
शाहू राजांचा विजय असो..✊🏼

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*