सवर्ण (ब्राह्मणी) स्त्रीवाद आणि बहुजन महापुरूषांबद्दलचे प्रचलित गैरसमज.

ए बी मंजुषा

आंबेडकर, फुले, शाहू, पेरियार आणि सरते शेवटी बुद्ध यांच्यावर सर्वात जास्त राग कुणाला असेल तर तो मला वाटतो सवर्ण स्त्रियांना (सगळ्याच सवर्णांना तसा राग आहे पण सवर्ण स्त्रिया, त्यातही तथाकथित स्वत:ला स्त्रिवादी म्हणवून घेणाऱ्या ब्राम्हण – सवर्ण स्त्रिया)

जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल काहीच वाईट बोलण्यासारखं नसतं तर तिथे काहीतरी कपोलकल्पित कथा निर्माण करून त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यातल्या त्यात जर महापुरूष बहुजन असतील तर यांच्या उत्साहाला उधाण येतं.

यांची सुरूवात होते बुद्धापास्न कि कसं बुद्धाने यशोधरेला एकटं सोडलं, बरं यांना मागचं पुढचं सत्य काहीच माहीत नसतं पण यशोधरेबद्दल कधी नव्हे ती खोटी सहानुभूती यांच्या मनात निर्माण होते, ज्याचा उद्देश फक्त सिद्धार्थाला कमी लेखण्याचा असतो, सीतेवर संशय करणारा, तिला सोडणारा राम, आपल्या बायकोला सोडून रामाच्या सोबत गेलेला लक्ष्मण, बायको असून प्रेयसीला महत्व देणारा कृष्ण, आणि जुगारात बायकोला हरणारे पांडव यांना कधीच चुकीचे वाटत नाही किंवा सीता, उर्मिला, रुक्मिनी आणि द्रौपदीबद्दल कधीच सहानुभूती वाटत नाही, यांना बुद्ध मात्र स्त्रिवादविरोधी (antifeminist) वाटतात.

स्त्रीवादाबद्दल मला जास्त काही माहीत नाही पण स्त्रीवादाचे काही प्रकार मी बघितलेत;
१ ज्यात असं सांगितल्या जातं कि पुरूष आणि स्त्रिया नैसर्गिकरित्या समान आहेत, पण त्यांना पारंपारीक/सांस्कृतिकरित्या कमी लेखलं जातं आणि असमानतेची वागणूक दिली जाते.
२ यात स्त्री हि निसर्गत: पुरूषापेक्षा श्रेष्ठ समजल्या जाते कारण तिच्याकडे सृजनशिलता आहे, आणि त्यामुळे ती सृष्टी च्या जास्त जवळची आहे
३ यात असं समजल्या जात कि स्त्रियांना भेदभावपूर्ण वागणूक दिल्या जाते जी बंद व्हायला हवी, त्यांना जास्त संधी उपलब्ध व्हायला हव्यात, आणि त्यांच्या प्रगतीमध्ये बाधा हि त्यांची पुनरूत्पादनाची क्षमताच आहे, तर ती कायमची नष्ट व्हावी, किंवा त्यांच्यावर ती सक्ती नसावी तर त्यांची ती इच्छा किंवा पसंती असावी.
४ यात स्त्रीयांनी हि पुरूषासारखं रहावं, स्वच्छंदी, मनमर्जीनुसार.
मला या कुठल्याच कक्षेत बुद्ध, फुले, आंबेडकर दिसत नाहीत, ते या मर्यादित कक्षेत कुठेच सम्मिलित होत नाहीत.

बुद्धाबद्दल विचार केला तर सिद्धार्थ आणि यशोधरेचं नातं हे नुसतं पतीपत्नीचं नव्हे तर मित्रमैत्रीनीचं असं होतं, यशोधरेने इतर राजकुमारांना नाकारून सिद्धार्थाला पसंत केले होते. आपला आयुष्याचा सहचारी म्हणून, त्यांच्यात नितांत प्रेम, आदर, आणि विश्वास होता एकमेकांप्रती.
सिद्धार्थ गृहत्याग करणार आहे हे यशोधरेला माहीत होतं, शिवाय बुद्ध बनल्यावर तथागत जेव्हा कपिलवस्तुला येतात तेव्हा राहुलला परिचय करून देतांना यशोधरा सिद्धार्थाचे जे वर्णन करते त्यात निव्वळ प्रेम आणि आदर दिसतो, याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म एकदा तरी नक्की वाचावा.

ज्योतिबा फुलें बद्दल जर कुणी म्हणत असेल कि ज्योतिबांनी fashion (प्रचलित चालिरीती) म्हणून स्त्रीवाद केला तर त्यांच्या या पराकोटीच्या मुर्खपणावर फक्त हसु शकतो, किंवा त्यांच्या अज्ञानाबाबत सहानुभूती ठेवू शकतो, असूयेपोटी असे उद्गार निघत असतील तर त्यांची विद्येची देवी त्यांना सदबुद्धी देवो.
समाजाच्या, स्वत:च्या परिवाराच्या विरूद्ध जाऊन पत्नीला शिकवणे, नुसतं शिकवणेच नाही तर इतरांना त्या शिक्षणाचा फायदा व्हावा याकरीता प्रेरीत करणे, वयाच्या 21 व्या वर्षी शाळा सुरू करणे, विधवाविवाह घडवून आणणे, बालिकागृह सुरू करून मुलींना आश्रय देणे, केशवपण सारख्या क्रूर रिती बंद व्हाव्या म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणणे, ह्या ना अनेक गोष्टी केल्यानंतरही जर या सवर्ण स्त्रियांना ज्योतिबा fashion (सद्यस्थिती चालीरीती) म्हणून स्त्रीवादी वाटत असतील तर यांनी आपला मानसिक उपचार करावा.

सर्वात शेवटी यांचं लक्ष्य असतं बाबासाहेब, यांचा आरोप असतो कि बाबासाहेबांनी रमाईला घरात ठेवलं, तर स्त्रिवादी (feminist) बायांनो, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, तरीही रमाई बाबांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असायच्या, घर सांभाळून बाबांना सामाजिक कार्याकरीता मोकळं सोडणे, हे सामाजिक कार्यात गणल्या जाणार नाही काय? हे सामाजिक योगदान नव्हतं काय रमाईचं? बाबांचं त्यांच्या रामूवर इतकं नितांत प्रेम होतं कि रमाई गेल्यावर बाबा एखाद्या लहान मुलासारखे ढसाढसा रडले आणि काही काळाकरीता प्रवर्जित सुद्धा झालेले, रमाईला आपण वेळ देऊ शकत नाही याची खंत त्यांना होती पण त्यांनी जर रमाई किंवा आपल्या परिवाराला वेळ दिला असता तर तुमच्यासारख्या छद्म स्त्रिवादी (pseudo feminists) सुद्धा आज कदाचित घरात चुल आणि मुल सांभाळत शोषित म्हणून जगत असता… बाबासाहेबांच वाक्य आहे कि मी समाजाची प्रगती यावरून आखतो कि त्या समाजाची स्त्री किती शिक्षित आहे, इतर विकसित देशातही स्त्रियांना मतदानाच्या हक्कांकरीता संघर्ष करावा लागला तिथे एका झटक्यात संविधानात ते हक्क स्त्रियांना बहाल केले, हिंदु कोड बिल, मातृत्व रजा, (maternity leave) समान अधिकार असे एक ना अनेक हक्क देऊन हजारो वर्षाच्या चालत आलेल्या पुरूसत्ताक व्यवस्थेला तडा दिला, तो व्यक्ति जर fashion म्हणून स्त्रीवाद करायचा असा आरोप होत असेल तर आपण मानसिकरित्या स्वस्थ आहोत काय याची एकदा चाचणी करावी.

ए बी मंजुषा ह्या नागपूर येथील रहिवासी असून त्या Biotech पदवीधर आहेत तसेच MBA (HR) पदव्युत्तर आहेत. आंबेडकरी चळळीतील एक अभ्यासक आहेत.

3 Comments

  1. Ha jo raag aahe to kontya karanane aahe yacha jar ka ya striyanni vishleshan kela tar tyanna kalel ki apli hi raagachi bhavna kiti vyarth aahe. Moreover It’s self destructive for them. Anyway, Chaan lihla lekh.

Leave a Reply

Your email address will not be published.


*