कलर फोटो – वर्णभेदाची वस्तूस्थिती

अदिती गांजापूरकर

रंग ही एखाद्या व्यक्तीची ओळख बनू शकत नाही असे असले तरी सर्रासपणे रंगाचा वापर ओळख बनविण्याच्या रीतीने केला जात असल्याने ही गोष्ट समाजमनाच्या खूप खोलवर रुजलीये हे दुर्दैवी वास्तव आहे. वैश्विक पातळीवर रंगभेदाविरोधाच्या तिव्र संघर्षाला यश मिळून त्याविरोधात मानवतेच्या विरोधातील गुन्हा ठरणारा कायदा झाला परंतु या यशामागच्या संघर्षातील जखमा इतिहासात आजही मौन आहेत. भारतात कायद्याने रंगभेद गुन्हा असला तरी समाजाची मानसिकता अजुनही प्रखरपणे बदलली नाही, समाजमनासाठी ही गोष्ट नॉर्मल असल्याने रोजच्या जगण्यात प्रॅक्टिस केली जाते त्यामुळे या विषयावर लिहिणे आणि बोलणे क्रमप्राप्त आहे, त्याशिवाय मानसशास्त्रीय बदल घडणार नाही.

वास्तविक पाहता भारताच्या भौगोलिक स्थितीनुसार आणि इथल्या वातावरणानुसार इथल्या लोकांचा मूळ वर्ण काळा सावळा आहे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले असतानाही सौंदर्याचे मापदंड निर्माण करणाऱ्यांनी स्वतःच्या प्रिव्हलेज ला अनुसरून मांडणी केल्याने समाजमनाचा हा फक्त विचार नसुन अट्टाहास निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीचा भाडीमार केला जातो, आयडल पर्सन ला प्रोजेक्ट करताना विशेष काळजी घेतली जाते. इथे व्यक्तीचे कर्तृत्व हे जात, वर्ण यापुढे गौण ठरविले जाते हीच वस्तुस्थिती आहे, तथाकथित समाज व्यवस्थेत व्यक्तीला विशिष्ट वर्ण आणि जात यानुसार वेगळी वागणूक दिली जाते हे मानवी सभ्यतेच्या विरोधातील एकप्रकारचे षडयंत्र आहे. याचे समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय आकलन होण्यासाठी त्या प्रकारची शिक्षणव्यवस्था आणि प्रबोधनव्यवस्था तितकीशी प्रभावीपणे काम करत नसल्याने २१व्या शतकात विज्ञानाच्या युगात अजुनही तेवढे अपेक्षित दृष्टिकोन परिवर्तन होताना दिसुन येत नाही. चित्रपट हे भाष्य करण्याचे अतिशय प्रभावी माध्यम असुन याची जाणीव पेरियार यांच्या विचारांमुळे ईतर प्रादेशिक भाषांच्या चित्रपटसृष्टीच्या तुलनेत दक्षिण सिनेसृष्टीत खोलवर रुजली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत जातीवाद काळजीपूर्वकात जोपासला जातो समाजशास्त्रज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चित्रपटात दाखवण्यासाठी खुप मोठा काळ लागला याउलट दाक्षिणात्य सिनेसृष्टी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राजकारण जपते म्हणून तेथील चित्रपटात बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा, विचार, प्रेम, विद्रोह, संघर्ष प्रकर्षाने समोर येताना दिसतात. द्रविड चळवळीने खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राजकारण जपण्यातून सांस्कृतिक आत्मभान निर्माण केले आणि त्यातुनचं आपल्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सामाजिक प्रश्न समोर आणण्याचे काम चित्रपटाच्या माध्यमातून होत असल्याचे दिसुन येते.

चित्रपट हा समाजाचा आरसा असतो हे खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयोगातून प्रकर्षाने जाणवते, नवनिर्मितीवर भर दिला जात असल्याने विविध विषय थेटपणे समोर आणुन अंतर्मुख होण्यास भाग पाडले जाते एवढी ताकद सिनेमाची आहे. काही दिवसांपूर्वीचं वर्णभेदावर सडेतोड भाष्य करणारा “कलर फोटो” हा सिनेमा पाहिला आणि त्यावर लिहिण्याची ईच्छा मनात घर करून राहिली. भारतीय समाजव्यवस्थेच्या जीवनात प्रॅक्टिस होत असल्याने लोकांसाठी नॉर्मल झालेली गोष्ट परंतु मानसशास्त्रीयरित्या परिणाम करणारा आणि मानवी सभ्यतेचं विडंबन करणारा विषय. इथल्या वर्चस्ववादी लोकांनी सौंदर्याचे बेगडी मापदंड प्रस्थापित करत रचलेलं षडयंत्र. या सगळ्याला फाट्यावर मारत घडणारी एक प्रेमकहाणी. चित्रपटातील नायकाला काळा असल्याने त्याच्यावर होणाऱ्या कमेंटवरून त्याच्यामध्ये तयार झालेला न्यूनगंड आणि समाजमनाच्या विचारांमुळे स्वतःचा फोटो सुद्धा त्याला काढू न वाटणे हे लादलेले अमानवीय ओझे मनाला विनाकारण वाहावे लागते हे पाहताना संवेदनशील व्यक्ती म्हणुन मन सुन्न होऊन जाते. कॉलेजमध्ये शिकत असताना नायक कृष्णाला काळा असण्यावरून चिडवलं जातं त्यावेळी तो व्यथित होऊन जातो, त्याचा मित्र त्याला समजवताना बोलतो, “रंगाचं एवढं काय नाही, चांगलं ह्रदय असणं गरजेचं आहे” त्यावेळी नायक म्हणतो जर रंगाचं एवढं काय नाही तर आपल्या रूममध्ये गोरा होण्याची क्रिम कशासाठी आहे? हा खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्न आहे. घरात सौंदर्याला घेऊन अट्टाहास असलेल्या वातावरणातून नायिका दीप्ती येत असताना आणि तिच्या भावाची याबाबतीत जबरदस्ती दहशत असताना कोणत्याही दबावाला बळी न पडता गोऱ्या वर्णाची नायिका निरागस प्रेमाच्या भावनेत पडते, नायकाला सतत कॉन्फिडन्स देत राहते त्यावेळी खऱ्या अर्थाने न्यूनगंडग्रस्त व्यक्तीच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीची किती गरज असते हे जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे जी व्यवस्थेची बंधने तोडीत अंतर्मनाचं सौंदर्य खुलवते. चित्रपटात दोन मनांचं बहरलेलं प्रेम पाहताना कलुषित मनातील सौंदर्याचे पोकळ मापदंड आपोआप गळून पडतात आणि आपल्याला समजुनही येत नाही इतक्या हळुवारपणे आपण या नैसर्गिक अनुभूतीत गुंतून जातो. त्यांनी रंगवलेली नवजीवनाची स्वप्ने आणि त्यासाठी परिस्थितीवर मात करून यशस्वी झाल्यावर नायक तिच्या घरी लग्नाची बोलणी करून तिला मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतो त्यावेळी नकारात्मकता संकुचित होऊन एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वोच्च कॉन्फिडन्स चं चित्र ठळकपणे दिसुन येते. Happy ending व्हायला हा बॉलीवूडचा मनोरंजनात्मक चित्रपट नाही; हे दक्षिण सिनेसृष्टीचं सांस्कृतिक सौंदर्यशास्त्र आहे जे समाजाचं वास्तव दाखवुन विचार करायला भाग पाडते, समाजाला आरसा दाखवुन अंतर्मुख करते. त्यामुळेच आपले हिंदी आणि मराठी सिनेमे यापासून कोसो दुर आहेत. दोघांच्या प्रेमाची माहिती घरच्यांना झाल्यानंतर मुलीच्या घरचे केवळ कृष्णाच्या रंगावरून त्याला विरोध करतात तेव्हा नायक बोलतो, “लग्नासाठी तुम्हाला रंग गरजेचा वाटतो पण सुखी आयुष्यासाठी निरागस ह्रदय आणि प्रेम गरजेचं आहे” आजच्या युगात मानसिक शांती आणि समाधानासाठी ही लाईन खुप महत्वाची ठरून जातेय. यानंतरही नायिकेच्या घरचे विरोध आणि अमानवीय अत्याचार करतात तेव्हा सभोवताली घडणाऱ्या ऑनर किलिंग, जातीयतेचे बळी, हुंडाबळी या घटनांची मालिका समोर येते. नायकावर अनन्वित अत्याचार होतेत, तो विनवण्या करीत असतानाही त्याचं भविष्य त्याच्यापासून हिसकावून घेतलं जातं, तो जीवापाड जपणाऱ्या आणि आईच्या आठवणीत नामकरण केलेल्या लक्ष्मी नामक गायीची हत्या करून तिचंचं मटण त्याला न सांगता खायला दिलं जातं त्यावेळी काळजावर घाव झाल्याशिवाय राहवत नाही. नायिका दीप्ती ज्यावेळी घरच्यांना प्रश्न करते की, तुम्ही अहंकारासाठी लढताय आणि कृष्णा त्याच्या प्रेमासाठी लढतोय. यांत अहंकार मोठा की प्रेम? या एकाच प्रश्नात पैशाचा माज, समाजातील पोकळ रुबाब, जातीचा अहंकार या सगळ्यांचा बुरखा फाटून जातो. जेव्हा पोकळ अट्टाहासासाठी अहंकारातून कौर्याची परिसीमा गाठली जाते आणि त्यातुन अमानवीय अन्याय-अत्याचार केले जातेत तेव्हा अशा रानटी जमातींवर मोठमोठ्या विद्यापीठ आणि इन्स्टिट्यूटमध्ये शोधनिबंध प्रकाशित केले गेले पाहिजेत, या जमातींचं मानसिक संतुलन ढासळल आहे का? यांना मानसोपचाराची गरज आहे का? असे प्रश्न वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर जेव्हा येतील तेव्हा खऱ्या अर्थाने ही समाजव्यवस्था मानवी सभ्यतेकडे वाटचाल करत असेल असे मनोमन वाटते. सरतेशेवटी चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये नायकाच्या श्रद्धांजलीसाठी त्याच्या कपड्याला हार घातलेलं दृश्य पाहुन जर मनाला वेदना होत नसतील, डोळ्यांवरची झापडे उघडत नसतील तर ज्याने त्याने आपल्या मनाच्या संवेदनशीलतेची मापदंडे तपासून पहावीत एवढंचं सांगेन.

अदिती गांजापूरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*