आजच्या मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्ताने…

अपेक्षा पवार

कोणत्याही वंचित समाजाला शब्द व भाषा देणारा महापुरुष लाभावा लागतो त्याशिवाय त्या समाजाची मानसिकता बदलत नाही आणि त्याला दिशाही प्राप्त होत नाही…डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युग निर्माणकर्ते आहेत काळाला वाकवून त्यांनी नवा इतिहास निर्माण केलाय. पुरुषांबरोबर स्त्री चे उत्थान कसे करता येईल ह्याचा ध्यास आंबेडकरांच्या कार्यात दिसुन येतो..

‘हिंदु कोड बिल’ च्या माध्यमातून त्यांनी संपुर्ण भारतीय स्त्रियांना कायद्याने अधिकार दिलेत जे अधिकार हजारो वर्षे हिंदु धर्मग्रंथानी नाकारले होते. ‘हिंदु कोड बिल’ हा स्त्री मुक्तीचा जाहीरनामा होता.

मनुस्मृती दहन दिवस आपण साजरा करतोय.. पण काय आहे ही मनुस्मृती.. कोण आहे हा मनु ह्याबद्दल थोडी माहिती द्यावीशी वाटते..तर ज्या मनुने आपल्या ‘मनुस्मृती’ मध्ये स्त्री च्या बंडखोरीला पायबंद घातला त्याच कारण होतं मनुची मुलगी ‘इला’ वडिलांच्या मिळकतीत हिस्सा मिळावा म्हणुन ही इला घराबाहेर पडली आणि म्हणुनच मनुने स्त्री जातीच्या वारसा हक्कावर बंदी आणुन तिला अंधार कोठडीत कायमचे डांबून ठेवले तिला पुरुषावलंबी बनवले.. आणि स्त्री हा अन्याय मूकपणे सोसू लागली.

हजारो वर्षे खितपत पडलेल्या ह्या स्त्री जातीला सर्वप्रथम धार्मिक क्षेत्रात समानतेचा अधिकार दिला. महात्मा फुल्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून तिला पुरुषप्रधान संस्कृतीच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पुरुषांबरोबर समानतेचा अधिकार दिला.. आणि स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त झाली..

हे सगळं आज मुद्दाम आठवावसं वाटलं मी आज एक independent working woman आहे आणि मला इथपर्यंत पोहचण्यासाठी …संपूर्ण स्त्री जातीला ज्याने उद्धाराचा मार्ग दाखवला त्याची कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच..

२१व्या शतकात पदार्पण करत असूनही मला वाटतं स्त्रियांवरील पुरुषी पगडा कमी झालेला नाही आजही ती त्याला पूर्णपणे विरोध करू शकत नाही..सुशिक्षित स्त्री office मध्ये officer जरी असली तरी घरात तिला पतीच्या अधिपत्याखाली राहावं लागतं ही खंत आहे..

आंबेडकरी चळवळीचं बघायला गेलं तर काही अपवाद वगळता आंबेडकरी चळवळीची अपत्य असलेल्या अनेक संघटनांच्या कार्यात खऱ्या अर्थाने आजही स्त्री ला वाटा दिला जात नाही कोणत्याही निर्णय प्रक्रियेत तिला महत्वाचे स्थान नाही..

आंबेडकरांनी आम्हा सर्व स्त्री जातीला नवीन दिशा प्राप्त करून दिलीये..त्यांनी माझ्यावर जे काही उपकार केलेत त्याची परतफेड तर करू नाही शकणार मी… पण ह्या समाजाप्रती काहीतरी देणे लागतं ह्या भावनेतूनच माझी प्रत्येक कृती असेल आणि ह्याच भावनेतून मी जगणार आहे..

इथल्या सगळ्या प्रस्थापित सामाज्यातील मुलींसाठी महिलांसाठी माझा मित्र कवी सचिन डांगळे ह्याची एक सुंदर रचना.. जी त्याने माझ्यासाठी लिहिलीये असं मी गर्वाने सांगु शकते…

दैववादी तु रूढी प्रथांची
आहेस वेडे मानसिक गुलाम
मी सत्यपथावर ठाण मांडीला
करिते विश्व मज सलाम…

तु जखडून अजुनी साखळीत गं
बंदिवान मनुवादाची
मी निळं पाखरुं भीमबाबचं
वस्ती धम्माच्या झाडाची….

तू मिळुनी दाखव स्वातंत्र तुझे
फिरुनी दाही दिशांचे चारही धाम
मी सत्यपथावर ठाण मांडीला
करिते विश्व मज सलाम…

मानाने तु संचार करती
आधुनिक ह्या काळात
नसते उगवले पीक सुखाचे
भिमाबिगर ह्या मळ्यात…

कळले ना तुला भीमविचार म्हणुनी
अजुनि मुखी देवाचे नावं
सत्यपथावर ठाण मांडीला
करिते विश्व मज सलाम…

कार्य भिमाचे कर्तव्य तुझे गं
आजलाच तू जाणुनी घे
गुलामाची ती तोड चाकोरी
लढण्यासोबत आता ये

लढवय्या बा ची वाघीण लेक तु
नको होऊस सखे कोणाची गुलाम
मिळुनी गाजवु रणांगण हे
भीमराय देऊ निळा सलाम….

अपेक्षा पवार

लेखिका B.A (Polictical Science) ,MBA – HR, असून BFSI क्षेत्रात Recruitment Specialist म्हणून कार्यरत आहेत. त्या शिवाय त्या एलएलबी चे शिक्षण पूर्ण करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*