Online शिक्षणप्रणाली कितपत योग्य?

भारती राजेश

माझा विद्यार्थी — मॅडम मला बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे

मी — अच्छा, फोटो ,आधारकार्ड ,फॉर्म फी आणली आहेस का.

विद्यार्थी — नाही मॅडम,मला काहीच सूचना माहिती नाही,आणि मी अजून फोटो पण काढला नाही.

मी–का रे, मी तर 10 वी च्या व्हाट्सअप्प ग्रुप वर फॉर्म भरण्याबाबत सर्व सूचना टाकल्या होत्या.

विद्यार्थी — मॅडम माझ्या कडे तसा मोबाईल नाहीये,तो मोबाईल पप्पांकडे असतो.पप्पा जुलै महिन्यापासून मुंबई ला कामाला जातात.लोकल बंद असल्याने रोज बस ने ये जा करणे परवडत नाही त्यामुळे कामाच्या ठिकाणीच राहतात व शनिवारी रात्री येतात, व परत सोमवारी कामावर जातात.

मुंबई पासून साधारणतः साठ किलोमीटर लांब असलेल्या कल्याण शहरातील खाजगी अनुदानित मराठी माध्यमातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची ही ऑनलाइन शिक्षणाची अवस्था.अशी बरेच उदाहरणे तुमच्या आजूबाजूला दिसतील. त्यामुळे खेड्यातील ऑनलाईन शिक्षणाचा विचारच न केलेला बरा.

साधारणतः एक ते दीड महिन्यापासून आमच्या कल्याण ईस्ट मध्ये कोरोना बाधित पेशंट चा आकडा हा रोजचा 10 ते 20 दरम्यानचा आहे.शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतांना सापडलेल्या कोरोना पेशंट मध्ये 9 व 10 वीत शिकणाऱ्या साधारणतः 14 ते 17 वयोगटातील मुलं कोरोना बाधित आहेत का? यावर शासनाला काहीच देणंघेणं नाहीये.

“माझं कुटुंब माझी जबाबदारी करता करता” आता शासन “तुमच्या मुलाचं शिक्षण, तुमची जबाबदारी” यावर ठाम झालीय.
मुंबई महापालिकेच्या जी.आर.निघाल्याबरोबर ठाणे महापालिकेने ही,शाळा 16 जानेवारी पर्यंत बंद राहील हा जी.आर काढलाय.

शिक्षणाच्या बाबतीत शासनाचा असाच सावळा गोंधळ सुरू राहिला तर, शाळा सोडून बालमजुरी करणाऱ्या बालकामगारांची संख्या वाढून पुन्हा पटसंखे अभावी मराठी शाळा बंद होण्याचं प्रमाण वाढेल.

भारती राजेश

लेखिका पेशाने शिक्षिका असून सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*