इतिहासाचे मिथकिकरण: आनंद तेलतुंबडे यांच्या भीमा-कोरेगांव संदर्भातील संक्षेपीकरणाचा समाचार

गौरव सोमवंशी

मी जास्त शब्दछल न करता किंवा शाब्दिक अवडंबर न माजवता सरळ मुद्द्यांवर बोलणं पसंत करेल. जेणे करून आपला वेळेचा अपव्यय होणार नाही. लेखकाचे लेखातील उतारेे उधृृृत करून ते मुद्दे खोडून काढत असताना मी त्यांचा संदर्भ हरवला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल.

(१) आनंद तेलतुंबडे: ” जेव्हा बाबासाहेब आंबेडकर भीमा-कोरेगांवची लढाई ही महार सैनिकांची पेशव्यांच्या जातीय अत्याचाराविरोधातील लढाई अशी रंगवतात, तेव्हा बाबासाहेब अगदीच त्याला मिथक बनवतात. जरी मिथक ही चळवळ बांधणीसाठी गरजेची असली, तरिही बाबासाहेबाना त्यावेळी ती अगदीच आवश्यक वाटलेली असावी. पण जेंव्हा एका शतकानंतर ते मिथक जवळजवळ ऐतिहासिक बनू पाहत आणि दलितांना जातीय अस्मितेच्या (identity politics) आधारित राजकारणाच्या दलदलीत ढकलू पाहत, तेंव्हा नक्कीच तो चितेंचा विषय बनायला हवा.”

वरील उतारा हा आनंद तेलतुंबडे यांनी लिहिलेल्या लेखातील दुसरा उतारा असून, लेखकाच म्हणणं किंवा मुद्द्यांची सुरुवात इथून होते. इथेसुद्धा लेखकाने पुन्हा दोन गोष्टींची मोडतोडच नव्हे तर सरमिसळ केली आहे. सर्वप्रथम, ज्या ऐतिहासिक तथ्याला ब्राह्मणी इतिहाकारांनी दखलपात्र न समजण्याचा करंटेपणा केला आणि जे ऐतिहासिक तथ्य शौर्याचे अद्वितीय उदाहरण आहे त्याला लेखक मिथक आणि अनैतिहासिक ठरवतात.

ही कसरत करण्यासाठी लेखक अगदी त्याच इतिहास पुसून त्याला विस्मृतीत टाकण्याच्या तंत्राचा वापर करतात ज्यावर हे जातीव्यवस्थेचे साम्राज्य उभे आहे आणि ज्याचे अस्तित्व लेखक मान्य करतात पण ते पूर्णपणे समजून घेण्यात अपयशी ठरतात.

लेखक दुसरी मोडतोड किंवा सरमिसळ करतात, जेव्हा ते शोषित समूहाच्या स्वत्व ठामपणे आणि जोरकसपणे मांडून शोषित वर्गावर ठराविक लादलेल्या प्रतिमांना (ज्या द्वारे शोषित कायम दुबळे, असहाय्य, लढा उभारू न शकणारे अस रंगवलं गेलं) धक्का देण्याच्या प्रयत्नांना ते जातीय अस्मिता किंवा ओळख बळकटीकरण किंवा मजबुतीकरण (identity politics) म्हणून पाहू लागतात तेव्हा. आता हे एका विद्वान लेखक विचारवंताकडून येणं थोडस आश्चर्य कारक आहे तेदेखील जेव्हा वेळोवेळी उलट वंशवाद (reverse racism) सारख गृहितक विचारवंत, कार्यकर्त्यांनी सुरुंग लावून नष्ट केलल असताना. आता पुन्हा त्यातील फोलपणा दाखवण्याची इथे गरज वाटत नाही. पुन्हा जर कोणी जातीय अस्मिता किंवा ओळख बळकटीकरण किंवा मजबुतीकरण यामुळे चिंतीत असेल तर मी इथे कुप्फिर नालगुंडवार ( राऊंड टेबल इंडिया या आंबेडकरी ऑनलाईन पोर्टलचे संपादक) यांना यासंदर्भात उधृत करेन. कुफ्फिर नालगुंडवार म्हणतात,”जातीय अस्मिता किंवा ओळख बळकटीकरण किंवा मजबुतीकरण कशाने होते तर ते मुख्य धारेच्या कडेवर किंवा काठावर राहण्याच्या प्रवृत्ती किंवा अनुकूलतेने होते. अप्रत्यक्षपणे मनुवादी राजकारण, मनुवादी मांडणी, मनुवादी परंपरा आणि मनुवादी व्यवस्था यांच्या सोयीची मांडणी करत राहणे आणि त्यातही काही प्रातिनिधिक मोजक्या लोकांच्या सोयीचे पाहणे तेही अशा व्यवस्थेमध्ये जिथल्या राजकीय पक्ष असोत की माध्यमे असोत की संस्था असोत की जिथे नव्वद टक्क्यांहून अधिक जागा ह्या काही मोजक्या अशा उच्च जातींनी ( साधारण भारतातील ५०००-६००० जातींपैकी ५०जाती) व्यापलेल्या आहेत. आणि असं असताना तुम्ही (ब्राम्हण उच्चवर्गीय मार्क्सवादी) जातीविरहिन किंवा ओळख विरहित राजकरण जे क्रांतिकारी असल्याचं सतत भासवत राहता ज्यात अजिबात तथ्य नाही.”

याव्यतिरिक्त, राहुल बनसोडे यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे, ॲड. बाळासाहेब आंबेडकरानी स्वतः मान्य केलेलं आहे की भिमा-कोरेगांवला भेटी देणारी लोकं ही अनेक अशा वेगवेगळ्या बहुजन जातींमधील आहेत. अशावेळी आनंद तेलतुंबडे यांचा भिमा-कोरेगांवच्या अनुषंगाने जो निरीक्षणात्मक दावा आहे की दलित जातीय किंवा ओळखीच्या (आयडेंटिटी पॉलिटिक्स)राजकारण्याच्या दलदलीत अडकत चालला आहे तेव्हा ह्यातील फोलपणा लक्षात येतो.         

(२)आनंद तेलतुंबडे: ” ऐतिहासिकदृष्ट्या हे खर आहे की जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने लष्करी महत्वाकांक्षा बाळगण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात दलितांना त्यात सामावून घेतले. कदाचित दलितांची असीम निष्ठा आणि विश्वासूपणा ही त्यांना सेवेत सामावून घेण्याची कारणे असावीत. पण त्याचबरोबर त्यांची स्वस्त उपलब्धता हेही प्रमुख कारण होते. म्हणूनच आपणास बंगाल प्रांतातील नामशुद्र, मद्रास प्रांतातील पराया किंवा महाराष्ट्रातील महार हे त्याकाळी मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या लष्करी सेवेत आढळून येतात. ब्रिटिश सत्तेच्या पायाभरणीत अशाप्रकारे दलितांनी महत्त्वाची भूमिका निभावली असा जर कोणी दावा केला तर तो फारसा चुकीचा ठरणार नाही.”

वरील आनंद तेलतुंबडे यांचा दावा खोडून काढण्यासाठी कुप्फिर नालगुंडवार  यांचा हा उतारा इथे पुरेसा ठरेल:

“….. काय? ब्रिटिशांनी महार सैनिकांना लष्करी सेवेत सामावून घेतले याचे कारण त्यांची स्वस्त उपलब्धता होते? हे अगदीच इतिहासाचं संक्षेपीकरण किंवा इतिहासाचं सरलीकरण करणं होईल… पण यामागची सत्यता किंवा खरी हकीकत अशी आहे की, ब्रिटिश, फ्रेंच आणि बाकी युरोपियन शक्ती हेच फक्त त्यांच्या सैन्याला नियमीत स्वरूपाचे वेतन देत असत. मग ते त्यांचे युरोपियन सैन्य असो अथवा त्यांचे भारतीय सैन्य असो… युरोपियन वसाहतवादी आणि ऐत्तदेशीय भारतीय राज्यकर्त्यानी सेवेत असलेल्या सैनिकांच्या  कामाच्या अटी, मिळणारा मोबदला आणि त्यांची स्थिती याच विदारक चित्रण निराद चौधरींच्या ‘क्लाइव्ह ऑफ इंडिया’ मध्ये आढळून येते… तर झालं अस की, भारतीय सैनिकी इतिहासात पहिल्यांदाच सैन्याला गणवेष, नियमीत शिधावाटप आणि जुजबी प्रशिक्षणाची तजवीज करण्यास सुरुवात झाली होती… त्यामुळे फक्त महारच नव्हे तर मराठा, जाट, राजपूत, सिख, पठाण, ब्राम्हण आणि आणखी बऱ्याच उच्च जाती हळूहळू पण अगदी उत्साहाने मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या लष्करी सेवेत सामील झाल्या…. आणि तुम्ही म्हणता ते स्वस्तात उपलब्ध होते…. अशा रीतीने ब्रिटिश आणि बाकीच्या युरोपियन शक्ती संख्येने त्यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात असलेल्या ऐत्तदेशीय सैन्यांवर विजय मिळवू शकल्या. हे सगळ काय दर्शविते? ते हे दर्शविते की यरोपियन शक्तींनी नव्या पद्धतीने साधनसामुग्रीच नव्हे तर त्याहूनही अधिक मनुष्यबळ पुनर्रचित करून उपयोगात आणण्यास सुरुवात केली होती…. याचेच पर्यावसन अधिक कार्यक्षम आणि चांगल्या लुटीच्या पद्धती आणण्यात झाला, पण यामागे व्यापारी वृत्ती ( mercantilist policy) अधिक होती ज्याचा तात्विक पाया मुक्त बाजारपेठेच्या ‘काम त्याला दाम’ या तत्त्वावर आधालेला होता.”

कुप्फिर नालगुंडवार पुढे म्हणतात की, ” महारांचा सैन्यातला प्रवेश हा निव्वळ अपघात होता अशा आशयाची मांडणी करून आनंद तेलतुंबडे त्यांचे स्वतःचे राजकीय भवितव्य ठरवण्याचे स्वातंत्र्य ते नाकारतात कि जे खूपच अनैतिहासिक आहे ” :- 

“मग आनंद तेलतुंबडे म्हणतात तस असेल तर ब्रिटिशांनी नंतरच्या काळात महार सैनिकांना लष्करात सामील करून घेणं का थांबवलं असेल आणि पुढच्या अर्ध्या शतकात महार रेजिमेंट पूर्णपणे रद्दबातल का ठरवली असेल? आनंद तेलतुंबडे यांच्या म्हणण्यानुसार महारांची स्वस्त उपलब्धता संपुष्टात येऊन ते महाग झाले होते काय? आणि ब्राम्हण, राजपूत, जाट या उच्च जाती स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्या काय? फक्त महारच नव्हे तर दक्षिण भारतातील उच्च जातींसहित सर्वच जाती (जे ब्रिटीश सैन्यात सर्वात पहिल्यांदा सामील झाले होते आणि ज्यांनी ब्रिटिश शक्ती निर्माण करण्यात खूप मोलाचं योगदान दिलं होतं) ‘ मार्शल रेस’ (martial race) नसण्याचे कारण देऊन रद्दबातल ठरवल्या गेल्या…. हयाच आपल्याकडे काय स्पष्टीकरण आहे? अशी एकमितिय किंवा ऐकरेशिय ऐतिहासिक मार्क्सवादी मांडणी खूपच पूर्वग्रहदूषित आणि आंधळी आणि एकांगी आहे… ही मांडणी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील बदलत्या राजकीय परिस्थितीची पुरेपूर दखल घेण्यास कमी पडते… ते हे की भारतीय उपंडातील वेगवेगळे जात समूह सजगपणे स्वतः चे राजकीय पर्याय निवडत होते… आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनीसुध्दा स्वत: चे राजकीय भागीदार निवडण्यास सुरुवात केली होती… आणि ते जेव्हा व्यापारी (mercantilist) भूमिकेतून सक्रिय वसाहतवादी धोरण अवलंबले, तेव्हा त्यांनी नवीन राजकीय भिडू शोधण्यास सुरुवात केली…. सिदनाकाची वीरगाथा आपणास दर्शविते की, पेशव्यांच्या जुलमी राजवटीतील अत्याचारग्रस्त महारसुद्धा नवीन राजकीय पर्याय निवडत होते. तुम्ही सिदनाकाची गाथा मिथक म्हणून धुडकावून लावू शकता. पण ज्या महार कुटुंबातील योद्धे पेशव्याविरुद्धच्या भीमा- कोरेगाव रणसंग्रामाचा भाग होते त्यांच्या वीरकथा आणि आठवणी कशा नाकारू शकणार आहात? लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी भीमा कोरेगाव रणसंग्राम शोधलेल नाही किंवा त्याभोवती आनंद तेलतुंबडे म्हणतात त्याप्रमाणे त्याभोवती मिथकही ही निर्माण केलेलं नाही… तर त्यासंबधीच्या आठवणी महारांमध्ये बाबासाहेबांच्या आधीपासूनच होत्या आणि ते दरवर्षी त्या स्मृती जागवत होते.”

(३)आनंद तेलतुंबडे: ” एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जेव्हा दलितांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झालेला होता, तेव्हासुद्धा जात हे त्यांचे स्वीकृत जग होते. त्यांनी जातव्यवस्था ही नैसर्गिक व्यवस्था आहे आणि त्याअनुषंगाने होणारे जुलूम हे त्यांच्या नशिबाचा भाग असून त्यांना ते निमूटपणे सहन करणं भाग आहे अशी भावना त्यांच्यात तेव्हासुद्धा दृढ होती. त्यामुळे त्याविरुद्ध प्रतिकार करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता तर त्याविरुद्ध वरील कारणांसाठी युद्ध छेडण्याची गोष्ट तर खूपच दूरची आहे.”

इथे पुन्हा एकदा आनंद तेलतुंबडे ज्या खोट्या मिथकांचा आधार घेऊन ही जातव्यवस्था उभी आहे तिचे एकप्रकारे मजबुतीकरण किंवा बळकटीकरणच करतात. ऐतिहासिक जात-व्यवस्थेमध्ये सर्वच जण निमूटपणे जाती व्यवस्थेचे पालन करत होते त्यामुळे त्याविरुद्ध बंडाचा किंवा क्रांतीचा लवलेश सापडणे अगदीच अशक्य होते त्यामुळे भीमा-कोरेगाव संग्राम हा जात व्यवस्थेविरुद्धचा संग्राम हा दावा फारसा विश्वासार्ह नाही अशी मांडणी ते करतात. पण इतिहासाच वरवरच वाचन जरी केल तरी अस लक्षात येत की इतिहास अशा अनेक बंडाचा साक्षीदार आहे की ज्यात ब्राम्हणी व्यवस्थेच्या ‘ जैसे थे’ रचनेला अनेक हादरे दिले गेले आहेत जरी त्यांचा शेवट त्याच व्यवस्थेचा भाग बनून जाण्यात किंवा विनियोगात परावर्तीत झालेला असला तरीही. शीख धर्मापासून ते महाराष्ट्रातील संत परंपरेपर्यन्त आणि एव्हाना लिंगायत धर्म हया बंडाची विविध उदाहरणे आहेत. हया ऐतिहासिक घटनांच दस्तावेजीकरण (documentation) जर शोषक समूहातील इतिहासकारांनी केल नसल्यामुळे त्या घडल्याच नाहीत अस म्हणता येऊ शकेल काय? जर या ‘ वायर’ मधील आनंद तेलतुंबडे यांच्या लेखाने कशाचे बळकटीकरण किंवा मजबुतीकरण होत असेल तर ते उच्च जातींच्या चुकीच्या ऐतिहासिक मांडणीच, अशी मांडणी जिच खंडण करण्यासाठी बाबासाहेब इतिहासतील दडवले गेलेल्या सत्य बाबी पुढे आणण्याचा प्रयत्न करतात.  

पुढे लेखात, आनंद तेलतुंबडे बाबासाहेबांचे आश्रयदाते असल्याच्या आविर्भावात ‘बाबासाहेबाना स्वतःच्या लोकांमधे एक नवचैतन्य निर्माण करायचं असू शकत आणि त्याहेतूनेच बाबासाहेबांनी भीमा-कोरगाव संबंधी मिथक निर्माण केलं असावं’, अशी मखलाशी करतात. पण आनंद तेलतुंबडे यांच्या दाव्यात काही तथ्य आहे काय? की त्यांच्या मांडणी विरुद्ध ही घटना आहे? बाबासाहेबांची मांडणी ही सत्याला धरून होती आणि आहे. जी मांडणी सत्यावर आधारलेली नसून अगदी सहजरित्या खोटी आणि चुकीची सिध्द केली जाऊ शकते अशी मांडणी बाबासाहेब का म्हणून करतील? अजिबात करणार नाहीत. बाबासाहेब स्वत: च्या लोकांकडे आत्मसन्मानाच्या दृष्टिकोनातून पाहतात त्यामुळे ते त्यांचे आश्रयदाते बनून त्यांची स्वायत्तता  नाकारत नाहीत. उलट ते त्यांच्यावर विश्वास दर्शवून साऱ्या जगाला हे सांगतात की हो येथे शोषकाविरुद्ध ऐतिहासीक युद्ध लढल गेलं होत आणि शोषकाना पराभूत देखील करण्यात आल होत.एखादी गोष्ट फार असंभवनीय आणि अविश्वसनीय वाटली म्हणजे ती दंतकथा किंवा मिथकच असते अस नाही.

(या लेखाची मूळ आवृत्ती इंग्रजी मध्ये RTI च्या वेबसाईटवर १६ जानेवारी २०१८ रोजी प्रकाशित झाली आहे, इंग्रजी मधील लेख मराठीत अनुवादित केल्याबद्दल राहुल बनसोडे यांचे आभार)

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*