सावित्री जोतिबा
नायगाव हे माझे माहेर जुनाट गांव खेडे
तयाचे गीत छान पवाडे..
रामकाली होती माकडे पांडवांचे कोल्हे
पुढे ते रठ्ठवंशी झाले
शिवप्रभूने राज्य स्थापिले कुणबी मराठ्यांचे
स्वराज्य झाले लोकहिताचे
नायगांव खेडे सुखसमृद्धीचे असे
चालवी पाटीलकी कारभारी नेवसे
याच कुळामध्ये मी नारी जन्म घेतसे
अशी जन्मभू मला वंदनीय प्रेम तियेवर जडे
गातसे तिचे गीत चहूकडे..
बारा बलुती बारा अलुती कितीक जाती जमाती
शिवारात या सुखे नांदती
पाऊसपाणी छान पडतसे येति पिके सारी
विहिरीवर फळफुले गोजिरी
गुलजार पक्षी गाती मनोहर फिरती फुलपांखरे
ऐसा निसर्ग तिथे वावरे
बळीराजा थोर होई शेतकरी दानशूर
जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपपुर
आम्ही तयांचे वंशज रडगाणे नच गाणारे
जन्मभूमीही मला सांगते फुले कराया ती
तीच उधळते मी तिजवरती..
~~~
रचयित्री: सावित्री जोतिबा
(काव्यफुले, १८५४)
- तंगलान (Thangalaan) – निवडक रिव्ह्यूस - September 21, 2024
- छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन. - May 18, 2023
- ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा – खुले चर्चासत्र - April 13, 2023
Leave a Reply