क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन आणि कार्य

प्रा. प्रेम चोकेकर

सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831रोजी झाला. वडील खंडोजी सिंदुजी नेवसे पाटील हे फुलमाळी असून त्यांचे घराणे इनामदार होते. सावित्रीमाईना सिंदुजी, सखाराम व श्रीपती असे तीन भाऊ होते.

सावित्रीमाईचा विवाह 1840 साली जोतीबा‌ फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्यांचे वय 9 वर्षे होते तर जोतीबांचे वय होते 13 वर्षे. सावित्रीमाईंची राहणी साधी सरळ होती. अंगावर अलंकार नसत. गळ्यात एक पोत व मंगळसूत्र असे. कपाळावर भले मोठे कुंकू असे. सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान व सडासंमार्जन होत असे. घर नेहमी स्वच्छ व टापटीप असे. स्वत: स्वयंपाक करीत. जोतिरावांच्या खाण्याची व प्रकृतीची काळजी घेत असत.

सगुणाबाई नावाची जोतीबांची विधवा मावसबहीण होती. तीच्या आग्रहामुळे‌ सावित्रीमाईचं शिक्षण 1842 पासून सुरु झालं. शेतीची कामं करतांना आंब्याच्या झाडाखाली जोतीबा त्यांना‌ शिकवित असत.

पुण्यात त्याकाळी मिसेस मिचेलचे क्षिक्षक प्रशिक्षण ‘नाॅर्मल स्कूल’ सुरु होते. त्यामध्ये सावित्रीमाईनी प्रवेश परिक्षा देऊन 1845-46 साली तिस-या वर्षात प्रवेश घेतला. 1846-47 साली चौथे वर्ष पूर्ण करून प्रशिक्षित शिक्षिका म्हणून कृतीशील झाल्या. भारतातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत!

1 जानेवारी 1818 रोजी महापराक्रमी महार योद्ध्यांनी भीमा कोरेगाव येथील युद्धात पेशव्यांचा पराभव केला आणि पेशवाईचा अंत केला. त्यामुळे एका नव्या क्रांतीचा मार्ग सुकर झाला होता. तरीही जनमानसावर मनुस्मृतीचा अंमल कायम होता. ब्राम्हणी सनातन बुरसट विषमतावादी संस्कृतीने जात्यंधतेचा कळस गाठला होता.

अशा काळात सावित्रीमाई एका नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी, एका नव्या क्रांतीसाठी जोतिबांसोबत खांद्याला खांदा लावून सज्ज झाल्या!

स्त्री, शूद्र, पशू आणि ढोल हे सर्व केवळ बडवण्याच्याच लायकीचे असतात, यावर ठाम श्रद्धा असणारा तो काळ.‌ स्त्री व शूद्रातिशूद्रांना कोणताच अधिकार नव्हता. स्त्रिया शिकल्या तर त्यांचे नवरे लवकर मरतात; शिक्षणामुळे स्त्रिया स्वैर व चवचाल बनतात; स्त्री हे पापाचे माहेरघर आहे; स्त्री म्हणजे नरकद्वार, स्त्री म्हणजे पुरुषांची कामवासना भागविणारे साधन अशा प्रकरची मानसिकता असणारा तो काळ! स्त्रिला आशा आकांक्षा असू शकतात, तीला स्वतंत्र व्यक्तीमत्व असू शकते हेच मुळी त्या काळात मान्य नव्हते. हाच धर्म होता. हेच धर्म‌मान्य होते आणि हेच देवमान्य‌ होते!

त्यामुळे पुण्यातल्या कर्मठ भटब्राम्हणांनी सावित्रीमाईंना अतोनात छळले. शिक्षण प्रसार केला म्हणून प्रचंड त्रास दिला. धर्मबुडवी म्हटले. कैदाशीण, सटवी, बाटगी म्हटले. म्हारीण म्हटले. एवढेच नव्हे तर सावित्रीमाई शाळेत जात असत तेव्हा त्यांच्या अंगावर थुंकणे, दगड मारणे, केरकचरा फेकणे, शेणाचा मारा करणे अशा नीच पातळीवर जाऊनही पुण्यातल्या कर्मठ भटब्राम्हणांनी सावित्रीमाईंचा छळ केला!

हे सर्व प्रकार सावित्रीमाईंनी शांतपणे सहन केले. शाळेत जाताना त्या एक साडी पीशवीतून नेत असत. ती नेसून त्या मुलांना शिकविण्यात रममाण होत असत. कंबर कसून त्या भटब्राम्हणांच्या नीच‌ हरकतीं विरोधात ठामपणे उभ्या राहिल्या!

1 जानेवारी 1848 रोजी क्रांतीबा फुले यांनी पूण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. तीथे सावित्रीमाई शिक्षिका म्हणून कृतीशील झाल्या. 1848 ते 1852 या काळात फुले दाम्पत्याने 20 शाळा काढल्या आणि यशस्वीरित्या चालविल्या. 1852 साली शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी मे. कॅण्डी यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम बाग वाड्यात इंग्रज सरकार कडून दोन शाली देऊन फुले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. 12 फेब्रुवारी 1853 रोजी मुलींच्या शाळेचा बक्षिस समारंभ झाला. त्या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

फुले दाम्पत्याने चालविलेल्या शाळांचा दर्जा खूपच चांगला होता. 28 मे 1852 च्या ‘पूना ऑब्झर्व्हर’ या नियतकालिकात एक लेखक म्हणतो,
“जोतीरावांच्या शाळेतील मुलींची पटसंख्या सरकारी शाळांतील मुलींपेक्षा दहापटीने मोठी आहे. त्याचे कारण मुलींना शिकविण्याची जी व्यवस्था आहे ती सरकारी शाळांतील व्यवस्थेपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ दर्जाची आहे……… जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर जोतिबांच्या मुली सरकारी शाळांतील मुलींपेक्षा वरचढ ठरतील…… तर स्त्रियांनी पुरुषांवर मात केली हे पाहून आम्हा पुरुषांना माना खाली घालाव्या लागतील.” फुले दाम्पत्याने चालविलेल्या शाळांचा दर्जा सांगणारी ही पावतीचा होती!

फुले दाम्पत्याने चालविलेल्या शाळेतील एक अकरा वर्षांची मातंग विद्यार्थीनी मुक्ता साळवे (1855) आपल्या निबंधात म्हणते, “लाडू खाऊ ब्राम्हण तर म्हणतात की, वेद ही आमचीच सत्ता‌ आहे. ब्राम्हणेतरांस वेदांचा अधिकार नाही. यांजवरुन जर आम्हांस धर्मपुस्तक पहाण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरे? हे भगवाना, तुजकडून आलेला कोणता धर्म‌ आम्ही स्विकारावा ते लवकर कळव. म्हणजे तेणेप्रमाणे तजवीज करता येईल.”

अशाप्रकारे फुले दाम्पत्याने चालविलेल्या शाळेतील मुलींमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची बौद्धिक क्षमता निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते.

शाळांसाठी योग्य अभ्यासक्रम तयार करण्याचे कार्यही सावित्रीमाईंनी केले.

28 जानेवारी 1853 रोजी जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीमाईंनी त्याचे व्यवस्थापन पाहिले. त्या काळात ब्राम्हण समाजात विधवा स्त्रियांना केशवपन करून विद्रुप केले जात असे व घरातल्या अंधाऱ्या अडगळीच्या खोलीत त्यांची रवानगी केली जात असे. मात्र अनेकदा या स्त्रियांवर अत्याचार केले जात असत. त्यातून जन्माला येणा-या नवजात अर्भकांची हत्या करण्यात येत असे. या अशा स्त्रियांची व त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह कार्यरत होते.

सावित्रीमाईंना मूल नव्हते. 1873 मध्ये काशीबाई या ब्राह्मण विधवेस सावित्रीमाईंनी आत्महत्येपासून वाचविले. तीचे बाळंतपण केले. तीचे मूल दत्तक घेतले. हाच यशवंत होय. त्याला डॉक्टर बनविले.

विधवा स्त्रीयांचे केशवपन करुन त्यांना विद्रुप करण्याची पद्धत ब्राम्हण समाजात होती. त्याविरोधात सावित्रीमाईनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. तसेच ‘विधवा पुनर्विवाह’ घडवून आणणारी संस्था स्थापन केली. ‘प्रौढ शाळा’ सुरु केली. रात्रशाळा सुरू केली. सतीची चाल बंद करण्यासाठी प्रयत्न केले. अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

सावित्रीमाई स्त्रियांना नेहमी समुपदेश करीत. पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे यांच्या सारख्या उच्चशिक्षित स्त्रिया त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी येत असत. सुशिक्षित स्त्रियांमध्ये सावित्रीमाईंबद्दल प्रचंड आदर होता!

28 नोव्हेंबर 1890 रोजी रात्री जोतीबांचे निधन झाले. सावित्रीमाईंवर दु:खाचा डोंगर कोसळला. परंतु सावित्रीमाईंनी न डगमगता जोतिबांचे‌ कार्य नेटाने पुढे चालविले. सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले. इतर संस्थांच्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 1893 साली सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षा झाल्या.

जोतीरावांच्या मृत्यू समयी सावित्रीमाई त्यांच्या जवळ होत्या. जोतीरावांनी आपल्या मृत्यूपत्रात “दहन करु नये. मीठात घालून पुरावे” असे लिहिले होते. त्यासाठी जोतिबांनी स्वत: घरामागे खड्डा खणून ठेवला होता. परंतु महापालिकेच्या नियमात ते बसत नसल्यामुळे अग्नीसंस्कार केला गेला.

वारसाहक्कासाठी अग्नीसंस्काराच्या समयी अनेक नातेवाईक आले. त्यांनी यशवंतला विरोध केला. तेव्हा सावित्रीमाईंनी स्वत: हाती टिटवे धरले आणि स्वत: जोतिबांना अग्नी दिला. भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडत होते!

1893 साली मुंबई मध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली. या प्रसंगी सावित्रीमाईंनी गिरणगावात ( लालबाग) प्रचंड सभा घेतली. या सभेला 60 हजार लोक उपस्थित होते. ( त्यावेळी मुंबईची लोकसंख्या होती सहा लाख!). दंगल शमली. सावित्रीमाईंच्या काळजाला हात घालणा-या शब्दांनी सर्व शांत झालं !!

1896 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. डॉक्टर यशवंतच्या सहाय्याने सावित्रिमाईंनी रुग्णांसाठी मदतकार्य सुरु केले. अशाच एका प्रसंगी एका प्लेगग्रस्त दलित मुलाला आपल्या खांद्यावरून सावित्रीमाईंनी डॉ यशवंतच्या दवाखान्यात आणले. सावित्रीमाईंना प्लेगची लागण झाली. त्यातच दिनांक 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले!

सावित्रीमाईंच्या निधनामुळे एका धगधगत्या कृतीशील क्रांतीकारी व्यक्तीमत्वाचा अस्त झाला तरी त्यांच्या कार्यामुळे त्या क्रांतीज्योती बनून सदैव तेवत राहतील!

आज 190 व्या जयंतीनिमित्त सावित्रीमाईंना विनम्र अभिवादन!!!

( 3 जानेवारी 2021)

प्रा. प्रेम चोकेकर

लेखक सामाजिक कार्यकर्ते असून BASERI (Dr Babasaheb Amebdkar Social and Educational Research Institute) चे संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*